तब्बल ५४ दिवस मुघल सैन्याला थोपवून धरणाऱ्या शिवरायांच्या निष्ठावंत शिलेदाराची गोष्ट!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मराठी स्वराज्य रचण्यासाठी अनेक निष्ठावंतानी योगदान दिलं. शिवाजीराजांना लाभलेल्या या निष्ठावंत सहकार्यांमुळेच स्वराज्याची स्थापना आणि ते टिकवणं शक्य झालं. अशाच निष्ठावंतापैकी एक नाव होतं, फिरंगोजी नरसाळा. चाकणच्या मोहिमेमासाठी इतिहासात अजरामर झालेलं हे नाव!
शहाजीराजांच्या निष्ठावंतांपैकी एक असणारे फिरंगोजी नरसाळा. जेव्हा शहाजीराजांना कर्नाटकात जाण्याचे हुकूम आले त्यावेळेस महाराष्ट्रातील वडिलोपार्जित जहागिरीची सोय लावण्यासाठी त्यांनी खास मर्जीतली, विश्वासू माणसं निवडली. चाकण परगण्यासाठी त्यांनी फिरंगोजी नरसाळा यांची निवड केली.
आदिलशहा आणि मुघल यांच्यात तह झाल्याने चाकण परगणा आदिलशहाच्या ताब्यात गेला. चाकण फिरंगोजीच्या देखरेखीखाली असल्याने फिरंगोजींनाही बादशहाच्या चाकरीत जावे लागले. इ.स. १६४७ साली शिवाजी राजेंनी चाकणवर विजय मिळवत ताबा मिळवला आणि फिरंगोजींनी स्वराज्याची सेवा स्विकारली. चाकणचे किल्लेदार फिरंगोजी किल्ला राखून होते.
१६६०- मुघलांच्या कारवाया चालूच होत्या. महाराज पन्हाळ्यावर अडकलेले होते. या परिस्थितीचा फायदा घेत औरंगजेबाने त्याचा मामा “अमिर – उल- उमराव नवाबबहाद्दूर मिर्झा अबू तालिब उर्फ़ शाहिस्तेखान याला स्वराज्यावर चाल करून जाण्याचे आदेश दिले.
शाहिस्तेखानाची पराक्रमी म्हणून ख्याती होतीच मात्र तो क्रुरकर्मा म्हणून जास्त परिचित होता. नात्याने मामा असणार्या शाहिस्तेखानाचा औरंगेजाबाला तख्त मिळवून देण्यात मोठा वाटा होता. औरंगजेबाच्या खास मर्जीतल्या शाहिस्तेखानाची ७७ हजार घोडेस्वार, ३० हजार पायदळ, हत्ती, ऊंट आणि पेट्या भरभरून खजिना सोबत देऊन या मोहिमेवर रवानगी करण्यात आली.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
सैन्यात उजबेक खान, गिरीधर कुंवर, सय्यद हसन, जाधवराव रायसिंह असे नामवंत सरदार होते. अशा या अफाट फौजेसह शाहिस्तेखानाने जानेवारी १६६० रोजी स्वराज्याच्या दिशेने कूच केली.
या सैन्यात मुघल सरदारांसोबत जी मराठी सरदार मंडळी होती त्यातले जाधवराव हे खरंतर शिवाजी राजेंचे सख्खे मामा. एक मामा स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी झटत होता, तर एक मामा स्वराज्य मिटविणार्याला साथ देत होता ही शोकांतिकाच म्हणली पाहिजे. फुटीच्या शापातून स्वराज्यही वाचले नव्हतेच.
असे हे अफाट सैन्य घेऊन शाहिस्तेखान निघाला. स्वराज्य संपुष्टात आणायचे, तर व्यूहरचना महत्त्वाची आहे हे जाणून त्याने मोहिमांचा सपाटाच लावला. आपल्या अफाट सैन्यापुढे शिवाजी राजांचं तुटपुंजं सैन्य फार काळ तग धरू शकणार नाही याची त्याला खात्री होती.
–
- ‘बहिर्जी नाईक’ या बहुरूपी हेराला शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा का म्हणायचे?
- मुघलांच्या कचाट्यातून हे राज्य एकहाती वाचवणारा एक दुर्लक्षित योद्धा!
–
शाहिस्तेखान मजल दरमजल करत पुण्यात येऊन धडकला. लाल महाल ताब्यात घेऊन त्याने त्याचे इरादे स्पष्ट तर केलेच, पण अल्पावधीतच पुणे परिसरातील किल्ल्यांवर ताबा मिळवायला सुरवात केली.
स्वराज्यात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. शाहिस्तेखानाशी दोन हात करणं सोपं नव्हतं हे राजे आणि त्यांचे विश्वासू जाणून होते. पुणे- गुलशनबाद म्हणजेच आताचे नाशिक, या वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता. पुणे- गुलशनबाद मार्ग जर मोकळा आणि निर्धोक करायचा असेल तर हा भुईकोट किल्ला, संग्रामदुर्ग काबिज करण्याची गरज होती. या मोहिमेवर शाहिस्तेखान जातीनं निघाला. सोबत होता प्रचंड तोफखाना आणि हत्यारबंद फ़ौज.
शाहिस्तेखानाकडे हत्यारबंद सैन्य असले, तरीही शिवाजी महाराजांकडे होतं स्वराज्यावर कमालिची निष्ठा असणारं आणि प्रसंगी जीव पणाला लावणारं सैन्य. भलेही संख्येनं कमी असेल, पण स्वराज्याचा एक मावळा मोगलांच्या शंभरांना भारी होता.
सतत जागरूक रहाणारे मावळे शाहिस्तेखानावरही बारीक लक्ष ठेवून होते. शाहिस्तेखान चाकणवर चालून येणार ही कुणकुण मराठ्यांनाही आधीच लागली होती. फिरंगोजींना हेरांनी ही बातमी पोहचविताच फिरंगोजींनी परिसरातील शेतकर्यांना सावध केलं. जितकं शक्य तितकं धान्य घेऊन गाव सोडून सुरक्षित जागी जाण्याचे आदेश दिले. उरलेलं धान्य ताब्यात घेतलं आणि उभी शेतं जाळून टाकली.
याचा उद्देश हाच, की चाल करून आलेल्या मुघलांना धान्याची चणचण भासून भुकेनं ते त्रस्त व्हावेत. इकडे फिरंगोजींची तयारी चाललेली असतानाच शाहिस्तेखानाने चाकणकडे कूचही केली होती.
किल्ले संग्रामदूर्ग- हा भुईकोट किल्ला म्हणजे खरंतर गढीच होती. दोनचारशे हशम राहू शकतील इतकाच काय तो तिचा अवाका, पण याचं महत्त्व तितकं होतं कारण हा स्वराज्याचा सीमेवरचा किल्ला होता. महाराजांनी याठिकाणी भरपूर रसद आणि दारुगोळा ठेवला होता. किल्लेदार फिरंगोजी डोळ्यात तेल घालून सख्तपणे किल्ल्याची राखण करत होते. शाहिस्तेखान आज ना उद्या चाल करून येणार हे जाणून तयारी होतीच.
बघता बघता शाहिस्तेखानाची फौज चाकणला येऊन दाखल झाली. किल्ल्याचा छोटा जीव बघून शाहिस्तेखान मनोमन खुश झाला. ही लहानशी गढी तर खेळता खेळता दोन चार दिवसात सर करू असा आत्मविश्वास त्याला होता.
खानाने किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याच्या दिशेने तोंड करून तोफा सज्ज केल्या. खानाचे हुकूम सुटल्याबरोबर तोफांचे गोळे किल्ल्याच्या तटबंदीवर जाऊन आदळू लागले आणि भिंती हादरवू लागले. पहिलाच हल्ला प्रचंड उन्मादी उत्साहात केला, मात्र हा पहिलाच हल्ला मराठी सेनेनं जोरदारपणे परतवून लावला.
खानाच्या दारूगोळ्यांना मराठी सैन्यानं दारूचे बाण सोडून उतर दिलं. खानाचं सैन्य या मोठमोठ्या बाणांनी हैराण झालं. दोन चार दिवसात किल्ला सर होईल हा खानाचा अंदाज साफ चुकला आणि दोनाचे चार, चारचे आठ, दहा दिवस झाले, तरी किल्ला हाती येण्याची काही चिन्हं दिसेनात.
खानानं आता व्युहरचनेतला पुढचा फासा फेकला. त्याने किल्ल्याला चोहोबाजूंनी वेढा दिला. जेणेकरून किल्ल्याला रसद मिळू नये आणि आतला दाणा-गोटा संपला, की किल्ला आपसूक ताब्यात येईल.
इकडे ही अचूक रचना केलेली होती. मोक्याच्या आणि अचूक जागी त्यांनी बंदुकधारी आणि तिरंदाज बसवले होते. त्यांच्या या अचूक मार्यामुळे खानाच्या सैन्याला किल्ल्याच्या जवळ येणंही कठीण बनलं होतं. वैतागून खानान धमधमे रचले आणि त्यावर तोफा चढवल्या, जेणेकरून तोफ़ांचा पल्ला लांबेल. याचाही फार काही फायदा झालाच नाही आणि खान पिसाळला.
इकडे खानाला जेरीस आणलेल्या मराठी सैन्याने त्याला आणखीन सळो की पळो करून लावण्याचे बेत केले. रात्री गाढ झोपलेल्या मुघली सैन्यावर किल्ल्यातून मांजराच्या पावलाने बाहेर पडलेल्या मराठी सैन्याने हल्लाबोल केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने मुघली सैन्यात गोंधळ माजला.
–
- १९ व्या वर्षी शरीरावर १५ गोळ्या झेलून देखील टायगर हिल वाचवणारा ‘शूर सुभेदार’!
- छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?
–
मुघली छावण्यात घुसून शक्य तितके नुकसान करून आल्या पावली परत फिरणे हा व्यूह मराठ्यांनी रचला. हा प्रकार अनेक रात्री चालू राहिला. खानाचं सैन्य आता खरंच बेजार झालं होतं. महिना उलटून गेला, तरीही किल्ला हाताशी लागण्याची चिन्हं दिसेनात. अशातच एक दिवस शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून पुण्यात सुखरूप पोहोचल्याची बातमी येऊन थडकली.
या बातमीने चवताळलेल्या खानाने आता आक्रमक होण्याचा निर्णय घेतला. किल्ल्याच्या नैऋत्येकडील बुरुजाखाली गुप्तपणे भुयार खोदून त्यात सुरुंग पेरण्याचा निर्णय त्यानं घेतला. बुरूज उडवून देऊन किल्ल्यात प्रवेश मिळवायचा त्याचा बेत होता. त्यानुसार मराठी सैन्याला खबर लागू न देता गुप्तपणे कामही चालू झालं आणि मराठी सैन्य बेसावध असतानाच ५५ व्या दिवशी ठरल्यानुसार खानानं बुरूज उडवला.
किल्ल्याला खिंडार पडलं. किल्ल्याची बुरूजावर राखण करणारं सैन्य हवेत फेकलं गेलं. खिंडारातून मुंगळे सुटल्यासारखं खानाचं सैन्य आत घुसलं. मात्र अशाही परिस्थितीत मराठे डगमगले नाहीत. हर हर महादेव करत त्वेशानं खानाच्या सैन्यावर सपासप वार करत ते तुटून पडले. संबंध दिवसभर रण माजलं.
दोन्हीकडचं सैन्य शर्थीनं परस्परांना भिडलं होतं. फिरंगोजींनी पराक्रमाची शर्थ केली. यात मराठ्यांचं बरचं सैन्य मारलं गेलं मोगलांचे दोनएकशे सैनिक मारले गेले.
दुसरा दिवस उजाडला. मुघली सैन्य चवताळून आत घुसतच राहिलं. परिस्थिती गंभीर झाली. प्रसंग बाका होता. फिरंगोजींनी काळाची गरज ओळखली. याहून जास्त नुकसान करवून घेण्यात शहाणपण नव्हतं हे जाणून भावसिंगच्या मध्यस्थिनं खानाशी तह करून उरलेलं सैन्य सुखरूप बाहेर काढलं.
हा दिवस होता १५ ऑगस्ट १६६०. किल्ला हातून गेल्याचं दु:ख फिरंगोजींना छळत असलं आणि अन्न गोड लागत नसलं, तरीही शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करत त्यांना भूपाळगडाची किल्लेदारी दिली.
फिरंगोजींच्या पराक्रमाचं खुद्द खानानं कौतुक करून त्यांना आपल्या सैन्यात सामिल होण्याचं सुचवलं. मात्र फिरंगोजींनी तडफ़दारपणे याला नकार देत स्वराज्याच्या सेवेलाच वाहून घेतलं.
त्यानंतर दिलेअखानानं भूपाळगडावर चाल केली. ही मोहिमही बरेच दिवस चालली. अखेरीस दिलेरखानानं चाल चालली आणि शंभुराजेंना पुढे केलं. उद्देश हा की शंभुराजे समोर आले तर फिरंगोजीं हल्ला करणार नाही. घडलंही तसंच. फिरंगोजींनी तोफ़ा चढवून तिला बत्ती देण्याचे आदेश दिले, पण खाली पहातो तर काय? साक्षात युवराज चाल करून येत होते.
धन्यावर तोफ़ेचा गोळा डागणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. १७ एप्रिल १६७९ या दिवशी त्यांनी गडाचे दरवाजे उघडून गड मुघलांच्या स्वाधीन केला. शंभुराजांनी याबदल्यात सर्व मराठी सैनिक मोकळे करून त्यांना स्वराज्यात परतण्याचं स्वातंत्र्य दिलं. फ़िरंगोजी आणि सबनीस महाराजांकडे आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत दिला.
हे सर्व ऐकून महाराज प्रचंड संतापले. समोर शत्रू म्हणून युवराज असो, की आणखीन कोणी, स्वराज्यासाठी तोफ़ेचा गोळा चालवणे हाच पर्याय असताना तुम्ही तोफ़ा का डागल्या नाहीत? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
या प्रकरणानंतर कदाचित फिरंगोजींस शिक्षा झाली असावी कारण त्यानंतरच्या इतिहासात फिरंगोजींचा नामोल्लेखही नाही. त्याचं घरदार, गाव, कुटुंब, वशंज यांची काहीच माहिती आज उपलब्ध नाही. त्याचीसमाधी कुठे असल्याचे उल्लेख नसले,तरी स्वराज्याचा निष्ठावंत म्हणून फिरंगोजींचं नाव अजरामर आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.