पुण्यातील १७ पेठा, प्रत्येक नावामागचा स्वतंत्र इतिहास माहित करून घ्यायलाच हवा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
पुणे तिथे काय उणे….ही म्हण जगजाहीर आहे. विद्येचं माहेरघर असलेलं पुणं. आयटी पार्क म्हणून ठळकपणे दिसून येणारं पुणं.. पुणेरी पाट्या.. पाट्यांवरुन केलेले विनोद, एक ते चार विश्रांतीची वेळ म्हणून त्यावरुन झालेली खेचाखेची..किती आणि काय काय!
शिवरायांचं बालपण गेलं ते इथंच. इथंच त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली. पेशवाईची साक्ष देणारा शनिवारवाडा…टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव, ते मानाचे गणपती, अफाट देखावे..अचाट मिरवणुका.. असा देदीप्यमान इतिहास असलेल्या पुण्याची काय काय म्हणून वैशिष्ट्ये सांगावीत!
या सगळ्यांसोबत अजून एक पुणेरी वैशिष्ट्य म्हणजे पुण्यात असलेल्या पेठा! या पेठांना त्यांचा त्यांचा स्वतंत्र इतिहास आहे. त्यांची स्वतंत्र ओळख आहे. कितीतरी प्रसंगांची साक्ष देतात या पेठा. आज या पेठांची ओळख करून घेऊ.
पुण्यात एकूण १७ पेठा आहेत. प्रत्येक पेठ आपली वेगळी ओळख घेऊन उभी आहे. प्रत्येक पेठ ही मराठे आणि पेशव्यांच्या काळात उभी केली होती. यापैकी सात पेठांची नांवे वारांवरुन ठेवली आहेत, तर उरलेल्या पेठांची नांवे त्या काळातील दरबारात काम करणाऱ्या कर्तबगार लोकांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत.
१. कसबा पेठ-
१४ व्या शतकात उभा केलेला हा पुण्यातील सर्वात जुना भाग. इथेच लालमहाल आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला कसबा गणपती कसबा गणपती आहे. ही पेठ चालुक्यांच्या काळात उभी राहिली आहे.
२. सोमवार पेठ
त्रिशुंड म्हणजे तीन सोंडेचा गणपती असलेलं पेशवेकालीन गणपती मंदिर इथं आहे, पण पूर्वी याची शाहपुरा अशी ओळख होती आणि बँका अस्तित्वात येण्यापूर्वी पैसे उधार उसनवार द्यायचं काम इथं चालायचं. मजेचा भाग म्हणजे पैसा उसने देणारे लोक गोसावी म्हणून ओळखले जात.
३. मंगळवार पेठ
पूर्वी या भागाला शाईस्तेपुरा म्हणत. आता इथं वाहनांची खरेदी विक्री होते. येथे आठवड्यातील दोन दिवस जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीचा बाजार भरतो.
४. बुधवार पेठ-
पुण्यातील अतिशय गजबजून गेलेला भाग म्हणजे बुधवार पेठ. औरंगजेबाने या भागाचं नांव मोहिताबाद ठेवलं होतं, पण बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्यांनी ही पेठ वसवून हिचं नाव ठेवलं बुधवार पेठ. श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट इत्यादी ठिकाणे बुधवार पेठेत मोडतात. याच पेठेत देहविक्रय व्यवसाय चालतो. याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बुधवार पेठ अधिक लोकप्रिय आहे.
५. गुरुवार पेठ
१७३० साली अस्तित्वात आलेली ही पेठ आधी विठ्ठल पेठ म्हणून ओळखली जायची. कारण इथं विठ्ठलाचं मंदिर होतं. हत्तीच्या झुंजीसाठी ही पेठ प्रसिद्ध होती.
६. शुक्रवार पेठ
पूर्वी ही पेठ विसापूर या नावाने ओळखली जायची, पण बाळाजी विश्वनाथ यांनी १७३४ मध्ये जीवाजीपंत खासगीवाले यांच्या मदतीने ही पेठ उभारली. आजही या पेठेत महात्मा फुले भाजी मंडई आहे.
===
हे ही वाचा : पुणे तिथे काय उणे : या सुप्रसिद्ध झणझणीत मिसळींचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच हवा!
===
७. शनिवार पेठ
प्रसिद्ध वास्तू शनिवारवाडा ही याच पेठेत आहे. मुस्लिम कारभारात हा भाग मूर्तूजाबाद या नांवाने ओळखला जायचा, पण पेशव्यांच्या काळात याचे नांव शनिवार पेठ करण्यात आले.
८. रविवार पेठ
मलकापूर हे नांव असलेला हा भाग नंतर रविवार पेठ म्हणून ओळखला जाऊ लागला. इथे सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी विक्री होते. तसंच इथं लक्ष्मीनारायण मंदिर आणि राम मंदिर प्रसिद्ध आहेत. आता प्लॅस्टिकची मोठी बाजारपेठ इथं आहे.
९. सदाशिव पेठ
पेशव्यांचे भाऊ आणि पानिपत युद्धाचे नायक सदाशिवराव भाऊ जे १७६१ साली युद्धात कामी आले, यांच्या स्मरणार्थ ही पेठ उभारली. इथे विश्रामबागवाडा, सारसबाग यासह अन्य अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
१०. नाना पेठ
पेशवाईतील अत्यंत मुत्सद्दी आणि हुशार अशा नाना फडणवीस यांच्या स्मरणार्थ निहाल पेठेचं नांव नाना पेठ असं केलं. होलसेल किराणा मालाची बाजारपेठ इथे आहे, तसंच आॅटोमोटीव्ह स्पेअर पार्ट्सचा मोठा व्यापार इथे चालतो. टू व्हीलरचे सर्व स्पेअर पार्टस या भागात मिळतात.
११. गणेश पेठ
सवाई माधवराव पेशव्यांनी ही पेठ १७५५ मध्ये उभारली. गणपतीच्या नांवाने गणेश पेठ असं या पेठेचं नांव ठेवलं.
१२. भवानी पेठ
१८६३ मध्ये भवानीमातेचं मंदिर इथं बांधलं गेलं. आणि त्यावरुनच या पेठेचं नांव भवानी पेठ असं ठेवलं. पूर्वी इथं बोरांची खूप झाडं होती. याला बोरवन असं म्हणत ,पण आता ही भवानी पेठ लाकडी, स्टील आणि हार्डवेअरची मोठी बाजारपेठ आहे.
१३. घोरपडे पेठ
पेशव्यांचे पराक्रमी सरदार घोरपडे यांच्या स्मरणार्थ ही पेठ बनवली आहे, पण आता हा भाग रहिवासी क्षेत्र आहे.
===
हे ही वाचा : पुणेकरांच्या या विचित्र तऱ्हा वाचून गंमत वाटेल, पण हा माज नाही, तर…
===
१४. नारायण पेठ
नारायणराव पेशवे यांनी १७७३ मध्ये ही पेठ उभारली. नारायण पेठेत गायकवाड वाडा या इमारतीत टिळकांनी आपलं केसरी हे मराठी वर्तमानपत्र सुरू केलं होतं. ही इमारत आता केसरी वाडा नावाने ओळखली जाते.
१५. गंज पेठ
सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात मुजफ्फरगंज हे एक व्यवसाय केंद्र होतं. नंतर याचं नांव गंज पेठ केलं. आता महात्मा फुले पेठ या नावाने ही पेठ ओळखली जाते.
१६. नवी पेठ
पुण्यातील सर्वात नवी पेठ म्हणजे ही ब्राह्मण पेठ.. नवी पेठ. लाल बहादूर शास्त्री मार्गाशी जोडलेली ही पेठ ही सगळ्या पेठातील नवीन पेठ. म्हणून या पेठेचं नांव नवी पेठ.
१७. रास्ता पेठ
१७७६ मध्ये ही पेठ शिवपुरी म्हणून ओळखली जायची. पेशव्यांचे सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या स्मरणार्थ रास्ता पेठ असं या पेठेचं नामकरण केलं.
अशा या पुणेरी पेठा आणि त्यांचा हा इतिहास!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.