Site icon InMarathi

बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडच्या गटबाजीला बळी पडलेल्या या बहारदार संगीकाराला एकही फिल्मफेअर मिळाला नाही!

“तू जहाँ जहाँ चलेगा..मेरा साया साथ होगा” हे गाणं कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो तो सुनील दत्त आणि साधना यांचा चित्रपट मेरा साया! आजही हा सिनेमा म्हणजे जुन्या क्लासिक्सपैकी अव्वल दर्जाचा सिनेमा मानला जातो!

या सिनेमाला संगीत दिलं ते मदन मोहन कोहली या संगीतकाराने. मदन मोहन हे भारतीय चित्रपटसृष्टीत अदबीने घेतलं जाणारं नाव!

 

 

सिनेसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले ज्यांच्याविषयी कधीच वाईट बोललं किंवा लिहिलं गेलं नाही. मुकेश, मोहम्मद रफी, तलत मेहमुद यांच्यापैकीच एक नाव म्हणजे मदन मोहन!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजच्या पिढीला चटकन त्यांची गाणी आठवणार नाहीत, पण मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकून ते किती प्रतिभावान होते याची प्रचिती येईल. कोणताही कलाकार जेव्हा त्याच्या कलाकृतीने ओळखला जातो तेव्हा हा त्याच्या कार्याचा खरा गौरव असतो.

मदन मोहन यांची गाजलेली अजून गाणी सांगायची तर “कर चले हम फिदा… जान-ओ-तन साथीयो… ” हे गाणे म्हणजे बॉलीवूडच्या इतिहासातील मैलाचा दगड आहेत.

देशप्रेमावर कित्येक गाणी झाली असतील, पण हे गाणं ऐकलं नाही असा एकही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी आपण कधीच अनुभवला नसेल.

मोहम्मद रफी या मखमली आवाजाच्या गायकाचा सुवर्णकाळ हा मदन मोहन यांच्या संगीतानेच सजलेला होता. आजही मोहम्मद रफी यांच्या आवाजातील “तुम जो मिल गये हो…” हे गाणं प्रत्येकाला आवडतं. हे गाणं सुद्धा मदन मोहन यांनीच संगीतबद्ध केलं होतं.

किशोर कुमार यांच्या सर्वात मोठ्या हिट्स पैकी एक “जरूरत है, जरूरत है…कलावती की” हे सुद्धा मदन मोहन यांचीच रचना आहे. हे गाणं यासाठी पण महत्त्वाचं आहे, की हे गाणं सर्वात पहिलं ‘रिमिक्स’ झालेलं गाणं आहे.

 

 

===

हे ही वाचा – जत्रेत २५ पैश्यांसाठी गाणं गाणारा मुलगा जेव्हा प्रचंड मेहनतीने देशाचा सर्वात लाडका आवाज होतो…

===

लता मंगेशकर यांच्या आवाजातील “लग जा गले…” हे सुद्धा गाणं मदन मोहन यांचीच रचना आहे. वय कोणतंही असो, या गाण्याची सुरुवात झाली आणि कोणी ‘अहाहा’ म्हटलं नाही असं फार क्वचित होईल.

याशिवाय, आशा भोसले यांनी गायलेलं ‘झुमका गिरा रे…’ हे गाणं सुद्धा त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकी एक आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी चांगली गाणी देणाऱ्या ‘मदन मोहन कोहली’ या संगीतकाराला ६०-७० च्या दशकात एकही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नव्हता. “गुणवत्ता, दर्जा म्हणजे अजून काय असतं?” असा प्रश्न कोणालाही हे वाचल्यावर नक्कीच पडेल.

मदन मोहन यांच्या ट्युन्सची गोडी इतकी अवीट आहे की, त्यांनी ५० वर्षांपूर्वी तयार केलेलं गाणं हे ‘तेरे लिये हम है जिये…’ या रुपात आपण २००३ मध्ये ‘वीर – झारा’ या सिनेमात ऐकलं होतं.

यश चोप्रा यांच्याकडे ही ट्यून मदन मोहन यांनी खूप आधी देऊन ठेवली होती. ज्यावर हे गाणं मदन मोहन यांच्या पश्चात तयार करण्यात आलं.

 

 

इतकी सुंदर गाण्याची रचना करणाऱ्या ‘मदन मोहन कोहली’ यांचं वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झालं. त्यांचा मुलगा संजीव कोहली यांनी यशराज बॅनर मध्ये बराच काळ काम केलं आहे!

आपल्या वडिलांच्या कामाबद्दल एका मुलाखतीत बोलतांना संजीव कोहली सांगतात की –

“माझ्या वडिलांचं कौतुक हे त्यांच्या हयातीत कधी झालंच नाही. त्यांच्या जाण्यानंतर मौसम हा सिनेमा सिल्व्हर ज्यूबली झाला. लैला मजनू हा सिनेमा गोल्डन ज्यूबली झाला. ‘कोई पतथर से ना मारो मेरे दिवाने को’ हे गाणं बिनाका गितमाला वर ११ आठवडे नंबर १ क्रमांकावर होतं.”

पुढे पुरस्काराविषयी बोलताना ते असं म्हणाले की –

ते काम करत असताना मात्र त्यांना पूर्ण इंडस्ट्रीने नेहमीच दुर्लक्षित केलं. आम्ही बघायचो की कितीतरी साध्या गाण्यांना बेस्ट म्युझिकचा फिल्मफेअर पुरस्कार दिला जायचा आणि आम्ही प्रत्येक पुरस्कार सोहळ्यातून नेहमीच रिकाम्या हाती घरी परतायचो.”

संजीव कोहली पुढे सांगतात की, “माझे वडील हे दर रविवारी आम्हाला पोहण्यासाठी घेऊन जायचे आणि स्वतः स्विमिंग पूलच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बसायचे आणि ट्यून गुणगुणायचे आणि घरी परत आल्यावर ती ट्युन रेकॉर्ड करून ठेवायचे.

शाळेत असतांना आम्ही शाळा बुडवून म्युझिक स्टुडिओमध्ये जायचो. तिथे आम्ही कंट्रोल रूम मध्ये बसून लताजी आणि मोहम्मद रफी यांच्या गाण्याची रेकॉर्डिंग बघायचो.”

 

 

१९५०-६० या दशकात मदन मोहन यांच्या व्यतिरिक्त नौशाद, एस डी बर्मन, शंकर जयकिशन हे संगीतकार काम करत होते.

जणू असं एक समीकरण होतं की, एस डी बर्मन – देवानंद सोबत काम करायचे, नौशाद हे दिलीप कुमार सोबत आणि शंकर जयकिशन – राज कपूर च्या बॅनर सोबत काम करायचे. त्या काळातील सगळे पुरस्कार हे या संगीतकारांनाच मिळायचे.

मदन मोहन यांना मोठे बॅनर मिळत नव्हते. त्यांची गाणी हिट व्हायची. पण, सिनेमे हिट व्हायचे नाहीत.

त्या काळात सिनेमा हिट, तरच संगीत पुरस्कार ही सुद्धा एक विचित्र पद्धत असायची. इतकी हिट गाणी असूनही मदन मोहन यांना फक्त अनपढ (१९६२) साठी नामांकन देण्यात आलं होतं.

 

 

एकदा मदन मोहन हे त्यांच्या परिवारासोबत कार मध्ये प्रवास करत होते. एक पोलीस ऑफिसर मदन मोहन यांची गाडी ओळखत होते. त्यांची गाडी मदन मोहन यांच्या मागे होती. पोलिसांनी हॉर्न वाजवून गाडी बाजूला घ्यायला लावली.

पोलीस खाली उतरले आणि मदन मोहन यांना येऊन म्हणाले की, “मदन जी, तुमचं गाणं ‘आप की नजरोने समझा…’ मला प्रचंड आवडतं.” मदनजींनी त्यांच्या पत्नीकडे बघितलं आणि म्हंटले, “ये मेरा अवॉर्ड है.”

१९६६ मध्ये ‘मेरा साया’ साठी मदन मोहन यांना फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन मिळालं होतं, पण अवॉर्डच्या एक महिन्याआधी ते नामांकन काढून टाकण्यात आलं होतं. कारण, कुणालाच माहीत नाही!

फिल्मफेअर हा त्या काळातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जायचा. तो नाही मिळाला म्हणून मदन मोहन यांनी १९७२ रोजी ‘दस्तक’ या सिनेमा साठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला होता. पण, तो स्वीकारण्यासाठी मदन मोहन यांनी जाण्याचं टाळलं होतं.

६० च्या दशकाच्या शेवटी नवीन संगीतकार हे स्पर्धेसाठी हजर होते. आर डी बर्मन, लक्ष्मीकांत – प्यारेलाल, कल्याणजी – आनंदजी या प्रत्येक जोडीकडे एकाच वेळी ४० सिनेमे असायचे.

===

हे ही वाचा – बॉलिवूडला खडेबोल सुनावणारा, लतादींकडून एकही गाणं गाऊन न घेणारा संगीतकार!

===

 

कित्येक वेळेस गाणं चांगलं तयार असूनही एक तर गायकांना वेळ नसायचा किंवा स्टुडिओ उपलब्ध नसायचे. संघर्ष हा प्रत्येक क्षेत्रात आहे, पण तुम्हाला जाणीवपूर्वक बाजूला करण्यात येत आहे ही भावना काही दिवसांनी साहजिकच मदन मोहन यांच्या नाराजीचं कारण झालं होतं.

२५ जून १९२४ रोजी मदन मोहन यांचा बगदाद येथे जन्म झाला होता. त्यांचे वडील चून्नीलाल हे मिडल ईस्टमध्ये काम करायचे. १९३२ मध्ये कोहली परिवार भारतात आला.

चुन्नीलाल हे मुंबईच्या फिल्मीस्तान स्टुडिओ आणि बॉम्बे टॉकीज मध्ये पार्टनर होते. मदन मोहन १९४३ मध्ये आर्मीत नोकरी करत होते, पण संगीताची आवड लक्षात येऊन त्यांनी पूर्ण वेळ संगीतकार होण्याचा निर्णय घेतला होता.

काही काळ त्यांनी ऑल इंडिया रेडिओ सोबत सुद्धा काम केलं होतं. गायक, संगीतकार यांच्या मुलाखती घेऊन मदन मोहन यांना गाणे, गझल्स कशा तयार होतात याचं ज्ञान मिळत होतं.

मुंबईमध्ये जोधा बाई (नर्गिस यांच्या आई) यांच्या शेजारी रहात असतांना त्यांच्या घराबाहेर उभं राहून मदन मोहन यांनी संगीताचे धडे गिरवले होते.

गझल्सची आवड असलेल्या मदन मोहन यांनी पुढे जाऊन ‘आपकी नजरो ने समझा…’ सारख्या कित्येक चांगल्या गझल्सची रचना केली होती.

 

 

२५ वर्षांच्या संगीत करिअर मध्ये मदन मोहन यांनी १०० पेक्षा अधिक सिनेमांना संगीत दिलं होतं आणि ६०० पेक्षा अधिक गाणी संगीतबद्ध केली. इतक्या गाण्यांपैकी एकही गाण्याला किंवा सिनेमाला पुरस्कार न मिळणे हे अन्यायकारक वाटतं.

कौतुक होण्यासाठी जरी कोणी काम करत नसलं, तरीही एक कौतुकाची थाप ही प्रत्येक कलाकाराला हवी असते. मदन मोहनसारख्या संगीतकाराला पुरस्कार न मिळणं हे खरंतर पुरस्काराचं सुद्धा दुर्भाग्य म्हणावं लागेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version