आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – दत्ता जोशी
===
अयाेध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहात आहे. सुमारे दीड हजार वर्षे टिकेल अशी ही भव्य निर्मिती व्हावी, या दृष्टीने बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्याचे नियाेजन करीत आहेत. समस्त हिंदू समाजाचे अनेक शतकांचे हे स्वप्न साकारत आहे, याचा अभिमान आहेच.
पण जन्मभूमीवरील मंदिर उभारणीच्या संदर्भातील निधी संकलनाच्या बाबतीत मागचे काही दिवस दिसत असलेले चित्र मला थाेडेसे चिंतित करणारे आहे. या निधीसंकलनाबाबत, त्याच्या विनियाेगाबाबत माझ्या मनात कसलीही शंका नाही.
कारण या सर्व गाेष्टींच्या मुळाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे आणि त्यामुळेच तेथे कसलेही न्यून राहणार नाही या विषयी मला माझ्या स्वतःपेक्षाही जास्त खात्री आहे.
माझी चिंता आहे ती या संकलनातील निधीच्या चढ्या आकड्यांच्या ग्लाेरिफिकेशनची.
या देशातील सामान्य माणसाचे स्वप्न साकारणारी ही चळवळ सामान्य माणसांच्या हातूनच पूर्णत्वास जाणार आहे आणि या सामान्य माणसाला देणगीचे सामान्य आकडेच परवडणारे आहेत.
मागे स्वामी विवेकानंद शिलास्मारकाच्या निर्मितीत 2-5 रुपयांचे याेगदान देणारे आणि श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदाेलनातही 5-10-20 रुपयांचे याेगदान देणारे सामान्य जीव आजही त्या गाेष्टींचा अभिमान बाळगतात. त्याची आठवण आजही उराशी जपतात.
पण आता एक लाख, दाेन लाख, पाच लाख, दहा लाख, एक काेटी असे आकडे टाकलेले धनादेश माेठ्या हिरीरीने फेसबुक व साेशल मिडियावर झळकू लागले तसा माझ्यातील सामान्य माणूस आणि स्वयंसेवक अस्वस्थ हाेऊ लागला आहे.
हे स्वप्न धनिकांचे की श्रमिकांचे? सामान्यांचे की कराेडपतींचे?
कुणाला लाखाेंचे याेगदान द्यावेसे वाटते आहे, हा त्यांच्या इच्छेचा आणि क्षमतेचा प्रश्न आहे. त्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यावर माझा अजिबात आक्षेप नाही.
मा. राष्ट्रपती श्री. रामनाथ काेविंद यांनी वैयक्तिक खात्यातून पाच लाखांची देणगी दिली, ही बाब नक्कीच आदर्शवत आणि राष्ट्रप्रमुखांच्या श्रद्धेला अधाेरेखित करणारी आहे, हे अभिमानास्पद आहे. अन्य अनेकांनी आपापल्या क्षमतेनुसार किंवा श्रद्धेपाेटी क्षमतेपलिकडे जाऊन सहा आकड्यांच्या देणग्या दिल्या, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
पण या आकड्यांच्या प्रसिद्धीतून आपण सर्वसामान्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करीत आहाेत का? मला वाटते, यावर विचार करण्याची वेळ या अभियानाच्या पहिल्या काही दिवसांतच आली आहे.
या देशातील सामान्य माणसाची दानत अकल्पनीय आहे. हेतू शुद्ध आणि पवित्र असतील तर हजाराे काेटी रुपये पाहता पाहता जमा हाेतात. ते यावेळीही हाेतील कारण हे काम रामाचे आहे. ते भव्य दिव्य हाेणारच.
पण हे करताना या आकड्यांचे ग्लाेरिफिकेशन तर हाेत नाही ना, `हा धनिकांचा खेळ आहे` असा संदेश तर समाजात जात नाही ना, याची काळजी कार्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे.
श्रीरामाच्या श्रद्धेपाेटी आपली दिवसाची कमाई अर्पण करणारा हातगाडीवाला, ओझी वाहणारा भारवाहक, हातावर पाेट असणारा सायकल रिक्षावाला, दिवसभर कष्ट केल्याशिवाय रात्री चूल न पेटणारा मजूर यांचा सुद्धा निधी श्रीरामचरणी अर्पण हाेणार आहे.
ताे देताना त्यांच्या मनात माेठ्यांच्या माेठ्या आकड्यांची भीती निर्माण हाेणार नाही, याची काळजी घेणे कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ठरणार आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.