केवळ ८० रुपयांत चक्क घर? एका सरकारची धमाकेदार योजना!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“एक हजार रुपये भरा आणि घराचा ताबा मिळवा” अशा कित्येक जाहिराती आपण रोज पेपरमध्ये बघत असतो. मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट इतक्या वेगळ्या परिस्थितीतून जात आहे, की नवीन ग्राहक मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जाऊ शकते हे आपण जाणतोच.
कोणत्याही वस्तू किंवा सेवेची जाहिरात करतांना खरं तर पूर्ण माहिती देणं कधीही चांगलं असतं. काही जाहिराती व्यवस्थित असतात, पण काही जाहिरातींच्या उजव्या कोपऱ्यात एक छोटा स्टार मार्क असतो जो बघून घेणं कधीही चांगलं असतं.
एक अशीच ऑनलाईन जाहिरात सध्या खूप फिरत आहे. “इटलीमध्ये घर घ्या, तेही १ डॉलरमध्ये…” कित्येक लोकांनी ही जाहिरात बघून पुढच्या सुट्टीत जाऊन घर बघण्याचे मनसुबे सुद्धा केले असतील. जाहिरात आहेच तशी.
१ डॉलर म्हणजे साधारणपणे ८० रुपयात आपल्याकडे एक फरशीही मिळत नाही आणि जाहिरातीत पूर्ण घर त्या किमतीत मिळतांना दिसतंय. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात.
झुंगोली आणि मुसोमेली ही इटली मधील दोन गावं आहेत. या गावातील काही घरमालकांनी आपली घरं विक्रीला काढली आहेत. किंमत आहे फक्त १ डॉलर किंवा १ युरो. हीच परिस्थिती आसपासच्या गावांची सुद्धा झाली आहे. ट्रोईना हे गाव सुद्धा काही दिवसांपूर्वी या यादीत समाविष्ट झालं आहे.
स्वच्छता आणि घराची रचना इतकी टुमदार आहे, की फोटो बघून आपल्याला ते गाव वाटत नाही. लाल रंगाचे घर, पेव्हर ब्लॉक्स टाकलेले रस्ते…एखाद्या सिनेमाचा सीन शुट करता येईल अशी उतारावरची घरं हे या गावातील घरांचं वर्णन सांगता येईल.
२०१५ मध्ये झुंगोली हे गाव इटलीचं सर्वात सुंदर गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं, पण मधल्या काही वर्षात या गावातील सगळेच लोक आपलं राहतं घर सोडून शहराच्या दिशेने गेले आहेत. अतिप्राचीन असलेली ही अख्खी गावं रिकामी होत आहेत.
जसा काही जाहिरातींमध्ये “अटी लागू” असा ‘स्टार मार्क’ असतो, तसा तो इथेही आहे. इथल्या बहुतांश घरांची आतून पडझड झालेली आहे. कोणतंही घर तुम्ही आज विकत घेतलं आणि उद्या रहायला गेलो असं होऊ शकत नाही. बाहेरून टुमदार दिसणारी ही घरं आतून अशा परिस्थितीत आहेत, की त्यांना पूर्ववत करण्यासाठी कमीत कमी ३ वर्ष लागतील आणि खर्च लागेल किमान २५,००० डॉलर्स.
‘१ डॉलरमध्ये घर…’ ही जाहिरात जेव्हा सर्वात पहिल्यांदा प्रकाशित झाली, तेव्हा एका जाहिरातदाराला त्याच्या घरांसाठी जवळपास ५००० लोकांचे फोन आले.
एक आजी तर मेलबर्न, ऑस्ट्रेलिया वरून इटलीला जाऊन पोहोचल्या. घर बघितलं, व्यवहार करायच्या आधी त्यांना हे सांगण्यात आलं, की घराची मूळ किंमत १ डॉलर असेल आणि घराच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला १७,००० डॉलर्स भरावे लागतील.
झुंगोली या गावात जर घर घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्यासोबत २,००० युरो इतकं सिक्युरिटी डिपॉजीट भरावं लागेल. त्याशिवाय, इतर देशातील नागरिकांना कोणतीही सर्विस घेण्यासाठी ४०० युरो फी या गावांमध्ये आकारली जाते. इतका सगळं खर्च करायची तयारी असेल तर ही डिल चांगली आहे.
झुंगोली आणि मुसोमेली या गावातील घरांच्या जाहिराती तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा तिथले महापौर सबेस्टिनो फॅबीओ वेनेझिया यांनी या कामात अर्थसहाय्य करायचं ठरवलं. तुम्ही जर ट्रोईना गावात कायमचं शिफ्ट होण्याचं ठरवणार असाल, तर तुम्हाला ८००० युरोचं अर्थसहाय्य करण्यात येईल आणि असं घर देण्यात येईल ज्याला कोणत्याही सुधारणेची गरज नाहीये.
ट्रोईना मध्ये घर घेण्याचे इतरही फायदे तिथल्या महापौरांनी जाहीर केले आहेत, ज्यामध्ये शाळेची फी, विनामूल्य बस सेवा, ३ वर्ष मालमत्ता करात सुट असे फायदे घोषित करण्यात आले आहेत.
समुद्रसपाटी पासून ११०० मीटर्स उंच असलेलं ट्रोईना हे गाव “बाल्कनी ऑफ सिसिली” या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या मोहिमेत सामील झाल्यावर या गावाची अजूनच स्वच्छता करण्यात आली आहे. ‘फेस्टा डे रामी’ या महोत्सवामुळे ट्रोईना हे गाव पूर्ण युरोप मध्ये लोकप्रिय आहे. हा महोत्सव दरवर्षी मे महिन्यात दुसरा ते शेवटचा रविवार या काळात होतो.
ट्रोईना या गावात नवीन रहिवासी यावेत यासाठी प्रशासन जे प्रयत्न करत आहेत त्याचं पूर्ण युरोप मध्ये कौतुक होत आहे. प्राचीन इतिहास असलेलं ट्रोईना हे गाव भौगोलिक दृष्ट्या खूप सुंदर आहे. प्रत्येक आवश्यक खाद्यपदार्थ पिकवण्याची सुविधा ट्रोईना मध्ये असल्याने हे एक स्वयंपूर्ण गाव मानलं जातं.
इटली मधील इतर गावांपेक्षा ट्रोईना या गावात घर घेणं हे फायद्याचा सौदा होऊ शकतो असं या क्षेत्रातील तज्ञांनी सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे ट्रोईनाने मध्यंतरी बऱ्याच प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता.
इटली सरकारने ट्रोईनासाठी मोठं फंडिंग केलं असल्याने स्थानिक प्रशासन फक्त स्थानिक लोकांनाच नाही, तर इतर देशातील गुंतवणूकदार लोकांना सुद्धा नवीन घर घेण्यास अर्थसहाय्य करण्यास सरसावले आहेत.
आपल्यापैकी कोणी गुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधत असतील, तर या पर्यायाचा विचार करू शकतात. फक्त निर्णय घेतांना सर्व नियम व अटी वकिलांकडून तपासूनच पुढे जावं.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.