बॉलिवूडला खडेबोल सुनावणारे, हाडाचे कलाकार आणि जेष्ठ संगीतकार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
संगीत हे माणसाच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव पाडतं. आपण आनंदी असो किंवा दु:खी, त्या मूडशी मिळतं जुळतं गाणं आपल्या कानावर पडलं की नकळतच त्या गाण्याचा आपल्यावर एक वेगळाच प्रभाव पडतो!
त्यातही चित्रपट संगीत तर आपल्या मनाच्या फारच जवळची गोष्ट. सिनेमा बघताना आपल्याला दिसणारी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतातच शिवाय त्या सिनेमाच्या कथेची रंजकतासुद्धा वाढवतात.
गेल्या काही वर्षांपासून चित्रपट संगीत हे एका चौकटीत अडकून पडलेलं आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. पण आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या काळातल्या लोकांनी जे चित्रपट संगीत अनुभवलं आहे ते आपल्या पिढीने कधीच अनुभवलं नाही!
हे सगळं आज लिहिण्यामागचं कारण म्हणजे आज १६ जानेवारी, आज भारतीय चित्रपटसृष्टीतले नावाजलेले, आणि स्वतःच्या लहरी स्वभावासाठी फेमस असलेले संगीतकार ओ.पी. नय्यर यांची जयंती!
खरंतर माझं ओ.पी. नय्यर यांच्याशी नातं तयार झालं ते माझ्या वडिलांमुळे.
माझे वडील स्वतः संगीत क्षेत्रातले असल्याने आणि ऑर्केस्ट्रा (आजकाल जो मिरवणुकींमध्ये वाजतो तो ऑर्केस्ट्रा नव्हे हा. सदाबहार गीतं लोकांसमोर सादर करणारा ऑर्केस्ट्रा) शी खूप जुन्या काळापासून जोडले असल्याने माझ्यावर गाण्याचे संस्कार हे त्यांनी आणि माझ्या आईने मिळून केले.
त्यामुळेच कदाचित मी चांगलं संगीत आणि कर्कश गोंगाट यातला फरक ओळखू शकलो. जुनी गाणी, जुने गायक गायिका जुने संगीतकार आणि त्यांनी दिलेल्या चाली ह्या आजही तरुण पिढीच्या तोंडावर का आहेत याचं रहस्य उलगडलं.
संगीतातला आत्मा हा त्या जुन्या कलंदरांनी जपला होता, आणि आजचे संगीतकार (रेहमान, शंकर-एहसान-लॉय सारखे काही संगीतकार सोडले तर) म्हणजे तोच आत्मा विकून रिमिक्स आणि ओंगळवाणा रॅप टाकून त्याच जुन्या गाण्यांची वाट लावायला लागलेत!
मी सैगल पासून आर.डी ते अगदी थेट एल.पी पर्यंत सगळ्यांची गाणी ऐकली आणि आजही ती गाणी मी आवडीनं ऐकतोच. पण तरीही यापैकी सर्वात जास्त मनात घर कुणी केलं असेल तर नय्यर साहेबांनी!
माझ्या बाबांना संगीत क्षेत्रात रस असल्यामुळे त्यांचा सहवास लाभला आणि कदाचित तेच नय्यर प्रेम माझ्यात सुद्धा उतरलं. माझे वडील आता माझ्या सोबत नाहीत पण त्यांनी दिलेला नय्यर साहेबांच्या गाण्यांचा खजाना आजही माझ्याकडे आहे.
ज्यात त्यांच्या कित्येक रेकॉर्ड न झालेल्या चाली, त्यांनी रिहरसल्स वेळी त्यांच्या आवाजात गायलेली गाणी आहेत.
मी बहुतेक दुसरी किंवा तिसरी मध्ये असेन तेंव्हा माझे आई बाबा मला नय्यर साहेबांच्या एका लाईव्ह कॉन्सर्टला घेऊन गेलेले, ते म्हणतात ना लहानपणी काही आठवणी तुमच्या मनावर इतक्या स्पष्टपणे कोरल्या जातात कि त्या विसरणं निव्वळ अशक्यच असत.
अगदी तसंच झालं त्या वेळेला स्टेजच्या जवळच लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर पांढरे शुभ्र कपडे आणि तशीच शानदार हॅट घालून वादकांना सूचना देणारे नय्यर साहेब आजही मला अगदी स्पष्टपणे आठवतात आणि तिथूनच हा प्रवास बहुदा सुरु झाला असावा!
खरंतर नय्यर साहेब म्हणजे King Of Rhythm & Melodies. जरासे फटकळच पण अगदी शिस्तप्रिय आणि हजरजवाबी! आजकाल आपण ह्या सगळ्या गोष्टींना Attitude असं नाव ठेवून मोकळं होतो पण त्या काळात तो माज करणं ही एक फॅशन होती.
पण त्या माज करणाऱ्या मंडळींचं सुद्धा काहीतरी ग्रेट कर्तृत्व होतं म्हणून माज ते दाखवायचे. नय्यर साहेबांच्या फटकळ स्वभावाचे कित्येक किस्से मी बाबांच्या तोंडून ऐकले आहेत.
संगीतक्षेत्रातले २ दिग्गज संगीतकारांनी २ दिग्गज गायिकांकडून जास्तीत जास्त गाणी गाऊन घेतली. एक जोडी म्हणजे मदन मोहन – लता मंगेशकर आणि दुसरी जोडी म्हणजे आशा भोसले – ओ.पी. नय्यर!
दोन्ही संगीतकार आणि गायक हे प्रचंड प्रतिभावान पण तरीही मदन मोहन यांनी काही गाणी आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली, पण नय्यर साहेबांनी लता मंगेशकर यांच्याकडून एकही गाणं गाऊन घेतलं नाही, यामागचं नेमकं कारण तरी काय होतं?
एकदा एका पत्रकाराने का कुणीतरी नय्यर साहेबांना विचारलं की तुम्ही लता मंगेशकर यांना तुमची गाणी का देत नाहीत? तेंव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे बऱ्याच जणांना न पचणारच होतं आणि ते आजही पचणार नाही!
त्यांनी उत्तर दिलं कि “लता यांच्याबद्दल मला आदर आहेच, पण मी संगीतबद्ध केलेली गाणी लता मंगेशकर गाऊच शकत नाही!” आता खरंतर ही अतिशयोक्ती झालीच.
–
हे ही वाचा :
लतादीदीं सोबत काम न करता संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारा ‘अनोखा’ संगीतकार!
–
पण तरीही एकही गाणं त्यांनी लताजींना दिलं नाही. आता याला माज म्हणा किंवा त्यांचा दृष्टिकोन!
पण खरंच आज जे नय्यर साहेबांचे चाहते आहेत तेसुद्धा आशाबाईंनी नय्यर साहेबांकडे म्हटलेली गाणी दिदींच्या आवाजात इमॅजीन सुद्धा करू शकणार नाहीत.
दीदी ग्रेटच आहेत पण तरी दोघींच्या गायकीत खूप फरक आहे आणि हे नेमकं नय्यर साहेबांनी ओळखलं!
असाच एक दुसरा किस्सा किशोर कुमार यांच्या बाबतीतला जो स्वतः खुद्द नय्यर साहेबांनी आकाशवाणीला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सांगितला आहे!
झालं असं की कोणत्यातरी सिनेमाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं, आणि त्या सिनेमाचा प्रोड्युसर हा किशोर कुमार यांना चांगला ओळखत असल्यामुळं त्यानं या गाण्यासाठी किशोर कुमारलाच घ्यावं अशी अट घातली.
नय्यर साहेब तयार नव्हते पण नंतर त्यांनी ती अट मान्य केली आणि रेकॉर्डिंगसाठी किशोर कुमारला बोलावून घेतलं आणि रेकॉर्डिंग सुरु झालं! एक टेक, दोन टेक, तीन टेक तब्बल ६ टेक झाले तरी नय्यर साहेबांना हवं तसं रोकॉर्डिंग मिळत नव्हतं!
शेवटी किशोर कुमार वैतागून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला की हे सगळं काय चाललंय?
तर त्यावर नय्यर साहेबांनी त्याला स्पष्टपणे उत्तर दिलं कि “आपके प्रोड्युसर दोस्त ने कहाँ है ये गाना तुमसे गवाने..वरना मैं तो तुम्हे लेनेही नहीं वाला था! ” हे अशा शब्दात फक्त नय्यर साहेबच बोलू शकतात!
आणि फक्त गायक गायिकाच नाही तर अगदी दिलीप कुमार सारख्या नटाला सुद्धा त्यांनी शाल जोडीतले मारायच सोडलं नाही.
नया दौर या सिनेमाच्या शुटींग च्या दरम्यान दिलीप कुमारची संगीत विभागातली लुडबुड बघून वैतागून एक दिवस नय्यर साहेब दिलीप कुमारला बोललेच कि “तू तेरा एक्टिंग का काम देख ये मुझ पे छोड!” असे अनेक किस्से आहेत जे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे!
खरंतर हा त्यांचा स्वभाव होता पण, एवढं होऊनही त्यांच्या कामात त्यांनी कुठंच कामचुकारपणा दाखवला नाही आणि कदाचित या फटकळ स्वभावामुळेच नंतर लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचे शेवटचे दिवस हे खूप यातनेत गेले!
पण तरी आज त्या माणसाने जी काही गाणी दिली ती आजही तितकीच ताजी आहेत. हावड़ा ब्रिज, काश्मीर की कली, आर-पार, बाज़, नया दौर, सीआयडी, तुमसा नहीं देखा, एक मुसाफ़िर एक हसीना,किस्मत, 12 O’ clock, प्राण जाए पर वचन ना जाये & the list goes on!
अशा अनेक अजरामर गाण्यांनी आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या ओमकार प्रसाद नय्यर म्हणजेच ओ.पी.नय्यर यांना माझ्याकडून आणि नय्यर साहेबांच्या असंख्य चाहत्यांकडून मानाचा मुजरा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.