मोरांची गुरुदक्षिणा ते गूढ हिंदू अध्यात्म: कृष्णाच्या मोरपीसामागील रंजक कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
श्रीकृष्ण – या सृष्टीचा पालनकर्ता. चराचरातील प्रत्येक गोष्टीत ज्याचा अंश आहे, जो प्रत्येक घडणाऱ्या आणि न घडणाऱ्या गोष्टीची जबाबदारी घेतो, जो जन्म मृत्यू च्या पलीकडे आहे, जो पदार्थातील चव आहे, फुलातील रंग आहे, सुगंध आहे.
भगवान विष्णूच्या त्या अवताराबद्दल हजारो वर्षांनंतरही लोकांना तितकंच कुतूहल आहे. भगवत गीता रूपाने त्यांनी सांगितलेलं जीवनाचं सार आचरणात आणण्यासाठी जन्मही अपुरा आहे.
हे देखील वाचा – श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली? वाचा ही रंजक कथा
श्रीकृष्णाचं कोणतंही रूप काही क्षणांसाठी जरी बघितलं तरी आपली नजर त्याच्यावरून हटत नाही. आपल्या देवघरात तो बाळकृष्ण म्हणून विराजमान असतो आणि रोज तो त्याच्या मनोहारी रूपाने आपलं मन जिंकतो.
श्रीकृष्णाचा उपदेश नव्हे तर जीवनगाथेतून सर्व जीवनमूल्य आपल्याला शिकता येतं.
सुदामासोबत मैत्री निभावताना त्याने एक मित्र कसा असावा हे सांगितलं. राधेच्या सहवासातून प्रेमाचा अर्थ सांगितला. अर्जुनासोबत असताना एका उत्तम सारथीची भुमिका वठवली. युद्धनीती, राजनीती ही ज्याने सर्वांना शिकवली.
श्रीकृष्णाच्या कोणत्याही फोटो किंवा मुर्ती मध्ये आपण बघितलं असेल की, पिवळ्या पितांबरात असलेली शांत मुद्रा, हातात बासरी, अंगात बरेच दागिने आणि डोक्यावर मुकुट. हे रूप सर्वांनी आपल्या मनात साठवलेलं आहे.
श्रीकृष्णाच्या मुकुटामध्ये नेहमी एक मोरपीस असतं. ते का असेल ? याबद्दल एक कुतूहल आहे.
हे देखील वाचा – राधा आणि कृष्ण यांच्या “अलौकिक” प्रेमकथेचा शेवट कसा झाला? वाचा…
सगळे प्रश्न ज्याच्यासमोर येऊन संपतात त्या श्रीकृष्णाबद्दलच्या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही काही नोंदीच्या आधारे करत आहोत.
जसं श्रीकृष्णाच्या प्रत्येक लीला आपण आवडीने वाचतो, बघतो. तसंच, एक निस्सीम कृष्णभक्त म्हणून या मोरपीसचं महत्व आणि त्याबद्दलच्या आख्यायिका जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यातील काही अंश इथे सादर करत आहोत:
१. निसर्गाचे रंग
मोरपीस बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की, त्यामध्ये इंद्रधनुष्यात दिसणारे सात रंग आपल्याला बघायला मिळतात. मोरपीस हे दिवसा निळ्या रंगाचं तर रात्री ते काळ्या रंगाचं दिसतं.
सावळा रंग असणाऱ्या श्रीकृष्णाच्या कांतीतही हे दोन रंग आपल्याला बघायला मिळतात.
सर्व रंग निर्माण करणाऱ्या त्या विधात्याने निसर्गाचे सातही रंग मोरपीस द्वारे आपल्या मुकुटावर परिधान केले आहेत हे सुद्धा एका आख्यायिकेनुसार मानलं जातं.
२. अशीही गुरुदक्षिणा
कालिया मर्दनाच्या कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने शेषनागाच्या फण्यावर अप्रतिम नृत्य सादर केलं.
एका आख्यायिकेनुसार, नृत्य, संगीत, बासरीवादन या सर्व कलेत पारंगत असलेले श्रीकृष्ण भगवान हे गोवर्धन पर्वताच्या जवळील एका जंगलात बासरी वाजवत होते.
बासरीचा मधुर आवाज ऐकून त्या जंगलातील सगळे मोर हे बेधुंद होऊन नाचत होते. काही वेळाने मोर थकले, पण श्रीकृष्ण भगवान स्वतः नाचत होते.
मोरांचा राजा तेव्हा खूप आनंदी झाला. त्याने श्रीकृष्णासमोर एक मोरपीस काढून ठेवलं आणि त्याचा स्वीकार करण्याची विनंती केली.
मोरपीस देणं ही मोरांसाठी सर्वात मोठी ‘गुरुदक्षिणा’ असते. श्रीकृष्णाने या विनंतीचा मान ठेवून जमिनीवर ठेवलेल्या मोरपीसांपैकी एक मोरपीस उचललं आणि आपल्या मुकुटात रोवलं. तेव्हापासून मोरपीस हे श्रीकृष्णाच्या मुकुटात आहे अशी आख्यायिका आहे.
भागवतात या कथेचा उल्लेख आहे. या कथेतून असा परामर्श निघतो की, तुम्हाला सर्वात प्रिय असलेली वस्तू तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण करा, तो तुम्हाला त्या वस्तुची कधीही कमतरता भासु देणार नाही.
‘आपल्या परम भक्ताने अर्पण केलेली भेट स्वीकारून त्याला शिरपेचात मानाचं स्थान देणं ‘ या कृतीतून त्या कृतज्ञ भावनेची शिकवण श्रीकृष्णाने समस्त विश्वासा दिली आहे. अर्थात, हे मान्य करण्यासाठी आपली श्रद्धा गरजेची आहे.
हे देखील वाचा – श्रीकृष्ण: महाभारत घडविणारा, जीवन जगायला शिकवणारा, अतिशय स्मार्ट “स्ट्रॅटेजिस्ट”
३. सावळे हे रुप
पाऊस पडल्यावर मोर हे आनंदाने नाचतात हे आपण सगळेच जाणतो. एका आख्यायिकेनुसार, यावेळी आकाशात काळे ढग जमा व्हायला लागतात आणि आकाशाचा रंग हा निळा न राहता गडद होतो. त्याच रंगाची छटा श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगात मोरांना दिसते.
जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवतो तेव्हा मोर हे जास्त रंगून नाचतात. तो कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी हे मोरपीस श्रीकृष्णाला अर्पण केलं गेलं आहे.
अध्यात्म सांगतं की, हे जग म्हणजे एक मोहमाया आहे. इथे रोज आपल्या अपेक्षा बदलतात, वाढतात.
मोरपीसामध्ये दिसणारे सात रंग हे सतत बदलणाऱ्या परिस्थितीचं प्रतीक मानलं जातं. बदलत्या परिस्थितीला सामोरं जा, त्यातून फार आनंदी किंवा फार दुःखी होऊ नका. स्थिर मनाने सर्व गोष्टींचा स्वीकार करा आणि सुंदर जीवन जगा. हे आपल्या चंचल मनाला शिकवावं. ही शिकवण ‘श्रीकृष्ण चरित्र’ मध्ये देण्यात आली आहे.
एक आख्यायिका अशीही आहे की, एक मोर हा श्रीकृष्णाचा भक्त होता आणि त्याने खूप वर्ष श्रीकृष्णाचा जप केला होता. या भक्तावर प्रसन्न होऊन,
त्याच्या विनंतीला मान देत श्रीकृष्णाने हे मोरपीस आपल्या शिरपेचात रोवलं.
आपल्याला श्रीकृष्णाचं अढळ स्थान मान्य आहे आणि त्याबद्दल अजून जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
विज्ञान, तंत्रज्ञानाच्या या जगात आजही कित्येक प्रश्न असे आहेत ज्याचं नेमकं उत्तरं मिळत नाहीत. २०२० हे वर्ष अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधायला लावणारं होतं हे आपण बघितलंच. कित्येक लोकांचा कल मधल्या काळात मनःशांतीसाठी आध्यत्मिक ज्ञान वाढण्याकडे आणि काही काळासाठी तरी भौतिक गोष्टींचा विसर पडावा याकडे होता. हा विषय सुद्धा असाच एक छोटासा प्रयत्न म्हणता येईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.