' हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं – InMarathi

हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही महिन्यांपूर्वी राजकीय विश्वात “धनंजय मुंडे” या नावाची बरीच चर्चा चालू होती. त्यांच्यावर लावण्यात आलेले बलात्काराचे आरोप, त्यावर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण, बायकोची असलेली समंती, राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याविषयी चाललेली मागणी… यामुळे एक वेगळंच वळण या सगळ्या घटनेला मिळाले होते.

या सगळ्यात सामान्य माणसांना अनेक प्रश्न पडलेत… हिंदू धर्मात विवाहबाह्य संबंध ठेवणं कायदेशीर आहे की नाही? विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे का? हिंदू पुरुष खरंच दोन वेळा लग्न करू शकतो का? लग्न केलं नसेल, तर विवाहबाह्य संबंधांमधून जन्माला आलेल्या मुलांना कायदेशीर अधिकार असतात की नाही? या सगळ्यांसाठीच हा लेखप्रपंच!

मुळात विवाहबाह्य संबंध म्हणजे काय?

 

extra marital affair inmarathi

 

लग्न झालेल्या पती- पत्नीव्यतिरिक्त, परस्त्रीशी किंवा परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे याला विवाहबाह्य संबंध म्हटलं जातं. इंग्रजीत यालाच ‘अडल्ट्री’ असं म्हटलं जातं.

इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहितेच्या कलम ४९७ मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार, एखादी महिला जी दुसऱ्या माणसाची पत्नी आहे, अशा महिलेसोबत त्या माणसाच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे याला ‘अडल्ट्री असं म्हणतात.

यासाठी ५ वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, पण यामध्ये खरी गोम अशी होती, की हा कायदा लिंग-तटस्थ नव्हता. अशा प्रसंगांमध्ये केवळ विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेचा पती किंवा विवाहबाह्य संबंध असलेल्या पत्नीचा पती अडल्ट्रीचा गुन्हा दाखल करू शकतो.

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी एक ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधाबाबत सुनावणी करताना ‘विवाहबाह्य संबंध अपराध (क्रिमिनल ऑफेन्स) नाही’ असं म्हटलं. न्यायालयाने १५८ वर्षांपूर्वीचं भारतीय दंड संहितेतील कलम ४९७ अवैध ठरवलं.

आता प्रश्न येतो तो, विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे की नाही? यावर घटस्फोट मागता येऊ शकतो का?

 

divorce-in-india InMarathi

 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर “विवाहबाह्य संबंध हा क्रिमिनल ऑफेन्स नसला, तरी यावर पत्नीकडे घटस्फोट मागण्याचा नक्कीच अधिकार आहे. पत्नीने कौटुंबिक हिंसाराची तक्रार दाखल केली, तर त्यात अडल्ट्रीचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

पूर्वी असलेल्या कलम ४९७ मध्ये ‘पत्नीवर (महिलेवर) कारवाई केली जाणार नाही.’ हा मुद्दा होता. त्यामुळे हे कलम लिंग-तटस्थ नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

“माझ्या नवऱ्याची बायको” या लोकप्रिय मालिकेच्या साच्यात बसवायचं झालं तर, जेव्हा गुरुनाथ राधिकाच्या संसारात शनाया येते, तेव्हा राधिकाला कोणतं कायदेशीर पाऊल उचलायची संधी आहे?  उत्तर आहे कोणतंच नाही.

अशा प्रकरणांमध्ये जर गुरुनाथविरुद्ध कोणी पाऊल उचलू शकतो, तर तो फक्त शनायाचा नवरा. म्हणजे त्याला हे संबंध समजल्यावर त्याने सर्वप्रथम गुरुनाथविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची तक्रार दाखल करावी. कारण या प्रकरणात शनाया दोषी नसून बळी आहे असं म्हटलं जातं.

याचा अर्थ राधिकाने देवाकडे प्रार्थना करावी, की शनायाचा विवाह होऊ दे आणि तिच्या नवऱ्याला हे संबंध नको रुचू दे. तरंच गुरुनाथाला धडा शिकवला जाईल. म्हणजे खरा अन्याय ज्या राधिकावर झालाय, तिला यात काडीचाही अधिकार नाही. आणि जर शनायाने लग्नच केलं नाही तर राधिकाकडे काहीच राहत नाही.

 

mazhya navryachi bayko inmarathi

नव्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने ही तरतूदही काढून टाकली त्यामुळे आता विवाहबाह्य संबंध गुन्हेगारी ठरतच नाहीत.” असं कायदेअभ्यासक सौरभ गणपत्ये सांगतात.

“पुरूष-स्त्री हे दोघेही कायद्यासमोर समान आहेत. विवाहबाह्य संबंधात पती, पत्नीचा मालक होऊ शकत नाही,” असं म्हणत सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, असा निर्णय दिला होता. यामुळे आता संबंधित व्यक्तीला अटक करता येत नसली, तरीही पती किंवा पत्नी घटस्फोट नक्कीच मागू शकते.

हिंदू पुरुष दोन लग्न करू शकतात का?

 

marraige inmarathi

 

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध मान्य केल्यानंतर अनेकांनी त्यांची पाठराखण करायला सुरुवात केली. मुस्लिम व्यक्ती ४ लग्न करू शकतात, तर हिंदूंनी २ केली तर कुठे बिघडलं? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हिंदू धर्माने द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारलेला आहे.

काय आहे द्विभार्या प्रतिबंधक कायदा?

द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजेच – Bombay prevention of hindu bigamous marriages act 1946. हा स्वतंत्र कायदा आहे आणि प्रत्येक राज्याने असा कायदा तयार केलेला आहे. या कायद्यानुसार, हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करू शकत नाही. एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न हे बेकायदेशीर असतं.

आता प्रश्न उरला तो संमतीचा! पहिल्या पत्नीची दुसऱ्या लग्नाला संमती असली, तरीही दुसरं लग्न हे कायदेशीर ठरत नाही आणि यासाठी अनेकदा कायद्यातील पळवाटा म्हणून धर्मांतर करून दुसरे लग्न केले जाते.

या सगळ्या विश्लेषणांनंतर “धनंजय मुंडे” प्रकरणाकडे बघता हे प्रकरण दिसते तेवढे साधे-सोपे नाही हे लक्षात येते.

 

dhananjay munde inmarathi

कायदेअभ्यासक सौरभ गणपत्ये यांच्या म्हणण्यानुसार, “धनंजय मुंडे यांनी दुसरी बायको केलेली नाही. कारण हिंदू कायद्यानुसार दुसरं लग्नच वैध नाही. पहिल्या बायकोची संमती चालते वगैरे गोष्टी आता नाहीत. कारण आपल्या देशात स्त्रियांचं एकूण स्थान पाहिलं, तर त्यांची संमती मिळवणं ही फार काही कठीण गोष्ट नाही.

मुंडेंनी आपल्या पत्नीला या गोष्टीची पूर्ण कल्पना दिली होती. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री अनैतिक संबंधांच्या स्वरूपात येणं ही खरंतर घसघशीत पोटगीसकट घटस्फोट मिळवण्याची गोष्ट, पण तसाही प्रयत्न श्रीमती मुंडेंकडून झाल्याचा काही दाखला नाही.

धनंजय मुंडे यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीला सगळं काही माहित होतं, कारण तशी कल्पना धनंजय मुंडे यांनीच दिली होती. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा झाला तर मुंडेंनी या बाबतीत गुन्हा केलेलाच नाही.

राहता राहिला प्रश्न मुलांचा. अनैतिक संबंधांमधून जन्माला आलेल्या मुलांना अधिकारही तेवढेच असतात जेवढे अधिकृत संबंधांमधून आलेल्या औरस मुलांना असतात.

कारण जन्माला येणं हा त्यांचा दोष नाही, मात्र अशी मुलं ही जर अधिकृतरीत्या मुलं म्हणून धरली जाणार असतील तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची व्यवस्थित माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात भरायची असते. त्या आघाडीवर ती माहिती भरण्यात काही कसूर झाली असेल तर निवडणूक आयोग हे बघून घ्यायला समर्थ आहे.” असं कायदेअभ्यासक सौरभ गणपत्ये सांगतात.

कायद्यात्मक विश्लेषण कितीही पाहिलं तरीसुद्धा शेवटी एक समज म्हणून काही प्रश्न अनुत्तरित राहतातच. ज्या समाजात फार पूर्वीपासून स्त्रियांनी “चारित्र्य” एखाद्या दागिन्यासारखं मिरवलंय, त्या समाजात बायको आपल्या नवऱ्याला दुसरी बाई आणायला संमती कशी देते? बरं तिची परवानगी असले, तर अशी नाती समाजमान्य का नाहीत?

राजकारण्यांची लफडी हा सगळ्यांसाठीच चवीचा विषय असतो. रंगीत चर्चा करून शेवटी “जाऊ दे ना.. त्यांची संमती आहे तर आपल्याला काय” अशा निष्कर्षापर्यंत पोहोचताना त्या राजकारण्यांची पत्नी कोणत्या मानसिकतेतून जात असेल, संमती देण्यामागचं शोषण, त्यांनी सुचवलेल्या गोष्टी किती भीषण असाव्यात याचा विचार व्हायला हवाच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

  1.  

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?