Site icon InMarathi

अंधेरी मार्ग, खंदक…यामुळे मराठवाड्याची शान असलेला अभेद्य किल्ला! 

daulatabad inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा…

नाजूक देशा, कोमल देशा फुलांच्याही देशा!

कवि गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्र देशा या कवितेत महाराष्ट्र राज्याचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे. इतिहासात डोकावून पाहिलं, तर महाराष्ट्रात अनेक संत, तेजस्वी राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची खाण आहे.

राष्ट्रप्रेमाचा तेजस्वी पुत्र असं ज्यांचं नांव आहे, ज्यांनी विखुरलेल्या स्वकीयांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं ते उल्लेखनीय कार्य करणारे आपले शिवाजी महाराज. ज्यांच्या केवळ नावाने महाराष्ट्रातील गवताचं पातं न पातं स्वराज्यासाठी एकत्र येऊन लढलं संजीवनी देणारा पुरुष म्हणजे शिवराय.

 

 

महाराष्ट्रातील बहुतेक गडकिल्ले ताब्यात घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आता सध्याच्या काळात बरेचसे किल्ले पडझड झालेल्या वास्तू बनून राहीले आहेत, पण तरीही काही किल्ले असे होते ज्यांची मजबूत बांधणी पाहून आश्चर्य वाटते!

त्या किल्ल्यात असलेलं बांधकाम, खंदक, चोर दरवाजे, भुयारी मार्ग, पाण्याची टाकी आणि त्याचं व्यवस्थापन यांचे नमुने खरोखर थक्क करणारे आहेत. असाच एक मजबूत किल्ला म्हणजे औरंगाबादमध्ये असलेला देवगिरी! याला दौलताबादचा किल्ला असंही म्हणतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

औरंगाबादपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेलं दौलताबाद शहर हे १४ व्या शतकात निर्माण केलं गेलेलं आहे. राष्ट्रकूट राजांनी कैलास लेण्यांबरोबरच या किल्ल्याचंही बांधकाम केलं.

या किल्ल्याने अनेक शासक पाहीले. राष्ट्रकूट राजे, मग अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलक. या सर्व राजांनी केलेलं शासन या किल्ल्याने पाहीलं. त्या सर्व घटनांचा देवगिरी किल्ला साक्षीदार आहे.

महंमद तुघलक याने देवगिरी या किल्ल्याला आपल्या शासनकाळात दौलताबाद असं नांव दिलं. आजही हा किल्ला अभेद्य मानला जातो. १९० मीटर उंच डोंगरावर शंकूच्या आकारात हा किल्ला आहे.

 

 

या किल्ल्याच्या तटबंदीवर कितीतरी बुरुज आहेत. या किल्ल्याच्या आत हे गांव वसलेलं होतं. आतमध्ये अनेक छुपे भुयारी मार्ग दगड तोडून बनवले होते. तशाच दऱ्याही बनवल्या होत्या.

या किल्ल्यात एक अंधारा मार्गही आहे. ज्याला अंधेरी म्हणून ओळखलं जातं. या अंधारवाटेवर काही काही ठिकाणी ओळखूही न येणारे मोठमोठे खड्डेही आहेत. म्हणजेच शत्रूला मधल्या मध्ये नामोहरम करता यावं. कुणी शत्रू किल्ल्यात आलाच तर हे खंदक, या दऱ्या, अंधेरी यात सापडून तो देवाघरी जावा ही व्यवस्था.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोठमोठ्या शेगड्या ठेवलेल्या होत्या. ज्यामुळे सहजासहजी कुणीही आत प्रवेश करु नये. केलाच तर या पेटलेल्या शेगड्यातून धूर करून शत्रूला बाहेरच रोखून धरता यावं.

या किल्ल्यात चांद मिनार, चीनी महल आणि बारादरी ही तीन मुख्य स्मारकं आहेत. यातील चांद मिनार हा ६३ मीटर उंच मिनार आहे. हा मिनार १४३५ मध्ये आदिलशाह बहामनी याने दौलताबाद किल्ला जिंकून बांधला होता. थोडक्यात हा त्यांचा विजय स्तंभ होता. हा मिनार टेहळणीसाठी वापरला जाई.

 

हा मिनार मुस्लिम वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मिनाराच्या मागेच जामा मस्जिद आहे आणि ही मशिद मंदिराला लागूनच आहे. चीनी महल या इमारतीत गोवळकोंड्याच्या शेवटचा शासक अब्दुल हसन तानाशाह याला औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते.

बारादरी म्हणजे बारा दरवाजे असलेला महाल. हा त्याकाळचे आॅडीटोरीयम म्हणा. संगीताचे नृत्याचे कार्यक्रम इथे बारादरीमध्ये होत असत. त्यानंतर किल्ल्याच्या आत प्रचंड मोठा हौद आहे. ज्याला हत्ती तलाव म्हणतात. संपूर्ण किल्ल्याला पाणी पुरवठा हा हौद करायचा.

जैन पंडित हेमाद्री यांच्या मते दौलताबादचा किल्ला हा यादव कुळातील प्रथम नरेश भिलम याने बांधला. त्यापूर्वी यादव चालुक्याचे मांडलिक राजे होते. त्यांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापन करायचा निर्णय घेतला आणि सन ११८७ देवगिरी आपली राजधानी बनवली.

पुढे यादवांचा वंशज भिलमचा नातू सिंहन याने संपूर्ण चालुक्यांना आपल्या अधिपत्याखाली घेतले. मात्र १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली. त्यात फितुरीमुळे घात झाला आणि यादवांचा पराभव झाला आणि अल्लाउद्दीन खिलजीने प्रचंड प्रमाणात लूट केली. त्यानंतर परकीय आक्रमणांचा सतत मारा सुरु होताच.

 

 

महंमद तुघलक याने तर देवगिरीलाच आपली राजधानी बनवली. दिल्लीहून आपली राजधानी हलविली ती देवगिरीवर. त्याचे सांस्कृतिक, कलाकारीमधले परिणाम आपण औरंगाबादमध्ये तयार होणाऱ्या हिमरु शालीतून पाहतोच आहे.

इथे असणारे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायला लागले. मग परत त्याने राजधानी दिल्लीत हलवली. यानेच देवगिरीचं नांव दौलताबाद केलं. तो परत गेला पण नांव मात्र कायम राहीलं.

आता तर किल्ल्यावर जाणं खूप सोपं झालं आहे. अजिंठा लेणी, एलोराच्या गुहा हे इथून जवळ आहे. औरंगाबादवरुन वाहने उपलब्ध आहेत. विमानाने औरंगाबाद येथे जाऊन पुढे दौलताबाद किल्ला बघायला जाता येतं.

रेल्वे, विमान आणि गाडी या तिन्ही प्रकारचा प्रवास करुन आपण दौलताबाद किल्ला पहायला जाऊ शकतो. चला.. एक ट्रीप दौलताबादला करायला हरकत नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version