आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पालकांनी लहान मुलांचे लाड करणं ही गोष्ट आता नवी राहिलेली नाही. आपल्याला जे मिळालं नाही, ते ते आपल्या मुलांना द्यायला हवं हे प्रत्येकच पालकाला वाटत असतं.
अगदी रोजंदारीवर काम करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानीपर्यंत कुठल्याही पालकांकडे पहा; ते आपल्यापरिने मुलांचे लाड करताना दिसतील. हे लाड आणि कौतुक करत असताना, एक गोष्ट अगदी आवर्जून त्यात दाखल होते, आणि ती म्हणजे हौशीने काढलेले लहान मुलांचे फोटो!
लहानग्यांचे भरपूर फोटो काढणं, पालकांना नेहमीच आवडतं. रोल असणाऱ्या कॅमेऱ्यांचा काळ होता तेव्हापासूनच, मुलांचे वेगवेगळ्या शैलीतील फोटो काढणारे पालक पाहायला मिळत आहेत. आजच्या काळात, मोबाईलच्या रूपात प्रत्येकाच्याच खिशात कॅमेरा आहे.
या हौसेला काहीही मोल नाही. मुलांचे फोटो काढणं आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी ते आवडीने ओळखीच्या लोकांना दाखवणं ही पालकांसाठी फार सामान्य झालेली गोष्ट आहे.
आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांचे फोटोज शेअर करणं सुद्धा पालकांसाठी आवडीचं होऊ लागलं आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तर हे फोटोज ओळखीच्या व्यक्ती आणि नातेवाईकांपर्यंत पोचतातच.
याशिवाय आपल्या लहानग्यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट तयार करण्याचे प्रताप सुद्धा पालक करतात. तुम्ही सुद्धा असं करत असाल, तर जरा सांभाळून. यात अनेक धोके असू शकतात. सगळ्यात महत्वाचा धोका म्हणजे डिजिटल किडनॅपिंग!
काय आहे डिजिटल किडनॅपिंग?
तुमच्या नकळत एखाद्या अनोळखी व्यक्तीने, तुमच्या लहानग्यांचा फोटो स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणे, म्हणजे डिजिटल किडनॅपिंग होय.
मुलांना या प्रकारचा कुठल्याही प्रकारे शारीरिकदृष्टया धोका नसला, तरीही यामुळे होणारा मनस्ताप खूप मोठा ठरू शकतो. डिजिटल किडनॅपिंग करणारी मंडळी, त्यांच्या प्रोफाइलवरील लाईक्स आणि कमेंट्स वाढवण्यासाठी, अशा फोटोजचा सर्रासपणे वापर करतात. याचा थेट परिणाम मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यात होतो.
डिजिटल किडनॅपिंगचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे, मुलांचे फोटो अफवा म्हणून पसरवणे. ‘हरवला/हरवली आहे’, ‘हे मूल अनाथ आहे’ अशाप्रकारचे संदेश चुकीचे फोटोज पाठवून बनवले जातात.
अर्थात, डिजिटल किडनॅपिंग हा सगळ्यात मोठा धोका असला, तरीही हा काही एकमेव धोका नाही. याव्यतिरिक्त इतरही धोके यामुळे संभवतात. आज त्याबद्दल जाणून घेऊयात.
१. मुलांच्या प्रायव्हसीवर परिणाम
कुठल्याही व्यक्तीला स्वतःची प्रायव्हसी प्रिय असते. मुलांच्या आयुष्यात सतत डोकावणं अनेक पालकांना चुकीचं वाटतं.
सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकणं, हा एकप्रकारे त्यांची प्रायव्हसी हिरावून घेण्याचा प्रकार ठरतो. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे फोटोज लोकांना पाहायला मिळतात. म्हणजेच कळनकळतपणे तुम्ही तुमच्या मुलांची प्रायव्हसी संपवत आहात.
२. मस्करीचा विषय
आपल्या लहानपणीचे फोटो जर पाहत असू, तर तेव्हा आपण कसे दिसायचो यावरून एकमेकांची खिल्ली उडवण्याचे प्रकार अगदी सहजपणे घडतात. आजच्या काळात आपण सर्रासपणे मुलांचे फोटोज सोशल मीडियावर टाकतो. म्हणजेच अनोळखी व्यक्तींपर्यंत आपल्या मुलांचे फोटोज आपण सहज पोचवत असतो.
विचित्र किंवा हास्यास्पद फोटोंचा वापर करून मुलांना केवळ मस्करीचा विषय बनवलं जाऊ शकतं.
३. मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम
आज तुम्ही सोशल मीडियावर टाकलेले मुलांचे फोटोज पुढे अनेक वर्षांनी तुमच्या मुलांसाठी त्रासदायक ठरू शकतील याचा तुम्ही विचार केलाय का?
आज सोशल मीडियावर तुम्ही टाकलेले फोटोज तुम्ही कदाचित डिलीट कराल सुद्धा, पण ते इंटरनेटवरून पूर्णपणे नष्ट होतात, असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.
या मुलांचे लहानपणीचे फोटोज बघून कुठली व्यक्ती काय विचार करेल, ते सांगता येऊ शकत नाही. याचा परिणाम मुलांना नोकरी मिळण्यावर देखील होऊ शकतो हेदेखील ध्यानात असू द्या.
४. मॉर्फिंग आणि चाईल्ड पॉर्न
सोशल मीडियावर सहजपणे उपलब्ध असलेले मुलांचे फोटोज कुठे वापरले जाऊ शकतात याची कल्पना करणं सुद्धा अशक्य आहे. मॉर्फिंगबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. तुमच्या मुलांचा चेहर इतर फोटोवर वापरून त्याचा गैरवापर होऊ शकतो. एवढंच नाही तर चाईल्ड पॉर्नमध्ये सुद्धा असे मॉर्फिंग केले जाऊ शकते. हा धोका फारच मोठा आहे.
५. मुलंच करू शकतात पालकांवर केस
कुणाचेही फोटो परवानगीशिवाय वापरणं योग्य नाही. सोशल मीडियावर मुलांचे फोटो टाकणं, म्हणजे त्यांच्या अनुमतीशिवाय फोटोजचा वापर ठरतो. मुलांच्या परवानगीशिवाय तुम्ही सोशल मीडियावर त्यांचे फोटोज शेअर करण्याबद्दल मुलं तुमच्यावर केसदेखील करू शकतात बरं!
अर्थात, या अशा भानगडी भारतात घडत नाहीत. या गोष्टी सहसा इतर देशात घडतात. अर्थात, भारतात सुद्धा अशा गोष्टी पाहायला मिळणारच नाहीत, अशा भ्रमात राहायला नकोच.
काय काळजी घ्यावी?
१. ओळखीतील इतर मंडळींशी स्पर्धा करण्याच्या उद्देशाने मुलांचे फोटोज सोशल मीडियावर टाकू नका.
२. केवळ तुमच्या आनंदासाठी मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा अट्टाहास करू नका.
३. सोशल मीडियावर काही प्रमाणात फोटो टाकणार असाल, तरीही योग्य प्रायव्हसी सेटिंग्सचा वापर करा.
४. मुलांना वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत सोशल मीडियापासून दूर ठेवा. तीच खबरदारी त्यांच्या फोटोबद्दल सुद्धा घ्या.
मग काय मंडळी, यापुढे मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकताना काळजी घेणार ना? तुमच्या ओळखीच्या इतर मंडळींना सुद्धा ही माहिती मिळायला हवी, त्यामुळे हा लेख शेअर नक्कीच करा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.