फुटबॉलच्या या ‘देवाची’ बार्सिलोनाने किंमत १६ अब्ज करून ठेवलीये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
जसं क्रिकेटचा देव म्हणून सचिनची पूजा केली जाते. त्याचप्रकारे फुटबॉलचा किंग म्हणून मेस्सीचा जयजयकार केला जातो. (हे विधान कदाचित रोनॉल्डो समर्थकांना रुचणार नाही, पण उगाच त्यांच्या भावना दुखावण्याचा इथे उद्देशही नाही.)
जगभरात मेस्सीचे असंख्य चाहते आहेत. त्याला आपला भारतही अपवाद नाही म्हणा.
क्रिकेट नंतर भारतात कोणत्या खेळाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळत असेल तर तो खेळ आहे – फुटबॉल!
त्यातही मेस्सीचे चाहते भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तुम्ही देखील मेस्सी भक्त असाल तर त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व गोष्टी माहित असतीलच. पण काही गोष्टी अश्या आहेत ज्या आजही कट्टर मेस्सी समर्थकांसाठी अज्ञात आहेत.
आज अश्याच मेस्सीमय गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मेस्सीचे पूर्ण नाव आहे- लायनेल अँड्रेस मेस्सी!
मेस्सीचा जन्म आर्जेन्टिना मधला परंतु त्याचे घराणे मुळचे आहे इटलीमधले. मेस्सीच्या वडिलांनी कामाच्या संदर्भात इटली वरून आर्जेन्टिनामध्ये स्थलांतर केले होते.
बर्सिलानो साठी खेळणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू म्हणजे मेस्सी होय.
जेव्हा त्याने सर्वप्रथम या क्लबसोबत आपला पहिला सामना खेळला तेव्हा त्याचे वय फक्त १७ वर्षे इतके होते. आणि या पहिल्याच सामान्यामध्ये गोल झळकावणारा मेस्सी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
आजारपणावर मात करून फुटबॉल गाजवलं!
अगदी लहानपणापासून फुटबॉल हा मेस्सीचा जीव की प्राण होता, परंतु असंतुलित स्वास्थ्यामुळे त्याला धावणे आणि मेहनत करणे जमत नसे. त्याचे कुटुंब दर महिन्याला ९०० डॉलर (सुमारे ५९,५०० रूपये!) खर्च करून त्याच्या आजारपणावर उपचार करत होते.
त्याच्या आजारपणाचा खर्च उचलण्यात बार्सिलोना क्लबने देखील मदत केली होती ही गोष्ट बऱ्याच जणांना ठावूक नाही.
जेव्हापासून मेस्सी हा बार्सिलोनाच्या नजरेत आला होता तेव्हापासून या क्लबला काहीही करून मेस्सी स्वत:च्या टीममध्ये हवा होता.
जेव्हा बार्सिलोनाचे स्पोर्ट संचालक कार्ल्स रेक्सेच यांनी मेस्सी सोबत कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलणी केली तेव्हा मेस्सीला साईन करून घेण्यासाठी त्यांच्याजवळ कोणताही कागद नव्हता, म्हणून त्यांनी एका नॅपकिनवर त्याची सही घेऊन त्याला बार्सिलोना क्लबसाठी साईन करून घेतले.
मेस्सी हा केवळ आर्जेन्टिनाचा नागरिक नसून स्पेनचा देखील नागरिक आहे, त्याला दुहेरी नागरिकत्व प्राप्त आहे.
२००५ साली मेस्सीने आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पदार्पण केले होते. दुसऱ्या हाफ मध्ये सबस्टीट्युट म्हणून त्याला आपली किमया दाखवण्याची संधी मिळाली. पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही.
मैदानात पाउल टाकल्यावर काही मिनिटात त्याला रेड कार्ड मिळाले आणि आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अद्भुत कामगिरी करून दाखवण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले.
“सुवर्णमयी गोल”
२००८ मधील बीजिंग ऑलम्पिकआधील आर्जेन्टिनाच्या फुटबॉल टीममध्ये मेस्सीचा समावेश होता. या ऑलम्पिकमध्ये आर्जेन्टिना अंतिम फेरीमध्ये पोचली. येथे आर्जेन्टिनाची गाठ पडली नायजेरियाशी.
या सामन्यात मेस्सीने पास केलेल्या बॉलवर अँगल डी मारिया याने गोल झळकावत आर्जेन्टिनाला विजयी केलं आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
बार्सिलोना च्या यशाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट!
बार्सिलोना ने आजवर ६ वेळा ला लीगास, २ वेळा कोपास डेल रे, ५ वेळा सुपरकोपास डी इस्पाना, ३ वेळा युएफआ चॅम्पीयन लीग्ज, २ वेळा युएफआ सुपर कप्स आणि २ वेळा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बाजी मारली आहे.
या सर्व विजयी घौडदौडीमध्ये मेस्सीचे योगदान सर्वात महत्त्वाचे होते.
३ युरोपियन गोल्डन बूट, ४ बॅलॉन डी’ओर अवार्ड्स, १ फिफा फुटबॉल ऑफ दी इयर अवार्ड यांसारख्या प्रतिष्ठीत अवार्ड्सवर मेस्सीने आपले नाव कोरले आहे.
एका सिझनमध्ये सर्वाधिक गोल्स
२०१२ साली मेस्सीने ६६ सामन्यांमध्ये तब्बल ८६ गोल्स झळकावले होते. आजवर एका सीजन मध्ये एवढे गोल्स कोणालाच करत आलेले नाहीत.
वर्ल्ड कप मध्ये गोल करणारा मेस्सी हा सहावा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याच्या वेगवान हालचालींमुळे त्याचे चाहते त्याला ‘द फ्लीया’ म्हणून संबोधतात.
सोनेरी पायासाठी, सोन्याचा बूट
जपानच्या ज्वेलेर गिंझा तनाका याने मेस्सीच्या उजव्या पायासाठी एक गोल्डन बूट बनवला होता. ज्याची किंमत ५.२५ मिलियन डॉलर इतकी होती. ही रक्कम २१०० ला आलेल्या त्सुनामीमधील पिडीतांना दान केली गेली.
महागडा मेस्सी
बार्सिलोना क्लब मेस्सीला कधीच सोडणार नाही. दुसरा कुणी त्याला घेऊ नये ह्यासाठी त्यांनी मेस्सीला खूप महाग करून ठेवलं आहे.
दुसऱ्या कोणत्या क्लबने त्याला खरेदी करू नये म्हणून त्यांनी त्याची विक्री किंमत २५० मिलियन डॉलर – म्हणजे तब्ब्ल १६ अब्ज रूपये – इतकी ठेवली आहे. भले भले क्लब्स ही किंमत ऐकूनच माघार घेतात.
२००७ मध्ये मेस्सीने अपंग मुलांच्या मदतीसाठी एक संस्था सुरु केली. इतकंच नाही तर मेस्सी युनिसेफचा ब्रँड अॅम्बॅसिडर देखील आहे.
मेस्सी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत सध्या स्पेनमध्ये वास्तव्याला आहे. मेस्सीच्या पायावर एक टॅटू नजरेस पडतो. हा टॅटू त्याने आपल्या मुलाच्या नावाने बनवला आहे.
बार्सिलोना क्लब सोबत खेळताना पूर्वी मेस्सीवच्या जर्सीचा नंबर ३० होता, पुढे त्याचा क्लब मधला सहकारी रोनाल्डिनो याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याची १० क्रमांकाची जर्सी मेस्सीला मिळाली.
तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या. आता इतरही मेस्सी चाहत्यांना त्या कळू द्या, यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.