Site icon InMarathi

डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

gaurav londhe featured inmarathi 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वडा पाव हे मिनी मिल आहे. कडकडून लागलेल्या भुकेवरचा उपाय म्हणून अनेक मुंबईकर वडापाव वर अवलंबून असतात. अर्धी मुंबई ज्या वडा पावच्या जीवावर धावत असते ती ट्रॅफ़िकमधे अडकली की भुकेनं आणखिनच व्याकुळ होते.

यावरचा उपाय मुंबईतल्या एका तरूणाला सापडला आणि त्यानं चक्क त्याची नोकरी सोडून ट्रॅफ़िकमधल्या भुकेवरचा हा व्यवसाय सुरु केला.

कल्पना करा, तुम्ही मुंबईमध्ये आहात. संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही अंधेरीहून ठाणे – मुलुंडकडे येण्यासाठी निघाला आहात. ट्रॅफ़िक जाममधून तुमची गाडी मुंगीपेक्षाही कमी वेगानं चालली आहे.

 

 

ऑफिसमधून निघूनही तुम्हाला तास – दीड तास होऊन गेलेला आहे. भुकेनं वैतागलेले असतानाच तुम्हाला मस्तपैकी गरमा गरम वडापाव मिळाला तर? कल्पनेनंच मस्त वाटलं ना?

मुंबईत पिक अवर्समधे प्रत्येक उपनगरातून जाणार्‍याची हिच अवस्था असते. एरवी खरं तर अर्ध्या, पाऊण तासांचा प्रवास या ट्रॅफ़िकमुळे दोन- दोन तीन- तीन तासाचा होतो.

दुपारचे जेवण होऊन अनेक तास उलटलेले असतात आणि पोटात कावळ्यांनी कावकाव सुरु केलेली असते. ठाण्यात रहाणारा आणि अंधेरीत एका पिझ्झा आऊटलेटमधे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या गौरवचाही अनुभव काही वेगळा नव्हता.

त्याची शिफ़्ट संध्याकाळी साडेपाचला संपायची आणि तिथून ठाण्याला परतायला त्याला रात्र व्हायची. खरं अर अवघ २४ किमी अंतर.

एरवी हेच अंतर अर्ध्या एक तासात कापलं जातं मात्र मुंबईच्या पिक अवर्समधे इतकं ट्रॅफ़िक असतं की गौरवला येता येता रात्र व्हायची. दिवसभर काम केल्यानंतर भूक भूक होत असायची.

काही खायचं तर गाडी रस्त्यावरून एखाद्या रेस्टॉरंटकडे वळवावी लागायची. बरं, दररोज बाहेरचं खाणं खर्चिकही व्हायचं. त्याला नेहमी वाटायचं की, असं काहीतरी खायला मिळावं, जे पोटभरीचंही असेल आणि खिशाला परवडणारंही.

नोकरी करता करता हा विचार मनात घोळत असायचाच. मग गौरवला त्याच्यासारखे इतरही काहीजण भेटले,जे ट्रॅफिकमधे अडकल्यावर भुकेनं वैतागलेले आणि पोटभरीच्या पण स्वस्त पर्यायाच्या शोधात होते.

कुठेतरी मनात विचार सुरू झालेच होते. ट्रॅफिकमधल्या भुकेवर उपाय शोधता शोधता आपणच या व्यवसायात उतरू हे मात्र त्याला कधीच वाटलं नव्हतं.

 

 

 

सप्टेंबर २०१९ मध्ये अशाच एका दिवशी मात्र त्यानं ठरवलं की नोकरी सोडून आता या व्यवसायात उतरायचं. जे पटकन खाता येईल, जे खाण्यासाठी डिश, चमचे असा थाट लागणार नाही, पटकन उभ्या उभ्या पाच मिनिटात खाऊन होईल, खिशाला परवडेल आणि पोटभरीचा होईल असा एकच पदार्थ विकायचा विचार त्यांनी सुरु केला.

वडापावला पर्याय दिसेना. करायलाही सोपा, खायलाही सोपा असा वडापावा विकायचं त्यानं ठरवलं आणि यातूनच जन्म झाला, “ट्रॅफिक वडापावचा.”

मुळात गौरव हा स्वतः खाद्यपदार्थांच्याच क्षेत्रात नोकरी करत असल्यानं त्याला आपला व्यवसाय हिट होणार याची खात्रीच होती. टपरीवरच्या वडापावचा थोडा मेकओव्हर करत त्यानं ‘हायजिनिक’ असा वडापाव बनवला.

टपरीवर वर्तमान पेपरच्या, रद्दी पेपरच्या तुकड्यावर वडापाव दिला जातो. अनेकजण हायजिन कॉन्शस असल्यानं अशा प्रकारे वर्तमान पत्राच्या तुकड्यावरचा वडा खाणं टाळतात, हे त्यानं पाहिलं होतं.

नेमकी हिच गरज ओळत त्यानं अगदी नेटकेपणानं वडा, पाव, छोटी पाण्याची बाटली आणि सोबत टिश्यु पेपर असं पॅक करत विकायला सुरवात केली. याची किंमतही अगदी वाजवी, म्हणजे केवळ २० रूपये ठेवली.

 

 

कारमधला ग्राहक असो की बाईकवरचा त्याची गरज लक्षात घेत गौरवनं पॅकिंग ठरवलं. फ़ार किचकट पॅकिंगही ग्राहकांना नको असतं आणि खाल्ल्यावर पाणी हवं असतं.

खाऊन झाल्यावर हात स्वच्छ करायचे असतात. हे सगळं लक्षात घेत त्यानं पॅकिंग बनवलं आहे.

गौरवला आपला व्यवसाय हिट होणार याची खात्री असली तरिही त्याच्या आई आणि पत्नीसाठी मात्र हे धाडसाचं होतं. एकतर हातातली फ़िक्स रकमेची नोकरी जाणार होती आणि तुलनेनं कष्टही होते. माल न खपण्याची जोखीमही होती.

गौरवची ५२ वर्षीय आई, रंजना सांगतात,” जेंव्हा गौरवनं त्याचा विचार मला बोलून दाखवला तेंव्हा मला खरंच काळजी वाटली. कारण गौरवचं नोकरीमधे चांगलं चाललेलं होतं. त्याला मॅनेजर म्हणून बढतीही मिळालेली होती. महिन्याचा त्याचा पगार होता ३५ हजार रूपये.

सगळं नीट चाललेलं असताना नोकरी सोडून पूर्णवेळ हेच करायचा त्याचा विचार ऐकून मला टेन्शन आलं. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की, त्यानं नोकरी सोडू नये. नोकरीत राहून उरलेल्या वेळात काय ते करावं. पण तो त्याच्या विचारावर ठाम होता.”

 

 

रंजना सांगतात की, मला तर त्याच्या बिझनेस मॉड्युलविषयीच शंका होती. कारण, अनेकजण या पध्दतीचा व्यवसाय करत असताना आपण असं काय वेगळं करणार आहोत?

शिवाय गौरवच्या कल्पनेनुसार बॉक्समधे पॅक केलेले वडापाव भर सिग्नलमधे जाऊन विकणं हे अवास्तव वाटत होतं. कारमधल्या ग्राहकांना प्लेटमधून ताजे पदार्थ खाण्याची सवय असते. ते आपले बॉक्स विकत घेतील का? ही शंका वाटत होती.

शिवाय सिग्नलवर जाऊन विक्री करायची म्हणजे जिवाचीही जोखीमच. एखाद्या वेगवान वाहनानं ठोकलं वगैरे तर? या विचारामुळे मला या व्यवसायात त्यानं पडू नये असं वाटायचं.

 

 

मात्र या विरोधाला गौरव पुरून उरला. तो त्याच्या विचारांवर ठाम होता. अखेर आईनं नमतं घेत त्याला सुरवातीच्या गुंतवणुकीसाठी एक लाख रूपये दिले. कष्टानं साठवलेले लाखभर रूपये व्यवसायात नुकसान करून घेत आपला मुलगा वाया तर घालवणार नाही नां? अशी धास्तिही त्यांना वाटायची.

या सुरवातीच्या भांडवलावर गौरवनं किचनची उपकरणं घेतली. एकदा निर्णय झाल्यावर मग आईनं वडे बनवण्याची जबाबदारी अंगावर घेतली तर पत्नीनं पॅकिंगची जबाबदारी घेतली. गौरवनं ते सिग्नलवर जाऊन विकण्याची जबाबदारी घेतली.

पहिल्या दिवशी त्यांनी पन्नास वडापाव बनवले होते. यापैकी एकही वडापाव विकला गेला नाही. हे वडे वाया जाऊ नयेत म्हणून गौरवनं ते शेवटी येणा-यांना अक्षरश: फुकट वाटले. हे असंच पुढचे पाच दिवस होत राहिलं.”

पहिले काही दिवस वडापाव विकले जात नव्हते आणि गौरव निराश होत होता. मात्र आता लगेच माघार घायची नाही असं ठरवत ते रोज वडापाव बनवायचे आणि विकायला न्यायचे. नाही खपले तर वाटून टाकयचे.

 

 

असं एक आठवडा झाल्यावर मात्र एक दिवस गौरवचा उत्साहानं फ़ोन आला आणि त्यानं अधिक थोडे वडापाव बनवायला सांगितले. त्या दिवशी पहिल्यांदाच शंभर वडापाव विकले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

आज गौरव एका दिवसात किमान आठशे वडापाव विकतो आणि महिन्याला साधारण दोन लाख कमावतो. खर्च वगळता त्याला सुमारे ८० हजार रुपयांचा नफ़ा होतो. आता त्यांच्याकडे आठ डिलिव्हरी बॉयची टिम आहे.

त्यांना प्रत्येक महिन्याला सहा हजार पगार आहे. ब्रॅण्ड सहज ओळखू यावा यासाठी त्यांना नारंगी रंगाचे टिशर्ट युनिफ़ॉर्म म्हणून दिलेले आहेत.

धाडसानं घेतलेल्या निर्णयाचं चीज झाल्याचं आज गौरवला समाधान आहे आणि स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणार्‍यांसाठी प्रेरणा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version