Site icon InMarathi

“मनसे” च्या अहमदाबाद अभ्यास दौऱ्यातून समोर आलेलं “गुजरात मॉडेल”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीत काम करायला सुरूवात करून आता मला जवळपास तीन वर्षे होत आली होती. दरम्यान (2009 साली) लोकसभा, विधानसभा निवडणूका होऊन गेल्या होत्या. मनसेची निवडणूकीतील कामगिरी समाधानकारक झाली होती.

माझ्याकडे विविध विषयांची माहिती, कागदपत्रासह गोळा करण्याची जबाबदारी होती. त्यासोबतच मी स्वत:हून देशातील इतर राज्यांत सामाजिक, आर्थिक, विकासात्मक आघाडीवर काय काय नविन योजना सुरू आहेत याचाही अभ्यास करत होतो. सबंधीत माहिती घेत होतो.

===
माझ्या अकादमीतील कामांबद्दलचे पूर्वीचे २ लेख वाचू शकता :
१) राज ठाकरेंच्या भाषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ! – राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण-भाग १
२) “राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर  राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण-भाग २
===

गुजरात राज्यातील विविध योजनांचा अभ्यास सुरू केला होता. महिती अधिकाराखाली माहिती मागवत होतो. यू ट्युबवर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे व्हिडिओ पाहात होतो, टिपणे काढत होतो. त्या टिपणांवर आधारीत गुजरात राज्यातील विकासाच्या विविध योजनांवर एक अहवालच तयार झाला होता.

एकदिवस, तो अहवाल मी आमच्या अकादमीच्या प्रमुखांना म्हणजेच श्री. अनिल शिदोरेंना दाखवला. त्यांनीही तो अहवाल वाचला. त्यांना माझं काम खूप आवडलं. “शाब्बास” म्हणून कौतूक केलं व

“गुजरातच्या विकासाचा अजून बारकाईने अभ्यास करून मला अहवाल तयार करून दे, आपण तो अहवाल राजसाहेबांना दाखवू”

असे शिदोरे सर म्हणाले. मी एकदम खुश झालो आणि नरेंद्र मोदी व त्यांनी केलेल्या गुजरात विकासाच्या “पाठीमागेच” (चांगल्या अर्थाने!) लागलो…!

गुजरात एक लक्ष डोळ्यासमोर घेऊन काम करत असल्याचं दिसून येत होतं…2001 साली श्री. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपद स्विकारले व त्यांनी साधारण आपले सरकार कोणत्या मार्गाने जाणार याची रूपरेषा तयार केली. त्याला त्यांनी “पंचामृत योजना” असे नाव दिले.

त्यामध्ये, ज्ञान शक्ती, उर्जा शक्ती, जल शक्ती, जन शक्ती, आणि रक्षा शक्ती या कार्यक्रमांचा समावेश केला.

 

 

हे कार्यक्रम काय आहेत, ते कसे राबवायचे आहेत हे सरकार दरबारातील उच्च अधिकार्यांना समजावून देण्यासाठी “चिंतन” शिबिरांचं आयोजन केलं गेलं. सलग तीन दिवस गुजरात राज्यातील सातशेच्यावर शासकीय उच्च अधिकार्यांयसोबत स्वत: मुख्यमंत्री असत.

मोदीजींच्या व्यक्तिमत्वाची छाप पडत होती. मोदीजी सर्वांशी संवाद साधत, गुजरात विकासाच्या आपल्या कल्पना सांगत, अधिकार्यांतच्या कल्पना ऐकून घेत, त्यांच्या अडचणी समजावून घेत.

अधिकाऱ्यांना मोदीजी सांगत होते की –

समाजोपयोगी निर्णय घ्यायला घाबरु नका, निर्णय घेताना चूक झाली तर माझी जबाबदारी, निर्णय योग्य ठरला तर तुम्हाला श्रेय तुमचं!

चिंतन शिबिराचा प्रचंड फायदा झाला…अधिकाऱ्यांना या शिबिरातून प्रेरणा मिळाली व झपाट्याने कामाला लागले. चिंतन शिबिरातूनच, ज्योती ग्राम, चिरंजीवी योजना या सारख्या योजनांचा जन्म झाला. अहमदाबादची बीआरटी (जनमार्ग), साबरमती रिव्हर फ्रंट परियोजना, कांकरिया तलाव सुशोभिकरण सारखे प्रस्ताव चिंतन शिबिरात चर्चिले जाऊ लागले…!

मी आता पुरता गुजरात विकास योजनांच्या माहितीच्या मागे लागलो होतो. माहिती अधिकाराचा वपर करून अनेक योजनांची इत्यंभूत माहिती मिळवली.

साधारण एका महिन्यात तीस पानी अहवाल तयार करून दिला. त्यातूनच मग शिदोरेसरांनी पुण्यातील मनसेचे “सोनेरी” आमदार रमेश वांजळे व आठ नगरसेवक व निवडक कार्यकर्त्यांना घेऊन गुजरात/अहमदाबाद विकास पाहणी दौरा आखायची सुचना केली. त्यांनाही ती मान्य झाली.

राजसाहेब व तेव्हाचे भाजप अध्यक्ष श्री. नितीन गडकरींचे कॉमन मित्र श्री. सारंग काळे यांनी गडकरींशी बोलून मनसे पुणे आमदार व नगरसेवक यांच्या अहमदाबाद विकास योजना अभ्यास दौऱ्याची आखणी केली. नगरसेवकांनी शिदोरेसरांकडे विनंती केली की –

अकादमीतील अभ्यासकही या अभ्यास दौऱ्यात सोबत आले तर बरे होईल.

पुणे मनसे आमदार व नगरसेवक दौऱ्यावर गुजरात विकास अभ्यासक म्हणून महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीतून माझी निवड झाली तर ग्रीन अर्थ या अनिल शिदोरेंच्या खाजगी संस्थेतून तीघा जणांची निवड केली गेली. ज्यामध्ये ग्रीन अर्थच्या संचालिका विनिता ताटके, अनिल शिदोरेंची मुलगी प्रज्ञा शिदोरे व हर्शद अभ्यंकर यांची निवड झाली.

मनसे पक्षातर्फे सोनेरी आमदार रमेश वांजळे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, प्रकाश ढोरे, किशोर शिंदे, वसंत मोरे, राजेंद्र एंडल, रविंद्र धंगेकर, मनसे पदाधिकारी बाळा शेडगे, राम बोरकर, इ. असा एकूण वीस जणांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश होता.

तीन दिवसांच्या दौऱ्यात आम्ही प्रामुख्याने अहमदाबाद शहर विकासासंबंधीची पाहणी अभ्यास केला, ज्यामध्ये प्रामुख्याने साबरमती रीव्हर फ्रंट डेवलपमेंट प्रोजेक्ट, अहमदाबादची प्रसिद्ध बीआरटी (बस रॅपिड ट्रांसपोर्ट) सिस्टिम, घनकचरा व्यवस्थापन, मलजल शुद्धिकरण प्रकल्प, गांधीजींचा साबरमती आश्रम, कांकरिया लेक, अहमदाबादजवळील अमुल दुध प्रकल्प व अखेरच्या दिवशी अहमदाबाद महापौर व आयुक्तांना भेटलो.

 

BRT मधून प्रवास- प्रसाद क्षीरसागर , नगरसेवक प्रकाश ढोरे, सोनेरी आमदार रमेश वांजळे

 

अहमदाबाद दौर्यााचे मुख्य आकर्षण म्हणजे गोल्डमॅन रमेश वांजळे हेच होते. रस्त्यावरून जाताना, किंवा महानगरपालिका कार्यालयात गेल्यावर अत्यंत कुतुहलाने अहमदाबादेतील लोक त्यांच्याकडे, त्यांच्या अंगभर सोन्याकडे एकटक पाहात रहायचे. त्या आश्चर्यचकीत लोकांना पाहून आम्हालाही खूप मजा वाटायची.

आमची अहमदाबाद मनपाकडून अधिकृत भेट असल्यामुळे अहमदाबाद मनपा अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी आम्हाला खूपच सहकार्य केले. साबरमती रिव्हर फ्रंट डेवलपमेंट प्रकल्प तर तोंडात बोट घालायला लावणारा होता.

पुण्यातील मुळा मुठा नदीसारखी अवस्था असणाऱ्या साबरमती नदीचा “कायापालट” या योजनेतून करण्यात आला. पाणी प्रदुषणामुळे मृत झालेली नदी परत जीवंत करण्यात आली होती. आम्ही गेलो होतो तेंव्हा प्रकल्पाचे काम चालू होते. नदीतून फिरवून आणलं.

नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर मोठमोठी विकास कामे सुरू होती. सगळीकडे हिरवळ करण्यात येत होती.

प्रत्यक्ष साईटवरून आम्ही नियंत्रण कक्षात गेलो. प्रथम आम्हाला प्रकल्पाबाबत पॉवर पॉईंट प्रेजेंटेशन देण्यात आले. पॉवर पॉईंट प्रेज़ेंटेशन हे गुजरात विकासाचे प्रचार करण्याचे महत्वाचे आयुध होते. गुजरातेतील प्रत्येक विकास कामाचे पाच मिनिटाचे हिंदी इंग्रजी पॉवर पॉईंट प्रेजेंटेशन पाहायला मिळायचे. यातून आपल्याला प्रकल्पाबाबत कमी वेळात खूपकाही समजून यायचं. प्रकल्पाचे मुख्य अधिकारी मराठी होते. त्यांना भेटलो.

 

साबरमती नदी प्रत्यक्ष काम सुरू आसताना.

 

साबरमती नदी प्रकल्प समजून घेताना

 

साबरमती रिव्हर फ्रंट डेवलपमेंट प्रकल्प नियंत्रण कक्ष.

“जनमार्ग” अहमदाबादची सुप्रसिद्ध बी आर टी बस रॅपिड ट्रांसपोर्ट सिस्टीम म्हणजेच जनमार्ग. पुण्यातील फज्जा उडालेल्या बीआरटीपेक्षा अधिक सक्षम व वेगवान अशी बस सर्विस. अहमदाबादमधील रस्ते पुण्यातील रस्त्यासारखेच असूनही तीथे बीआरटी सर्विस चांगल्या पद्धतीने राबवली गेली आहे. मुख्य कारण एक की बीआरटीसाठी “एक्स्क्लुजिव” लेन दिली आहे.

या लेन मधून मुख्यमंत्र्यांच्याही गाडीला परवानगी नाही तर बाकीच्या गाड्यांचा प्रश्नच येत नाही. रूग्णवाहिकांना परवानगी आहे. प्रत्येक सिग्नलवर भारतीय फौजेतून निवृत झालेले जवान तैनात केले आहेत, बीआरटी व्यतिरिक्त कोणत्याही गाडीला परवानगी नाही. बीआरटीचे थांबे भव्य केले होते. बीआरटीचे नियंत्रण कक्ष तर पाहण्यासारखे होते. प्रत्येक बस ही जीपीआरएस ने युक्त असल्याने नियंत्रण कक्षात प्रत्येक बस नेमकी कुठे आहे आपल्याला स्क्रीनवर पाहता येते.

कांकरिया लेक…!

 

आपल्या जांभुळवाडी किंवा पाषाणच्या तलावासारखा किंवा त्याहून छोटा असा हा कांकरिया लेक प्रकल्प. मनपाने असा काही विकसीत केला आहे की अहमदाबादमधला प्रमुख टुरिस्ट स्पॉट झाला आहे. इथे काय केले नाही…!

आपल्याला लेक मधून स्पीडबोटने प्रवास करता येतो…लंडनहून स्पेशल लहानमुलांसाठी छोटी रेल्वे आणण्यात आली आहे.

 

तसेच किड्स झोन म्हणून एक वेगळाच प्रक्ल्प कार्यांवित केला आहे. या प्रकल्पात आगीचा बंब, पोस्ट खाते, तार विभाग, हॉस्पिटल, ऍंब्युलंस, छोटे रेडिओ केंद्र, आईस फॅक्टरी, अशासारखे अनेक विभाग केले आहेत.

थोडे पैसे देऊन या प्रत्येक विभागात आपल्या मुलाला भाग घेता येतो. म्हणजे आगीच्या बंब विभागात आपल्या मुलाला भाग घ्यायचा असेल तर आपल्या मुलाला फायर फायटरचा ड्रेस दिला जातो त्याला खर्याय आगीच्या बंबावर बसवून त्याच्या हातात पाण्याचे पाईप दिले जातात फायरप्रूफ काचेच्या मागे नियंत्रीत आग लावली जाते व ती आग आपल्या मुलाने विझवायची.

मुलांची संपूर्ण काळजी घेऊन प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.

 

तसेच रुग्णवाहिकेचेही तसेच प्रत्यक्ष अनुभव आल्याने मुलांना यासर्व सिस्टीम कशा प्रकारे काम करतात याची जाणिव होते.

सर्वात शेवटच्या दिवशी आम्ही अहमदाबादचे महापौर व आयुक्तांना भेटलो. अहमदाबाद विकासाबद्दल चर्चा केली. पुण्यातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. महापौर आयुक्तांना पुणे भेटीचे आमंत्रण दिले, व निरोप घेतला.

अहमदाबाद येथील शेवटचे आकर्षण म्हणजे हॉटेल “पतंग”. येथे जेवायला गेलो. हॉटेल पतंग हे ही अहमदाबादच्या टुरिस्ट लोकांचे आकर्षण आहे. हॉटेल साबरमती नदी किनारी आहे. त्यामुळे नदीचे दर्शन होते. हॉटेलचा वरचा मजला पूर्ण गोल आहे व काचेचा आहे. हा पूर्ण मजला हळूहळू स्वत:भोवती फिरत असतो. त्यामुळे आपण बसल्याजागी संपूर्ण अहमदाबाद दर्शन करू शकतो.

 

हॉटेल पतंग- वरचा पूर्ण मजला स्वतःभोवती फिरतो.

अहमदाबाद विकास अभ्यास दौरा कमालीचा यशस्वी झाला. पुण्यातील मनसेच्या नगरसेवकांची शहर विकासाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेल्याचे जाणवले. व मलाही मी जे आत्तापर्यंत कागदावर यु ट्युबवर गुजरात विकासाबाबत पाहात होतो ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version