आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : संतोष कानडे, बीड
===
आईऽऽ..ऽ आईऽऽ..ऽ आईऽऽ..ऽ कुठे आहेस तू? एवढ्या रात्री मला सोडून कुठे गेलीस? बघ ना कित्ती धूर झालाय या रुममध्ये! आम्हाला तर आता चटकेही बसत आहेत गं. आम्ही सगळे किती मोठ्ठ्यानं रडतोय. पण आम्हाला घ्यायला कुणी येतच नाहीये. तू ये ना आई… प्लीज. प्लीज. प्लीज.
का गं, कट्टी केलीयस का तू माझ्याशी? माझी काय चूक झालीय का? तुला खूप त्रास दिला का मी? पण आई, तुला तर मी आणखी त्रास द्यायलाही सुरुवात केलेली नाही गं आई.
आताशी तर मी कुठे जन्म घेतलाय. या हॉस्पिटलच्या चार भिंतीबाहेरचं जगही मी आणखी बघितलेलं नाही. डोळे भरून माझ्या ‘आईचं’ रुप डोळ्यात साठवलंही नाही आणि पोटभरून रडलेही नाही. तू मला डोळे भरून पाहिलंस का गं? नाही ना! मग ये ना आई, मला वाचवायला. तू ये ना गं आई… प्लीज.
आई, निदान त्या डॉक्टर काकांना तरी पाठव ना. त्या मला औषध देणाऱ्या नर्सताई पण इथं नाहीत. दररोज खूप लोकं ये – जा करायची आमच्या अवतीभोवती. आज एकही माणूस दिसत नाही. कुठे गेले सगळे?
आई आता धूर वाढत चाललाय बघ. कित्ती धूर झालाय सगळा! आम्हाला काहीच दिसत नाहीये. आता श्वासही घेता येईना बघ. आई ये की गं… प्लीज.
या धुरातून मार्ग शोधत शोधत माझ्या रडण्याचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय की नाही, माहिती नाही मला! कारण इवलुसा आवाज माझा. कुठेच पोचेना झालाय गं. मला जोरात रडायचीही ताकद नाही आली गं. माझी ‘कीव कीव’ ह्या रुमच्या बाहेरही जाईना आणि कुणी इकडेही फिरकेना. ये की गं आई.. प्लीज.
आई कदाचित तू माझे नाव घेत घेत धावत धावत माझ्यापर्यंत येत असशील असं मला वाटतयं! पण अगं तू मला कोणत्या नावाने हाक मारत येत असशील गं? मला माहितीच नाही. कारण तू अजून मला माझं नाव कुठं सांगितलसं? कदाचित बाबांशी चर्चा करून तू माझ्या नाव ठरवलं असशील! पण मला कुठं माहितीए?
पण आई ‘बाळा, बाळा’ म्हणत धावत आलीस तरीही मला तुझा आवाज कळेल. कारण तुझ्या पोटात नऊ महिने राहिल्याने तुझा आवाज, तुझ्या हृदयाची घालमेल, तुझ्या मनाची व्यथा सगळं सगळं माहिती आहे आई मला.
या क्षणालाही तुझ्या मनाची व्यथा मला इथं समजतेय. पण तरीही वाटतं तू येशील, तू यावीस…
आता माझं काही खरं नाही. जीव गुदमरला माझा. श्वास घेता येईना. काय करु मी… कुणी आहे का? माझ्या आई-बाबांना बोलवा प्लीज. प्लीज. ते नक्कीच आम्हाला वाचवतील. कुणीतरी या ना. बघा ना आम्हांला… नाहीतर आम्ही मरुन जाऊ!
ऐक ना आई, मी माझ्या पप्पांना अजून नाही बघितलं. त्यांनीही मला नाही बघितलं. त्यांचा स्पर्श मला मिळेल का? आई, बोल ना! का गं इतकी खट्टू झालीस. मी नकोय का तुला?
पण तू तर किती हॅपी होतीस माझ्या जन्मानं. माझ्या इवल्याशा डोळ्यांनी तुझे ते पाणावलेले डोळे बघितले होते मी. माझ्या छोटुशा हाताची मूठ सोडवली होतीस तू. तळहातावरच्या रेषा बघत होतीस.
काय कळलं काय माहित. पण माझ्या सगळ्या शरीराकडं बघून जाम खूश झाली होतीस तू! तुला खुषीत पाहून मी ही खूष. बट आज तुला इतकी झोप कशी गं लागली? आता मला तुझी जास्त गरज होती बघ. बोल ना… प्लीज.
बरं ठीक आहे आई. तू झोप. नाही तुला त्रास देणार. तसंही आता मी जीवंत रहात नाही बघ. मी आता शेवटचा श्वास घेते. माझा शेवटाचा प्रवास सुरु होईलच या श्वासानंतर. किती छोटा प्रवास होता ना माझा. देवानं का जन्म दिला असेन गं मला? लाखभर श्वाससुद्धा घेतले नसतील गं मी या जगात. काही बघायच्या आतच डोळे बंद करतोय तो माझे. दुष्ट कुठला.
पण आई ‘आलेल्या माणसाला कधी तरी जावचं लागतं’ असं तूच एकदा कोणाशी तरी बोलताना मी पोटात असताना ऐकलं होतं. त्यामुळे मला कधी ना कधी तरी जावं लागणारच होतं. फक्त खूपच लवकर जातोय असं मला वाटतयं.
मला माझी चिंता नाही आई. तुझी चिंता वाटतेय. आता किती त्रास होईल तुला, त्याचंच टेन्शन आलंय बघ. पण आई तू रडू नको… स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस.
मी ज्या मार्गानं आलो त्या मार्गानं हळूहळू निघून जातो. मी एकही पाप आणि एकही पुण्य केलं नाही, त्यामुळे मला काहीही होणार नाही. तू मात्र जास्त त्रास नको करून घेऊस आई.
आई, शेवटचं एक सांगतो, त्या पुढारी काकांना म्हणावं, आमच्या दुःखाचं राजकारण करु नका. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेवर लक्ष द्या म्हणावं. आम्ही दहा जण तर देवाघरी गेलोच आहोत, पण उरलेल्या सात जणांवर आणि त्यानंतर जन्माला येणाऱ्यांवर आणि या जगात जिवंत असलेल्यांवर नीट उपचार करा म्हणावं. तरच आम्ही वरती आनंदात राहू.
बाय..बाय…आई-पप्पा
तुमचं
(नावही नसलेलं)
पिल्लू
(भंडाऱ्याच्या दुर्दैवी घटनेतील चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली)
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.