' शनिवारची बोधकथा : वृद्ध स्त्री, झाड आणि राजा…! – InMarathi

शनिवारची बोधकथा : वृद्ध स्त्री, झाड आणि राजा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आटपाट नगर होतं. त्या नगरातील राजाला एकदा जंगलात फिरायला जाण्याचा मोह झाला. “राजा बोले, दल हाले!’ त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी घोड्यावरून काही निवडक सैनिकांसह राजा जंगलाच्या दिशेने निघाला.

काही मैल अंतर कापल्यावर एक घनदाट जंगल लागले. तेथून वेग कमी करून सारे जण पुढे पुढे जात राहिले. जंगलातील उंच उंच हिरवीगार झाडे, दूरवर दिसणारे डोंगर, मऊ मऊ गवत, डोंगरावरून खाली ओघळणारे पाणी, मंद मंद वाहणाऱ्या हवेचा आवाज, झाडांच्या पानांची सळसळ असे सारे वातावरण पाहून राजा हरखून गेला. घोड्यावरून उतरून तो आत पायी चालू लागला.

त्याच्यामागे सारे सैनही हळूहळू चालू लागले. काही अंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक दुर्मिळ फळाचे झाड राजाला दिसले. ते झाड खूप जुने, उंच आणि चांगलेच बहरलेले होते. त्याच्या फांद्या अगदी जमिनीपर्यंत पोचल्यासारख्या भासत होत्या. खोड तर दिसतही नव्हते. त्यामुळे झाडाची एक बाजू भिंती असल्यासारखीच होती. त्या झाडाला चांगलीच फळे आलेली होती.

ते पाहून राजाला त्या झाडाचे फळ खाण्याचा मोह झाला. सैनिकांना विनंती करण्याऐवजी राजाने पाऊलवाटे शेजारी पडलेले दोन-तीन दगड हातात घेतले. फळ पाडण्याच्या उद्देशाने दगड झाडाला मारू लागला. पण निशाणा चुकला. सैनिकांनी आणखी दगड आणून दिले.

राजा पुन्हा प्रयत्न करू लागला. स्वत: दगड मारून फळे पाडण्यात राजाला आनंद वाटत होता. आतापर्यंत एक-दोन फळे राजाला मिळाली होती. पण सोबत आणखी काही फळे घ्यावीत म्हणून राजा झाडाला दगड मारत होता.

आणि काय आश्चर्य एक दगड मारल्यानंतर वृद्ध स्त्री किंचाळण्याचा जोरात आवाज आला. राजाला क्षणभर झाडच रडल्यासारखे वाटले. पण तात्काळ सावरत त्याने सैनिकांना कोण ओरडले हे शोधण्यासाठी पाठवले.

काही वेळाने सैनिक राजाजवळ आले. त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री होती. तिच्या हातात एक टोपली होती. त्या टोपलीत जंगलातील वेगवेगळी दुर्मिळ फळे होती. तिच्या डोक्यातून रक्त वाहात होते.

राजाला पश्चाताप झाला. “महाराज, ही म्हातारी आपल्याच राज्यातील. जंगलातील फळे गोळा करून राज्यात विकते. हाच तिचा उदरनिर्वाह. दोन-तीन दिवसांनी ती एकटीच जंगलात येते आणि फळे वेचून घेऊन जाते’, अशी माहिती सैनिकांनी दिली.

आपला दगड या महिलेला लागला म्हणून त्याने हात जोडून तिची माफी मागितली. त्या स्त्रीने मात्र काहीही तक्रार न करता “राजा तू मला दगड मारलास. बक्षिस म्हणून तुला ही फळे’ असे म्हणत टोपलीतील काही फळे राजाला देण्याचा प्रयत्न केला. सैनिकांना फार विचित्र वाटले.

राजा माफी मागतोय आणि ही म्हातारी बक्षिस देतेय. त्यांना ही म्हातारी वेडी असल्यासारखे वाटले. राजालाही आश्चर्य वाटले. त्याने म्हातारीला विचारले, “माते, आम्ही तुला दगड मारला. अद्याप तुझी जखमही भरली नाही. तर तू आम्हाला बक्षिस म्हणून फळे देत आहेस? तुला आमचा राग नाही आला का?’

राजाच्या या वक्तव्यावर वृद्ध स्त्रीने जे सांगितले त्याने राजाला फार फार वाईट वाटले. ती म्हणाली, “राजा. या एवढ्या मोठ्या झाडाला तू कितीही दगड मारलेस तरी हे झाड न रागावता तुला खूप सारी फळं देतं.

मग मला दगड मारलास तर मी रागावण्याऐवजी फळ दिले तर बिघडले कुठे? माणसानं झाडाकडून नम्रतेचा एवढा एक गुण जरी घेतला तरी बघ तुझं राज्य कसं या जंगलाप्रमाणे बहरेल. भांडणतंटे होणार नाहीत. सगळीकडे शांतता नांदेल.’

वृद्ध स्त्रीच्या या वक्तव्यावर राजाने तिच्या पायांना स्पर्श करत नमस्कार केला आणि आपला जंगल प्रवास संपवत त्याने तिला राज्यात आणले. तेथे तिच्यावर योग्य ते उपचार करून तिचा यथोचित सत्कार केला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?