Site icon InMarathi

आज लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमधील ‘वन डे’ सामन्यांना अशी झाली सुरूवात!

ODI-cricket-history-featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या भारतात क्रिकेट हा खेळ सर्वात जास्त खेळला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या खेळाबद्दल एक वेगळेच आकर्षण आहे. सुरुवातीला या खेळात फक्त कसोटी सामने खेळले जायचे. परंतु कालांतराने क्रिकेटमध्ये बदल होत गेले, आणि वन डे, ट्वेंटी-ट्वेंटी असे नवीन प्रगत रूप आपल्या सर्वांना बघायला मिळाले आहे.

 

 

कसोटी क्रिकेटच्या काळात क्रिकेटला फारसं ग्लॅमर नव्हतं. परंतु पुढे त्यात जसजसे बदल होत गेले, तसतसे क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त होत गेलं.

या सर्व बदलांची सुरुवात ‘वन-डे क्रिकेट’ या संकल्पनेतून झाली.

तर मंडळी आज आपण या लेखात वन-डे क्रिकेटच्या जन्माची कहाणी जाणून घेणार आहोत.

सर्वसामान्य खेळाडूला प्रचंड प्रसिद्धी मिळवून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट! पण सुरुवातीला हे समीकरण असं नव्हतं. कारण तेव्हा क्रिकेट हा खेळ, एवढा वेगवान खेळ म्हणून प्रसिद्ध नव्हता.

क्रिकेट रसिकांसाठी ५ जानेवारी १९७१ चा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी क्रिकेटला नवीन स्वरूप प्राप्त झालं, कारण याच दिवशी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याची सुरुवात झाली.

त्याआधी क्रिकेट फक्त आणि फक्त कसोटी सामन्यापुरतंच मर्यादित होतं. हे सामने पाच पाच दिवस चालत असत आणि त्यामुळेच हा खूपच रटाळ खेळ वाटत असे.

 

 

वन-डे सामन्यामुळे क्रिकेटचं संपूर्ण स्वरूपच बदललं. खरं पाहता वन-डे क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलं जायच्या तब्बल आठ वर्ष आधी म्हणजे १९६३ मध्ये क्रिकेटची मायभूमी इंग्लंडमध्ये वन-डे क्रिकेटचा प्रयोग यशस्वी झाला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तो यशस्वी ठरण्यासाठी मात्र, पुढची आठ वर्ष वाट पहावी लागली.

कसा झाला वन-डे क्रिकेटचा जन्म?

१९७० च्या नोव्हेंबर महिन्यात सुप्रसिद्ध Ashes सिरीज खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात गेला होता. तेव्हा ही सिरीज तब्बल सहा सामन्यांची खेळली जात असे. यातील पहिला सामना ब्रिस्बेनला खेळला गेला हा पहिला सामना ड्राॅ झाला.

 

 

या सिरीज मधला दुसरा सामना पर्थ येथे खेळला गेला आणि तो सामना देखील अनिर्णितच राहिला. यातील तिसऱ्या सामन्याला २९ नोव्हेंबर १९७० रोजी सुरुवात झाली. परंतु जोरदार पावसामुळे पहिल्या तीन दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.

त्यानंतर दोन्हीकडील क्रिकेट बोर्डाने हादेखील सामना रद्द करण्याचे ठरवले. परंतु त्याकाळी क्रिकेट सामन्यांचा इन्शुरन्स काढला जात नसे. हा सामना रद्द झाल्यावर आयोजकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार होते. हा आकडा जवळपास ८०,००० पाऊंड एवढा मोठा होता.

एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करण्याची आयोजकांची तयारी नव्हती, कारण नुकसानासोबतच त्यांना या सामन्याची विकलेली तिकिटं देखील परत करावी लागणार होती.

केवळ हा सामना रद्द कराण्याऐवजी, मालिकेत आणखी एक म्हणजे सातवा सामना खेळण्याचे दोन्ही क्रिकेट बोर्डाकडून ठरवण्यात आले. परंतु या जास्तीच्या सामन्याचं मानधन मिळावं असा हट्ट इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून केला जाऊ लागला.

या काळी क्रिकेटचा सामना म्हटलं की पैशांचा पाऊस पडत नसे. अत्यंत जुजबी खर्चात हे सामने खेळले जात आणि त्यानुसार खेळाडूंना मानधन दिले जात असे.

 

 

इंग्लंड क्रिकेट संघाकडून झालेली मानधनाची मागणी आयोजक पूर्ण करू शकत नव्हते म्हणूनच पुढे बोर्डाने असा निर्णय घेतला की मेलबर्न मधील क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी आणि खेळाडूंच्या मानधनाचा विचार करत हा सातवा सामना केवळ ४० ओव्हर्सचा असेल.

(यातील एक ओव्हर ८ चेंडूंची होती) आणि अशाप्रकारे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एकत्र येत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्याचे ठरविले.

परंतु तरीही अनेक अडचणी समोर दिसत होत्या कारण अशा प्रकारच्या वन-डे सामन्यासाठी आयोजक ( स्पॉन्सर ) मिळणे अत्यंत अवघड काम होते. दोन्ही बोर्डाने प्रयत्न करून तंबाखूचे उत्पन्न घेणाऱ्या Rothmans कंपनीला स्पॉन्सरशिपसाठी तयार केलं.

मंडळी आश्चर्य वाटेल पण जगातील पहिला वन-डे आंतरराष्ट्रीय सामना केवळ पाच हजार पौंड एवढ्याच जुजबी खर्चात पूर्ण झाला. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी केवळ ९० पाऊंड एवढे बक्षीस ठेवण्यात आले होते.

अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत खेळवला गेलेला हा सामना इंग्लंडने जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांकडून दिग्गज खेळाडू मैदानात उतरले होते. ऑस्ट्रेलियन संघाकडून डॉन ब्रॅडमन, बिल लाॅरी तर इंग्लंड संघाकडून इलिंगवर्थ, ईयन चॅपल यासारखे खेळाडू मैदानात होते.

 

 

इंग्लंडच्या जाॅन एंड्रीच या खेळाडूची मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारासाठी निवड झाली. लक्षात घ्या मित्रांनो हा खेळाडू वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावलेला खेळाडू आहे.

हा सामना संपल्यानंतर मेलबर्नमधील स्थानिक क्रिकेट रसिकांशी संवाद साधताना डॉन ब्रॅडमन म्हणाले की, “तुम्ही इतिहास घडताना पाहिला आहे.”

पहिला वन-डे क्रिकेट सामना व्यवसायिक दृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरला. Rothmans कंपनी केवळ वीस हजार तिकिटे विकली जावीत म्हणून प्रयत्न करत होती. परंतु प्रत्यक्षात ४६ हजारांपेक्षा देखील जास्त तिकिटं विकली गेली. ज्यातून कंपनीला प्रचंड नफा झाला.

या सामन्याचं यश बघू आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल या संस्थेने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर वन-डे क्रिकेटला मान्यता दिली.

मान्यता दिल्यानंतर देखील अनेक काळ याचे नियम ठरवण्यात घालवला गेला. अर्थात, काही बदल पुढील काळात, अनुभवातून होत गेले. सुरुवातीच्या काळात हा सामना ६० षटकांचा खेळला जायचा.

आशिया खंडामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये मात्र साठ षटकांचे सामने खेळून होत नसत. त्यामुळे पुढे त्यामध्ये बदल करून, सामना केवळ ५० षटकांचा खेळवण्यात येऊ लागला.

कसोटीच्या तुलनेत वन-डे क्रिकेट जास्त प्रमाणात यशस्वी होऊ लागलं. कसोटी सामने सुरुवातीला मोजकेच काही देश खेळत असत परंतु वन-डे क्रिकेट मात्र संपूर्ण जग खेळू लागलं.

त्यानंतर अर्थातच या खेळात खूप बदल होत गेले. आज तर अवघ्या २०-२० षटकांमध्ये संपलेले सुसाट सामने सुद्धा खेळले जातात.

 

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version