Site icon InMarathi

कार्पेट दुकानात नोकरी करणारा ‘कालिन भैय्या’ आज ‘गुगल’ सह जगाला कार्पेट पुरवतोय!

kaleen bhaiya inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये कार्पेट व्यवसाय असणारे कालीन भैय्या हे कॅरेक्टर प्रचंड गाजलं. परंतु खऱ्या आयुष्यात असे एक कालीन भैया आहेत ज्यांनी कार्पेट मध्ये आपलं करिअर केलं.

नुसतंच करिअर केलं नाही तर अनेकांचं करिअर घडवले देखील.

आपल्या इनसिग्ने या कंपनीद्वारे संपूर्ण जगभरातल्या ४५०० ठिकाणी, त्यात फाईव्ह स्टार हॉटेल्स, प्रायव्हेट विमाने, मोठ्या लक्झरिअस प्रॉपर्टी, एअरपोर्टला, कंपन्यांना, कार्पेट पुरवली आहेत. असिफ रहेमान असं कालीन भैयाचं नाव आहे.

असिफ रहमान हे कलकत्त्याचे रहिवासी. १९८८ साली त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते.

 

 

एके दिवशी कलकत्त्याच्या बाजारातून फिरताना त्यांना एक कार्पेटचे दुकान दिसले, ते बाहेर उभं राहून ते दुकानाचं निरीक्षण करत होते.

त्यांना पाहून दुकानातल्या मालकाने त्यांना आत बोलावून घेतले आणि ,इथे कशासाठी उभा आहेस? असं विचारलं. त्यांची संपूर्ण चौकशी केली आणि त्यांना ‘नोकरी करशील का?’ असं विचारलं.

असिफ यांना त्या दुकानात नोकरी लागली. नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी ते एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कार्पेट बसवायला गेले. त्या दुकानात त्यांनी मन लावून काम केले. त्यांची मेहनत फळाला येत होती.

त्यांचा प्रामाणिकपणा बघून त्यांची नेमणूक सेल्स डिपार्टमेंटला करण्यात आली. त्यांनी तिथे देखील व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. काही लोक त्यांचे म्हणणे ऐकूनही घेत नव्हते तर काहीजण त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत होते.

हे करता करताच त्यांची बढती ही होत होती. पुढे त्यांना बडोही आणि मिर्झापूर येथे जाता आले. उत्तर प्रदेशातील ही शहरे कार्पेट इंडस्ट्रीजची माहेरघर आहेत, असं म्हटलं तरी हरकत नाही.

परंतु त्यामुळेच आसिफ यांना कार्पेट इंडस्ट्रीजची खडानखडा माहिती झाली. कार्पेट साठी लागणारे रॉ मटेरियल, कलर, बजेट, डिझाईन, मार्केटची गरज या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या.

 

 

पुढे ते हॉंगकॉंगमधल्या तैपिंग येथल्या कार्पेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे डायरेक्टर झाले. त्यानंतर त्यांना जाणवायला लागलं की आता आपण आपलीच कंपनी काढायला हवी.

मग २०११ मध्ये गुरुग्राम येथे इनसिग्ने या कंपनीची स्थापना झाली. त्यांनी बचत केलेले स्वतः जवळचे ३५ लाख रुपये त्या कंपनीत गुंतवले. आता त्यांची कंपनी कन्सल्टेशन, मॅन्युफॅक्चरिंग आणि कार्पेट इन्स्टॉलेशन करते.

आसिफ यांनी कंपनी काढली खरी मात्र सुरुवातीला त्यांना एकही ऑर्डर कित्येक महिने मिळाली नाही. ऑर्डर मिळवण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागले. पहिली ऑर्डर त्यांना मिळाली ती मुंबईमधल्या टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलची.

मग नंतर त्यांना काम मिळत गेले. आधी या इंडस्ट्रीमध्ये काम केलेले असल्यामुळे त्यात झालेल्या थोड्याफार ओळखीचा फायदा झाला. त्यांचं काम, त्यांचा स्वभाव, कामाची कमिटमेंट लोकांना माहीत होती.

हळूहळू काम मिळायला सुरुवात झाली. सुरुवातीला तर त्यांच्याकडे ऑफिस देखील नव्हते. ते आणि त्यांचा छोटासा स्टाफ घरातूनच काम करायचे. आता त्यांच्या मेहनतीला फळ आले आहे.

इनसिग्नेची मॅन्युफॅक्चरिंगही सुरुवातीला वाराणसी मधल्या नेवाडा आणि आग्रा येथे होत होती. २०१८ मध्ये हॉंगकॉंग मधली तैपिंग कंपनी विकली गेली. पण तैपिंगला ज्या चीनमधल्या कंपनीतून कच्चामाल पुरवला जायचा, त्या कंपनीला त्यामुळे प्रॉब्लेम आला.

 

 

चीन मधली कच्चा माल पुरवणारी कंपनी दिवाळखोरीत आली. मग असिफ त्यांनी ती कंपनी खरेदी केली, आणि ती आपल्या कंपनीबरोबर जोडली.

इनसिग्ने या कंपनीत जे कार्पेट बनतात त्यासाठी लोकल मार्केट मधून कच्चा माल घेतला जातो. नंतर त्यावर मिल मध्ये प्रक्रिया केली जाते. त्यानंतर साईज, डिझाईन, कलर ठरवले जातात.

जे काही बारीक डिटेल्स आहेत तेही गिऱ्हाईकाबरोबर चर्चा करून ठरवले जातात. प्रत्येकासाठी वेगळं डिझाईन तयार केलं जातं, एकच डिझाईन कधीही रिपीट केलं जात नाही.

भारतामध्ये हाताने बनलेल्या कार्पेटला जास्त पसंती दिली जाते. असे एक कार्पेट बनवायला सात ते आठ आठवडे लागतात. कार्पेट बनवण्यासाठी पहिल्यांदा त्याचं डिझाईन एका ग्राफ पेपरवर काढण्यात येतं, नंतर त्याची आउटलाइन कपड्यावरती केली जाते.

त्यानंतर धागे वेगवेगळ्या रंगात रंगवले जातात. नंतर ते धागे कपड्यावरती विणले जातात.

आता ते धागे विणण्यासाठी मशीन आहे पण अजूनही कधी कधी हातांनी देखील ते धागे विणले जातात. खास हँडलूम कार्पेट मात्र हातानेच विणले जातात. १४ ते १६ आठवड्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.

इनसिग्नेच्या चीन मधल्या युनिट मधून दिवसाला ५००० स्क्वेअर मीटर कार्पेट बनवले जातात. तर भारतातल्या युनिट मधून एक हजार स्क्वेअर मीटर कार्पेट बनते.

आपल्या उत्कृष्ट कामामुळे इनसिग्ने कंपनीने भारताला आत्तापर्यंत परदेशी चलन मिळवून दिले आहे. या क्षेत्रात अजूनही पैसा मिळवण्याचा वाव आहे, ही इंडस्ट्री वाढण्यासाठी अजूनही प्रचंड प्रमाणात स्कोप आहे असं असिफ म्हणतात.

ही इंडस्ट्री दुर्लक्षित आहे. या इण्डस्ट्रीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. असिफ म्हणतात की नोटाबंदी, जीएसटी मधील गोंधळ आणि आताच्या covid-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या इंडस्ट्रीची वाढ खुंटली.

 

 

केवळ दिलेली ऑर्डर कॅन्सल करता येणार नाही या कंपनीच्या पॉलिसी मुळे या लॉकडाऊन मध्ये देखील फारसा त्रास झाला नाही असे असिफ म्हणतात.

नाही तर परिस्थिती खूपच गंभीर बनली असती. कारण त्यावेळेस चीनमधली दोन्ही युनिट्स दोन महिने बंद होती तर भारतातली सहा महिने बंद होती. आता ऑनलाइन मार्केट मुळे बरेचसे ग्राहक त्यांना जगभरातून मिळत आहेत.

पण युरोप अमेरिकेत या कार्पेटची निर्यात करीत असताना BFL-S1 या सर्टिफिकेटची गरज लागते. परंतु भारतात हे सर्टीफिकीट देणारी लॅबच उपलब्ध नाही.

यासाठी तयार केलेले कार्पेट, स्पेन, बार्सिलोना इत्यादी ठिकाणी पाठवावे लागते आणि यूरो मध्ये किंमत देऊन सर्टिफिकेट मिळवावे लागते. यामुळे कार्पेटची किंमत वाढते.

भारतात अजूनही इथल्या शिक्षण व्यवस्थेत कार्पेट बनवण्याचं शिक्षण कुठल्याही संस्थेत मिळत नाही. जे काही लोक काम करतात ते पूर्वापार चालत आलेलं काम करतात.

या सगळ्या परिस्थितीतून इनसिग्ने कंपनी मार्ग काढीत आहे. वर्षाकाठी मोठे ५०० प्रोजेक्ट्स ही कंपनी घेते. आत्तापर्यंत त्यांनी फ्रान्समधल्या ‘ल समरेतेन’, न्यूयॉर्कमध्ये ‘द पियर’, लास वेगास मधील ‘वेन कॅसिनो’, तर ओमान मधील ‘सलाह इंटरनॅशनल एअरपोर्ट’ इत्यादी अनेक ठिकाणी इनसिग्ने कंपनीचे कार्पेट आहेत.

 

 

आता अबुधाबीच्या राजाच्या प्रायव्हेट जहाजावरदेखील इनसिग्ने कंपनीचे कार्पेट असणार आहे.

अगदी आता सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या आणि अत्यावश्यक सेवेत आलेल्या गुगल कंपनीच्या न्यूयॉर्कमधल्या ऑफिसमध्ये देखील इनसिग्ने कंपनीचे कार्पेट घातलेले आहेत.

आता असिफ रेहमान इको फ्रेंडली कार्पेट बनवण्याकडे वळत आहेत. मका, ज्यूट इत्यादी नैसर्गिक गोष्टी वापरून कार्पेट बनवण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या कंपनीचं कुठलंही शोरूम त्यांनी काढलेलं नाही.

तरीदेखील स्वतःच्या मेहनतीने त्यांच्या स्टाफच्या साथीने कार्पेट मध्ये नावीन्य आणून असिफ रहमान यांनी आता कार्पेट इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव केलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version