Site icon InMarathi

डॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून

http://www.hindustantimes.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रिय डॉक्टर मित्र मैत्रिणींनो, तुमच्या व्यवसाय बंधूवर हल्ला झाला की तुम्ही एकी दाखवून देता हे निश्चितच स्तुत्य आहे. अशा बाबतीत सगळा समाज, सरकार तुमच्या पाठीशी राहावेत अशी अपेक्षाही रास्त आहे. असा हल्ला करणारे लोक माझ्या पाहण्यात तरी सुशिक्षित असे नाहीत. माझं वैयक्तिक मत अगदी साधं सोपं आहे. वैद्यकीय शिक्षण सध्या समाजातील सर्वोच्च प्रतिष्ठा देणारं आहे आणि ज्यांना हे शिक्षण तर नाहीच पण कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रात यश मिळत नाहीत ते जळक्या वृत्तीने अशी भडास काढतात. त्यातही मस्तवाल तरूण मुलांचाच यात सहभाग असतो. एखाद्या सुशिक्षिताने किंवा वृद्धाने किंवा महिलेने हल्ला केल्याचं उदाहरण कुठे आहे काय!?

सध्या तुम्ही लोक receptive mood मधे नाही आहात म्हणून कुणी काही तुमच्या विरोधात बोललं कि आणखीच भडकत आहात. मी नेहमीच नोट करते न्याय व्यवस्थेवर तुमचा फारसा विश्वास नसतो.

http://www.hindustantimes.com

फार कमी वैद्यकीय अधिकारी असे आहेत जे medico legal cases मधे व्यवस्थित प्रमाणपत्र लिहितात आणि बोलावल्यावर साक्ष देण्यासाठी येतात. त्यांना साक्षीसाठी बोलावणं हे आमच्यासाठी मोठं दिव्य असतं. आम्ही रूग्णावर उपचार करावे की कागदं काळे करावे, साक्ष देणं आमचं कर्तव्य नाही अशी बेजबाबदार विधानं करणारेही बरेच आहेत .

न्याय मिळाला नाही तर न्यायाधीशाला मारावं का? अशासारखे प्रश्न तुमच्या हल्लीच्या लेखांमधून येताहेत. (आपण सगळेच हल्ली social media वर लिहितोय बहूतकरून) पण असं आहे की हा प्रश्न केवळ उद्वेगातून येतो. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही, तर अशी प्रतिक्रिया द्यायची नसते हे सुजाण जाणतात. त्यासाठी वरच्या न्यायालयात अपील करायचं असतं. पण तरीही – न्यायाधीशाला न्यायालयात शिवीगाळ करणं, वस्तू, चप्पल फेकून मारणं, न्यायाधीशाच्या घरी चोरी करणं, त्यांच्या घरातल्या लोकांवर जीवघेणा सशस्त्र हल्ला करणं हे प्रकार घडतात याची किती जणांना कल्पना आहे? समाजातल्या सगळ्या घटकांना संरक्षण देणं जगातल्या कोणत्याही सरकारला शक्य नाही. न्यायसंस्थेत काही विशेष प्रकरणांव्यतिरीक्त संरक्षण फक्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश व त्यावरील पदांसाठी आहे इतरांना नाही.  तरी मूळ फरक हा आहे की तुम्ही समाजातील रुग्णांसाठी काम करता ते गुन्हेगारांना handle करत असतात. असो.

http://indiatoday.intoday.in

वकीलांवर त्यांचे कितीतरी अशील हल्ला करतात – did u know?!

प्रत्येक क्षेत्रातच असे वाईट elements त्रास देतात . पोलिसांवरही हल्ले होतात. पण या सगळ्यांना संप करण्याचा अधिकारच कायद्याने दिलेला नाही. तुमच्यात एकीचं बळ आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. तुम्हाला union स्थापण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे ही तुम्हाला कायद्याची देन आहे हे विसरू नका. हा अधिकार सगळ्यांना नाही हेही लक्षात घ्या.

एक काळ असा होता की कायद्याचा तज्ञ हा समाजात सर्वोच्च स्थान मिळवून होता आज त्याची स्थिती समाजात फारशी चांगली नाही. असं का घडलं? तर आमच्याकडे स्वतःच्या व्यवसायात शिरलेल्या वाईट गोष्टी आम्ही वेळेवर control केल्या नाहीत. तुम्हीही त्याच मार्गाने जात आहात!

मधल्या काही काळात मला PCPNDT Act ( स्त्री भ्रूण हत्या संबंधीत कायदा ) च्या cases handle करण्याची संधी मिळाली. हा कायदा डॉक्टरांवर खास अन्याय करण्यासाठी तयार केला असल्याबाबत माझ्या सहवासातील जवळपास सगळ्या डॉक्टरांचं मत असल्याचं जाणवलं.

या सामाजिक प्रश्नाचं भान आणि गांभीर्य तुम्हाला जर नसेल तर ही भारतीय समाजाची फार मोठी शोकांतिका ठरेल. यासंबंधातील गुन्हे केवळ डॉक्टरांच्या मदतीनेच होऊ शकतात.  या कायद्यातील तरतुदीनुसार काही रुग्णाचे काही form भरणं बंधनकारक आहे. तुम्ही एवढी मोठी hospitals manage करता, एवढा staff सांभाळता, इतकी कर्ज फेडता त्या अनुषंगाने असं म्हणेन की लाखोची उलाढाल करता मग form भरणं जाचक आहे असं का वाटतं तुम्हाला ?

 

http://indianexpress.com

समाजविघातक पद्धतीने practice करणा-या डॉक्टरांविरुद्धही आंदोलन करावं, MBBS पास करण्यासाठी budding doctors ना बऱ्याचदा जो जाणीवपूर्वक त्रास दिला जातो तो तुमचेच लोक देतात त्यात लक्ष घालावं, उच्च शिक्षण घेत असतांना आत्महत्या करणारे अधिकाधिक विद्यार्थी medical चेच का असतात हे बघावं असं तुम्हाला नाही वाटत का?

डॉक्टर पेशंटला लुटतात असा समज किंवा गैरसमज म्हणा हवं तर समाजात झपाट्याने पसरत चाललाय याबाबत काय करावं याबाबत तुमची किती चर्चासत्र आयोजित होतात?

सरकारी यंत्रणा सगळीकडेच तुटपुंज्या आहेत. तुमचा फारसा संपर्क येत नसेल असं उदाहरण देते.

५ प्रवाशांची क्षमता असणारी ST bus ६० जणांना नेते. आपण सगळेच जण कुठे ना कुठे हे सोसत असतो. तुमचा नेहमीच होणारा outbreak मी समजू शकते पण तुम्ही डॉक्टर म्हणून काही जास्त विशेष अपेक्षा समाज आणि सरकार यांच्याकडून ठेवत आहात का याचं आत्मपरीक्षण कराल का? प्लिज?

 

http://www.hindustantimes.com

मी हा लेख लिहिला म्हणजे तो last word नाही याची मला जाणीव आहे. पण या angle चर्चा व्हावीच असा माझा आग्रह आहे. माझा एक शालेय वर्गमित्र सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून शासन सेवेत आहे. तो अतिशय उत्कटतेने, प्रामाणिकपणे काम करतो ग्रामीण भागात तुटपुंज्या साधनसामग्रीसह तो त्याच्या रूग्णावर उपचार करत असतो. कामाप्रती समर्पण व सेवावृत्तीचं हे असं उदाहरण आहे की रुग्णावर उपचार करत असतांना तो स्वतः महामृत्युंजय मंत्राचा जपही करतो. पण अशा सेवाभावी वृत्तीचे किती लोक उरले आहेत!!?

(हे सुद्धा वाचा: डॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून!)

काही डॉक्टरांना आपण डॉक्टर व्हायलाच नको होतं असं काही नवोदितांना वाटतं असाही सूर ऐकला. त्यांच्यासाठी आणि सगळे डॉक्टर्स चांगलेच असतात म्हणून त्यांना special immunities आणि विशेष दर्जा मिळावा अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांसाठी काही ओळी…

 

http://desinema.com

 

शतजन्माच्या पुण्याईने , मिळे ऐसे शिक्षण ,
डॉक्टर नव्हेत दीन, देव मानती तया सकळ जन !
कुण्या एकावर जरी झाला असेल हल्ला ,
वेठीस धरणे रुग्णा , नच शोभे तुम्हाला !
तुमची मेहनत अन् सेवावृत्ती ,
काय असे केवळ कौतुक घेण्यापुरती ?
पुष्कळ डॉक्टर जरी असती सेवाधारी,
लुटणारेही असती कमी न परी !
कुणासाठी हे असे रुग्णसेवेचे व्रत,
बरेच आहेत परी पैशापुढे नत!
स्त्री भ्रूण हत्येच्या पापाचेही धनी काही ,
येणाऱ्या स्त्री रूग्णाला छेडणारेही कमी नाही !
एका डॉक्टरने करवून घेतलेल्या चाचण्या ,
दुसरा डॉक्टर न मानी , अशा कित्येक कहाण्या !
असेल आकाशात राहात तो देव,
पण तुम्ही आमची पृथ्वीवरची ठेव !
खरेच असेल जर तुमचे व्यवसायावर प्रेम ,
दूर करा त्यात शिरलेली गोम !
असोत सैनिक , वकील , इंजिनिअर वा मजूर,
प्रत्येकाच्या प्रामाणिक कष्टाची व्हावी कदर !
डॉक्टर राहावेत सदैव पात्र आदरा,
अन्य किंतू-हेतू नसे मनात जरा!
हे कुणा एकट्यास उद्देशिले मी ना,
कळकळीची विनंती सा-या विद्वज्जना!
योग्य वळण मिळो तुमच्या आंदोलना ,
केवळ हीच प्रार्थना करी वंदना !!!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version