कोरेगाव भीमा लढाई – इंग्रजांचा जातिवाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – सौरभ वीरकर
====
दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा “शौर्यदिन” म्हणून यासंदर्भात ‘आऊट ऑफ काँटेक्स्ट’ संदर्भ उचलून, खोटा इतिहास पसरवून समाजात जातीद्वेष पसरविण्याचे काम गेले काही वर्ष यशस्वी रित्या चालू आहे.
पण ही कोरेगाव भीमा लढाई नक्की काय होती? त्याचा व्यापक इतिहासाशी संबंध काय ? ही खरंच जातीअंताची लढाई होती का? तर सर्वस्वी नाही. कोरेगाव भीमा लढाई ही विशिष्ट समाजाने ब्राहण्यवादी, ब्राह्मणांशी लढलेली लढाई नाही.
ही लढाई तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धातील महत्वाची लढाई होती. ज्यात व्यापार करण्यासाठी म्हणून आलेले इंग्रज, ईस्ट इंडिया कंपनीने उभारलेल्या सैन्याच्या मदतीने भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहात होते
कोरेगाव भीमा लढाई – धावता आढावा
तिसरे इंग्रज – मराठा युद्ध ५ नोव्हेंबर १८१७ पासून सुरू झाले ते जवळ जवळ जून १८१८ मध्यापर्यंत चालले. ज्याचा अंत, मराठा संघराज्याचे (confederacy) प्रमुख दुसरे बाजीराव पेशवे यांच्या संपूर्ण शरणागतीने झाला. त्यानंतर भारतीय उपखंडात, दक्षिणेत बऱ्याचश्या भूभागावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली.
पर्याप्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी स्वप्नातून साकार झालेले २०० वर्षाचे मराठा साम्राज्य अस्ताला गेले.
१८०२ साली पेशव्यांनी इंग्रजांबरोबर केलेल्या वसई तहानुसार, (तात्पुरत्या राजकारणासाठी) मान्य कराव्या लागलेल्या अटींमुळे होणारी मानहानी साम्राज्याच्या एके काळच्या सर्वेसर्वा असणाऱ्या पेशव्यांना सहन होणारी नव्हती.
त्यामुळे अशा कराराला धाब्यावर बसवून बाहेर पडण्याचा हरेक प्रयत्न दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी केला. पुढील दहा – बारा वर्षात पुरेसे अर्थ जोडून शिंदे, होळकर , गायकवाड सरदारांशी वेळोवेळी संगनमत करून त्यांनी मराठा सैन्य उभे करण्यास सुरुवात केली.
१८१५ मध्ये घडलेली एक घटना काळाला कलाटणी देणारी ठरली. याच घटनेचा दुवा साधून इंग्रजांनी मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणात परत ढवळाढवळ करून ” फोडा आणि राज्य करा ” नीतीचा अवलंब सुरू केला. महसूल गोळा करण्यावरून गुजरातचे गायकवाड यांच्याशी पेशव्यांचा आर्थिक वाद प्रकोपला गेला होता.
गायकवाड घरण्याचे दूत गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची पंढरपूरमध्ये त्यातच हत्या झाली. लगोलग या वादात पुण्याचा इंग्रजांचा रेसिडेंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने हिरहिरिने उडी घेतली आणि गंगाधर पटवर्धन यांच्या हत्येचा ठपका पेशव्यांचे सरदार त्रिंबक डेंगळे यांच्यावर ठेवला. इंग्रजांनी डेंगळे यांना अटक करून ठाण्यातील कारागृहात बंदी ठेवले. यानंतर पेशवे – इंग्रज संबंध खराब होत गेले.
दुसरे बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांच्या विरोधात सर्व सरदार एकत्र आणण्याचे प्रयत्न, अनेक पत्रं आणि दूत यांच्या मार्फत चालू ठेवले. यातील अनेक पत्रं आणि दूत इंग्रजांकडून पकडले देखील गेले. या पकडल्या गेलेल्या ‘इंटेलिजन्सच्या’ आधारावर अश्या व्यापक आघाडीबाबत इंग्रज पहिल्यापासून सजग होते. पेशव्यांनी अश्या प्रस्तावित सैन्याचे वरपांगी कारण “मध्य भारतात पिंडारींविरुद्ध इंग्रजांना मदत” करण्यासाठी म्हणून सांगितले होते खरे पण त्यातून योग्य ते राजकारण साधता आले नाहीच.
दरम्यान सप्टेंबर १८१६ मध्ये ठाण्याच्या कारागृहातून सरदार त्रिंबक डेंगळेने विस्मयकारकरित्या इंग्रजांना चपराक देऊन पलायन केले. इंग्रजांना हे पलायन फारच जिव्हारी लागले.
पुढील वर्षात डेंगळे यांनी मांग ,भिल्ल, रामोशी आणि इतर अनेक जमातीतील लोकांना एकत्र करून मोठे सैन्य उभारले (ज्याची नोंद ब्रिटिशांच्या कागदपत्रात आहे). तर पेशव्यांच्या सैन्याचे सरसेनापती बापू गोखले यांनी इंग्रजांविरुद्ध निर्णायक युद्धाचे नियोजन सुरू केले.
कोरेगाव भीमा लढाईच्या ६ महिने अगोदर, मे १८१७ मध्ये पळून गेलेल्या सरदार डेंगळेंसाठी, इंग्रजांनी पुन्हा पेशव्यांवर दबाव टाकला. डेंगळेंना दोषी घोषित करून हमी म्हणून सिंहगड, पुरंदर, आणि रायगड हे तीन महादुर्ग ताब्यात देण्यासाठी तगादा लावला.
यावेळेस पेशव्यांनी आपल्या संरक्षणासाठी (असा बहाणा करून) पुण्यात घोडदळ आणि ७००० अरब पायदळ तयार ठेवले. इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टन याने पुढच्या युद्धाची साद ऐकून जनरल स्मिथला इंग्रजी सैन्यासह पुण्यात बोलवून घेतले. येणाऱ्या युद्धात कुमक पुरवण्यासाठी इंग्रजांनी “पुना ऑक्सीलारी होर्सेस” या नवीन ट्रूपची बांधणी सुरुवात केली. या साठीच्या जाहिरातीमध्ये,
“Men to be Sunnis,Shaikh’s,Moguls,Pathans , Scindias , Beloochis,Shah’s, Hindustanis , Brahmins, Rajputs and Marhattas spearsmen. Men of low caste not to be admitted “, असे रीतसर म्हटले होते. (याचा संदर्भ “पूना हॉर्सेस” या पुस्तकात मिळतो. यातून इंग्रज कसे जातीभेद करीत हे दिसून येतो.) या दलातील ३०० घोडदळ कोरेगाव भीमा लढाईत सहभागी होते.
इंग्रजी सैन्याची पुण्यातील वाढती हालचाल बघून पेशव्यांनी आपले पूर्ण सैन्य सातारजवळ माहुली येथे हलविले. तेथे छत्रपती प्रतापसिंह यांची मनधरणी करून इंग्रजांविरुद्ध युद्धासाठी त्यांचा पाठिंबा मिळविला.
एलफिन्स्टनने पुण्यात तयार असलेल्या कॅप्टन स्मिथ आणि सैन्याला पेशव्यांच्या मागावर पाठविले. १८१७ च्या दसऱ्याला पेशव्यांनी प्रचंड मोठ्या सैन्याचे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मात्र इंग्रज – मराठा निर्णायक युद्ध अटळ होते.
५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकी येथे पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये लढाई झाली. पेशव्यांना या लढाईत यश आले नाही. वाढता युद्धज्वर लक्षात घेऊन एल्फिन्स्टन याने पुण्यात इंग्रजी सैन्य गोळा करण्यासाठी सर्वत्र आदेश धाडले.
१५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान इंग्रज – मराठा सैन्यात येरवडा येथे अजून एक लढाई झाली. परंतु खुल्या मैदानात इंग्रजांच्या सैन्याशी लढण्याची कमकुवत बाजू लक्षात घेऊन पेशव्यांनी २९५०० घोडदळ आणि ४००० पायदळ हे माहुलिकडून दक्षिणेस निपाणीकडे हलविण्यास सुरुवात केली.
पुढे गोदावरी पाशी शिंदे, होळकर आणि पेशवे यांच्या सैन्याने एकत्र मिळून इंग्रजांच्या सैन्याचा खात्मा करावा असा प्राथमिक मनसुबा होता. तत्पूर्वी दुसरे बाजीराव पेशवे यांनी आपले कुटुंब रायगडावर सुरक्षित ठिकाणी हलविले आणि छत्रपतींना सुरक्षित ठेवता यावे यासाठी स्वतः बरोबर येण्यासाठी म्हणून नारोपंत आपटे यांना पाठविले. स्वतः छत्रपती, पेशव्यांना १२ डिसेंबर १८१७ मध्ये येऊन मिळाले.
एल्फिन्स्टनच्या आदेशावरून जनरल स्मिथ सतत तीन आठवडे पेशव्यांच्या मागावर होता. दक्षिणेकडे जाता जाता अचानक दिशा बदलून पुण्याला वळसा घालून पेशवे सैन्य २७ डिसेंबर १८१७ दरम्यान नाशिक मधील ब्राह्मणवाडा येथे पोहोचले होते.
याच ठिकाणी सरदार त्र्यिंबक डेंगळे यांचे सैन्य, मराठा मुख्य सैन्याला येऊन मिळाले. येथून उत्तरेकडून,सैन्यासह स्वारी करून पुणे कब्जात घ्यावे असे नियोजन होते.
पुण्यापासून फक्त १८ मैल अंतरावर असणाऱ्या पेशव्यांच्या एवढ्या मोठ्या सैन्यामुळे उद्भवलेला धोका लक्षात घेऊन पुण्यातील कर्नल बर्र याने शिरूर येथील कॅप्टन स्टाँटन याला तातडीच्या मदतीसाठी आवाहन केले. ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्रीं ८ वाजता स्टाँटनने आपल्या सैन्यासह पुण्याकडे कूच केले.
या सैन्यात “बॉम्बे नेटिव इन्फंट्री” च्या २ ऱ्या बटालियन मधील फर्स्ट रेजिमेंटचे ६०० पायदळ, मद्रास अर्टीलरीच्या दोन सहा पौंड तोफा, २६ युरोपियन गोलंदाज, पूना ऑक्सिलरी हॉर्सचे ३०० घोडदळ आणि दोन इंग्लिश सर्जन इतकी कुमक होती. हे सैन्य शिरूरकडून पुण्याकडे जात असताना १ जानेवारी १८१८ रोजी साधारणतः सकाळी १० वाजता भीमा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर पोहोचत होते.
त्याच वेळेस स्टाँटन याला नदीच्या दक्षिण किनारी मराठा सैन्याचा पांढरा समुद्र दिसून आला. (१०० मैलावरून पाठलाग करणाऱ्या कॅप्टन स्मिथच्या सैन्याला हुल देऊन, मराठा सैन्य पेशवे आणि छत्रपतींसह, नवीन वसविलेल्या “फुलशहर “म्हणजेच कोरेगाव या शहरात विसावा घेण्यासाठी थांबले होते.)
स्टाँटनने पुढील चकमक लक्षात घेऊन उत्तर किनारी असलेल्या कोरेगाव गावाचा कब्जा घेतला, ज्याला थोड्याफार प्रमाणात संरक्षक भिंत होती.
स्टाँटनचे सैन्य रात्रभर सलग २८ मैल रपेटीमुळे आणि पाण्याविना जबरदस्त दमलेले होते. यानंतर दोन तोफांसाठी मोक्याच्या जागा मिळवून स्टाँटन आणि सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवला. मराठा सैन्यातील जवळजवळ ३००० अरब सैनिक, इंग्रजी सैन्याविरुद्ध लढले. दिवसभर चाललेल्या या चकमकीत दोन्ही सैन्यांची कमी अधिक वेळा आगेपिछेहाट होत राहिली.
ही संपूर्ण चकमक दुसरे बाजीराव पेशवे यांनी छत्रपती प्रतापसिंह यांच्या समवेत जवळच्या टेकडीवरून पहिली. पेशव्यांनी १ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडे प्रयाण केले. तर स्टाँटन याने २ जानेवारी १८१८ रोजी मृत आणि जखमी सैन्याची योग्य ती सोय लावून शिरूर कडे ‘रिट्रिट’ केले.
परंतु जय – विजय दृष्टिकोनातून ही लढाई( चकमक ?) अनिर्णयाक ठरली. इंग्रजी सैन्याच्या १११ मृतांमध्ये ,१३ इंग्रज तर ९८ भारतीय सैनिक होते. मराठा सैन्याच्या मृतांचा आकडा ५००-६०० असावा ( इंग्रजी संदर्भ). परंतु मराठा सैन्यातील मृतांचा ठोस पुरावा मिळत नाही. इंग्रजी सैन्याच्या मृतांची आणि जखमी सैनिकांची नावे उपलब्ध आहेत.
३ जानेवारी १८१८ रोजी एल्फिन्स्टन याने स्वतः जातीने कोरेगावला भेट दिली. इंग्रजांच्या अतुलनीय शौर्याचं सविस्तर कथाकथन त्याने आपल्या रिपोर्टमध्ये करून ठेवलं आहे. त्याच्याच शिफारसीवरून १८२४ मध्ये कोरेगाव येथे “जयस्तंभ” उभा राहिला.
इंग्रज सैन्यामधील खंडोजीबिन गाजोजी यांना त्यांच्या पराक्रमासाठी ‘जमादार’ म्हणून बढती देण्यात आली आणि या स्तंभाच्या देखरेखीची जबाबदारी त्यांच्या कडे सोपवण्यात आली. (जामदारांचे वंशज आज ही जयस्तंभाजवळ राहतात. ते मराठा समाजाचे आहेत व या लढाईला कोणीही जातीय रंग देऊ नये असे आवाहन करतात).
दरम्यान अशाच लढाया चालू राहून दुसरे बाजीराव पेशवे यांनी जून १८१८ मध्ये संपूर्ण शरणागती पत्करली. यानंतर त्यांना कानपूर येथे हलविण्यात आले. दख्खनच्या भूभागावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला.
या घटनेपासून सुमारे ११० वर्षानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोरेगाव जयस्तंभला भेट दिली. ब्रिटिशांनी महार बांधवाना सैन्यात प्रवेश बंदी केली. या विरोधात आंबेडकरांनी जयस्तंभाजवळ ब्रिटिश विरोधी सभा घेतली. त्याबाबतीत धनंजय कीर यांच्या पुस्तकातील संदर्भ खालील प्रमाणे.
प्रकरण ५ – बंडाचे निशाण उभारले. “सन १९२७ साल उजाडले. आंबेडकरांनी त्या वर्षातील कार्याचा आरंभ कोरेगाव युद्ध स्मारकासमोर भरलेल्या सभेने केला. त्या सभेस अस्पृश्य समाजातले काही नामवंत पुढारी उपस्थित होते.
त्या सभेत भाषण करताना आंबेडकरांनी कृतघ्न ब्रिटिश सरकारचा जळजळीत शब्दात निषेध केला. ज्या महार जातीच्या शेकडो सैनिकांनी अनेक लढायात सरकारला यश मिळवून दिले, असे त्यांनी आपले मत उघडपणे बोलून दाखविले.
ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही हे खरे; पण ब्रिटीशांच्या मदतीस गेले? स्पृश्य हिंदू नेत्यांना नीच मानून कुत्र्या-मांजरापेक्षा वाईट वागविले म्हणून!
पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले. आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की महाराजांवरील लष्कर प्रवेश बंदी ब्रिटिश सरकारने उठवावी जर सरकारने ही गोष्ट केली नाही तर सरकारविरुद्ध चळवळ करावी, अशी त्यांनी आवेशाने त्या समाजात चेतना दिली.”
निष्कर्ष –
१. कोरेगावची लढाई कदापि महार सैनिक विरुद्ध ब्राह्मण अशी नव्हती. ब्रिटिश व पेशवे दोघांच्या सैन्यात विविध जाती (तथाकथित सवर्ण व दलित) व धर्माचे सैनिक लढण्यासाठी उभे ठाकले होते. कुठल्याही जातीचा प्रतिनिधी इंग्रजांकडे जाऊन पेशवे/ ब्राह्मण वर्णद्वेषी असल्याने त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही आपल्याला साथ देऊ अशी याचना घेऊन गेल्याचा काहीही संदर्भ अस्तित्वात नाही.
२. व्यापारासाठी आलेले इंग्रज सत्ता काबीज करू पाहत होते. त्यांना इथल्या जातींमधील संघर्षाशी काहीही घेणदेणे नव्हते. उलट येथील जातीवादानुसार त्यांनीही जातीवादी भूमिका घेऊन काम केल्याचे दाखले आहेत. आपल्या सैन्याच्या एका तुकडीत “Men of low caste not to be admitted” असे ब्रिटीश सांगतात तेंव्हा त्यांचा पेशवे काळातील जातीवाद ही दिसून येतो.
३. महार सैनिक इंग्रजांच्या सैन्यात होते तसेच ते पेशव्यांसाठी देखील लढले आहेत असे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. १७९५ साली झालेल्या खर्ड्याच्या लढाईत पेशव्यांच्या बाजूने लढणाऱ्या सिदनाक महार या शूर योद्ध्याचा संदर्भ देखील सापडतो. ब्रिटिश विरोधी लढाईत पेशव्यांच्या सैन्यात मांग, रामोशी, भिल्ल समाजाचे सैनिक होते अशी नोंद ब्रिटिशांनी केली आहे.
४. महार सैनिक शूर होते आणि आहेत यात शंकाच नाही. आणि तत्कालीन समाजात वर्ण आणि जतिद्वेश होताच. परंतु त्याचा इंग्रज – मराठा युद्धाशी काही संबंध नाही. उलट पुढे इंग्रजांनी देखील महारांना सेना भरती बंद करून आपले विघटिकरणाचे तत्व पुढे रेटले. आणि त्या विरोधातच डॉ आंबेडकर कोरेगाव भीमा लढाई नंतर ११० वर्षांनी लढत होते.
कोरेगावची लढाई स्वकियांनी उपलब्ध साधन, सामुग्री आणि सैन्यासह, परकीय आक्रमणे परतवून लावण्यासाठी म्हणून केलेली लढाई आहे.
सद्य परिस्थितीत त्याला जातीय वळण देऊन समाजात फूट पडू देणे आणि अश्या घटना केवळ बघत राहणे म्हणजे, आपण परत कुठल्या विघातक शक्तीच्या वरवंट्याखाली चिरडण्यासाठी जणू काही तयार होत आहोत आणि दुष्ट हेतूपोटी आपसातील लढाईसाठी तिसऱ्या कुणाचा फायदा होऊन देत आहोत…
ही इतिहासाची पुनरावृत्ती घडू देत नाही ना हे प्रत्येकाने तपासले पाहिजे.
–
तळटीप – व्यापक पटावरील संदर्भ अतिशय धावत्या वेगात देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. यातील अनेक संदर्भ जागेअभावी देता आले नाहीत. तरी याबाबत काही सविस्तर लिहिण्याचा मानस आहे. काही चूक भूल असल्यास माफी असावी. टिपण्णी असल्यास अवश्य कळवावे.
–
संदर्भ –
१. History of Mahrattas – James Grant Duff
२. The Marathas – 1600-1818 – Stuart Gordon
३. Corygum Coloumn by Wylie (1839)
४. Poona Horse (Handbook on raising the auxiliary force at Pune )
६. Elphinstone’s Journal
७. डॉ बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
८. इंडियन एक्स्प्रेस न्यूज लिंक
९. कॅप्टन स्टाँटन रिपोर्ट ( ७ जानेवारी १८१८)
१०. जनरल स्मिथ रिपोर्ट ( ७ जानेवारी १८१८)
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.