Site icon InMarathi

श्री रामांचं देवत्व, सीतेवरील अन्याय आणि शंबुकाचा वध…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुढीपाडवा ते रामनवमी – श्रीरामावर “प्रश्न” विचारण्याचा हा सुवर्ण काळ असतो. सीतेची अग्निपरीक्षा, पुढे सीतेचा त्याग – ही प्रकरणं समानतावाद्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची आहेत!

त्यांना ह्या घटना घडल्या ह्याचा कोण आनंद होत असतो – कारण हे घडलं नसतं तर रामावर टीका करणार कशी, नाही?!

ह्या विषयावर प्रो-श्रीराम मंडळी, बहुतेकवेळा, हेच मांडतात की सुंदरकाण्ड, उत्तरकांड, त्यातील अग्निपरीक्षा मूळ रामायणातील नाही. पुढे सुद्धा “सीतेचा त्याग” हा भाग प्रक्षिप्त रामायणातील आहे, मूळ रामायण श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर संपतं – असा ठाम मतप्रवाह आहे.

 

सीतेची अग्निपरीक्षा.

ही उदाहरणं केवळ राम-सीता ह्या पती-पत्नी नात्याबद्दल, स्त्री-पुरूष समानतेबद्दल आहेत. परंतु शंबुक नावाच्या शूद्राची कथा मात्र रामांना पार टोकाचा जातीयवादी खलनायक ठरवण्यासाठी रंगवून रंगवून सांगितली जाते.

अनेकांना ही कथा कदाचित ठाऊक नसेल. कथा अशी आहे की एका ब्राह्मणाच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. ब्राह्मणाने विलाप करत आरोप केला की हा मृत्यू राजाच्या अधार्मिक वर्तनामुळे झाला आहे.

रामांनी सभा बोलावली आणि ह्यावर विचारमंथन केलं. सर्व ऋषी मुनींनी असा निर्वाळा दिला की –

अशी अघटित घटना घडली आहे ह्याचा अर्थ राज्यात कुणीतरी “अनधिकारी तप करीत आहे!” – म्हणजेच ज्याला जप-तप करण्याचा अधिकार नाही, अशी व्यक्ती तप करीत आहे.

तेव्हा देवर्षी नारद म्हणाले की हा फार मोठा अधर्म आहे आणि श्री रामांनी तो थांबवला पाहिजे.

श्रीराम तात्काळ आपलं पुष्पक विमान घेऊन अश्या पाप्याच्या शोधात निघाले. शैवल पर्वताच्या उत्तरेस त्यांना एक तपस्वी झाडाला उलटा लटकून तप करताना आढळला.

रामांनी त्या तपस्व्याची विचारपूस करता त्यांना हे कळालं की हा शंबुक नावाचा शूद्र असून, “देव लोक” ची प्राप्ती करण्याच्या हेतूने त्याने तप आरंभ केला आहे. हे ऐकताच श्रीराम आपली तलवार उपसतात आणि शंबुकाचा शिरच्छेद करतात.

 

शंबुक वधाची कथा

सुन्दरकाण्ड आणि सीतेच्या वनवासाच्या बाबतीत जो दावा आहे – तोच ह्या शंबुकाच्या कथेच्या बाबतीत देखील आहे. शंबुकाची कथा उत्तरकांड मध्ये आढळते.

ही कथा देखील खोटी आहे, मूळ रामचरित्रात असं काहीच घडलं नव्हतं – असं म्हणणारे अनेक आहेत.

त्यांच्या मते, पूर्वीची कर्माधिष्ठित चातुर्वर्ण व्यवस्था नंतर भ्रष्ट झाली. स्त्रियांवर जाचक निर्बंधनं लावण्यात आली, ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र हे वर्ण जन्माधिष्ठित होऊन अस्पृश्यता बोकाळली.

ह्या भ्रष्ट व्यवस्थेला justify करण्यासाठी, तिचं समर्थन करण्यासाठी धार्मिक इतिहासात अश्या खोट्या कथा पेरल्या गेल्या. ज्यात सीतेचं पावित्र्य कसोटीसमोर तपासलं गेलं, अस्पृश्याला तप केलं म्हणून यमसदनी पाठवलं गेलं.

मनुस्मृतीमध्ये देखील असे श्लोक पेरल्या गेल्याचा आरोप अनेक अभ्यासक करत असतात.

ह्या म्हणण्याच्या समर्थनात इतर अनेक दाखले देखील दिले जातात. खुद्द श्रीरामांनी वनवासाच्या काळात निषाद राज चं भोजन सेवन करणे, शबरीची उष्टी बोरं खाणे – ही काही ठळक उदाहरणं आहेत.

इथे हा विषय अभ्यासकांमध्ये वादाचा ठरतो. समानतेचे लढवैय्ये ह्या घटनांचे संदर्भ देऊन हिंदू धर्म किती वाईट आहे, भरतभूमीवर किती अन्याय होत असे हे ठामपणे सांगत रहातात आणि हिंदू धर्माभिमानी लोक ह्या घटना नाकारून हा इतिहास खोटा असल्याचं प्रतिपादन करतात.

आपण ह्या दोन्ही विचारांना तटस्थपणे बघून, मोठं चित्र बघायचा प्रयत्न करूया.

चातुर्वर्ण व्यवस्था आधी कर्माधिष्ठित होती आणि ती नंतर भ्रष्ट होऊन जन्माधिष्ठित झाली, अस्पृश्यतेच्या किळसवाण्या चक्रात आपला समाज अडकला – हे सत्य नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे त्यावर वाद नकोत.

तसंच, आजही खेडोपाडी अस्पृश्यता टिकून आहे आणि ती जितक्या जलद गतीने संपुष्टात येईल तितकं मानवतेच्या दृष्टीने आवश्यक आहे हेही वादातीत आहे. ह्या दोन्ही मुद्द्यांवर – खासकरून दुसऱ्या मुद्दावर कुठलेही मतभेद असण्याचं कारण नाही.

हे नक्की झालं की श्रीरामांच्या वर्तनाचं महत्व उरतं काय? – हा प्रश्न उरतो. जो सुटणं फार सोपं आहे.

आज श्रीराम आमचे देव आहेत. राजा असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा, पुत्र असावा तर रामासारखा…असं आम्ही सर्वच अगदी ठाम भक्तिभावाने मानतो.

ह्या मानण्यात श्रीरामांचे जे गुण अभिप्रेत आहेत, त्यांमध्ये सीतेच्या त्याग, शंबुकाचा वध – अनुस्यूत, गृहीत आहेत काय? अजिबात नाही! अक्ख्या भारतात – शंबुकाचा शिरच्छेद केला म्हणून मला राम देव वाटतात, आवडतात – असं म्हणणारा एकतरी सापडेल काय?

रामराज्य म्हणजे न्याय्य, जनतेला आपलंसं वाटणारं राज्य हीच आमची पक्की धारणा आहे.

“मला पती म्हणून रामाचा आदर्श पाळायचा आहे”, असं म्हणताना श्रीरामांची “एक पत्नी, एक वचनी, एक बाणी” ही प्रतिमा डोळ्यांसमोर असते… सीतेच्या अग्निपरीक्षेची आणि त्यागाची कथा आमचा आदर्श नव्हे!

थोडक्यात, “राम आमचा देव आहे, आमचा आदर्श आहे” – हे म्हणताना आम्ही कोणत्या गुणांसाठी रामाला वंदनीय, पूजनीय, आचरणीय मानतो – हे आणि हेच महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी अभ्यासक म्हणून चर्चेच्या आणि वादाच्या असू देत.

वादात, चर्चेत ह्या कथेचा विरोध, निषेध, धिक्कार करावा काय? इच्छा असणाऱ्यांनी जरूर करावा. परंतु ही टीका करून साध्य काय होणार – हा प्रश्न देखील स्वतःस विचारावा.

एखाद्या गोष्टीवर टीका तेव्हाच आवश्यक आणि कामाची असते जेव्हा त्या विषयाचा काही significance असतो. श्रीरामांच्या उपरोक्त खऱ्या/खोट्या घटनांचा significance शून्य आहे. कारण त्यांचा आदर्श आमच्यासमोर नाही.

आज जर कुणी ती उदाहरणं देऊन, हिंदूंनी तसं वर्तन करावं असा उपदेश, अशी अपेक्षा करत असेल तर त्याचा धिक्कार करावा तेवढा कमीच. सुदैवाने, तसं घडत नाहीये. आधी म्हटल्याप्रमाणे, अस्पृश्यता नष्ट व्हावी, स्त्री-पुरूष समानता अधिकाधिक प्रस्थापित व्हावी ह्यावर कुणाचंच दुमत नाही आणि म्हणून हा विषय निरूपयोगी आहे.

 

“श्रीरामांनी सीतेचा त्याग केला!” हा विषय किती रंगवायचा, त्याचा प्रत्येक चर्चेत किती काथ्याकूट करायचा ह्याला मर्यादा नाहीतच. तो आपापल्या अभिव्यक्तीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

परंतु ह्या चर्चेचं आजच्या समानतेच्या लढ्याशी नातं जोडायचं असेल तर ते जोडता येणार नाही.

कारण श्रीरामांनी सीतेचा खरंच त्याग केला होता किंवा नाही, शंबुकाचा शिरच्छेद केला होता किंवा नाही – ह्याने आजची असमानता कमी-अधिक होत नाही. आजच्या समाजाचा आदर्श, जर कुणी खरंच ठेवत असेल तर, पत्नीच्या प्रेमापोटी युद्ध करणारा आणि ज्याच्या वनवासाच्या बातमीने जनता व्याकुळ झाली होती अश्या न्यायी, आदर्श राजकुमार आणि राजाचा.

ज्या रामावर टीका केली जाते, तो राम – खरा असो वा खोटा – आमचा नव्हेच.

आमच्या श्रीरामांचं देवत्व त्यांच्या अंगभूत सद्गुणांमुळे आहे. समानतेची काळजी असणाऱ्यांनी एवढं ध्यानात धरलं तरी पुरे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version