आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्याची फिल्म इंडस्ट्री आणि आपल्या आधीच्या २ पिढ्यांनी पाहिलेली फिल्म इंडस्ट्री यांच्यात प्रचंड फरक होता! त्या काळात मीडिया किंवा सोशल मीडिया हा प्रकार अजिबात नव्हता.
त्यामुळे एवढं ग्लॅमर नव्हतं आणि एकंदरच फिल्म इंडस्ट्री मध्ये कामं करणारी लोकं सचोटीने कामं करायची. आणि त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या कामातून दिसायची.
त्यामुळे आजही जुने सिनेमे बघताना फ्रेश वाटतात. आजही सुनील दत्त, देव आनंद, राज कपूर, राजेश खन्ना, मनोज कुमार, शम्मी कपूर, यांचे सिनेमे कित्येक जण आवडीने बघतात!
त्यापैकीच एक नाव म्हणजे दिलीप कुमार. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत कित्येकांनी एकाच अभिनेत्याला फॉलो केलं ते म्हणजे दिलीप साब!
दिलीप कुमार, आपल्या मागच्याच्या मागच्या पिढीतील हिरो. आता नव्वदी ओलांडून पुढे गेलेला हा जेष्ठ अभिनेता तरुणपणी कसला कातिल दिसत होता. आजही आपल्या आजीला विचारलं तर उडे जब जब जुल्फें तेरी म्हणताना कशी खुशीत येऊन दिलीपकुमारचं कौतुक करते बघा!
आत्ता सगळे खान कंपनीला खानावळ म्हणतात पण दिलीप कुमार हा सिनेमातला पहिला खान मानला जातो.
त्यांनी साकारलेल्या देवदास,अंदाज, राम और श्याम, दिल दिया दर्द लिया, आदमी, शक्ती अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांनी त्यांना ट्रॅजेडी किंग ही उपाधी मिळाली आहे.
अमिताभ बच्चन, शाहरुख खान असे कितीतरी जण दिलीपकुमारच्या अभिनयाची छाप ठेवूनच पुढे आले आहेत. एक काळ असा होता, राज-दिलीप-देव या तीन जणांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले होते.
दिलीपकुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान. सिनेमासाठी म्हणून त्यांनी दिलीप कुमार हे नाव घेतलं. १८ डिसेंबर १९२२ मध्ये पेशावर येथे जन्मलेल्या युसुफ खान यांना पद्मविभूषण, पद्मभूषण हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत.
१९४४ ते १९९८ पर्यंत सिनेमासृष्टीत कार्यरत असलेल्या दिलीप कुमार यांना आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तर १९९४ मध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
१९४४ साली ज्वार भाटा या सिनेमातून दिलीपकुमार यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. नंतर आन, अंदाज, आजाद अशी विविधांगी भूमिकांची रांगच लागली. नया दौरा हा वैजयंतीमाला यांच्यासोबत त्यांचा गाजलेला आणखी एक सिनेमा.
अनारकली आणि सलिम यांच्या ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारित मुगल-ए-आझम हा सिनेमा तर आजही महाखर्चिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.
के. आसिफ यांची कल्पकता, मधुबालाबरोबर चालू असलेलं प्रेमप्रकरण सिनेमा चालू असताना तुटलं होतं. अशा कितीतरी गोष्टी भरलेलं दिलीपकुमार यांचं आयुष्य सिनेमापेक्षा वेगळं नाही.
इतकं की, त्यांच्या आणि कामिनी कौशल यांच्या अर्धवट राहीलेल्या प्रेमकहाणीवर गुमराह हा सिनेमा बनला होता आणि त्याचाच रीमेक अक्षयकुमार आणि करीना कपूर यांचा बेवफा बनवला होता.
अमिताभ बच्चन जरी मॅन ऑफ मिलेनियम म्हणून जगभर ओळखला जात असला तरी तो दिलीप कुमार युनिव्हर्सिटीचाच विद्यार्थी आहे. सिनेमातील वेगवेगळ्या चढ उतारांनी भरलेलं दिलीपकुमार यांचं आयुष्य पाहीले तर सत्य हे कल्पितापेक्षा वेगळं असतं या उक्तीचं प्रत्यंतर येतं.
आज आपण खूपजण सिनेमात काम करायला घर सोडून पळून मुंबईत आलेलं ऐकतो बघतो.. खुद्द अमिताभ बच्चन, दिलीपकुमार यांनाही हा संघर्ष चुकला नाही.
पण त्या संघर्षातून तावून सुलाखून बाहेर निघून त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं आहे. कितीतरी जण त्या संघर्षाच्या दिवसांत मध्येच दमून माघारी फिरतात.
पण जे चालत राहतात ते ट्रॅजेडी किंग, मॅन ऑफ द मिलेनियम, किंग खान म्हणून झळकत राहतात. अमिताभ बच्चन यांनाही काही दिवस अर्धपोटी काढावे लागले होते. देव आनंद यांनाही संघर्ष करावा लागला होता.
फक्त राज कपूर यांच्या पाठीशी कपूर खानदानाची पुण्याई होती म्हणून संघर्ष कमी करावा लागला. दिलीपकुमार यांनाही हा संघर्ष करावाच लागला होता.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिलीप कुमार यांनीही सुरुवातीच्या दिवसात रस्त्यावर सँडविच विकले आहेत. बसला ना धक्का?
हो, दिलीप कुमार यांना सिनेमात काम करायची प्रचंड आवड होती. पण त्यांच्या वडीलांच्या मनात अजिबात नव्हतं या भूलभुलैया मायानगरीत आपल्या मुलानं जावं.
पण दिलीप कुमार इतके हट्टाला पेटले होते की वडीलांना ऐकावंच लागलं. मुलाच्या इच्छेसाठी ते पेशावरहून मुंबईत आले. पण दोन पिढ्यांचा संघर्ष कुणालाही चुकला नाही.
एक दिवस त्यावरुनच वडीलांशी दिलीप कुमार यांचं जोरदार भांडण झालं आणि रागारागाने दिलीप कुमार घर सोडून पुण्याला निघून गेले. बरं, पुण्याला जाऊन फक्त बाबांशी वाद टळणार होते.
पैसा मिळवायला तर पाहिजे होताच. मग काहीतरी काम करणं गरजेचं होतं. त्यांनी सरळ रस्त्यावर सँडविच बनवून विकायला सुरुवात केली. एक वर्ष हे काम चालू होतं. त्या कामातून त्यांनी पैसे शिल्लक ठेवायला सुरुवात केली.
पुरेसे पैसे साठल्यावर मुंबई गाठली. आणि तिथंच बाँबे टाॅकीजची मालकीण असलेल्या देविका राणी यांनी त्यांना पाहीलं. आणि चक्क कामाची आॅफर दिली.
दिलीप कुमारना जे हवं होतं तेच अनायसे समोर आलं. ही संधी ते सोडतील कसे? त्यांनी होकार दिला.. आणि एक अभिनेता होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व मनापासून केलं.
आणि भारतीय चित्रपट सृष्टीला एक किंग मिळाला… रस्त्यावर सँडविच विकले होते ते सत्कारणी लागले!
आयुष्यात संघर्ष करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिलीप कुमार यांचे आज पहाटे निधन झालं. बॉलिवुमधील एका युगाचा अंत झाला. दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.