मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ‘ही’ सवय वेळीच बदला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शीतपेये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. कोकाकोला, पेप्सी, थंब्स-अप, स्प्राईट, लिम्का आणि अशा अनेक नावांनी मिळणारी शीतपेये मोठ्या आवडीने प्यायली जातात.
या पेयांमधील वेगवेगळे स्वाद, शर्करा आणि विरघळलेला कार्बन डायॉक्साईड या गोष्टींमुळे लोक जास्त आकृष्ट होतात. कार्बन डायऑक्साईड-युक्त पाणी हा या सगळ्या शीतपेयांमधील महत्त्वाचा आणि समान घटक होय.
सामान्यतः यालाच “सोडा” असे संबोधले जाते. सोड्यामध्ये वेगवेगळे स्वाद आणि रंग मिसळून शीतपेये बनवली जातात.
उन्हातून फिरून आल्यावर, तहान लागलेली असताना किंवा इतरही वेळी सहजच एक पेय म्हणून सोडा मोठ्या प्रमाणात प्यायला जातो. काहीजण तर आम्ल पित्तावर उतारा म्हणूनही सोडा घेतात.
पण मुळात सोडा प्रकृतीसाठी खरोखरच चांगला असतो का? त्याचे काही दुष्परिणाम असतात का? आणि असलेच तर ते किती प्रमाणात असू शकतात?
वर सांगितल्याप्रमाणे सोडा म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त पाणी होय. पाश्चात्य देशात, विशेषतः अमेरिकेत सोडा मोठ्या प्रमाणात प्यायला जातो.
===
हे ही वाचा – सावध व्हा! रोजच्या खाण्यातले “हे” पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी करतात!
===
एक अमेरिकन माणूस वर्षभरात सरासरी ३८ गॅलन्स एवढा सोडा पितो! कोकाकोला सारख्या उत्पादनापासून सुरू झालेल्या या सोडा उद्योगाने आज कोट्यवधी डॉलर्सचे साम्राज्य उभे केले आहे.
भारतात अमेरिके एवढे प्रमाण नसले तरी कृत्रिम शीतपेयांचे उत्पादन आणि खप बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. आजकाल जागोजागी सोडा पब उभे राहिलेले आपण पाहतो.
वेगवेगळे रंग आणि स्वाद मिसळून सोडा विकला जातो. कधीतरी प्यायला बरे वाटत असले तरी सोड्याचे नियमित सेवन करणे शरीरासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते.
सोड्यातील वेगवेगळे घटक शरीरावर दूरगामी परिणाम करू शकतात.
साखर –
सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर वापरलेली असते. काहीवेळा कृत्रिम घटक वापरूनही त्याला गोडवा आणलेला असू शकतो. विरघळलेल्या अवस्थेतील साखर रक्तात लगेच शोषली जाते आणि शरीरातील इन्सुलिनच्या निर्मितीवर याचा प्रभाव पडतो.
परिणामी कालांतराने माणसाला मधुमेह होण्याची दाट शक्यता निर्माण होते. जास्त साखरेमुळे लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो.
फॉस्फरिक ऍसिड –
सोड्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड असते ज्याचा थेट परिणाम शरीरातील हाडांवर होतो. फॉस्फरिक ऍसिडमुळे शरीर योग्य प्रमाणात कॅल्शिअम मिळवू शकत नाही.
यामुळे हाडे ठिसूळ होणे, दातांमध्ये पोकळी निर्माण होणे अशा समस्या येऊ शकतात. फॉस्फरिक ऍसिडची पोटातील पाचकरसाशी अभिक्रिया झाल्याने अन्नपचनावर परिणाम होतो. तसेच इतर पोषक जीवनसत्वे शरीरात शोषली जात नाहीत.
कृत्रिम शर्करा –
सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. पण दर वेळेस पारंपरिक पद्धतीने तयार झालेली साखर यात वापरली जात नाही. ऍस्पर्टेम या नावाचे एक संयुग बऱ्याच सोडा/शीतपेयांमध्ये शर्करेच्या जागी वापरले जाते.
साध्या साखरेपेक्षा २०० पट जास्त गोड असले तरी याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. यामध्ये लठ्ठपणा, मधुमेहापासून ते अगदी ब्रेन ट्युमरपर्यंत विकारांचा समावेश होतो.
कॅफिन –
कोकाकोला, पेप्सी यांसारख्या शीतपेयांमध्ये कॅफिन हे प्रामुख्याने वापरले जाते. कॅफिन उत्तेजना निर्माण करणारे असले तरी त्याचे जास्त प्रमाणात केलेले सेवन कॅन्सरला आमंत्रण देणारे ठरू शकते.
पाणी –
नामांकित ब्रॅण्डस् सोड्याच्या निर्मितीसाठी शुद्ध पाणी वापरत असतात. परंतु याखेरीज वेगवेगळ्या नावांनी सोडा/शीतपेये बनवणाऱ्या अनेक कंपन्या दररोज आपली उत्पादने बाजारात आणत असतात.
ही उत्पादने प्रत्येक वेळेस शुद्ध पाण्याने बनविलेली असतीलच असे नाही. अशा पाण्यात घातक धातू किंवा रसायनांचे अंश देखील असू शकतात.
याशिवाय जागोजागी दिसणाऱ्या सोडा पबमध्येही वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची खात्री देता येत नाही.
सोड्यामधील घटकांमुळे शरीरावर होणारे परिणाम हे तात्काळ दिसून नाही आले तरी कालांतराने ते जास्त प्रमाणात दिसून येतात आणि काही प्रसंगी ते हाताबाहेरही गेलेले असू शकतात.
एका अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की सोडा पिणे हे लठ्ठपणाशी थेट निगडित आहे.
१२ वर्षांचा मुलगा जर जास्त प्रमाणात सोडा पीत असेल, तर भविष्यात लठ्ठपणा आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर आजार होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी वाढते.
शीतपेयांमध्ये फ्रुक्टोज या शर्करेचे प्रमाण जास्त असते आणि बहुतांश वेळा ती कॉर्न सिरपच्या माध्यमातून, म्हणजेच मक्यापासून मिळवली जाते. या प्रक्रियेत सौम्य प्रमाणात पाऱ्याचाही वापर केला जातो, जो शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे.
सोडा किंवा शीतपेयांचे सेवन तेवढ्यापुरते उत्साहवर्धक वाटले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. सोड्यामधील सोडियम, कॅफिन आणि उच्च प्रमाणात असलेली साखर प्रत्यक्षात शरीरातील पाणी कमी करते. तहान लागल्यावर सोडा किंवा शीतपेय प्यायल्यास डिहायड्रेशन होऊ शकते.
===
हे ही वाचा – या पदार्थांचं अतिसेवन वेळीच बंद केलं नाहीत तर तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकू शकाल
===
सोडा पिण्याचा शरीराला कोणताही थेट फायदा होत नाही. पण सोडा किंवा शीतपेय पिण्याची तलफ आपण अन्य काही पेय घेऊन नक्कीच भागवू शकतो.
शक्य असल्यास ताज्या फळांचा रस घेणे कधीही फायदेशीर ठरू शकते. मुळात अशा रसात कोणतेही कृत्रिम रंग किंवा स्वाद नसल्याने त्यांचा कोणताही अपाय होत नाही.
फळांमधील जीवनसत्त्वेही शरीराला उत्तम प्रकारे मिळतात. उत्साहवर्धक म्हणून चहा किंवा कॉफी यांसारखी पेये नियंत्रित प्रमाणात घेता येऊ शकतात.
आईस टी किंवा कोल्ड कॉफी सारखी पेये आजकाल चांगलीच लोकप्रिय झाली आहेत जी सोड्याच्या जागी नक्कीच पिता येतील. विविध प्रकारची सरबते तर आपल्याकडे आधीपासूनच प्यायली जातात.
बरेच आहारतज्ज्ञ वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींपासून बनवलेला ग्रीन टी घेण्याचा सल्ला देतात. थोडक्यात काय, तर कृत्रिमरीत्या विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या पेयांपेक्षा पारंपरिक पद्धतीने तयार केलेली पेये शरीरासाठी उत्तम ठरतात.
तरी भारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोडा किंवा शीतपेय घेण्याचे प्रमाण कमी आहे, पण हल्लीच्या काळात फास्टफूड बरोबरच या गोष्टींकडे लोक वळू लागल्याचे दिसून येते.
आपल्या जीवनशैलीत अशा पदार्थांचा अंतर्भाव करून नव्या विकारांना आमंत्रण देण्यापेक्षा पारंपरिक पेये आपल्या आहारात वापरून आरोग्य सुदृढ राखणे निश्चितच आपल्या हातात आहे.
===
हे ही वाचा – कॅन्सरचा धोका वाढवणारे हे पदार्थ तुमच्या आहारात तर नाहीयेत ना?
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.