Site icon InMarathi

तब्बल ४०० वर्षे जुना, पण आजही खूप चटकदार असलेला पदार्थ, असा बदलत गेला!

kachori inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

काही काही पदार्थ हे विशिष्ट दिवसात खाल्ले जातात. म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं तर लाडू -करंजी हे दिवाळीत खाल्ले जातात. डिंकाचे लाडू शक्यतो हिवाळ्यात खाल्ले जातात. भेळ, पाणीपुरी, चाट हे पदार्थ फक्त संध्याकाळी चांगले लागतात, परंतु कचोरी हा एक असा पदार्थ आहे की तो कोणत्याही ऋतूत, दिवसाच्या कोणत्याही प्रहरी खाल्ला जाऊ शकतो.

आज भारतभर कचोरी हा पदार्थ खायला मिळतो. काही ठिकाणी त्यात घातले जाणारे घटक वेगळे असतील, पण कचोरीची तीच आंबट, गोड, तिखट, चमचमीत चव कायम असते.

कचोरी हा भारताबरोबरच दक्षिण आशिया मधल्या सूरीनाम, त्रिनिदाद, टोबॅक्को, गयाना या देशातही खाल्ली जाते. भारतातून गेलेल्या लोकांनीच तो तिथे प्रसिद्ध केला, पण हा पदार्थ भारतभर कसा पोहोचला असेल? पहिल्यांदा हा पदार्थ कोणी तयार केला असेल? याच्या मागचा इतिहास काय आहे?

 

 

कचोरी बाबतचा पहिला उल्लेख हा बनारसीदास यांच्या ‘अर्धकथानक’ या पुस्तकामध्ये आढळतो. त्यांनी १६१३ साली आग्र्यामध्ये हे पुस्तक लिहिले. ते लिहितात, की दररोज एक शेर कचोरी ते विकत घ्यायचे. मुख्यतः व्यापार करणाऱ्या मारवाड्यांनी कचोरी भारतभर नेली. त्यांना व्यापार करताना पोटभर जेवणाची सोय कचोरीमुळे व्हायची.

उत्तर भारतात कचोरीचा उगम झाला असे म्हटले तरी हरकत नाही. उत्तर प्रदेश, दिल्ली, आग्रा राजस्थान, मध्य प्रदेश याठिकाणी वेगवेगळ्या कचोरी मिळतात. कचोरी लोकप्रिय व्हायचं एक कारण म्हणजे त्यासाठी लागणारे घटक हे अमुकच हवेत किंवा तमुकच हवेत असं काहीही नाही. कुठल्याही भाजीशिवाय ही कचोरी बनू शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मूळ कचोरी गव्हाच्या पिठाच्या गोळ्यात, मूग डाळीचे किंवा कांदा बटाट्याचे सारण भरून केली जाते आणि ती तूपात तळली जाते. आता सगळीकडेच मैदा वापरला जातो आणि तळण्यासाठी तेल.

 

 

म्हणजे गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ यापासून देखील कचोरी बनवली जाते. वरती चवीसाठी चिंचेची चटणी. हिरवी चटणी, दही, कांदा, शेव घातली तरी त्याला मस्त चटकदार चव येते.

त्यामुळेच सकाळी जरी कचोरी खाल्ली तरी दुपारपर्यंत भूक लागत नाही. जरी व्यापाऱ्यांना कामाच्या गडबडीत संध्याकाळ झाली आणि जेवण झालं नाही तरी चालून जायचं, कचोरीवर त्यांचं भागायचं. त्यांची ऊर्जा कुठेही कमी व्हायची नाही.

हीच गोष्ट लक्षात घेऊन मग कचोरी, व्यापारपेठेतल्या रस्तोरस्ती मिळायला लागली. गरम कचोरीवरती टेस्टी चटण्या, दही, कांदा आणि थोडी शेव हे लोकांचं आवडतं खाद्य बनलं नसतं तरच नवल होतं. मारवाडी व्यापारी आपल्यासोबत ही कचोरी घेऊन जायचे आणि मग ही कचोरी हळूहळू सगळीकडेच प्रसिद्ध पावली.

 

वर म्हटल्याप्रमाणे कचोरीला ठराविक घटक लागत नव्हते. म्हणजे ती मुगाच्या डाळीची बनते, तर राजस्थान मध्यप्रदेश मध्ये कांद्याची कचोरी देखील प्रसिद्ध आहे. बटाटा घालून देखील कचोरी बनवली जाते आणि काही ठिकाणी मटार वगैरेसारख्या गोष्टी घालूनही कचोरी बनवतात.

वाराणसीची कचोरी देखील खूपच प्रसिद्ध आहे. मऊ आणि खुसखुशीत असणारी ही कचोरी पालक, पडवळ, भोपळा, वांगी यासारख्या ज्या कोणत्या भाज्या उपलब्ध असतील त्यांच्या भाजीआमटी सोबत दिली जाते.

मध्यप्रदेशातल्या इंदोर मधील सराफा गल्लीत, म्हणजे इंदोर मधील खाऊगल्लीत, रात्रीच्या वेळी जी कचोरी मिळते ती ही प्रसिद्ध आहे. एका कचोरीतच माणसाचे पोट भरेल इतकी ती मोठी असते आणि आतील पदार्थही तितकेच चविष्ट असतात.

बंगालमध्ये हिंगाची कचोरी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये हिंग आणि उडीद डाळीचे पीठ वापरून ही कचोरी बनवली जाते. उडीद डाळ आणि हिंगाचा वास यामुळे ही कचोरी अत्यंत खुसखुशीत बनते आणि लाल भोपळ्याच्या आमटी बरोबर वाढली जाते.

भारतात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेली कचोरी म्हणजे बिकानेरची ‘राज कचोरी’. पाणीपुरीच्या आकाराची ही कचोरी असते. परंतु आतमधलं सारण भरगच्च असतं, वरती सगळे चाटला वापरले जाणारे पदार्थ असतात. जोधपूर मधील मावा कचोरी देखील प्रसिद्ध आहे, ही गोडसर असते. प्रवास करताना देखील ही कचोरी घेऊन जाता येते.

 

 

महाराष्ट्रात जी कचोरी प्रसिद्ध आहे ती म्हणजे शेगाव कचोरी. शेगाव आपल्याला माहित आहे ते गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले गाव म्हणून, पण त्याबरोबरच तिथली कचोरी देखील आता भारतभर प्रसिद्ध आहे.

भारत स्वतंत्र झाला आणि भारताची फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तानातल्या पंजाबमधून शर्मा नावाचे व्यापारी शेगाव मध्ये आले आणि तेथेच स्थायिक झाले…त्यांनी तेथे कचोरी सेंटर चालू केले.. त्यांनी सुरुवातीला रेल्वेस्टेशन वरती कचोरी विकायला सुरुवात केली आणि ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की पुढे तिथे कचोरीसाठी रेल्वे थांबायला लागली.

आता शर्मा यांची चौथी पिढी आपला हा व्यवसाय पहात आहे. सध्या मनोज शर्मा यांचे शेगाव मध्ये डेक्कन बस स्टॉप समोरील शेगाव कचोरीचे दुकान प्रसिद्ध आहे.

आता शेगावच्या कचोरीला आयएसओ सर्टिफिकेट मिळाले आहे. मनोज शर्मा यांच्या आजोबांनी या कचोरीमध्ये केलेला जो बदल आहे तोच लोकांना आवडला. मनोज शर्मा यांच्या आजोबांनी मूग डाळीच्या ऐवजी बेसन पीठ वापरले, सोबतच काही वेगळे मसाले देखील घातले, शिवाय आलं, लसूण, हिरवी मिरची घालून त्या कचोरीला एक भन्नाट ट्विस्ट दिला.. जो लोकांना फारच भावला.

 

 

लोक गजानन महाराजांच्या दर्शनाला आले, की मनोज शर्मा यांची कचोरी खातात आणि सोबतही घेऊन जातात. आता त्यांची कचोरी पुण्या-मुंबईतही मिळते.

आता मनोज शर्मा आणि त्यांचे बंधू यांनी हा व्यवसाय बराच पुढे नेला आहे. आता ते कचोरी तयार करून त्यांना फ्रोजन करताहेत. ज्या वेळेस गिऱ्हाईक येईल त्याच वेळेस त्यांना त्या कचोर्‍या तळून दिल्या जातात.

ज्या लोकांना त्याठिकाणी कचोरी खाऊन घरी पार्सल घेऊन जावेसे वाटते, किंवा कधीही या कचोरीचा आस्वाद घ्यावा वाटतो, अशा लोकांसाठी देखील त्यांनी या तयार कचोऱ्यांचे पॅकेट्स तयार केले आहेत. ते पॅकेट्स ग्राहक कधीही घेऊन जाऊ शकतात आणि आपल्या घरी कचोरी फक्त तळून खाऊ शकतात.

आता त्यांच्या या कचोऱ्या नागपूर, ठाणे, वडोदरा, सुरत आणि सिलवासा याठिकाणी निर्यात केल्या जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, तयार केलेली कचोरी ही फ्रोजन न करता देखील ३६ तास चांगली राहते आणि तळलेली कचोरी ही चार दिवस चांगली राहते. फ्रोजन कचोरी तीन महिने चांगली राहते. शिवाय ही कचोरी खाल्ल्याने कोणताही जडपणा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत नाही.

 

आधी म्हटल्याप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकाराने कचोरी बनवता येते. आता तर सॅंडविच कचोरी, मिक्स व्हेज कचोरी, जैन कचोरी, चीज कचोरी हे प्रकारही मिळतात.

इतकंच काय उपवासाला जरी कचोरी खावीशी वाटत असेल तरी उपवासाची कचोरी ही मिळते. यात उकडलेला बटाटा आणि शिंगाडा /राजगिरा यांचं पीठ आवरण म्हणून वापरल जातं, तर आत मध्ये ओलं खोबरं आणि मिरची, लिंबाचा रस यांचं सारण वापरलं जातं. कचोरी ही करायलाही इतकी सोपी आहे, की गृहिणी आजकाल त्यात वैविध्य आणत आहेत.

तर अशी ही कचोरी एकदम खुसखुशीत आणि चमचमीत, कधीही खावीशी वाटणारी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version