आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बसला ना धक्का? म्हशी आणि ब्यूटीपार्लर!
खरंतर ज्या ६४ कला सांगितल्या जातात त्यापैकी साजशृंगार करणे ही एक मोठी आणि वेळखाऊ कला आहे. पूर्वापार चालत आलेली ही कला आपल्याला पार महाभारतात पण आढळून आली आहे.
पांडव अज्ञातवासात असताना विराटाकडे कामाला होते. विराटाच्या बायकोची म्हणजे सुदेष्णेची दासी म्हणून द्रौपदीने सैरंध्री हे नांव घेऊन तिचा साजशृंगार करायचं काम स्वीकारलं होतं.
थोडक्यात सांगायचं तर नट्टापट्टा करणं ही केवळ आणि केवळ श्रीमंतांचीच मिरासदारी होती. साधारणपणे नटण्या -मुरडण्याची संकल्पना म्हणजे तोंड स्वच्छ धुणं… मेणाने कपाळावर गोल करुन कोरडं कुंकू लावणं, एखादी काळजाची रेघ ओढणं, एखादा ठसठशीत दिसेल असा दागिना घालणं, काठापदराची साडी अंगभर पदर घेऊन चापून चोपून नेसणं.
पुढं पुढं सर्वसामान्य घरांमध्ये क्वचितच लिपस्टिक, पावडर दिसू लागली. आता तर ढिगभर ब्रँडची सौंदर्य प्रसाधने, परफ्यूम्स, पावडरी, आय लायनर, काजळ, नेलपेंट एक ना अनेक प्रकारांनी ड्रेसिंग टेबल व्यापलं आहे.
वेगवेगळ्या हेअर स्टाइल, हेअर कटिंग, हेअर कलरींग, स्ट्रेटनिंग, पर्मिंग, हायलाईटींग, वॅक्सिंग, फेशिअल, ब्लीच या सर्वांनी तमाम महिला वर्गाला भुरळ घातली आहे. काही वर्षांपूर्वी केवळ श्रीमंत स्त्रीयाच ब्यूटी पार्लर मध्ये जात, पण आता मात्र सगळ्या वर्गातील स्त्रीया पार्लरला जातात.
स्त्रीयाच काय..पुरुषही आजकाल सर्रास मेन्स ब्यूटी पार्लरला भेट देतात. अनिल कपूरचा तुळतुळीत बीचवर धावणारा फोटो या सौंदर्याच्या वेडाचा पुरावा आहे. टापटीप राहणं.. सुंदर दिसणं ही तमाम महिला वर्गाला आवडणारी गोष्ट आहे.
आता तर ब्यूटी पार्लरनी पण रुप पालटलं आहे. त्यांचे सॅलोन..स्पा झाले आहेत. आता त्यातली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका अवलियानं हा स्पा म्हणा.. ब्यूटी पार्लर म्हणा किंवा सॅलोन म्हणा सुरू केलं आहे पण स्त्रीयांसाठी नाही..मग पुरुषांसाठी? नाही..चक्क म्हशींसाठी!
बसला ना धक्का… पण हे सत्य आहे. कोल्हापूरमध्ये एका तरुणाने म्हशींसाठी गोठा नाही, तर ब्यूटी पार्लर सुरु केलं आहे.
कोल्हापूर हे कलापूर म्हणून प्रसिद्ध आहे. इथं तांबड्या मातीत कुस्तीचे फड रंगतात. कितीतरी मराठी चित्रपट तयार होतात. ज्येष्ठ संगीतकार राम कदमांच्या लावण्या इथंच चालीत बांधल्या गेल्या.
राजशेखर, गणपत पाटील हे कलाकार याच मातीतले. भालजी पेंढारकर तर शिवरायांचे भक्तच होते. चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे यांनी शिवरायांच्या रुपात मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केलं. पंचगंगेच्या पुरात धडाधड उड्या मारणारी मुलं आहेत इथे. रंकाळा आजही लोकांना तशीच भुरळ घालतो.
जलपर्णीच्या विळख्यातून रंकाळा आणि पंचगंगेला मोकळा श्वास घ्यायला लावणारी तरुण मंडळं इथेच आहेत. म्हैस पालनाचा व्यवसाय इथे जोरात चालतो. कधी ताजं ताजं धारोष्ण दूध प्यायचं असेल, तर गंगावेशीत असलेल्या दूध कट्ट्यावर आजही जाऊन बघा. म्हशींच्या शर्यती पण इथं होतात.
कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी प्रदूषणामुळे अतिशय खराब झाली होती. यावर कडक उपाययोजना करण्यात आल्या. जनतेने पण या जलप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवला. त्यांची दखल घेऊन महानगरपालिकेचने बरेच उपाय योजले. त्यातील काही उपाय म्हणजे गणपती विसर्जन, निर्माल्य विसर्जनन, रक्षा विसर्जन हे नदीत न करता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करवून घेतली.
नदीत सांडपाणी मिसळू नये म्हणून नाले बांधले, ते पाणी शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी वापरले जाते. अजून एक उपाय म्हणजे पंचगंगेत, किंवा पिण्याच्या पाण्याचा साठा असेल तेथे तलावात जनावरं धुवायला केलेली बंदी. यामुळे बराचसा प्रश्न निकाली निघाला, पण जनावरांची स्वच्छता आवश्यक असतेच. ती कशी करायची? हा म्हशींच्या मालकांना पडलेला प्रश्न होताच.
यावर कोल्हापूर येथील माजी नगरसेवक श्री.विजय सूर्यवंशी यांनी एक अफलातून उपाय शोधला. कोल्हापूर नगर निगम आणि डीपीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हशींसाठी त्यांनी कॅटल सर्व्हिस सेंटर दुध कट्टा आणि पार्लर सुरु केलं आहे.
कोल्हापूरमध्ये मंगेशकर नगरच्या पाठीमागे असलेल्या खणीजवळ हे पार्लर उभारलं आहे. १५ लाख रुपये खर्च करून हे पार्लर उभारलं आहे. यात शाॅवर बाथ, म्हशींच्या अंगावर असलेले केस काढून टाकणे, त्यांची एकंदरीत स्वच्छता करणे अशी कामं केली जातात.
या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मागे असलेल्या बागेत हे म्हशींना घातलेल्या अंघोळीचं पाणी फिरवलं जातं. त्यांच्या शेणाचा तसेच अंगावरील केसांचा वापर खत तयार करण्यासाठी केला जातो. हे खत महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानात वापरले जाते.
एका वेळी आठ ते दहा म्हशींची सोय आणि स्वच्छता इथं केली जाते, पण त्यासाठी आधी अपाँईंटमेंट घ्यावी लागते.
साहसे श्री: प्रतिवसती.. अडचणी तर असतातच, पण त्या अडचणींवर मात करुन कल्पकपणानं जो माणूस अभिनव उपक्रम राबवतो तो कधीही अनुकरणीय असतो.
कोल्हापूर येशील विजय सूर्यवंशी यांचा आदर्श घेऊन जर इतरही तरुणांनी आत्मनिर्भर होण्यासाठी असे उपक्रम राबवले तर खेड्यांत पण किती रोजगार उपलब्ध होईल. शहरीकरणाचा रेटा कमी होऊन आयुष्य समृद्ध व्हायला नक्कीच हातभार लागेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.