आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी मिळवण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले आहे. सत्याग्रह, असहकार, इंग्रजांना विरोध, विदेशी मालावर बहिष्कार असे अनेक विविध उपाय त्यावेळेस सामान्य जनतेनेही केले.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आसुसलेला होता. त्यात महिलादेखील मागे नव्हत्या. त्यांनी आपलं घर, कुटुंब ही जबाबदारी सांभाळताना स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग नोंदवला.
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तसेच भरतातल्या स्त्रीयांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी त्यांनी दिलेला लढा अभूतपूर्व होता!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
ज्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला, त्रास सहन केला. त्या महिलांचे योगदान तर आता विस्मृतीत गेले आहे. अशाच काही महिलांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
१. बेगम हजरत महल :
राणी लक्ष्मीबाईचा लढा पुढे जर कोणी चालू ठेवला असेल तर अवधच्या बेगम हजरत महलने.
तिचा लढा केवळ स्वतःचे राज्य वाचावे याकरिताच नव्हता तर ब्रिटिशांनी जे मंदिर आणि मस्जिद उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबलं होतं त्यालादेखील बेगमने विरोध केला, आणि आपलं बलिदान दिलं.
२. भिकाजी कामा :
भारतातल्या सर्वच धर्मियांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यात पारशी धर्मीय लोक ही मागे नव्हते. त्यातलंच एक नाव म्हणजे मदाम कामा.
एका सधन पारशी घरातून आलेल्या या स्त्रीने आपली सगळी संपत्ती अनाथ मुलींच्या आश्रमासाठी देऊ केली. समाजात स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी चळवळ सुरू केली.
३. कित्तूर राणी चन्नम्मा :
कर्नाटकातील कित्तूर मधील राणी चन्नम्मा हिनेदेखील ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला. सैन्याने केलेल्या उठावाचे नेतृत्व तिने केले वयाच्या ३३ व्या वर्षी तिने ब्रिटिश सैन्याविरुद्ध शूरपणे लढा दिला.
तिचा पराक्रम कर्नाटकातील महिलांसाठी त्यावेळेस प्रेरणादायी ठरला होता.
४. कमलादेवी चट्टोपाध्याय :
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळातच अनेक सुधारणांची चळवळही सुरू झाली होती. कमलादेवी चट्टोपाध्याय या समाजसुधारक. पण समाज सुधारण्याची कामे करताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग नोंदवला.
तशा त्या मूळच्या नाटकातील कलाकार, पण स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठं काम केलं. ब्रिटिशांनी अटक केलेल्या पहिल्या महिला म्हणजे कमलादेवी चटोपाध्याय.
स्त्रियांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर सुधारावा याकरिता त्यांनी काम केलं. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक लघुउद्योग सुरू केले. अखिल भारतीय महिला परिषद त्यांनीच स्थापन केली.
कमला देवींनी महात्मा गांधीजींच्या १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात ही भाग घेतला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकातही त्यांनी भाग घेतला. त्या विधानसभेतील पहिल्या महिला उमेदवार होत्या.
५. कॅप्टन लक्ष्मी सहगल :
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ज्या आझाद हिंद फौजेची स्थापना केली, त्यातील स्त्रियांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी केलं.
आझाद हिंद सेनेबरोबर काम करताना लक्ष्मी सहगल यांनी हेच दाखवून दिलं की, अहिंसक मार्गाने होणारे आंदोलन असो किंवा लढाई करण्याची वेळ येवो, महिला कुठेही मागे नाहीत.
आझाद हिंद सेनेत जाण्यापूर्वी देखील त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता, त्यासाठी त्यांना ब्रह्मदेशात तुरुंगवासही भोगावा लागला होता.
६. अरुणा असफ अली :
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे देखील एक मोठं नाव.’द ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणून त्या ओळखल्या जातात. भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस त्यांनी मुंबईत झालेल्या आंदोलनात भारताचा ध्वज हातात घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
आंदोलनात सहभाग घेतला, ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगात असतानाही कैद्यांना देण्यात येणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलही त्यांनी तुरुंगात देखील आंदोलन केले होते.
७. कनकलता बरुवा :
कनकलता बरुवा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरबाला म्हणून ओळखल्या जातात. संपूर्ण भारतभर त्यावेळेस ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन सुरू होतं. अगदी ईशान्य कडील राज्य ही त्याबाबत मागे नव्हती.
कनकलता बरुवा या आसाममधल्या. आसाममधून त्यांनी १९४२ च्या आंदोलनात भाग घेतला होता. त्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी बारंगबारी येथून केलं. त्यावेळेस त्यांना ‘भारत छोडो’ च्या घोषणा देत गोहपुर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करायचे होते.
आणि तिथे त्यांना तिरंगा फडकवायचा होता. परंतु ब्रिटिशांनी त्यांना मध्येच अडवले. त्या ब्रिटिशांना सांगत होत्या की आमच आंदोलन हिंसक नाही, तरीदेखील ब्रिटिशांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.
त्यांच्यावर जोरदार लाठीमार करण्यात आला आणि त्यातच वयाच्या केवळ १८ व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले.
८. मातंगिनी हाजरा :
‘गांधी बुरी’ या नावाने मातंगिनी हाजरा ओळखल्या जातात. भारत छोडो आंदोलन आणि असहकार चळवळीत त्यांचा सहभाग होता. कलकत्ता मध्ये सुरू असलेल्या अशाच एका चळवळीचे नेतृत्व करीत असताना भारताचा ध्वज घेऊन त्या ‘वंदे मातरम’ च्या घोषणा दिल्या जात होत्या.
त्याच वेळेस ब्रिटिशांनी त्या आंदोलनावर गोळीबार केला. मातंगिनी हाजरा यांना एकूण तीन गोळ्या लागल्या. तरीही त्यांनी हातातला ध्वज खाली पडू दिला नाही.
कोलकत्यात त्यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला तिथे त्यांचा एक पुतळा उभा केला आहे. कोलकत्ता मधील हाजरा रोड देखील त्यांच्याच नावाने आहे.
९. ताराराणी श्रीवास्तव :
बिहार मधील एका साध्या कुटुंबात सामान्य कुटुंबात ताराराणी यांचा जन्म झाला. परंतु त्यांचे लग्न झाले ते फुलेंदू बाबू यांच्याशी. महात्मा गांधीजींच्या छोडो भारत हे आंदोलन १९४२ ला सुरू झाले. त्यात फुलेंदू बाबू यांनीही भाग घेतला. आणि त्यांच्याबरोबरच ताराराणी यांनीदेखील.
सिवानच्या पोलीस स्टेशन वर भारतीय झेंडा फडकवण्यासाठी हे आंदोलनकर्ते निघाले होते. इन्कलाब च्या घोषणा सुरू होत्या, आंदोलनकर्ते पोलीस स्टेशनसमोर आले आणि पोलिसांनी गोळीबार सुरू केला.
त्यात एक गोळी फुलेंदू बाबू यांना लागली. परंतु ताराराणी यांनी आपली साडी फाडून त्यांची जखम बांधली आणि मोर्चा सुरू ठेवला. परंतु पोलिसांनी केलेल्या अत्याचारात फुलेंदू बाबू यांचा अंत झाला.
परंतु भारत स्वतंत्र होईपर्यंत ताराराणी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
१०. मुलमती :
मूलमती यांचं नाव कोणालाच माहिती नाही. परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा सहभाग देखील महत्वाचा आहे. कारण त्या रामप्रसाद बिस्मिल यांच्या आई होत्या.
१९२५ साली झालेल्या काकोरी कटात राम प्रसाद बिस्मिल सहभागी होते. राम प्रसाद बिस्मिल यांना त्याबद्दल ब्रिटिशांनी अटक केली होती आणि १९२७ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाली.
त्यावेळेस त्यांना भेटायला मूलमती तुरुंगात गेल्या, आईला पाहिल्यावर रामप्रसाद बिस्मिल कोलमडले. त्यावेळेस त्यांनी रामप्रसाद बिस्मिल यांना धीर दिला. “तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला याचा मला अभिमान वाटतो”,असं त्यांनी सांगितलं.
राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांना वाहिलेल्या शोकसभेत मूलमती यांनी राम प्रसाद बिस्मिल यांना आदरांजली वाहताना असं सांगितलं की,
“माझ्या एका मुलाने देशासाठी प्राणार्पण केले पण आता पुढील लढाईसाठी माझा दुसरा मुलगा तयार आहे”, म्हणून आपल्या दुसऱ्या मुलाचा हात त्यांनी उंचावला.
११. सुचेता कृपलानी :
सुचेता कृपलानी या गांधीवादी विचारसरणीच्या स्वातंत्र्य सेनानी. त्यांचा देखील सहभाग स्वातंत्र्यलढ्यात होता. १९४० मध्ये त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली.
१५ ऑगस्ट १९४७ ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यादिवशी त्यांनी संसदेमध्ये ‘वंदे मातरम’ म्हटले. त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत.
१२. सरोजिनी नायडू :
भारताच्या ‘गानकोकिळा’ म्हणून सरोजिनी नायडू ओळखल्या जातात. त्यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली, ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी त्यांचं शिक्षण झालं.
गांधीजींचे विचार ऐकून त्या गांधीवादी झाल्या. त्यांच्याबरोबर प्रत्येक आंदोलनात सरोजिनी नायडू यांनी सहभाग घेतला. १९२५ मध्ये त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाही बनल्या.
१३. ऍनी बेझंट :
भारतीय नसलेल्या पण आयरिश असून देखील ऍनी बेझंट यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिलं. १९१६ मध्ये त्यांनी होमरूलची चळवळ चालू केली.
त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य बनल्या आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष. त्यांनी ‘न्यू इंडिया’ नावाचे वृत्तपत्र देखील चालवले. अनेक शाळा-कॉलेजेस चालू करायला मदत केली.
१४. उषा मेहता :
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आवाज ज्यांच्यामुळे कळाला त्या उषा मेहता. भूमिगत राहून त्यांनी रेडिओ स्टेशन चालू केले, आणि त्यावरून बातम्या सांगायला सुरुवात केली. ब्रिटिश कुठे अन्याय करतात याची माहिती त्या द्यायच्या.
कुठे स्वातंत्र्य लढा सुरू आहे, त्यात कोण सहभागी आहे याचीही माहिती त्या पुरवायच्या. त्यांच्या या रेडिओ स्टेशन बद्दल ब्रिटिशांनाही फार लवकर कळले नाही.
याशिवाय कस्तुरबा गांधी, कमला नेहरू, विजयालक्ष्मी पंडित या स्त्रियांनी देखील आपले योगदान स्वातंत्र्यलढ्यात दिलं आहे. कस्तुरबा गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी. त्यांनी आपली संपूर्ण साथ महात्मा गांधींना दिली.
त्यांच्याबरोबर त्याही आंदोलनात सहभागी व्हायच्या. त्याचप्रमाणे कमला नेहरू या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी. त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.
विजयालक्ष्मी पंडित या पंडित नेहरूंच्या बहिण. त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला आहे.
अशा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्त्रिया यांना फारशी प्रसिद्धी कधी मिळाली नाही परंतु आपले ध्येय मात्र त्यांनी सोडलं नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.