गल्लीतील व्यापारी ते अमेरिकन कॉटन एक्सचेंजचे सदस्य: कापूस सम्राटाचा प्रेरक प्रवास
- आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बिजनेस वर्ल्ड म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर काही मोजकीच नावं येतात. टाटा, बिर्ला, अंबानी, बजाज, महिंद्रा, अझीम प्रेमजी वगैरे. आपल्यापैकी फार कमी लोकांनी ‘गोविंद सक्सेरिया’ हे नाव ऐकलं असावं. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात ज्या लोकांनी व्यवसाय करण्याची धमक दाखवली त्या लोकांच्या यादीमध्ये ‘गोविंद सक्सेरिया’ यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं.
‘कॉटन किंग’ ही उपाधी बहाल करण्यात आलेल्या गोविंदजींचा जन्म १९ ऑक्टोबर १८८८ रोजी राजस्थानमधील नवालगढ येथे एका मारवाडी परिवारात झाला. १६ व्या वर्षी आई-वडिल दोघांचं निधन झालं. घरात सर्वात मोठे असलेल्या गोविंदजींवर त्यांच्या सहा भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी आली होती.
१९०५ साली वयाच्या १७ व्या वर्षी ‘गोविंद सक्सेरिया’ हे राजस्थानहून मुंबईला आले. “करायचा तर व्यवसायच” हे ठरवून आलेल्या गोविंदजींनी ‘मेसर्स गोविंद सक्सेरिया’ या नावाने कंपनी सुरू केली.
भारतात त्या काळात ब्रिटिश राजवट असल्याने कोणत्याही नवीन उद्योगाला सहाजिकच सरकारी प्रोत्साहन नव्हतं, ना सरकारी अनुदान. कापूस खरेदी-विक्रीच्या व्यापारात तोपर्यंत कित्येक भारताबाहेरील कंपन्यांनी आपली जागा पक्की केली होती. कोणत्याही भारतीय व्यापाऱ्याला आपलं स्थान निर्माण करणं ही सोपी गोष्ट नव्हती.
कापूस उत्पादक आणि विक्रेता म्हणून या क्षेत्राची पूर्ण माहिती असलेल्या गोविंदजींनी त्याकाळी ‘बॉम्बे कॉटन एक्सचेंज’चं ऑपरेटर म्हणून सदस्यत्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांचं सदस्यत्व स्वीकारण्यात आलं.
काही वर्ष ‘बॉम्बे कॉटन एक्सचेंज’ मध्ये काम केल्यानंतर गोविंद जींनी ‘ईस्ट इंडिया कॉटन असोसिएशन’ चं सुद्धा सदस्यत्व देण्यात आलं. काही वर्षात ‘गोविंद सक्सेरिया’ हे नाव कापूस उद्योगात खूप लोकप्रिय झालं होतं.
कापूस उद्योगात मिळणारं यश हे आत्मविश्वास वाढवणारं होतं. तेवढ्यावरच न थांबता, ‘गोविंद सक्सेरिया’ यांनी सोने, बियाणे या व्यापाराकडे आपला मोर्चा वळवला. ‘बॉम्बे बुलीयन एक्सचेंज’, ‘द इंडियन मर्चंट चेंबर्स’, ‘बॉम्बे सिड्स ब्रोकर्स असोसिएशन’ आणि ‘मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स’ या व्यवसायिक प्लॅटफॉर्मवर त्यांनी सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली.
या ही पुढे जाऊन, गोविंदराम यांनी ‘इंडियन स्टॉक एक्सचेंज’ची स्थापना केली. आता वेळ होती भारताच्या बाहेर आपला व्यवसाय वाढवण्याची. ‘गोविंद सक्सेरिया’ हे त्यात सुद्धा मागे राहिले नाहीत.
१९३४ मध्ये ‘गोविंद सक्सेरिया’ यांनी अमेरिकन कॉटन एक्सचेंजचं सदस्यत्व स्वीकारलं. त्या काळात हा मान मिळणं हे कोणत्याही भारतीय व्यक्तीसाठी खूप मानाची गोष्ट होती. हे सदस्यत्व गोविंदजींनी शेवटपर्यंत अबाधित ठेवलं. यासोबतच, लिवरपुल कॉटन एक्सचेंजमध्ये सुद्धा ते सहभागी झाले होते.
गोविंदराम यांचं आंतरराष्ट्रीय मार्केटमधील वर्चस्व वाढत होतं. “कोणत्या वस्तूला कोणत्या वेळी आणि किती दरात विकावं?” याबद्दलच्या त्यांच्या मताला आदराने बघितलं जाऊ लागलं.
१९३७ मध्ये ‘गोविंद सक्सेरिया’ यांनी गोविंदराम ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी तेलाचा व्यापार सुरू केला. टेक्सटाईल, बँकिंग, साखर, बँकिंग, प्रिंटिंग अश्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी नशीब आजमावलं आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळालं.
गोविंदराम यांचा करिअर ग्राफ इथेच थांबला नाही. त्यांनी इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना केली. या कंपनीचा उद्देश त्यांच्या सर्व प्रॉपर्टीला मॅनेज करणे असा होता. बँक ऑफ राजस्थानची सुद्धा स्थापना ‘गोविंद सक्सेरिया’ यांच्या हातून झाली.
बॉम्बे हॉस्पिटलच्या उभारणीत गोविंद यांनी सिंहाचा वाटा उचलला. अमर्याद कामाचं क्षेत्र असलेल्या ‘गोविंद सक्सेरिया’ यांनी बॉम्बे टॉकीजच्या उभारणीस सुद्धा मदत केली आणि त्याद्वारे इंडियन मोशन पिक्चर्सची स्थापना होण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत केली.
‘गोविंद सक्सेरिया’ यांचा १९४६ मध्ये ५८ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात राजकुमार सक्सेरिया आणि नंद सक्सेरिया हे “द सक्सेरिया’ज” हा ब्रँड पुढे यशस्वीपणे नेत आहेत. आजही सक्सेरिया परिवार हा मुंबईतील श्रीमंत परिवारांपैकी एक म्हणून गणले जातात.
‘गोविंद सक्सेरिया’ यांनी ‘भगवती भवन’ आणि ‘सक्सेरिया चेंबर्स’ या दोन बिल्डिंग आपल्या मुलीच्या नावावर केल्या आहेत. मरीन ड्राईव्ह येथील ‘सक्सेरिया बिल्डिंग’ इथे परिवारातील इतर सदस्य वास्तव्यास आहेत.
गोविंदराम यांचा २२ मे १९४६ रोजी मृत्यू झाला त्या दिवशी कॉटन एक्सचेंज, गोल्ड एक्सचेंज आणि स्टॉक एकचेंज हे एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेतील स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा ‘गोविंद सक्सेरिया’ यांच्या नावाने एक छोटे पिरॅमिड उभे करून त्यांना समरणात ठेवण्यात आलं आहे.
गोविंदराम यांनी कित्येक शाळांची स्थापना केली आणि तीच परंपरा आता त्यांच्या मुलाने कुंदीलालजी सक्सेरिया यांनी सुद्धा पुढे सुरू ठेवली आहे. त्यांनी इंदोर येथे ‘गोविंदराम सक्सेरिया एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. या सोसायटीने काही वर्षांपूर्वी ‘श्री. गोविंदराम सक्सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’ आणि ‘गोविंदराम सक्सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ ची स्थापना केली.
क्रिकेटमध्ये जसं आपण बघतो, की पहिल्या काही विकेट्स पडल्यानंतर मॅच जिंकणं किती अवघड असतं. ‘गोविंद सक्सेरिया’ यांच्या आयुष्याची सुरुवातच अशा घटनांनी झाली होती. तरीही त्यांनी खचून न जाता आयुष्याची मॅच इतक्या मोठ्या फरकाने जी जिंकली हे अद्भुत आहे. येणाऱ्या पिढीसमोर बिजनेसचा आदर्श ठेवणाऱ्या गोविंदराम यांच्या कार्याला सलाम!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.