' ३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर! – InMarathi

३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्नॅक्स या प्रकारात आपल्याला वडापाव, समोसा, पोहे असे काही निवडक पदार्थ काही वर्षांपर्यंत माहीत होते. प्रत्येक गोष्ट झटपट अपेक्षित असलेल्या या काळात आता स्नॅक्स मध्ये ‘मोमो’ या दक्षिण चीनमधून उगम झालेल्या पदार्थाचा समावेश झाला आहे. तिबेटीयन शब्द ‘मोग मोग’ पासून मोमो हे नाव या पदार्थाला देण्यात आलं आहे.

आपल्यापैकी काही लोकांनी कदाचित हा पदार्थ खाल्ला नसावा. मोमो म्हणजे आपल्या उकडीच्या मोदकासारखा दिसणारा एक खमंग पदार्थ आहे. दक्षिण आणि उत्तर भारतात हा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला जातो.

सुरुवातीला रोडसाईड विकले जाणारे ‘मोमो’ आता हॉटेल, हायपरमार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विकले जातात. अल्पावधीतच भारतात घडलेल्या या मोमो क्रांतीचं श्रेय ‘वॉव मोमो’ या फुड चेनला नक्कीच द्यावं लागेल.

 

 

सागर दर्यानी आणि बिनोद कुमार होमगाई या कोलकत्तामध्ये राहणाऱ्या मित्रांनी एकत्र येऊन ‘वॉव मोमो’ला जन्म दिला आहे. दिल्लीच्या सेंट झेवीयर्स कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेत असताना या दोन जिवलग मित्रांच्या हे लक्षात आलं होतं, की पुढे MBA किंवा CA करणं हे यात काही आपल्याला इंटरेस्ट नाहीये.

सागर आणि बिनोद दोघांनाही व्यवसाय करण्यात आणि ‘ब्रँड’ उभा करण्यात जास्त रुची होती. अभ्यासात सरासरी प्रगती असलेले हे दोघेही मित्र कायम एक चांगलं उत्पादन तयार करावं आणि बाजारात आणावं हेच स्वप्न बघायचे.

सागर दर्यानी बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षात शिकत असतांना रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत बसून अभ्यास करायचे. या मित्रांपैकी बिनोद कुमार हा रात्री उशिरा सर्व मित्रांसाठी ‘मोमो’ तयार करायचा आणि सर्वांना ते खूप आवडायचे.

 

wow momo inmarathi1

 

एका रात्री मोमोचा आस्वाद घेतांना मित्रांमध्ये असंच बोलणं झालं की, “भारतात खाद्यपदार्थांना नेहमीच मागणी असते. पिझ्झा, बर्गरच्या नादी लागलेल्या लोकांना आपण हे मोमो सुद्धा विकू शकतो.”

मित्रांनी विचार पक्का केला. २००८ मध्ये मोमोच्या व्यवसायाला मूर्त स्वरूप आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि ‘स्ट्रॉंग ब्रँड तयार होईल असं एक बिजनेस मॉडेल’ तयार केलं.

सुरुवात कशी झाली?

 

 

कोणत्याही वस्तूची विक्री कशी करावी? याचं ज्ञान सागर दर्यानी यांना लहानपणीच त्यांच्या एका नातेवाईकाच्या कपड्यांच्या दुकानाचं काम बघतांना मिळालं होतं.

स्वतःचा उद्योग सुरू करताना त्यांना सुद्धा भांडवल उभं करणं सोपं नव्हतं. ३०,००० रुपयांच्या भांडवलावर सागर आणि बिनोद यांनी ‘वॉव मोमो’ ची सुरुवात केली. जाहिरात करायला पैसे नव्हते, पॅम्प्लेट छापण्यासाठी, वाटप करण्यासाठी लोक नव्हते. जे कोण होते सागर आणि बिनोद हे दोघेच.

पहिले सहा महिने ‘वॉव मोमो’ चा रोजचा गल्ला हा फक्त २००० रुपयांचा व्हायचा. सागर हे सकाळी ५.३० ला उठून त्या दिवशीच्या मोमोसाठी लागणाऱ्या भाज्या घेऊन यायचे. सामग्री एकत्र केल्यावर मोमो हे सागर यांच्या वडिलांच्या गॅरेज मध्ये बनवले जायचे. घरातील हवाबंद डब्यात सागर मोमो घेऊन बाहेर पडायचे.

या जोडीला पहिला मोठा ब्रेक मिळाला तो कोलकत्ताच्या स्पेन्सर्समधून. स्पेन्सर्सच्या फुड काउंटर वर मोमो विकल्या जाऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आलं होतं. जातां- येतां भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोमो ची टेस्ट करायला हे दोघे सांगायचे. चव घेणारी व्यक्ती ही आपल्या स्टॉल वर येणारच ही खात्री सागर दर्यानी यांना होती.

 

wow momo inmarathi3

 

सागर आणि बिनोद हे शक्य तितक्या कमी पैश्यात मोमोला स्टोअर पर्यंत न्यायचे. त्यांच्या या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. कोलकत्ता मधील सर्वात मोठ्या साऊथ सिटी मॉलमध्ये त्यांना ९० स्क्वेअर फूट इतकी जागा मिळाली.

२००० कमाईवर सुरू असलेला व्यवसाय आता २ लाख रुपये महिन्यावर येऊन पोहोचला होता. काही दिवसातच या ९० स्क्वेअर फुट च्या जागेतून ११ लाख रुपये महिना इतका टर्नओवर होऊ लागला. ‘वॉव मोमो’ हा आता एक ब्रँड झाला होता.

२०११ मध्ये ‘वॉव मोमो’ने बँगलोरच्या फिनिक्स मार्केट मॉलमध्ये त्यांचं पहिलं आऊटलेट सुरू केलं. त्याचीच प्रतिकृती ही या जोडीने चेन्नई, पुणे मध्ये असलेल्या फिनिक्स मॉल मध्ये सुद्धा उभी केली आणि त्यांच्या कॅश फ्लो चा पाया अजून भक्कम झाला.

२०१५ पर्यंत ‘वॉव मोमो’ने देशातील ४३ शहरांमध्ये आपले आउटलेट्स सुरू केले. वाढलेला व्यवसाय मॅनेज करण्यासाठी अँजल इन्व्हेस्टमेंटकडून १० करोड आणि लाईटहाऊस फंड या संस्थेने काही अर्थसहाय्य Wow!Momo या ब्रँडला केलं होतं.

 

wow momo inmarathi5

 

२०१९ मध्ये डॉमिनो आणि बर्गर किंग मध्ये गुंतवणूक करणाऱ्या टायगर ग्लोबलने ‘वॉव मोमो’ मध्ये गुंतवणूक करायचं ठरवलं. या गोष्टीमुळे या दोघांचाही आत्मविश्वास हा द्विगुणित झाला होता.

नोटाबंदीच्या काळात ATM च्या रांगेत उभं असणाऱ्या लोकांना जागेवर मोमो नेऊन देणे अशा काही युक्त्यांनी लोकांचं ‘वॉव मोमो’ सोबत एक नातं निर्माण झालं.

कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीत सुद्धा ‘वॉव मोमो’ला मोठ्या आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं. अकरा वर्षात कधीही तोट्यात नसलेली कंपनी ही महिन्याला ६ करोड रुपयांचं नुकसान करत होती, पण तो ही काळ निघून गेला आणि आज ‘वॉव मोमो’चे एकूण २७२ स्टोअर्स हे भारतात कार्यरत आहेत.

 

wow momo inmarathi4

 

गुणवत्तेवर केंद्रित केलेलं लक्ष आणि सुरुवातीच्या मेहनतीने तयार केलेला ब्रँड या गोष्टींना या दोघांनी श्रेय दिलं आहे. या प्रवासात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या शेफ रामजी के.सी. यांचे सुद्धा सागर आणि बिनोद हे नेहमीच आभार मानत असतात. बर्गरला पर्याय म्हणून ‘मोबर्ग’ हा जेवणाला पर्याय ठरू लागला आणि ‘वॉव मोमो’ घराघरात पोहोचलं.

परदेशात असलेल्या भारतीयांकडून सुद्धा ‘वॉव मोमो’ला स्टोअर सुरू करण्याची विनंती आता होत आहे. नवीन उद्योजकांना सल्ला देतांना सागर सांगतात, की “खाद्यपदार्थ किंवा इतर कोणत्याही व्यवसायात ग्राहक हा देव असतो. ग्राहकाचा प्रतिसाद ऐकण्यासाठी नेहमी उपलब्ध रहा.”

ऑनलाईन फुड ऑर्डर करणाऱ्या स्वीगीसारख्या कंपन्यांमुळे ‘वॉव मोमो’चे पदार्थ हे जास्त लोकांपर्यंत सध्या पोहोचत आहेत आणि कंपनीचा टर्नओव्हर हा आता १८० कोटींपर्यंत जाऊन पोहोचला आहे. काही दिवसात सागर दर्यानी आणि बिनोद कुमार होमगाई हे कंपनी चा IPO लाँच करणार आहेत.

“ये दोस्ती हम नही तोडेंगे…” असं फक्त गाणं न म्हणता या दोघांनी दोन मित्र ठरवलं तर काय करू शकतात हे जगाला दाखवून दिलं आहे.
स्वप्न बघितले, तर ते प्रत्यक्षात उतरवता येतात हा संदेश घेऊन आपण सुद्धा ‘वॉव मोमो’चा आस्वाद घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देऊया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?