' जीना, टिळक ते नरेंद्र मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास – InMarathi

जीना, टिळक ते नरेंद्र मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम

===

लेखक – संतोष शेलार 

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक गोविंदराव तळवलकर निवर्तले आणि समस्त मराठी वाचक-लेखक वर्गावर शोककळा पसरली. अनेक सन्माननीय लेखकांनी तळवलकरांना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेख लिहिले. ह्या सर्व लेखांत कुमार केतकर ह्यांचा लेख देखील आहे.

दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या अंकात “मानदंड” ह्या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध झाला होता. सदर लेखात केतकरांनी एक परिच्छेद असा लिहिला होता :

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते अस्वस्थ होते. आधुनिकता, सुसंस्कृतता आणि लोकशाही-निधर्मी परंपरा रुजविल्या त्याच देशात हिंदुत्ववादी विचारांनी (व टोळ्यांनी) थैमान घालावे यामुळे ते कमालीचे चिडचिडे होत असत. ‘नेहरूंच्या देशात मोदी पंतप्रधान व्हावेत आणि गांधीजींनी ज्या गंगेच्या विशालतेचे व चैतन्याचे रूप भारतवर्षात पाहिले, त्या गंगेच्या खोऱ्यात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री व्हावेत’ हे त्यांना लांच्छनास्पद वाटत होते.

 

Govindrao Talwalkar marathipizza
दिवंगत पत्रकार, लेखक गोविंदराव तळवलकर

इतिहासाची साधने (पक्षी – पुरावा) पहात असताना एक विवेक नेहमीच करावा लागतो. तो म्हणजे प्राथमिक (पहिल्या दर्जाची) व दुय्यम असा.

इथे आपल्या समोर तळवलकरांचं खूप सारं लेखन उपलब्ध आहे. काल परवा पर्यंत ते लिहित होते. ते सर्व प्राथमिक साधनात मोडेल. हे इतकं सारं लेखन उपलब्ध असताना केतकरांच्या आठवणी या तशा दुय्यम साधन मानल्या पाहिजेत. त्यांनी कित्येक वेळी मोदी व भाजपा यांना विरोध केला आहे ही वस्तुस्थिती आहे.

पण तरीही केतकर ज्या भाषेत तो विरोध मांडताहेत तसा विरोध केल्याचं निदान माझ्या तरी वाचनात नाही. मला वाटतं की केतकर आपल्या मनातला द्वेष तळवळकरांवर थोपवताहेत.

केतकरांचा अजुन एक सवंग खोडसाळपणा म्हणजे, ‘तळवळकरांना आजच्या परिस्थितीत देशद्रोही ठरविले गेले असते’ असं सांगणे.

आता आजची परिस्थिती म्हणजे कधीची परिस्थिती? मोदी सत्तेवर आल्या नंतरही तळवलकर लिहित होतेच ना! प्रसंगी टीकाही करीत होते. पण म्हणून कोणी त्यांना देशद्रोही ठरविले का? पण यांना स्वत:च्याच अनुमानाच्या हनुमान उड्या मात्र मारायच्या आहेत.

समकालीन केतकर व तत्सम जमातीचे अभ्यासक आणि गोविंद तळवलकर यांच्या विचारात एक गाभ्याचा फरक आहे. तो म्हणजे तळवलकरांना आधुनिक भारतासंबधात असलेली मुस्लिम प्रश्नाची सखोल जाणिव!

तळवलकर या जमातीपेक्षा केवळ त्यांच्या प्रचंड अभ्यासामुळेच काय ते वेगळे ठरतात असे नसून त्यांच्या विचारातही मूलगामी फरक आहेत. तळवलकरांनी त्यांच्या लेखनातून वेळोवेळी मुस्लिम प्रश्न तटस्थपणे मांडला. या बाकीच्या विचारवंतांना त्या प्रश्नाचे अस्तित्वच मुळी मान्य नाही.

फार कशाला, एवढेच सांगितलं तरी पुरेसे आहे की आधुनिक भारतातल्या मुस्लिम प्रश्नाची मांडणी करताना प्रा. शेषराव मोरे यांनी जे जे मुद्दे सविस्तर नि तपशीलवार मांडले त्यातले बहुतांश मुद्दे तळवलकरांनी अगोदर मांडले होते. अर्थातच मोरे यांच्या इतकी तपशीलवार मांडणी त्यांनी केलेली नाही.

उदाहरणच द्यायचं असेल तर असं देता येइल की मोरे यांनी मौ. आझाद यांच्या विषयी जी मांडणी त्यांच्या ‘गांधीजी व कॉंग्रेसने अखंड भारत का नाकारला?’ या ग्रंथात केली त्याची सुरुवात एक प्रकारे गोविंद तळवलकर यांनी केली होती.

परंतु केतकर आणि तत्सम अभ्यासकांना हे समजून घ्यायचं नसतं. उलट दिवंगत अभ्यासकांवर आपली मते थोपवायची असतात. केतकरांचा हा अप्रामाणिकपणा नवा नाही. त्यांच्यात हा दुर्गुण फार आधीपासून आहे.

 

kumar ketkar marathipizza

कुमार केतकर यांनी रविवार दिनांक ०१/०८/२०१० रोजी लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये ‘टिळक आणि जीना : नुरानींच्या नजरेतून’ या नावाचा लेख लिहिला होता. हा लेख मुख्यत नूरानींच्या ग्रंथाचा परिचय करून देण्यासाठी लिहिलेला असला तरी त्यांचे स्वतःचे भाष्यही बरेच आहे. केतकरांनी हा लेख खरोखरच नुरांनीच्या नजरेतून लिहिला आहे असे वाटते.

मुस्लीम प्रश्न समोर आला की त्यांचा चिकित्सकपणा बंद होतो. याचा प्रत्यय याही लेखातून येतो. तसेच या लेखात ‘शितावरून भाताची परीक्षा’ या स्वरूपाचे जे निष्कर्ष केतकरांनी काढले आहेत, व त्यामुळे सर्व भातंच कसा बिघडून गेला आहे, तेही इथे दाखवून द्यवयाचे आहे. लेखाचा साधारणपणे सूर असा आहे की जीना व हसरत मोहानी यांच्यासारखे नेते टिळकांवर प्रेम करीत. पर्यायाने ते देशभक्त नि हिंदु-मुस्लिम ऐक्यवादी सुद्धा होते.

टिळक या व्यक्तीवरील प्रेमाच्या सुतावरून केतकरांनी हिंदु-मुस्लिम ऐक्याचा स्वर्ग गाठला आहे. या विषयीचे काही आक्षेपार्ह मुद्दे पुढील प्रमाणे :

हिंदु-मुस्लिम प्रश्न समजावण्याच्या प्रत्येक विचारगटाच्या पद्धती वेगळ्या आहेत. आपल्या खास पुरोगामी प्रथेनुसार लखनौ कराराचे कौतुक केले आहे. व त्यावरील टीकेला ‘अतिरेकी’ ठरविले आहे.

आता २२ टक्के असणाऱ्या मुस्लिम समाजाला जर ३३ टक्के जागा देण्यात येत असतील तर उघडपणेच हिंदु समाजावर अन्याय आहे. कारण तेवढ्या प्रमाणात (म्हणजे सुमारे ११ टक्के) हिंदु समाजाच्या जागा कमी होणार.

केवळ मुसलमानांना स्वराज्याचे अधिकार देण्यात आले, तरी त्याचे आम्हास काही वाटणार नाही.

– हे टिळकांचे विधान केतकरांनी उदधृत केले आहे. अशाच आशयाची विधाने गांधीजींनीही केली आहेत. यावरून टिळक व गांधी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी किती अतिरिक्त उदार व त्यागी भूमिका घेत होते, याचा प्रत्यय येतो. लखनौ करारासारख्या कृतीतून ही गोष्ट स्पष्ट होते. अशी कृती करणाऱ्या व त्याहूनही अधिक उदार विचार व्यक्त करणार्या टिळकांवर मुस्लिम नेते प्रेम करीत. यात आश्चर्य कसले?!

परंतु “सर्व सत्ता हिंदूच्या हाती गेली तरी चालेल.” अशा आशयाचे विधान एका तरी मुसलमान नेत्याने केले आहे काय?

जीना अगोदर फार राष्ट्रवादी होते व नंतर ते बदलले असं मानण्याची पद्धत आहे, केतकरांना ते मान्य नाही. जीना उत्तरकाळातही फार बदलले नाहीत, (म्हणजे ते ऎक्यवादीच होते) असे केतकरांचे मत आहे. ते व्यत्यासानेच खरे आहे. म्हणजे मला १९१६ च्या जीना यांच्या ऐक्यवादीपणाविषयी सुद्धा शंका आहे. अन्यथा लखनौ करारात हिंदुंवर झालेल्या अन्यायाविषयी ते काही बोलले असते. निदानपक्षी हिंदु समाजाचे ते ऋणी तरी राहिले असते.

 

Tilak-and-Jinnah-marathipizza
thequint.com

ज्या हसरत मोहानींच्या टिळक-प्रेमाचा उल्लेख मोठ्या कौतुकाने केतकरांनी केला आहे. त्या मोहानींची मोपला बंडाविषयीची मते धर्मांधता दर्शवणारी आहेत. या बंडात झालेल्या धर्मांतराविषयी ते म्हणतात –

मोपल्यांनी हिंदूंसमोर मृत्यू अथवा धर्मांतर हे पर्याय ठेवणे योग्यच होते, जर हिंदूंनी मृत्यूऐवजी मुस्लीम धर्म स्वीकारला असेल तर त्यांना जबरी धर्मांतर म्हणता येणार नाही, तर ते त्यांनी स्वखुशीने स्वीकारले असेच म्हटले पाहिजे. (संदर्भ: Ambedkar B. R., Pakistan or Partition of India, Bombay, 1990, पान १६०)

या विधानावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मोहानींचे टिळकांवर प्रेम होते याचा अर्थ असा नव्हे की हिंदू समाजावर प्रेम होते. मौलाना महमंद अली किंवा मौलाना शौकत अली हे दोन बंधू ‘या’ प्रकाराचे आणखी एक उदाहरण. त्यांचेही टिळकांवर फार प्रेम होते मात्र त्यामुळे त्यांची हिंदुविरोधी वृत्ती कमी झाली नाही.

केतकर लेखात एके ठिकाणी म्हणतात,

“काँग्रेसने टिळकांपासून मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू केले, असा दावा करणारे संघ परिवारवादी काहीही म्हणोत, फाळणी वाचवायचे प्रयत्न टिळकांपासूनच सुरू झाले आणि ते अगदी १९४६ पर्यंत- म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत- आणि जीनांच्या बाजूने चालू होते.”

टिळकांनी फाळणी वाचवण्याचे प्रयत्न केले हे उघडच आहे, (फाळणी हा शब्द इथे व्यापक अर्थाने वापरला आहे.) मात्र जीनांच्या बाजूनीही असे प्रयत्न चालू होते, असे म्हणणे म्हणजे इतिहासाचा अगदीच विपर्यास आहे.

जीनांनी हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी मुस्लिमांच्या वतीने काही त्याग करणे सोडाच उलट आपल्या न्याय्य अधिकारापेक्षा जास्तीच्या मागण्या करणे चालू ठेवले. त्यांच्या सुप्रसिद्ध चौदा मागण्या पाहिल्या तर हे पुरेसे स्पष्ट होते. (संदर्भ: Ambedkar B. R., Pakistan or Partition of India, Bombay, 1990, पान २५७-२५८)

खरी गोष्ट अशी आहे की जीनांच्या या भरमसाट मागण्या पूर्ण करणे कोणत्याच कॉंग्रेस नेत्याला शक्य नव्हते. म्हणून त्या कॉंग्रेस नेत्यांनी जीनांनीच मांडलेला व मुस्लीम समाजात रुजवलेला फाळणीचा पर्याय नाईलाजाने स्वीकारला.

बरे या आपल्या भरमसाठ मागण्या किंवा फाळणीचा पर्याय स्वीकारावयास लावण्यासाठी जीना कोणत्या थरापर्यंत गेले, तर त्यांनी ‘प्रत्यक्ष कृतीची’ (डायरेक्ट एक्शन) हाक दिली व ती प्रत्यक्षात आणली. या प्रत्यक्ष कृतीत ५००० लोक ठार झाले, १५००० जखमी तर लाखाहून अधिक निराश्रित झाले. (तळवळकर गोविंद, सत्तांतर:१९४७, खंड : २, मुंबई, १९९७, पृ.१५२)

 

फाळणीचं क्षणचित्र

ही अधिकृत आकडेवारी आहे. प्रत्यक्षातील आकडा यापेक्षाही अधिक मोठा असू शकतो. या सर्व गोष्टी केतकरांना जीनांच्या बाजूने फाळणी टाळण्याच्या प्रयत्नाचा भाग वाटतात काय? केतकरांनी स्वत:च्या स्वातंत्र्य लढ्यावरील ग्रंथात ‘पाकिस्तानची मागणी जीनांनीच मुस्लीम समाजामध्ये मुरवली होती’ असे स्वच्छपणे म्हटले आहे. (केतकर कुमार, कथा स्वातंत्र्याची, पुणे २००३, पृ.३०३) मात्र ‘प्रत्यक्ष कृती’ या गंभीर घटनेचा उल्लेखसुद्धा करणे या साडेतीनशे पानी ग्रंथात त्यांना आवश्यक वाटलेले नाही. (इथे No one can change the history…except Historian! या महावाक्याची आठवण का होतेय?)

केतकरांनी आपल्या लेखामध्ये ए.जी. नुरानी यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. त्याची दुसरी बाजू दाखवणे आवश्यक आहे.

 

a g noorani musharraf marathipizza
frontline.in

मुस्लीम समाजातील बुद्धिवादी समाज सुधारक हमीद दलवाई यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे त्यात त्यांनी ए. जी. नुरानी या अभ्यासकाविषयी बरीच माहिती दिली आहे.

ती पुढीलप्रमाणे.

ए.जी. नुरानी हे उदारमतवादाचा लेप लावलेले छुपे जातीयवादी असून अलीगढ विद्यापीठाच्या जातीयवादी राजकारणात ते सक्रिय सहभागी असत. भारत पाक संघर्ष आणि कश्मीर प्रश्नाच्या संदर्भात ते नेहमी पाकिस्तानवादी भूमिका घेत.

भारतात सुशिक्षित मुसलमानांची पाकिस्तानवादी लॉबी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात ते पुढे होते. त्यांच्या अतिरिक्त पाकिस्तान प्रेमामुळे १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात सरकारने त्यांना भारत संरक्षण कायद्याखाली स्थानबद्ध केले.

पुढे १९७१ साली परत भारत पाक संघर्ष झाला. त्याही वेळी आपल्याला अटक होईल या भितीने नुरानींनी महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्यमंत्री रफिक झकेरिया यांच्यामार्फत अटक टाळण्याचे प्रयत्न केले. (संदर्भ: दलवाई हमीद, ‘राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान’ पुणे, २००२, पृ. १४९-१५२)

नुरानींच्या अशा ‘कर्तृत्वाविषयी’ बरेच तपशील दलवाईंनी दिले आहेत जिज्ञासूंनी ते मुळातूनच पहावेत.

केतकरांनी इतिहासाचा विपर्यास केला आहे, हे उघड आहे. आपण असेही गृहीत धरू की त्यांनी हे लिखाण उदात्त हेतूनेच केले आहे. (म्हणजे उदा. हिंदू मुस्लीम ऐक्य व्हावे वैगेरे) मात्र समकालीन उदात्त हेतूसाठीही कोणी ‘इतिहास’ या ज्ञानशाखेला वेठीस धरून त्याचा विपर्यास करता कामा नये. या ज्ञानशाखेची स्वायत्तता जपणे आवश्यक आहे.

===

ता. क. – केतकरांच्या मूळ लेखाची लिंक :

लोकसत्ता : http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=90392%3A2010-07-31-18-56-33&Itemid=1

केतकरांचा ब्लॉग : http://kumarketkar.blogspot.in/2010/08/blog-post.html

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?