आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
एखाद्या सिरीजची तुम्ही आतुरतेने वाट पाहता आणि ती सिरिज बघताना भरकटल्यासारखं वाटतं तसंच काहीसं हॉटस्टारच्या क्रिमिनल जस्टीस या सिरिजबाबतीत घडलं आहे.
या सिरिजचा पहिला सीझन खरोखरच स्तब्ध करणारा होता. पण त्याच सिरिजचा दूसरा भाग ज्याला स्वतंत्र वेगळी सिरिज म्हणून सुद्धा ट्रीट केलं तरी चालेल!
अशा या दुसऱ्या भागात जबरदस्ती सोशल मेसेज घुसवून प्रेक्षकांना एका ठरलेल्या साच्यातला डोस पाजायचा हा केविलवाणा प्रयत्न पाहून खरंच या सिरिजच्या मेकर्सची कीव करावीशी वाटते.
सिरिज वाईट नाहीये, उलट एक क्राइम थ्रिलर म्हणून सिरिज उत्कृष्ट आहे, टेक्निकल तसेच इतर भागात सुद्धा सिरिज अव्वल आहे. पण शेवटचे २ एपिसोड संपूर्ण सिरिजचा टोनच चेंज करतात.
एका उत्कृष्ट लिहिलेल्या क्राइम थ्रिलर मध्ये क्राइम पेट्रोल किंवा सावधान इंडियाची झलक पाहायला मिळते आणि Domestic Abuse च्या नावाखाली काहीतरी विचित्र अजेंडा लोकांच्या माथी मारला जातो!
या सिरिजचा पहिला सीझन पाहता या दुसऱ्या भागात सुद्धा काही गोष्टी स्पष्टपणे मांडता आल्या असत्या किंवा unbiased राहून या सिरिजच्या लेखकांना एक सुंदर सिरिज बनवता आली असती.
पण Domestic Abuse किंवा Marital Rape अशा गंभीर नोट वर संपणारी ही कथा काही केल्या पचत नाही आणि मनात बरेच प्रश्न निर्माण करते!
आपल्या देशात domestic violance च्या असंख्य केसेस होत असतात हे कुणीच अमान्य करणार नाही पण या सिरिज मध्ये हा अॅंगल मेकर्सनी का घुसडला असेल हा मला पडलेला प्रश्न अजूनही सुटत नाहीये!
या सिरिजची कथा फिरते अनू चंद्रा आणि बिक्रम चंद्रा यांच्याभोवती.
एक सुखी कुटुंब ते दोघे आणि त्यांची मुलगी पण सिरिजच्या सुरुवातीलाच अनू हिला खूप टेंशन मध्ये दाखवलं जातं आणि नेमकं त्याच एपिसोडच्या शेवटी रात्री अनू बिक्रमच्या पोटात सुरा खुपसून त्याचा खून करते.
आणि इथून पुढे सुरू होतो एक वेगळाच खेळ. खुनाच्या आरोपाखाली प्रथम त्यांची लहान मुलगी रिया आणि मग स्वतः अनुराधा यांना पोलिस पकडतात.
खून कुणी केलाय हे सिरीजच्या पहिल्याच एपिसोडला समजतं पण त्यामागे नेमकी काय कारणं आहेत हेच सगळं शोधायचा ही सिरिज प्रयत्न करते.
मधले काही एपिसोड सिरिज खरंच चांगली पकड घेते, जेल मधलं एकंदर वातावरण, महिला कारागृहात होणारे विविध अपराध आणि एकंदरच ते गुन्हेगारी विश्व अनुभवताना आपण त्यात गुरफटून जातो.
पण जसं अनू वर खटला भरून तिच्याविरुद्ध केस सुरू होते तेंव्हापासून ही सिरिज काहीतरी वेगळंच वळण घेते.
अर्थात सुरुवातीच्या काही एपिसोडच्या सीन्स मध्ये असा शेवट असेल अशी आपल्याला शंका येते पण दिग्दर्शक खूप चलाखीने तुम्हाला ६ एपिसोड बांधून ठेवतो.
===
हे ही वाचा – उपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय?
===
पण शेवटच्या २ एपिसोड मध्ये मिळणारे ट्विस्ट आपल्याला खूप गोंधळात टाकतात आणि एकंदरच एक सोशल मेसेज देण्याच्या नादात ही सिरिज पुरती फसते!
Marital Rape ही गोष्ट भारतात अजूनही गुन्हा मानली जात नाही आणि या मुद्द्याला धरून सिरिजचा होणारा शेवट खूप हास्यास्पद वाटतो.
म्हणजे ज्या पात्राला संपूर्ण सिरिजमध्ये हीरोसारखं ट्रीट केलं जातं तेच पात्र नेमकं शेवटच्या २ एपिसोड मध्ये व्हिलन कसं होतं ते बघताना खरंच हे नेमकं आपण का पाहतोय असंच वाटतं!
बरं त्याहून हास्यास्पद म्हणजे ठरवून केलेल्या खुनाला जेंव्हा सेल्फ डिफेन्स म्हणून जस्टीफाय केलं जातं तेंव्हा मात्र खरंच या सिरिजचं पितळ उघडं पडतं.
पद्धतशीरपणे एखाद्याला Abuse करणे आणि ते त्या व्यक्तिला कळू न देणे इतपत ठीक होतं पण हे सगळं मांडताना स्त्री पुरुष यांच्या नात्यात पुरुष कसा व्हिलन आणि स्त्री ही एकटीच कशी सोशीक हे दाखवण्याचा सिरिजच्या मेकर्सचा खटाटोप फोल ठरतो!
हे दाखवताना सिरिज काही पात्रांना सुद्धा त्याच प्रकारे प्रेझेंट करते. एक पोलिस ऑफिसर्स जोडपं ज्यांना मूल होत नाहीये किंवा एक मुसलमान स्त्री जी अजूनही आपल्या पतीने दूसर लग्न केलं तरी ब्र देखील काढत नाही, वगैरे वगैरे!
यातल्या कोर्टरूम ड्रामा कडे काल्पनिक कथा म्हणून सुद्धा एकवेळ कानाडोळा केला तरी यात केल्या गेलेल्या छोट्या छोट्या चुका सामान्य माणूस सुद्धा पटकन सांगू शकेल. जसं की कोर्टात पोलिसांनी घेतलेलं स्टेटमेंट admissible नसतं इतकी साधी गोष्ट या सिरिजच्या मेकर्सना कळू नये.
बरं हे झालं फॅक्टस बाबत, कथा मांडताना तिचा शेवट अमुक अमुकच करायचा या उद्देशानेच कथानक लिहिल्याचं जाणवतं.
माझं असं अजिबात म्हणणं नाही की आपल्या देशात Domestic Abuse होत नाही, किंबहुना आपल्याच काय तर इतरही देशांमध्ये हा प्रकार सर्रास होतो!
पण केवळ काही लोकांच्या अनुभवावरून तुम्ही एकाचीच रि ओढत बसलात तर ते कसं चालेल?
या सिरिजमध्ये पुरुषप्रधान संस्कृति किंवा पुरुष कसे महिलांवर अत्याचार करतात हे दाखवण्याला माझा विरोध नाहीये पण ती गोष्ट तुम्ही Selectively करताय त्याचं कुठेतरी वाईट वाटतं.
लग्नानंतर असो किंवा लग्नाआधी रेप तो रेपच असतो, आणि तो करणाऱ्या व्यक्तीला माफी नाही हे देखील तितकंच खरं!
पण आपल्यावर अत्याचार झाला म्हणून आपल्या नवऱ्याचा खून करणारं आणि आपलं चारित्र्य लपवणाऱ्या या सिरिज मधल्या अनुराधा चंद्रा या पात्राची मात्र कीव करावीशी वाटते.
बरं जी स्त्री परपुरुषाबरोबर संबंध ठेवून त्याचं मूल आपल्या पोटात वाढवत असते, त्याला जन्म देते, तीच स्त्री आपल्या नवऱ्याचा खून सेल्फ डिफेन्स म्हणून करते हे पचायला जरासं कठीण वाटतं. बरं इतकी वर्षं चाललेला छळ तिला पटत होता का?
आणि जर तिचा नवरा जे करतोय ते Abuse आहे? तर मग तिच्या हातून अनावधानाने का होईना जे घडलंय ते योग्य आहे का? प्रश्न फक्त या नैतिक मूल्यांचा नाहीये, प्रश्न आहे तो या गोष्टी एकतर्फा दृष्टिकोनातून मांडण्याचा.
Extra Marital Affair असो किंवा Domestic Abuse दोन्ही गोष्टी या चुकीच्याच आहेत हे सांगायला ही सिरिज सेल्फ डिफेन्सची ढाल करते ते न पटण्यासारखं आहे!
सिरिजच्या शेवटी एक सीन आहे जिथे एक महिला वकील एका पुरुष वकिलाल विचारते की “आपको नही लगता की कानून सिर्फ पुरूषों के अधिकारों की सुरक्षा के लिए नही बना है!”
हा डायलॉग आणि एकंदर या सिरिजचा अजेंडा पाहता माझ्या मनात सुद्धा एक प्रश्न आला की कायदा हा सगळ्यांसाठीच सारखा आहे तर मग या अशा सिरिजमध्ये स्त्री पुरुष भेद करून, का नेहमी सगळ्या पुरुषांना एकाच रांगेत आणून बसवलं जातं? स्त्रिया कायद्याचा फायदा उचलतच नाहीत का?
असो विषय प्रचंड खोल आहे आणि या सगळ्या गोष्टींचा या सिरिजच्या मेकर्सनी थोडा जरी विचार केला असता तर नक्कीच ही सिरिज इतकी फसली नसती!
या सिरिज मध्ये प्रत्येक कलाकाराने सुंदर काम केलं आहे. जीशू सेनगुप्ता, कीर्ती कुल्हारी यांनी साकरलेले बिक्रम आणि अनू चंद्रा खूपच जमून आलंय. कीर्तीने तर डिप्रेशन आणि abusive व्यक्तिचं पात्रं हुबेहूब वठवलं आहे.
अनूप्रिया गोएन्का, शिल्पा शुक्ल, दीप्ती नवल या कसदार अभिनेत्रीनी सुद्धा अप्रतिम काम केलं आहे.
आशीष विद्यार्थी यांनी साकारलेला प्रभू वकील हे पात्र उगाच घेतल्यासारखं वाटतं, शिवाय नेहमीप्रमाणेच या पात्राला कट्टर हिंदूवादी किंवा पूजा वगैरे करणारा कर्मठ वकील दाखवलं गेलं आहे ज्याची खरंतर काहीच आवश्यकता नव्हती!
या सगळ्यात ही सिरिज बघण्याचं एकमेव कारण म्हणजे पंकज त्रिपाठी. बॉस हा माणूस गॅंग्स ऑफ वासेपूर नंतर जो काही सूटलाय तो काही थांबायच नावच घेत नाहीये, वेगवेगळे रोल्स वेगवेगळ्या छटा हा माणूस अगदी सहजतेने आपल्यासमोर मांडतो.
मिर्जापुर मधला कालीन भैय्या असो किंवा नुकताच रिलीज झालेल्या लुडो मधला डॉन. हा माणूस अभिनय करत नाहीच तो फक्त ते पात्र आपलंस करतो, त्याचे प्रत्येक डायलॉग हावभाव हे सगळं improvisation वाटावं इतकं नॅच्युरल काम आहे त्रिपाठी यांचं.
क्रिमिनल जस्टीसचा हा सीझन आणि येणाऱ्या पुढच्या सीझन मध्ये सुद्धा जर माधव मिश्रा नसेल तर ही सिरिज कुणीच बघणार नाही!
एकेकाळी आपण नसिरुद्दीन किंवा ओम पुरी यांना अभिनयाचं विद्यापीठ म्हणत, पण आता ते ही बदलत चाललंय त्यांच्या जागी आता एक नाव नक्की झालंय ते म्हणजे पंकज त्रिपाठी!
सिरिज वाईट आहे असं अजिबात नाही, सगळ्यांचे अभिनय, बॅकग्राउंड म्युझिक, कॅमेरा वर्क सगळंच सुंदर झालं आहे. सिरीजची कथा सुद्धा खूप छान पद्धतीने लिहली गेली आहे.
पण बंद दरवाज्यांच्या मागे नवरा बायकोत होणाऱ्या गोष्टींना selectively दाखवून सगळ्याच जोडप्यांना एकाच साच्यात बसवण्याचा खटाटोप मात्र न पटणारा आहे! सिरिज तुम्ही हॉटस्टार या प्लॅटफॉर्म वर बघू शकता.
===
हे ही वाचा – ‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.