खांद्याला चेंडू लागला, अंपायरने सचिनला आऊट दिलं. तो क्षणभर स्तब्ध झाला आणि…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – ईशान घमंडे
===
सचिन तेंडुलकर म्हटलं, की क्रिकेटमधील अनेक विक्रम आपसूकच आठवतात. त्याचा रुबाब, दर्जा आणि त्याला प्राप्त झालेलं देवत्व, या गोष्टी आपल्याला माहित आहेतच! If CRICKET IS A RELIGION, then SACHIN is its GOD, असं उगाच म्हटलं जात नाही.
पण, त्याच्या या अफाट विक्रमांच्या बरोबरीनेच कायमच्या विस्मरणात जायला हव्यात, अशा काही दुर्दैवी गोष्टी सुद्धा आठवतात.
साक्षात भगवान विष्णूंना सुद्धा मनुष्य जन्मात, श्रीरामाच्या अवतारात वनवास भोगावा लागला होता; मग सचिन तर चाहत्यांनी देवत्व बहाल केलेला माणसासारखा माणूस आहे. चांगल्या गोष्टींच्या बरोबरीने कटू आठवणींचा ठेवा त्याच्यासोबत नसता, तर त्याचं नवल वाटलं असतं.
सचिन म्हणजे नर्व्हस 90s, सचिन म्हणजे टेनिस एल्बो, सचिनचं शतक म्हणजे भारताचा पराभव, (खरं तर सचिनने फटकावलेल्या १०० शतकांपैकी ७५ शतकांच्या वेळी भारतीय संघ अपराजित आहे, असं आकडेवारी सांगते.) अशा अनेक गोष्टी ‘सचिन तेंडुलकर’ नावासोबत जोडल्या गेल्या आहेत.
त्याच्या नर्व्हस नाईंटीजच्या यादीत, लंकेविरुद्ध २००९ साली तो ९६ धावांवर नाबाद परतला ती खेळी सुद्धा समाविष्ट करायला हवी.
सचिनने धावांचा वेग थोडा अधिक वाढवायला हवा होता पासून, दिनेश कार्तिकने त्याला अधिक काळ स्ट्राईक द्यायला हवा होता पर्यंत अनेक मतमतांतरं आणि चर्चा त्यावेळी झाल्या. अर्थात, नंतर होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नसतोच. असो.
या दुर्दैवी गोष्टींच्या यादीत आणखी एका गोष्टीचा समावेश होतो, ते म्हणजे सचिनविरुद्ध देण्यात आलेले, पंचांचे चुकीचे निर्णय… यात स्टीव्ह बकनर हे नाव आघाडीवर आहे, असं म्हणता येईल. या पंचाला, एकूणच सचिनचं यश बघवत नसावं. सचिन क्रीझवर आला की कधी एकदा तर्जनी आभाळाकडे नेतो अशा पवित्र्यातच ते निर्णय देत असत.
थर्ड अंपायर ही संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर, सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या निर्णयानुसार बाद झालेला खेळाडू म्हणून सुद्धा सचिनचं नाव घ्यावं लागतं. थोडक्यात काय तर, सचिनचे विक्रम जसे भन्नाट आहेत, तशाच त्याच्या कारकिर्दीतील नकारात्मक बाजू सुद्धा! पण, असो तो आजचा विषय नाही.
हाच सचिन, एकदा आणखी एका विचित्र पद्धतीने बाद झाला होता. खांद्याला चेंडू लागून फलंदाज बाद होणं, हीच मुळात एक अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे. त्यातही पंचांच्या नजरचुकीने, खांद्याला लागलेल्या चेंडूवर फलंदाजाला झेलबाद ठरवण्यापर्यंत घडलेली गोष्ट सुद्धा एकवेळ समजण्याजोगी आहे. पण,
खांद्याला चेंडू लागलेला असताना सचिनला चक्क ‘लेग बिफोर विकेट’ म्हणजेच एलबीडब्ल्यू या प्रकारात बाद दिलं गेलं होतं.
तर, ही गोष्ट आहे १९९९ सालची. सचिन तेंडुलकर त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता. म्हणजेच त्याच्या ‘खांद्यावर’ फलंदाज आणि कप्तानी अशी दुहेरी जबाबदारी होती. पण, त्याच खांद्याने त्याचा घात केला. एका विचित्र पद्धतीने बाद होणं त्याच्या नशिबात होतं. खांदा आड आला आणि नेहमीच खिलाडूवृत्तीने पंचांचे निर्णय मान्य करणारा सचिन पॅव्हेलियनकडे चालू पडला.
देवांग गांधी, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि द्रविड या खेळाडूंनी लवकर शस्त्र टाकली असल्यामुळे भारताची अवस्था ३ बाद २७ अशी दयनीय झाली होती. ३६९ धावांचं आव्हान समोर असलेला भारतीय संघ पराभवाच्या छायेत उभा होता. संघनायक सचिन काय करणार याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या.
मॅक्ग्राच्या गोलंदाजीवर, सचिन स्ट्राईकला असताना त्यानं लावलेलं क्षेत्ररक्षण पाहिल्यावरच ऑस्ट्रलियाने भारतावर पूर्णपणे वर्चस्व मिळवण्याचा निश्चय केलाय हे स्पष्ट झालं होतं. ३ स्लिप्स, २ गली, लेग गली आणि एक फॉरवर्ड शॉर्टलेग अशी क्षेत्ररक्षणाची सजावट अनेक गोष्टी स्पष्ट करत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पुढचा चेंडू एक धारदार बाउन्सर असणार हे सुद्धा स्पष्ट होतं.
बाउन्सर म्हटलं की तो छाती किंवा खांद्याचा वेध घेणार यात काहीच नवल नाही. मात्र, हा उसळता चेंडू ज्यापद्धतीने सचिनच्या खांद्यावर आदळला ते आश्चर्यकारकच होतं. तेजतर्रार ग्लेन मॅक्ग्राचा शॉर्टपीच चेंडू अजिबातच उसळला नाही. तो अपेक्षेहून फारच खाली राहिला. शॉर्टपीच चेंडू पाहून तो डक करायला सचिन खाली वाकला, पण…
अर्धवट न उसळलेला आणि कंबरेच्या उंचीवर राहिलेला हा चेंडू सचिनच्या खांद्यावर जाऊन आदळला. मॅक्ग्रासह सगळ्याच प्रतिस्पर्ध्यांनी याविरोधात अपील केलं. काही क्षण विचार करून पंच डॅरिल हार्पर यांनी सचिनला एलबीडब्ल्यू बाद ठरवलं.
आश्चर्यचकित झालेला सचिन क्षणभर थांबला. पण, नेहमीप्रमाणे खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवत, पंचांचा निर्णय मान्य करून तंबूकडे चालू लागला.
सचिन शून्यावर बाद झाला. बाउन्सर डक करण्याच्या प्रयत्नात ‘डक’वर बाद झालेला सचिन परतीच्या वाटेवर असताना त्याच्या असंख्य चाहत्यांना वाईट वाटत होतं. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, त्यांना आश्चर्य वाटत होतं. हा निर्णय वादग्रस्त ठरला.
खांदा यष्ट्यांसमोर आल्यामुळे ‘लेग बिफोर विकेट’ ठरलेला सचिन मात्र याविषयी काहीही बोलला नाही.
कर्णधार असूनही, या विषयावर पत्रकार परिषेदेत त्यानं याविषयी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. या चेंडूवर सचिनला बाद देण्याचं काहीच कारण नव्हतं असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. अगदी सचिनवर अमाप प्रेम करणाऱ्या चाहत्यांपासून ते साऱ्या दिग्गजांपर्यंत सगळ्यांचंच!
दिग्गजांच्या यादीत, त्या सामन्यात कॉमेंट्री करणारे सुनील गावस्कर यांचं नाव अधिक महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या खास शैलीत त्यांनी या घटनेवर मत मांडलं होतं. त्या विकेटविषयी बोलताना ते म्हणाले होते,
‘यष्ट्यांची उंची साधारण ६ इंच अधिक असती, तर सचिन नक्कीच बाद ठरला असता.’
पायचीतच्या या गमतीदार विकेटला अनेकांनी SBW अर्थात शोल्डर बिफोर विकेट असंही म्हटलं. नाराजी व्यक्त झाली, तसाच हा विनोदी अँगल सुद्धा काही काळ चर्चेत राहिला. अर्थात, तो अगदी काही काळच.. मूळ चर्चा होती, पंचानी दिलेल्या ती सचिनविरुद्धच्या चुकीच्या निर्णयाचीच!
कारण, शेवटी सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद देणं, याहून मोठा विषय दुसरा कुठला असू शकतो का; तुम्हीच सांगा…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.