' पोलिओशी झुंज देत ती झालीये बिझनेसवूमन! या जिद्दीला सलाम हवाच – InMarathi

पोलिओशी झुंज देत ती झालीये बिझनेसवूमन! या जिद्दीला सलाम हवाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इच्छाशक्ती ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. ती प्रत्येक व्यक्तीकडे असते, पण ती ओळखून तिचा योग्य वापर करून यशस्वी होणारे मात्र फार कमी असतात.

केरळमधील दिजा सतीशन ही अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसूनही जिद्दीने स्वतःचा घरगुती लोणच्याचा व्यवसाय सुरू करून आज महिन्याला २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवणाऱ्या दिजा यांची कहाणी खूप काही शिकवून जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या दिजा सतीशन यांना लहानपणीच पोलिओने गाठले. पोलिओमुळे पायातील त्राण गेल्याने मित्रमैत्रिणींबरोबर बागडण्याच्या वयातच दिजाच्या नशिबी व्हीलचेअर आली. इतर मुलांप्रमाणे चालता-धावता येत नसल्याने तिचे सगळे शिक्षण शाळेत न जाता घरीच झाले.

दिजाच्या साथीला तिच्या पालकांनी घेऊन दिलेली पुस्तकेच तेवढी असत. एखाद्या शारीरिक व्यंगमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना कोणासाठीही क्लेशदायकच असते, पण त्यातूनही काहीजण आपली वेगळी आवड जोपासतात आणि आपल्या आयुष्यात नव्याने आनंद फुलवतात.

 

 

दिजाला इतरांप्रमाणे बागडणे शक्य नसले, तरी तिला लहानपणापासूनच एक गोष्ट फार आवडे, ती म्हणजे स्वयंपाक! दिजाचे वडील उत्तम स्वयंपाक करत असत. ते एका हॉटेल मध्ये काम करत असत. त्यांच्याकडे बघून दिजाच्या मनात स्वयंपाकाची आवड निर्माण झाली.

वयाच्या १९व्या वर्षी व्हीलचेअरवर बसलेल्या दिजाने आपला पहिला पदार्थ बनवला, तो म्हणजे चिकन करी! दिजाचा हा पहिलाच प्रयत्न सगळ्यांची वाहवा मिळवून गेला. व्हीलचेअरवर जखडल्या गेलेल्या दिजाला स्वतःच्या एका नवीन छंदाची जाणीव झाली.

२०१७ मध्ये दिजाच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. दिजाच्या घराचा आधारस्तंभ, म्हणजे तिच्या वडिलांचे अकाली निधन झाले. घरातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्याने दिजा आणि तिच्या घरच्यांसमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला. दिजाची आई वयोमानपरत्वे जास्त काम करू शकत नव्हती. अशा परिस्थितीत दिजाने आपल्या कुटुंबासाठी उभे राहण्याचे ठरवले.

आपल्या स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करावा असे दिजाच्या मनात होते. त्यांच्या कुटुंबाचे एक मित्र नौशाद यांनी दिजाला मानसिक आधार दिला आणि प्रोत्साहित केले. आपल्या स्वयंपाकाच्या आवडीला आपले उत्पन्नाचे साधन बनवता येईल का? या विचाराने दिजाने काम सुरू केले.

 

pickles making inmarathi

 

तिच्या मनात लोणची बनवून विकण्याचा विचार आला. तिच्या घरच्यांनी आणि इतर हितचिंतकांनीदेखील ही कल्पना उचलून धरली. नौशाद यांच्या मदतीने ‘निमित्र’ या नावाने दिजाने लोणची तयार करण्यास प्रारंभ केला.

‘निमित्र’ चा अर्थ होतो ‘नवीन मित्र’! शारीरिक अक्षमतेबरोबरच आणि अचानक ओढवलेल्या संकटाला सामोरे जाणाऱ्या दिजाला या कल्पनेमुळे खरोखरच एक नवीन मित्र मिळाला.

दिजाने आपल्या व्यवसायाची सुरुवात लिंबाचे लोणचे बनवण्यापासून केली. घरातील उपलब्ध साहित्य वापरून तिने लिंबू लोणचे बनवले आणि फेसबुकवर त्याची जाहिरात पोस्ट केली. सोशल मीडियाची जादू काही वेगळी सांगायला नको! दिजाची जाहिरात असंख्य लोकांपर्यंत पोचली आणि लोणच्याची मागणी सुरू झाली.

लोणचं हा तोंडी लावण्याचा एक चटपटीत पदार्थ. भारताच्या जवळपास सगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवली जातात. म्हणूनच भारतातील विविध खाद्यसंस्कृतींमध्ये लोणच्याला स्थान आहे. सगळे स्वाद योग्य लागलेले, टिकाऊ लोणचे बनवणे हे तसे संयमाची परीक्षा बघणारे असते.

 

pickle 2 inmarathi

 

सुरुवातीला लोणची बनवायला सुरुवात केल्यावर दिजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कायम व्हीलचेअरवर बसून काम करावे लागत असल्याने दिजाच्या काम करण्यावर मर्यादा येत असत. दिजासाठी त्यांच्या स्वयंपाकघरात काही विशेष सोय केलेली नव्हती. त्यामुळे प्रसंगी व्हीलचेअरवरून वाकून तिला काम करावे लागे.

मोठी ऑर्डर असेल तर तिला लोणचे बनवताना अक्षरशः आठ-दहा तास सलग काम करावे लागे. आता सरावाने दिजाची काम करण्याची पद्धत ठरून गेली आहे.

नौशाद बाजारातून लोणची बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या आणि इतर सामग्री घेऊन येतात. त्यानंतर दिजा तिच्या बहिणीच्या मदतीने भाज्या धुवून घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करते.

दिजा शाकाहारी व मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची लोणची बनवते. आंबा आणि लिंबाचे लोणचे बनवताना ती जवळपास आठवडाभर आधीपासून कैऱ्या आणि लिंबं मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवते आणि मगच पुढील प्रक्रिया करते. आले, लसूण किंवा मिरचीचे लोणचे करताना भिजवून झाल्यावर त्यांना वाळवावे लागते.

मांसाहारी लोणची बनवताना सगळी प्रक्रिया एका दिवसातच पूर्ण करावी लागते, अन्यथा ते लोणचे लवकर खराब होते. दिजा आपल्या लोणच्यात व्हिनेगर शिवाय अन्य कोणतीही परिरक्षके (Preservatives) वापरत नाही. पाककृतीमधील काटेकोरपणामुळे तिची लोणची चार महिने सहज टिकू शकतात.

लोणचे बनवण्याच्या या सगळ्या प्रक्रियेत दिजाला बऱ्यापैकी शारीरिक श्रम पडतात. आपल्या बहिणीच्या साथीने ती सध्या दिवसाला जवळपास ५० किलोची लोणची बनवते.

 

 

लोणचे तयार झाल्यावर दोन तास थंड झाले, की ते बाटल्यांमध्ये भरले जाते. घराजवळच तिचे दुकान आहे, जिथे या लोणच्यांची विक्री केली जाते. दिजा अक्षरशः अनेक प्रकारची लोणची बनवते. यात कैरी, लिंबू, खजूर, जायफळ, लसूण, पपई, आले, मुळा, मिरची, कारले, गुजबेरी, मासे, बीफ आणि कोळंबी (प्रॉन्स) यांचा समावेश आहे.

लोणच्यांखेरीज ती सांभार मसाला, रस्सम मसाला, गरम मसाला यांसारखी उत्पादनेही बनवते. तिची लोणची प्रतिकिलो २०० रुपयांपासून ते प्रतिकिलो ८०० रुपयांपर्यंत दराने विकली जातात. सोशल मीडियामुळे दिजाला भरपूर ऑर्डर्स मिळतात. मासे आणि बीफ चे लोणचे ही दिजाची खासियत आहे. अनेक लष्करी अधिकारी तसेच परदेशातील भारतीय लोकांकडून याला विशेष मागणी आहे.

दिव्यांग असूनही दिजा आज गृहोद्योगाच्या माध्यमातून ‘आपल्या पायांवर’ उभी राहात आहे. यामागची तिची जिद्द आणि चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. संकटांना सामोरे जाऊन दिजाने उद्योगात संपादन केलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?