Site icon InMarathi

रोडरोमियोंना थांबवण्याच्या आवश्यक टिप्स; प्रत्येक स्त्रीसाठी आणि तुमच्या-आमच्यासाठी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोमवारची सकाळ.. नेहमीप्रमाणेच धावपळीची, गर्दीची! रिक्षेतून उतरून हातातली पर्स आणि इतर बॅग्स सांभाळत ‘ती’ स्टेशनच्या दिशेने चालू लागली…दिवसभरातील कामाचे विचार “तिच्या” मनात घोळत होते.

स्टेशनवर गर्दीतून वाट काढत अपेक्षित ट्रेन पकडण्यासाठी तिची पावलं झपझप पडत होती. अचानक पाठून कोणीतरी विचित्र स्पर्श केल्याचं तिला जाणवलं… संपूर्ण शरीरातून एक भीतीची भावना उसळून गेली… धीर एकवटून तिने एका तीक्ष्ण नजरेने मागे वळून पाहिलं…. तिच्याकडे बीभत्सपणे हसून तो पुरुष त्या गर्दीत गायबही झाला…

“काय करायला हवं?” हे समजण्याच्या आत हे सगळं घडून गेलं होतं… दिवसभराची कामं समोर दत्त म्हणून उभी होतीच… गप्पपणे झालेला प्रकार गिळून तीही मार्गस्थ झाली…

मनुस्मृतीत एक महत्त्वाचा श्लोक आहे…

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।

थोडक्यात, जिथे स्त्रियांचा मान ठेवला जातो, तिथे देवता वास करतात. जिथे त्यांचा अपमान केला जातो, तिथे कोणतीच गोष्ट सफल होत नाही. देवींची- स्त्रियांची पूजा करणारी आपली संस्कृती आहे, पण वरचा प्रसंग आजकाल तुम्ही आम्ही एकदा तरी अनुभवला असेल किंवा पाहिला तर नक्कीच असेल.

 

 

या गोष्टी घडताना आपण पाहत असतो, पण कसं बोलायचं? असा विचार करून सोडून देतो. बोलण्याची गरज आहे हे समजूनही आपण शांत राहतो, कारण नेमकं काय करायचं? हे माहीतच नसतं.

रस्त्यावर केली जाणारी टिंगल, बस- ट्रेनमध्ये वरपासून खालपर्यंत भिरभिरणारी नजर, विचित्र हास्य, मुद्दाम केला जाणारा स्पर्श या गोष्टी प्रत्येक स्त्रीच्या जिव्हारी लागणाऱ्याच असतात. केवळ भारतातच नाही, तर चारचौघांमध्ये घडणाऱ्या या गोष्टी जगभरातील स्त्रियांसोबत घडतात, पण याबाबतीत नेमकं काय करायचं हे मात्र कोणीच सांगत नाही.

शाळेत असताना दिले जाणारे कराटेचे क्लासेस प्रत्येक मुलीने घेतलेले असतातच असं नाही. “मी काही बोलले तर प्रकरण अजून चिघळेल” “त्याने उद्या काही केलं तर?” ही भीती एका मुलीच्या मनात सतत असते आणि याच भीतीपोटी गोष्टी सोडून दिल्या जातात.

प्रत्येकवेळेस सोडून देण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यासोबतही अशा काही गोष्टी घडल्या, तर आपण आपल्या पातळीवर कोणत्या गोष्टी करू शकतो यांची चर्चा होणे गरजेचे आहे.

१. बोलायला शिका :

 

 

समोरची व्यक्ती त्रास देत असताना तो मुकाट्याने सहन करणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. अशा परिस्थितींमध्ये शांत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला स्पष्टपणे खडे बोल सुनवा आणि तिथून निघून जायला सांगा.

एकदाच स्पष्टपणे सांगा. त्यांच्याशी संभाषण साधू नका. कारण, अशा हालचाली करणारी व्यक्ती कधीच आपली चूक मेनी करण्याच्या मानसिकेत नसते, त्यामुळे त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांच्या हालचालींनी तुम्हाला त्रास होतोय हे स्पष्ट सांगा.

२. मदत मागा :

प्रत्येकवेळेस तुम्ही बोलून, ओरडून, चिडून उपयोग होतोच असं नाही. अशावेळेस प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. समोरच्याची मानसिकता विकृतच असेल तर तिथे तुम्ही त्यांचेवर ओरडून, स्पष्ट सांगून काही फायदा होणार नसतो.

अशावेळेस तुमच्या आजूबाजूला जी इतर माणसं असतील त्यांना याबद्दल सांगा. त्यांच्याकडून मदत मागा. त्यांना काहीवेळ तुमच्यासोबत थांबायला सांगा किंवा पोलिसांना देखील तुम्ही संपर्क साधू शकता.

३. रेकॉर्डिंग करा :

 

 

सध्याच्या काळात सोशलमिडीयाला असाध्य असं काहीच नाहीये. त्यामुळे जी व्यक्ती तुम्हाला त्रास देतेय, तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तुम्ही पोलिसांना देखील दाखवू शकता. सोशलमीडियावर हा व्हिडीओ शेअर केल्यास, तुम्ही त्या व्यक्तीलाही योग्य अद्दल घडवू शकता.

एखाद्या महिलेची रस्त्यात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कोणी छेड काढतंय हे तुमच्या लक्षात आलं, तर फक्त तो तमाशा बघण्यापेक्षा तुम्हीही हे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करू शकता, कसे? बघा

१. आधाराचे बोल :

महिलेची छेड काढणारा तरुण भलेही गर्दीत निघून गेला, तरीही त्या महिलेजवळ जाऊन आपुलकीने तिची विचारपूस करा. यामुळे “मी एकटी नाहीये, माझी मदत करणारं कोणीतरी आहे” हा विश्वास त्या महिलेच्या मनात निर्माण होईल.

आपुलकीचे दोन शब्द हे नेहमीच जादुई कामगिरी करतात. तुमच्या आधाराच्या शब्दांनी त्या महिलेला नक्कीच बरं वाटेल.

२. मदतीची हाक :

 

 

तुम्ही स्वतः काही करू शकत नसाल, तरी एक महत्त्वाची गोष्ट करू शकता आणि ती म्हणजे मदतीसाठी कोणालातरी बोलावणे. छेडछाडीचा प्रसंग तुमच्या डोळ्यांसमोर घडत असेल, तर तात्काळ पोलिसांना फोन करा किंवा आजूबाजूच्या कोणालातरी मदतीसाठी बोलवा.

३. रेकॉर्ड करा :

वर सांगितल्याप्रमाणे, तुम्ही त्या गोष्टीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता. पोलिसांना दाखवण्यासाठी हा एक महत्त्वाचा पुरावा असू शकतो. हे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ज्या महिलेची छेड काढली जात होती तिला विचारल्याशिवाय तो व्हिडीओ कुठेही पोस्ट करू नका.

४. थेट बोला :

तुमच्यासमोर कोणत्याही प्रकारचे लैगिक अत्याचार घडत असतील, तर ताबडतोब जाऊन ते थांबवा. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला त्यांचं वागणं चुकीचं आहे हे स्पष्टपणे सांगा, असे करताना कोणत्याही भांडणात अडकू नका. कारण शेवटी सुरक्षा महत्त्वाची असते.

समोरच्याकडे कोणती हत्यारं असतील किंवा त्यांची शारीरिक क्षमता नक्की किती आहे याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे या गोष्टी करताना योग्य विचार करा आणि मग बोला.

५. लक्ष हटवण्याचा प्रयत्न करा :

 

 

स्पष्ट बोलायचं नसेल, तर हा सगळ्यात सोप्पा मार्ग आहे. एखाद्या महिलेची छेड काढली जात आहे हे लक्षात आल्यानंतर त्या परिस्थितीत हस्तक्षेप करत त्या माणसाचे लक्ष विचलित करा. उदारणार्थ, मुद्दाम जाऊन त्याला एखाद्या ठिकाणचा पत्ता विचारा किंवा तिथे जवळ जाऊन नुसते उभे रहा.

तुमची लहानशी मदत सुद्धा समोरच्यासाठी खूप मोलाची असते. आपल्याही नकळत आपण समोरच्या व्यक्तीला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो.

मध्यन्तरी आलेल्या “मी टू” चळवळीने लैगिंक अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. स्त्रियांना अनेक वर्षांपासून देण्यात आलेली दुय्यमी वागणूक आणि ‘स्त्री हे शरीरसुखाचं साधन आहे’ अशा बुरसटलेल्या विचारसरणीत लैगिंक अत्याचाराची पाळंमुळं आहेत. काही सेकंदांची ही भयावह घटना स्त्रीच्या मनावर दूरगामी परिणाम करते.

 

 

आपल्याकडे “कोर्टाची पायरी कधी चढू नये” असं म्हणतात. या सगळ्या भीतीमुळे स्त्रिया अनेकदा गोष्टी सोडून देतात आणि याविषयी तक्रार करणेही टाळतात. या सगळ्याव्यतिरिक्त आपण स्वतः काय करू शकतो याचा विचार कधीच केला जात नाही.

वाईट प्रवृत्तीला खतपाणी न घालता त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. तुमच्याकडेही असे काही उपाय असतील ज्याने आपण सार्वजनिक ठिकाणी होणारे स्त्रियांचे अत्याचार थांबवू शकतो, तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version