भारतात सट्टा, जुगार कायदेशीर करणे मूर्खपणाचे…वाचा त्यामागचे तर्कशुद्ध उत्तर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : स्वप्नील श्रोत्री
===
“देशातील तरुण हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या हातात विधायक गोष्टीच पडणे गरजेचे आहे. उच्चशिक्षण, चांगला रोजगार, चांगले आणि आरोग्यपूर्ण राहणीमान हे सुदृढ आणि विकसित देश बनवण्यासाठी आवश्यक आहे.”
कोरोना महामारीमुळे गेल्या ६ महिन्यात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली.अनेक उद्योगधंदे बंद पडले. परिणामी रोजगार गेला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर इतरही सर्वत्र होती.
जगातील अनेक देश कोरोनामुळे गलितगात्र झाले. पुढे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर विविध देशांच्या सरकारांनी विविध योजना सुरू करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न केले.
भारतातही अशाच प्रकारचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरु असून विविध उद्योग समूह, अर्थशास्त्राचे अभ्यासक, लोकप्रतिनिधी यांनी भारत सरकारला अनेक योजना आणि उपाय सांगून कशाप्रकारे भारताची अर्थव्यवस्था कशाप्रकारे रुळावर आणता येईल यासाठी आपल्या सूचना केल्या.
परंतु, केंद्राकडे आलेल्या ह्या सूचनांविषयी माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी भारतात सट्टा आणि जुगार कायदेशीर करण्याचा केंद्राचा विचार असल्याचे सांगून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.
मागणी जूनीच!
भारतात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समाजातील विविध घटकांकडून सट्टा आणि जुगाराला देशात कायदेशीर मान्यता देण्याची मागणी होत आहे.
केंद्र सरकारला कायदेविषयक मार्गदर्शन करणारी संस्था ‘लॉक कमिशन ऑफ इंडिया’ अर्थात केंद्रीय विधी आयोगाने स. न २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनामध्ये सट्टा आणि जुगाराला देशात कायदेशीर करण्याचा विचार आपल्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट करून आपल्या संकेतस्थळाद्वारे भारतीय जनतेची मते मागवली होती.
पुढे जनतेने काय आणि कशाप्रकारे प्रतिसाद दिला, कशा प्रकारच्या सूचना आयोगाला मिळाल्या ह्याची माहिती उपलब्ध झाले नसली तरी ही सट्टा आणि जुगाराला कायदेशीर रूप देण्याच्या बाबतीत देशातील अनेक संस्था गंभीर असल्याचे दिसून येते.
हास्यास्पद तर्क अधिक :
सट्टा आणि जुगाराचे समर्थन करणारे साधारणपणे खालील प्रकारचे तर्क देताना दिसतात.
१) सट्टा आणि जुगार देशात कायदेशीर केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
२) भारतात सट्टा आणि जुगारावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. आज भारतात ब्रिटिश राजवट नाही आणि ब्रिटनमध्ये सुद्धा सट्टा आणि जुगाराला कायदेशीर मान्यता आहे. मग भारतात का नको?
३) गोवा, दमण व देशाच्या इतर अनेक भागात अनेक ठिकाणी कॅसिनो चालतात. देशाच्या अनेक भागात घोड्यांच्या शर्यतींना मान्यता आहे मग सट्टा आणि जुगाराला का नको?
थोडक्यात, सट्टा आणि जुगाराचे समर्थन करणारे लोक वरील तर्क देवून आपली मागणी कशी योग्य हे दाखविण्याचा प्रयत्न करतात.
भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होण्याची शक्यता अधिक :
जगातील काही प्राचीन संस्कृतींपैकी भारतीय संस्कृती ही एक आहे. अगदी मौर्य काळापासून परदेशी आक्रमकांना, विद्वानांना आणि प्रवाशांना भारतीय संस्कृतीने आकर्षित केले आहे. त्यातील काही काही भारतात आले आणि भारतीय बनून राहिले. तर काहीजण परत आपल्या देशात गेले.
परंतु, परत जाताना भारतीय संस्कृती आणि परंपरा आपल्या सोबत घेवून गेले त्यात विविध परदेशी विद्वान, बौद्ध भिक्खू आणि परकीय प्रवासी यांची नावे घेता येतील.
चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्या दरबारात ग्रीक राजा सेल्यूलर निकेटरचा राज्य प्रतिनिधी म्हणून असलेल्या मॅगस्थेनीज याने आपल्या ‘इंडिका’ या ग्रंथात भारतीय जीवनशैलीचे मोठे रसभरीत वर्णन केले आहे केले आहे.
ह्या शिवाय बौद्ध भिक्खू फहियान, चीनी प्रवासी युआन श्वांग ह्यांनी आपल्या देशात जावून भारतीय संस्कृतीचे कौतूकच केले आहे. भारतीय संस्कृती ही ज्ञान विज्ञान, प्रेम आणि चारित्र्यशीलतेचे प्रतिक आहे. आजही जागतिक राजकारणात भारताची हीच ओळख आहे.
लोकशाहीत सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. (भारतीय संविधानाचे भाग ३ मधील कलम १९ अन्वये) मग ते सट्टा आणि जुगार कायदेशीर करण्याच्या मागणीसंदर्भात असेल किंवा इतर कोणत्या कारणांसाठी असो.
परंतु, देशाच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी किंवा देशाच्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये बसलेल्या लोकांनी सट्टा आणि जुगाराच्या बाजूने आपले मत व्यक्त करणे जास्त गंभीर आहे.
अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न आवश्यक :
कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही एका रात्रीत भक्कम होत नसते. त्यासाठी नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांची गरज असते. आजही थेट परदेशी गुंतवणूक (एफ. डी. आय) भारतात सहजासहजी येण्यास तयार नसते.
विविध प्रकारचे कायदे, शेकडो नियम आणि लाल फितीचा कारभार यांमुळे भारतात उद्योगधंदे उभारणे परदेशी उद्योजकांना अवघड जाते. पर्यटन आणि कृषी क्षेत्राची परिस्थिती ह्यापेक्षा वेगळी नाही.
आज आपण चीन, अमेरिका व युरोपीय देशांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आजही भारतीय बनावटीची एकही वस्तू जागतिक बाजारपेठ पहावयास मिळत नाही.
देशात दरवर्षी लाखो पदवीधर विद्यापीठातून बाहेर पडत आहेत. त्यांना रोजगार नाही. त्यांच्या हातात काम देण्याचे सोडून पत्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे का?
ज्या ब्रिटनचे उदाहरण आज सट्टा आणि जुगाराचे समर्थक देतात, त्या ब्रिटनची एक संपूर्ण पिढी सट्टा आणि जुगारापायी वाया गेली आहे.
भारतासारख्या देशात जेथे तरुणांची संख्या मोठी आहे तेथे हा धोका खरचं परवडण्यासारखा आहे काय ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.
अपयश झाकण्यासाठी कायदेशीर करणे कितपत योग्य :
भारतात ब्रिटिश काळापासून सट्टा आणि जुगार बेकायदेशीर आहे तरी आजही अनेक ठिकाणी सर्रासपणे सट्टा व जुगार खेळला जातो. कायद्याचा धाक असल्यामुळे खेळण्याचे प्रमाण मर्यादित असले तरीही ते पूर्णपणे थांबलेली नाही.
एखादी गोष्ट कायद्याने बंदी घालून सुद्धा जर थांबवता येत नसेल तर त्याला कायदेशीर रूप देणे कितपत योग्य आहे?
ह्याशिवाय अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे कायद्यात कडक शिक्षेची तरतूद असूनसुद्धा देशात थांबलेले नाहीत मग ते सुद्धा ह्याच न्यायाने कायदेशीर केले जाणार का?
ह्याचा विचार सुद्धा होणे गरजेचे आहे. देशातील तरुण हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या हातात विधायक गोष्टीच पडणे गरजेचे आहे.
उच्चशिक्षण, चांगला रोजगार, चांगले आणि आरोग्यपूर्ण राहणीमान हे सुदृढ आणि विकसित देश बनवण्यासाठी आवश्यक आहे. नाही की सट्टा आणि जुगार.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.