' कोकणातील तरुणाने लॉकडाऊनमध्ये “असे विकले” ४० लाखांचे आंबे … – InMarathi

कोकणातील तरुणाने लॉकडाऊनमध्ये “असे विकले” ४० लाखांचे आंबे …

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

लेखक : व्यंकटेश कल्याणकर

===

सकाळी नऊ वाजता रस्त्याने ऑफिसला जाणे आणि त्याच रस्त्याने सायंकाळी सहा वाजता पुन्हा घरी येणे ही आयुष्यातील सर्वांत धोकादायक गोष्ट आहे, असे एका कवीने म्हटले आहे. अर्थात स्वतःकडे प्रचंड क्षमता असतानाही नऊ ते सहा नोकरी करणे म्हणजे स्वतःची प्रगती रोखण्यासारखे आहे, असा याचा आशय यातून घेता येतो. त्यामुळेच थोडासा धोका पत्करून जर स्वतःचा व्यवसाय केला तर केव्हाही चांगले. अनेकजण नोकरी करताना  व्यवसाय उभारण्याचे स्वप्न बघतात. तर काही जण नोकरीचा मार्ग न पत्करता थेट व्यवसायात उतरतात. अशा मंडळींना थोड्या बहुत काळानंतर यश मिळते. पण यश मिळतेच.

या वर्षी आलेल्या कोरोनाने जगाची आर्थिक गणिते बिघडली. परिणामी  नोकरी व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा मोठा फटका बसला. आता हळू हळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे. मात्र कोरोनाकाळातही अनेकांनी नियोजनबद्ध पद्धतीने व्यवसाय सुरु ठेवला. त्याला गती दिली. पदवी मिळवल्यानंतर नोकरीच्या मागे न लागत व्यवसाय स्वीकारून कोरोना काळातही व्यवसाय वाढविणाऱ्या अशाच एका कोकणातील तरुणाची एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.

कोकणातील माणसांना मुंबईचे भलते आकर्षण असते. प्रत्येक घरातील किमान १-२ व्यक्ती मुंबईत असतातच. मुंबईत अगदी शिपाई, किराणा दुकानात नोकराचे काम, सुरक्षा रक्षकाचे काम, मॉलमध्ये काम, घरकाम अशा कोणत्याही कामाला कोकणातील तरुण-तरुणी लाजत नाहीत. विशेष म्हणजे मुंबईत काहीही केले तरी त्याचं गावात कौतुक होतं.

मात्र, या सर्व प्रकारापासून दूर राहत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रायपाटण या छोट्याशा गावातील महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई या तरुणाने पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा निर्णय घेतला. सोबत देशी गाय खरेदी-विक्री, परिसरातील आंबा-काजू बागांचे संपूर्ण व्यवस्थापन इत्यादी जोड व्यवसाय सुरु केले.

कोकणातील आंबा, काजू, तांदूळ या प्रमुख पिकांच्या विक्रीसह प्रक्रिया केलेली उत्पादने जसे कि फणस गरे, आंबा पोळी, मँगो पल्प, आंबा मावा इत्यादी पदार्थांची विक्रीही सुरु केली. यातून गावातील तरुण-महिलांना रोजगारही मिळवून दिला.  अल्पावधीतच व्यवसाय वाढला आणि वार्षिक उलाढाल काही लाखात पोचली.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मार्च-एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःचा आणि स्वत: व्यवस्थापित करत असलेल्या बागेतील आंबे तयार झाले. पण नेमके त्या काळात भारतात कोरोनाचे प्रमाण वाढले आणि संपूर्ण देश लॉकडाऊन झाला.  जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थाना रीतसर परवानगी घेऊन विक्री करता येत होती. मात्र तरीही किरकोळ किंवा होलसेल खरेदीदार सोडा आंबे विक्रेतेही चिंतेत पडले होते. कारण बाजारात जाण्यास वाहने सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नव्हती.

अशा सर्व परिस्थितीत परिसरातील काही छोटे-मोठे शेतकरी त्यांच्याकडील कमी अधिक प्रमाणात असलेले आंबे महेशने घ्यावेत म्हणून विनंती करु लागले. एरवी कुरिअर, एसटी पार्सल या पद्धतीने आंबे पोहोच केले जात होते. पण यावर्षी सर्व बंद असल्याने सगळे काही ठप्प झाले.

स्वतःकडील आणि इतरांचे असे मोठ्या प्रमाणात आंबे विकण्याचे आव्हान महेशसमोर होते. मग त्याने आवश्यक परवाने, वाहन व्यवस्था यांची सर्व माहिती घेतली. गणिते मांडली. पुरेसा पाठपुरावा केल्यानंतर परवानेही मिळत होते. स्वतंत्र वाहन आणि चालकही सुरक्षिततेचे सर्व नियम पळून उपलब्ध होत होते. त्यासाठी चालक नाना खानविलकर, संतोष कुवसेकर, रामदास गांगण, नियोजनबद्ध मदत व माहिती देणारे मनोज गांगण हे सर्व मित्रमंडळी, गावकरी सहकाऱ्यासाठी धावून आले. याशिवाय व्यवसायानिमित्त महाराष्ट्रभर पसरलेला महेश यांचा पूर्वीचा ग्राहकवर्ग, मित्रपरिवारही मदतीस धावून आला. त्यामध्ये बाप्पा उमराणीकर (अक्कलकोट), मंदार भारदे (औरंगाबाद), भाऊ चासकर (अकोले) मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी वर्गाचीही मोलाची मदत झाली.

आता मुख्य प्रश्न होता ग्राहक कसे मिळणार? यावर महेश आणि त्यांचे मोठे बंधू गजानन पळसुलेदेसाई यांनी विचारविनिमय केला. शेवटी त्यांनी डिजिटल मार्केटिंग वापर करता येतो का यासाठी पुण्यातील एका मीडिया एजन्सीला संपर्क केला. एजन्सीच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी नियोजन सुरु केले. सर्वांत प्रथम त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे काम करणारे गावातील कर्मचारी, चालक, वाहन आणि पॅकिंगच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले.  प्रशासकीय परवाने काढले. वाहन बुक केले. आणि नंतर डिजिटल जाहिरात सुरु केली.

असे ठरवले जाहिरात धोरण

एजन्सीच्या सल्ल्यानुसार सर्वांत परवडणारे माध्यम म्हणून फेसबुक आणि इंस्टाग्रामचा डिजिटल जाहिरातीसाठी वापर करण्याचे महेशने ठरवले. शिवाय किरकोळपेक्षा होलसेल विक्रीला प्राधान्य देण्यात आले. त्यातही स्वतंत्र वाहन, त्याची स्वच्छता आणि इतर कारणांमुळे वाहतूक खर्च किंचित वाढणार होता. त्यामुळे किमान १०० पेट्यांची (४०० डझन) ऑर्डर असेल तरच गाडीने आंबा पोहचवणे परवडणारे होते.

अशी केली डिजिटल मार्केटिंग

बाजारातील सर्व व्यवहार ठप्प असल्याने लोक पैसे जपून खर्चत होते. त्यामुळे एकदम  होलसेल विक्रेते एकदम १०० पेटी खरेदी करतील का याबद्दल साशंकता होती. त्यामुळे एजन्सीच्या सल्ल्याने रत्नागिरीपासून कोठपर्यंत वाहन न्यायाचे हे ठरले. सुरुवातील शेवटचा टप्पा फक्त पुणेपर्यंत ठेवला. मग होलसेल किमान ऑर्डर २० पेटी केली आणि रत्नागिरी ते पुणे मार्गावर येणाऱ्या शहरामध्ये दाखविण्यासाठी जाहिरात तयार करण्यात आली. योग्य आणि मराठी मजकूर, नेमकी पण संक्षिप्त माहिती आणि योग्य टार्गेट ऑडियन्स सिलेक्शन या बाबींचा प्रामुख्याने विचार केला गेला. त्यासाठी फेसबुकवरील टार्गेट ऑडियन्स सिलेक्शन टूलचा प्रभावी वापर केला गेला.

पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः लॉकडाऊनमध्ये ज्यांचे व्यवसाय संपूर्ण ठप्प होते अशांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. त्यांना महेशने व्यवस्थित प्रशिक्षण आणि माहिती देऊन ऑर्डर स्वीकारली. बघता बघता ठरल्याप्रमाणे गाडी ज्या मार्गाने जाणार होती त्याच मार्गावरील पहिली गाडी भरेल आणि सोडणे परवडेल एवढी ऑर्डर मिळाली.

अशा पद्धतीने मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद या सर्व शहरात आंबे विकण्यात आले. पहिल्यांदा ज्यांनी ऑर्डर दिली होती ते पुन्हा पुन्हा ऑर्डर देऊ लागले.  शेवटी शेवटी तर काही होलसेल खरेदीदार वेटिंगवर  थांबले. एकाच दिवशी २ – ३ गाड्या वेगवेगळ्या मार्गावर सोडण्यात आल्या.  अशा प्रकारे अवघ्या ४० दिवसात महेश यांनी स्वतःकडील आणि परिसरातील शेतकऱ्यांकडील मिळून ४० लाखाचे आंबे विकले गेले.

हे सर्व करताना महेशला प्रचंड आव्हानांना आणि अडचणींना सामोरे जावे लागले. काहींनी लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन आंब्यांबद्दल खोटी तक्रार करून आंबे पुन्हा मागवले. तर या क्षेत्रात नव्याने आलेल्यांनाही आंब्याची माहिती तसेच ग्राहकांना कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण देण्यात खूप वेळ खर्च झाला.

याबाबत खास इनमराठीशी बोलताना महेश पळसुलेदेसाई  याबाबत बोलताना महेश पळसुलेदेसाई म्हणाले, ”डिजिटल माध्यमांचा आम्ही सर्वतोपरी योग्य वापर केला. ती योग्य वेळेत अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोहचवली आणि व्यवसाय वाढवला. त्यामुळे आम्ही यंदा ४० लाखाचा व्यवसाय  करू शकलो.”

व्यवसाय असो अथवा आपले आयुष्य बदलत्या काळानुसार वेळीच अपडेट झालो कि आपली प्रगती कोणीही रोखू शकत नाही हेच या उदाहरणातून नव्याने सिद्ध झाले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?