आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
एका अरण्यात एक गुरुकुल होतं. तेथील गुरूंकडे अनेक शिष्य शिक्षण घेत होते. एकाग्रता, अभ्यास, चिंतन, मनन, अभ्यास या गोष्टींबरोबरच गुरुजी व्यावहारिक शिक्षण देत असत. वागावं कसं, बोलावं कसं, जगावं कसं हे सुद्धा गुरुजी सविस्तरपणे सांगत होते. त्यासाठी अनेकदा गुरुजी शिष्यांची परीक्षा घेत. त्यामुळेच गुरुजींकडे अनेक शिष्य मोठ्या पदावर अगदी काही शिष्य काही राज्यात मंत्रीपदे भूषवित होते. काही योद्धे वगैरे झाले होते. अशा प्रकारे हे गुरुकुल आदर्श आणि सुप्रसिद्ध होते.
एकदा गुरुजींनी सर्व शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. गुरुजींनी निवडक शिष्यांना बोलावले. उद्या पहाटे आपल्याला जवळच्या अरण्यात फक्त दोन तासांचा यज्ञ करायचा आहे, त्यासाठी जायचे आहे. पहाटे सर्वानी लवकर निघावे, अशी गुरुजींना आज्ञा केली.
ठरल्याप्रमाणे निवडक शिष्य सकाळी तयार झाले. गुरुजीही आले. गुरुजींना प्रत्येकाला एक लांब, मोठी आणि जाड फळी दिली. स्वतःही एक मोठी फळी घेऊन निघाले. ही फळी आपल्याला यज्ञासाठी वापरायची आहे, प्रत्येकाने आपली फळी घेऊन माझ्यासोबत या. सर्व शिष्य मोठ्या उत्साहाने गुरुजींसोबत निघाले. काही वेळ अरण्याच्या दिशेने चालले.
काहींना सोबत असलेल्या फळीचे ओझे होऊ लागले. शिष्य कुजबुज करू लागले, फक्त दोन तासांचा यज्ञ आणि एवढ्या फळ्या कशाला लागणार. फार फार तर या प्रत्येक फळीतील एखादा छोटासा तुकडा यज्ञात आहुती म्हणून वापरला जाईल, मग या फळ्या एवढ्या दूर का घेऊन जायच्या? मग काही शिष्यांनी फळ्या हळूहळू तोडायला सुरु केल्या. गुरुजी सर्वात पुढे होते. त्यांना मागे काय सुरु आहे ते समजत नव्हते.
तब्बल एक तासाच्या दीर्घ पायी प्रवासानंतर सर्व जण एका ठिकाणी पोचले. जंगल संपून मोठे डोंगर सुरु झाले. आणखी काही अंतर पुढे गेल्यावर डोंगर संपले. तोपर्यंत फक्त दोन शिष्यांनीच गुरुजींच्या आज्ञेचे पालन केले होते. त्यांच्याकडे असलेल्या फळ्या अखंड होत्या. इतर सर्व शिष्यांनी ओझे झाले म्हणून फळ्या एका कोपऱ्यातून थोड्या थोड्या कापल्या होत्या.
गुरुजींनी सर्वांना थांबवले. समोर एक डोंगर संपलेला होता. दुसरा सुरु झालेला होता. मात्र मध्ये खोल आणि खूप मोठी दरी होती. एका डोंगरातून दरी पार करून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी गुरुजींनी स्वतःकडे असलेली फळी दोन्ही डोंगरावर आडवी केली. त्यावरून ते पुढे दुसऱ्या डोंगरावर गेले. आणि तिकडून शिष्यांना म्हणाले, ‘ज्यांच्याकडे अखंड आणि पहाटे निघताना फळी जशीच्या तशी आहे त्यांनीच ती वापरून या डोंगरावर या.’
फक्त दोन शिष्य दुसऱ्या डोंगरावर आले. मग गुरुजी पुन्हा मागे आले. ज्यांनी ज्यांनी फळी कापली होती, त्यांना त्यांना उद्देशून म्हणाले, ”खरे तर आज यज्ञ वगैरे काहीही नाही. मात्र तुम्हाला कृतिशील संदेश देता यावा म्हणून मी आज तुम्हा सर्वांची परीक्षा घेतली यातून तुम्हाला तीन बोध मिळाले –
१) ज्यावेळी आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठी माणसं काही सांगतात त्यावेळी त्यामागे काहीतरी अर्थ असतो. तुम्ही तुमच्या बुद्धीने जो विचार करता तोच अर्थ नेहमी असेल असे नाही. त्यापलीकडेही काही अर्थ असू शकतो. जसे तुम्ही या फळ्या फक्त यज्ञात वापरण्यासाठीच असतील असे गृहीत ठरले.
२) दुसरे जोपर्यंत फळी अखंड होती तो पर्यंत तिचा वेगवेगळ्या कामासाठी पूर्ण वापर करता येत होता, जेव्हा तिचे तुकडे झाले त्यावेळी तिचा वापर विशेष कारणासाठीच करता येऊ लागला. त्यामुळे आयुष्यात नेहमी मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याशी मिळून मिसळून राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक गोष्टी सध्या करता येतील.
३) तुम्हा सर्वाना पलीकडील डोंगरावर घेऊन जाण्यासाठी एक फळी पुरेशी होती. मात्र एकालाच फळी घेऊन येण्याचे कष्ट पडले असते. प्रत्यक्ष आयुष्यातील कष्ट असे वाटून घेता येत नाहीत. प्रत्येकाला कष्ट करावे लागलात आणि ते कधीना काही उपयोगी पडतातच.”
एक लाकडाची फळी तुम्हाला एवढा मोठा संदेश देऊन गेली बघा.
एवढे बोलून गुरुजी थांबले.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.