Site icon InMarathi

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स रवी शास्त्री, भारतीय क्रिकेटमधील पहिला ग्लॅमर बॉय…

ravi-shastri-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखक – ईशान घमंडे 

===

आज भारतीय क्रिकेट संघासोबत एक नाव अविभाज्यपणे जोडलेलं असतं, ते म्हणजे संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री! तसं बघायला गेलं तर, रवी शास्त्री हे नाव क्रिकेटमधील ग्लॅमरपासून ते वादविवादांपर्यंत सगळीकडेच जोडलं गेलेलं असतं.

 

 

शास्त्रीजींची प्रशिक्षकपदी निवड होण्याआधी गांगुली आणि रवीचं सुरु असलेलं कोल्ड वॉर सुद्धा जगजाहीर झालं होतंच की…

पण, या सगळ्या गोष्टी काही काळ बाजूला ठेवूयात. कारण इतर सगळ्या गोष्टी खऱ्या जरी असल्या, तरी एक गोष्ट नाकारून चालणार नाही, आणि ती म्हणजे भारतीय क्रिकेटविश्वाला ‘ग्लॅमर’ म्हणजे काय हे शिकवायचं काम या माणसाने केलं आहे.

सचिनला फेरारी भेट म्हणून मिळाली, तो काळ आठवतोय का? २००२ मध्ये घडलेली घटना आहे ही; आणि तरी देखील त्या फेरारीची तुफान चर्चा रंगली होती. २१व्या शतकात सुद्धा एका ‘इंपोर्टेड गाडीची’ इतकी चर्चा झाली, मग ‘त्या’ काळात १९८५ मध्ये रवी शास्त्री यांनी थेट ऑडी ‘कमावली’ होती!

 

 

१९८३ साली भारतीय संघ विश्वविजेता बनला. त्यावेळी एक सामना खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला सरसकट १५०० रुपये देण्यात येत असत. (आताचे खेळाडू वेगवेगळ्या श्रेणीत असतात, तसं त्यावेळी नव्हतं) तसंच प्रतिदिन २०० रुपयांचा भत्ता मिळत असे. त्याकाळात, रवी शास्त्रीने भेट म्हणून ऑडी मिळवली होती. ज्यावेळी त्याचं वय होतं, अवघं २३ वर्षांचं!

मग आता तुम्हीच सांगा, रवी शास्त्रीने तरुणपणापासूनच भारतीय क्रिकेट विश्वात ग्लॅमर आणायला सुरुवात केली होती की नाही…

बरं ही भेट त्याला अशीच मिळाली का? तर याचं उत्तर नाही असं आहे. त्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत त्याने, ५ सामन्यात फलंदाजीत १८२ धावा वसूल केल्या आणि गोलंदाजी करताना ८ जणांना तंबूत धाडलं. या त्याच्या चमकदार कामगिरीमुळेच, त्याला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरवण्यात आलं. थोडक्यात काय, तर तरुण असतानाच तो खऱ्या अर्थाने भारतातील सर्वोत्तम चॅम्पियन ठरला  होता.

 

 

तसं पाहायला गेलं तर तो त्याच्या कामगिरीतून चॅम्पियन असणं नेहमीच सिद्ध करायचा, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण, सुरुवातीला १० व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणारा रवी, कधी संघातील महत्त्वाचा अष्टपैलू होऊन गेला, हे कुणालाही कळलं नाही.

‘मी या सामन्यात गोलंदाजी करणार नाही, मला फक्त फलंदाज म्हणून खेळवा’ असं कप्तानाला सांगण्याची हिंमत सगळ्यांकडे नसते मंडळी… ती रवी शास्त्रीकडे होती.

त्याच्या फलंदाजीची कमालच वेगळी होती. असं म्हटलं जायचं की रवी शास्त्रीची फलंदाजी फक्त दोनच गियर्समध्ये चालायची. पहिल्या गियरनंतर तो थेट तिसऱ्या गियरमध्ये शिफ्ट व्हायचा.

म्हणजे रवी शास्त्री हा फलंदाज एक तर अत्यंत धीम्या गतीने फलंदाजी करून गोलंदाजाला हैराण करत असे, किंवा एकदा मूडमध्ये आला की झकासपैकी पुढे चालत येत थेट गोलंदाजीवर हल्ला चढवत असे. फलंदाजीतील वेग हळूहळू वाढवणं जणू त्याला मान्यच नव्हतं.

संघातील आपलं स्थान आणि पत भक्कम ठेवण्याइतकी उत्तम कामगिरी तो करत होता. त्याचे आकडे पहिले की ते लक्षात येतंच.

देव एका हाताने देतो, तेव्हा दुसऱ्या बाजूने काढून सुद्धा घेतो हे किती खरं आहे, हे रवी शास्त्रींच्या उदाहरणावरून नक्कीच सांगता येईल. भारताच्या या चॅम्पियनला, ऐन उमेदीच्या काळात तिशीत असतानाच त्याला निवृत्ती घ्यावी लागेल, असा विचार त्याने ऑडी १०० घरी आणली तेव्हा कुणीही केला नसेल. पण, त्याला त्याच्या दुखऱ्या गुडघ्याने घरी बसवलं.

 

 

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा नव्याने बदलू पाहणारा सचिन नावाचा नवा सितारा खऱ्या अर्थाने चमकू लागला होता, त्याकाळात रवी मात्र बॅट म्यान करून बसला होता. तसं झालं नसतं तर, न जाणो कदाचित सचिन आणि रवीची जोडी भारतासाठी सलामीला येत असलेली पाहायला मिळाली असती. अर्थात या झाल्या जर-तरच्या गोष्टी…

पण, सूर्यास्त झाल्यानंतर, पुन्हा सूर्योदय होतोच. १८ महिन्यात गोलंदाजाचा फलंदाज झालेला आणि आपल्या बिनधास्त शैलीत क्रिकेट ‘जगणारा’ माणूस क्रिकेटपासून दूर कसा राहू शकेल! शास्त्रींचा खऱ्या अर्थाने पुन्हा सूर्योदय झाला, तो क्रिकेट समालोचक म्हणून.

 

 

त्याच्या उत्तम फलंदाजीची आणि डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीची जादू जशी प्रेक्षक पाहत होते, तशीच त्याच्या बोलंदाजीची जादू ऐकण्यात सुद्धा अनेकांना स्वारस्य होतं.

हे ही वाचा –

===

 

१९९५ साली त्याने हे नवं करिअर सुरु केलं आणि पुन्हा एकदा क्रिकेटमधला चॅम्पियन म्हणून नावारूपाला येऊ लागला. मगाशी म्हणालो त्याच्या बरोबर विरुद्ध म्हणायचं झालं तर, देव एका हाताने काढून घेतो, तेव्हा दुसऱ्या हाताने पुन्हा देण्याची दानत सुद्धा ठेवतोच. ते घेण्यासाठी आपली झोळी मजबूत हवी.

आठवा ना तुम्हीच, ते दोन्ही सुवर्णक्षण…

In the air… Sreshanth takes it…
आणि
India lift the World Cup…  after 28 years!!!!

आठवतोय ना तो आवाज… २००७ साली पहिल्यांदा टी-२० विश्वचषक आयोजित केला गेला, तो भारताने जिंकला, २०११ साली पहिल्यांदाच ‘स्पर्धेच्या यजमानाने’ विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला तोदेखील भारतानेच!

या दोन्ही ऐतिहासिक क्षणांच्या वेळी हातात माईक घेऊन अवघ्या जगाला ती गोष्ट अभिमानाने सांगण्याचा मान शास्त्रीजींच्या पदरात पडला.

पुढे २००८ साली आयपीएल ही ‘ग्लॅमरस’ स्पर्धा सुरु झाली. ज्याने पंचविशीच्या आतच त्याच्या ग्लॅमरच्या तेजाने क्रिकेटविश्व दिपवून टाकलं होतं, तो या ग्लॅमरस स्पर्धेचा भाग झाला नसता तरच नवल!

 

 

कालांतराने हा प्रवास सुद्धा बदलला आणि मग २०१४ साली तो भारतीय संघाचा डायरेक्टर झाला. पुढे २०१७ साली मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने भारतीय संघाची कमान हाती घेतली. दरम्यानच्या काळात यश-अपयशाच्या अनेक गोष्टी त्याने अनुभवल्या आहेतच. मध्यंतरी कुंबळेच्या हाती संघाचा डोलारा सुपूर्द केला गेला, तेव्हा पुन्हा एकदा रवी संघापासून दूर होता.

पण, आता प्रशिक्षकपदाच्या सेकंड इंनिंगमध्ये त्याची आणि विराटची जोडी चांगलीच जमलेली दिसतेय. काही खेळाडूंवर अन्याय घडताना सुद्धा पाहायला मिळतंय. पण, आयुष्य आणि क्रिकेट म्हटलं की मानापमान आणि राजकारण आलंच.

गांगुलीने त्याची ‘दादा’गिरी केली नसती, तर कदाचित त्याकाळात भारतीय संघ घडला नसता.

त्यामुळे या इतर बाबी तूर्तास बाजूला ठेऊया. तर, प्रशिक्षक म्हणून २०२१ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत रवीची कारकीर्द निश्चित आहे. त्यामुळे, भारतीय संघ ‘विराट’ कामगिरी करेल आणि विजयाचा ‘रवी’ पाहायला मिळेल अशी आशा करूया.

 

 

म्हणजे मग, India lift the World Cup, after 14 years असं म्हणत, कुणीतरी आनंद व्यक्त करू शकेल आणि आपण हे वाक्य ऐकल्यावर भाडिपाचा एक फेमस डायलॉग थोडा ट्विस्ट करून म्हणू “शास्त्री असतं ते”…

 

हे ही वाचा –

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version