' मुतखड्यावर “रामबाण उपाय” म्हणून बिअर पिण्याआधी हे वाचा, नीट समजून घ्या! – InMarathi

मुतखड्यावर “रामबाण उपाय” म्हणून बिअर पिण्याआधी हे वाचा, नीट समजून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सल्ला देणं आणि सगळ्यात अवघड गोष्ट तो अंमलात आणणं.‌ कारण खूपदा सल्ला देणारा माणूस त्या परिस्थितीतून गेलेला नसतो किंवा त्याची अंमलबजावणी त्याला त्याच्या दृष्टीने सोपी वाटत असते.

अशा लोकांना सल्लेबहाद्दूर म्हणतात. कारण त्यामुळे त्यांचं नफा नुकसान काहीही होत नसतं. झाला तर ऐकणाऱ्या माणसाचा फायदा होतो किंवा नुकसान झालं तरी तो सल्ला घेतलेल्या माणसाचं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असाच एक सल्लेबहाद्दूराचा सल्ला म्हणजे किडनी स्टोन झाला, की भरपूर बिअर प्यावी. त्यानं काय फायदा आणि काय नुकसान हे त्याला कुठं माहीत असतं? पीनेवालों को पीने का बहाना चाहीये! पण तो बहाना काय करु शकतो हे दाखवण्यासाठी यासाठीच आजचा हा लेख.

 

beer inmarathi 1

 

माणसाचं शरीर हे मशीनसारखं आहे. त्याची नीट देखभाल केली नाही तर ते वारंवार बिघडू शकतं. काळजी घेतली नाही तर मशीन जसं गंजून जातं, तसं माणसाचं शरीर नाना रोगाचं आगर बनतं.

माणसाचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे शरीराकडं फारसं लक्ष न देता वाटेल तसं खायचं प्यायचं.. व्यायाम केला तर केला..नाहीतर नाही. आणि जोवर एखादा फटका बसत नाही तोवर तसंच ओढत ढकलत न्यायचं.

 

fat boy indian inmarathi

 

 

कधीतरी एकदा तब्येत बिघडली, की मग आपल्याला जाणीव होते आपल्या शरीराला कसा अयोग्य आहार घातक आहे. कशी आपण त्याची निष्काळजीपणा करुन वाट लावली आहे. आपल्या निरोगी शरीराची आपल्याला किंमतच नसते.

एखादाच डाॅ. अभय बंग हृदयरोगाला साक्षात्कार मानून आपला आहार विहार बदलतो आणि आपल्यासारखे आणि काही लोक यावरुन धडा घेऊन शहाणे व्हावेत म्हणून पुस्तक लिहीतो. बाकी सारे तात्पुरते आरंभशूर होऊन काही चालू करतात नी मग मध्येच सोडून तरी देतात किंवा बंद तरी करतात.

बाकीचे सल्लेबहाद्दुरांचे सल्ले ऐकून काही बाही टाणेटुणे उपचार सुरू करतात, पण त्याचे परिणाम पुढे काय होणार याची कल्पनाच नसते त्यांना.

आता किडनी स्टोन म्हणजे मुतखडा होतो म्हणजे काय होतं ते आधी बघू. आपल्या शरीराचं काम म्हटलं तर साधं सोपं आहे. आपण जेवण करतो त्यातून मिळणारे उपयुक्त घटक शरीर पचनात घेतं नको असलेले घटक उत्सर्जित करतं. मल, मूत्र, घाम यांच्या स्वरुपात अनावश्यक घटक बाहेर फेकले जातात.

या उत्सर्जन प्रक्रियेत किडनी खूप महत्त्वाचं काम करते ते म्हणजे हे अनावश्यक घटक गाळून बाहेर पाठवायचे. जेव्हा हे घटक गाळायचं काम करते तेव्हा त्यातील अनावश्यक कॅल्शिअम, क्षार हे जर मूत्रमार्गात साठून राहीले तर त्याचा खडा तयार होतो‌ आणि असह्य दुखणे सुरू होते.

 

kidney pain

 

ओटीपोट, कंबर, ज्या बाजूला मुतखडा आहे त्या बाजूला पाठीत तीव्र कळा येतात. लघवीला जावे वाटते पण लघवी होत नाही. प्रचंड त्रास होतो. जंतूसंसर्ग होऊन थंडी वाजून ताप येतो. अगदी प्रसूती वेदना काय असतात हे या पोटदुखीने समजते इतक्या त्या वेदना तीव्र असतात.

काय काय आहेत मुतखडा होण्याची लक्षणं? 

१. मळमळ

२. उलट्या होणे.

३. क्वचित लघवीत रक्त येणे.

४. लघवीला दुर्गंधी येणे.

५. ओटीपोटात, कंबरेत पाठीमागे प्रचंड वेदना होणे.

६. लघवीला जळजळ होणे.

त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. लघवी अजिबात तटवून ठेवू नये. त्यामुळे किडनीवर खूप ताण येतो. पुढचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय शरीरात वरुन आलेले घटक गाळायला कशी सुरु करणार?

काहीजण सांगतात बिअर प्यावी.. पण तुम्हाला हे माहित आहे का.. शरीराला अनावश्यक घटक गाळायचं काम किडनी करते. अल्कोहोल हे पण शरीराला अनावश्यक घटक आहे. ते जर अतिप्रमाणात घेतलं, तर किडनीची शक्ती किती पुरेशी पडणार? मग त्या ताणामुळे किडनीचे काम मंदावते.

 

beer inmarathi

हे ही वाचा – मद्याचे परीक्षण करताना डोळ्यांवर पट्टी का बांधतात? : मानसशास्त्राचे रंजक उत्तर

 

रक्त शुद्ध करायचं काम कमी होऊ लागतं. पाण्याचं योग्य प्रमाण शरीरात राखायचं काम किडनीच करते, पण या बिअर पिण्याने तीही क्रिया मंदावते. परत आपल्या शरीरालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात.

पाण्याचं योग्य प्रमाण राखता आलं नाही, की डिहायड्रेशन होऊन शरीर कोरडे पडण्याची भीती.. याचंच पुढचं पाऊल मुतखडा होणं.

जास्त प्रमाणात बिअर घेतली तर त्यातून तुम्हाला कॅलरीज भरपूर प्रमाणात मिळतात.. आता आला वजनवाढ होण्याचा धोका. त्यानेही मुतखडा  होण्याची शक्यता वाढते.

बिअरमध्ये प्युरीन हा नायट्रोजनयुक्त घटक असतो. त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढते. यावर संशोधन केलं गेलं. १९ हजार लोकांचा आठ वर्षं सर्व्हे केला गेला. या मुतखडा झालेल्या प्रौढ लोकांनी कधीही बिअर घेतली नव्हती, पण काही लोक असे होते जे रोज बिअर घेत होते. त्यांना परत परत मुतखडा झाला होता. म्हणजेच बिअर घेणे हे मुतखड्याला पुन्हा आमंत्रण देण्यासारखे आहे.

कोणताही रोग होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घ्यावी हे जास्त चांगलं. मुतखडा होऊ नये यासाठी साधे सोपे उपाय म्हणजे: 

 

water-health-inmarathi05

 

१. भरपूर पाणी पिणे

२. लघवीला अडवू नये

३. भरपूर प्रमाणात कॅल्शियम असलेले‌ पदार्थ टाळावेत

तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी…इतकं सोपं असतं सारं…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?