आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“मल्टिप्लेक्स परत कधी सुरू होणार ?” हा प्रश्न मध्यंतरी बऱ्याचदा विचारला जात होता. कोरोना आला आणि लोकांचे करमणुकीचे हक्काचे साधनच घेऊन गेला. नोव्हेंबर मध्ये लोकांची प्रतीक्षा संपली आणि पुन्हा एकदा लोक आपल्या आवडीच्या मल्टिप्लेक्समध्ये कुटुंब, मित्रांसोबत जायला लागले.
सिंगल स्क्रीन हे सध्या प्रत्येक शहरात अगदी मोजकेच असल्याने लोकांना मल्टिप्लेक्स शिवाय सध्या तरी पर्याय नाहीये आणि एव्हाना लोकांना ते आता सोयीस्कर सुद्धा वाटायला लागलं आहे. घरीच बसून ऑनलाईन तिकिटं काढायची, बसायची जागा ठरवूनच तिकिटं बुक करायची. इंटरवल मध्ये मस्त गोल पॉपकॉर्नचा डब्बा घेऊन परत आपल्या जागेवर जाऊन बसायचं.
‘स्वच्छता’, ‘कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातील अदब’, ‘आसन व्यवस्था’, ‘वाट बघण्यासाठी असलेला एरिया’ यासारख्या गोष्टींनी लोक मल्टिप्लेक्सच्या प्रेमात पडले असं म्हणता येईल. ह्या सर्व बदलांची नांदी भारतात सुरवात केली ती PVR ग्रुपने.
भारतात सर्वात जास्त स्क्रीन असलेल्या ग्रुपची सुरुवात कशी झाली? ‘अजय बिजली’ या एका व्यक्तीने वयाच्या ४७ व्या वर्षी इतकं मोठं यश कसं मिळवलं असेल?
अजय बिजली यांचे वडील हे ‘अमृतसर ट्रान्सपोर्ट कंपनी’ चालवायचे. वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे १९८८ मध्ये अजय यांनी त्यांना जॉईन केलं.
दिल्ली मधून BA चं शिक्षण पूर्ण केलेल्या आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून ओनर मॅनेजमेंट प्रोग्रामचा कोर्स केलेल्या अजय यांना ट्रान्सपोर्टच्या बिजनेस मध्ये काम करताना हे लक्षात येत होतं, की हा व्यवसाय म्हणजे माझ्या आजोबांचा आणि वडिलांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. माझा नाही. पुढे काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्याने अजय त्या व्यवसायासाठी आपला वेळ देत होते.
१९९० मध्ये अजय यांचं लग्न झालं. स्वतःच्या करिअरचा ते विचार करू लागले. त्यांनी वडिलांशी याबाबत बोलायला सुरुवात केली. १९७८ मध्ये अजय यांच्या वडिलांनी ‘प्रिया सिनेमा’ नावाचं एक दिल्लीमधलं टॉकीज विकत घेतलं होतं.
‘चाणक्य’सारख्या मोठ्या थिएटर समोर तग धरणं प्रिया टॉकीजला अवघड चाललं होतं. वडिलांनी अजय यांना त्या व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगितलं. बस, तिथूनच त्यांच्या आणि सिनेमा बिजनेसच्या प्रेमकथेची सुरुवात झाली.
‘प्रिया सिनेमा’ मध्ये सर्वात पहिला बदल अजय यांनी केला तो म्हणजे इंग्रजी हॉलीवूड सिनेमा भारतात आणला. दिल्लीच्या प्रेक्षकांना इंग्रजी सिनेमाची आवड आहे हे त्यांनी योग्य हेरलं होतं. हॉलीवूडच्या काही स्टुडिओ सोबत त्यांची बोलणी सुरू झाली. त्या लोकांनी भारतात सिनेमा रिलीज करण्याससाठी एक अट ठेवली, की “थिएटर हे सर्व सोयी सुविधांनी अद्ययावत असलं पाहिजे.”
‘स्टर्लिंग थिएटर’ हे त्यावेळी हॉलीवूड सिनेमा प्रदर्शित करायचे. त्याची रचना बघून अजय यांनी ‘प्रिया सिनेमा’चं रूप पालटण्याचं ठरवलं. अजय यांनी प्रिया सिनेमा मध्ये डॉल्बी साउंड सिस्टीम लावली. यासोबतच, त्यांनी इंटेरिअर्सवर खूप काम केलं. एकच राखाडी रंग असलेल्या भिंतींवर त्यांनी गुलाबी रंगांचा कोटिंग करवून घेतलं. सर्व स्टाफला गणवेश दिला आणि नव्या रुपात प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले.
प्रिया सिनेमाला मिळणारा प्रतिसाद अर्थातच वाढला होता. आपल्याला मिळणाऱ्या सर्विसला प्राधान्य देऊन उजव्या बाजूच्या रेट कार्डकडे तितक्या बारकाईने न बघण्याच्या काळाची ती सुरुवात होती. भारत सरकारने सुद्धा त्यावेळी सिनेमाच्या तिकिटांवरील आपला वचक कमी केला होता.
एकीकडे व्यवसायात यश मिळत होतं, पण दुसरीकडे अजय यांच्या वडिलांची तब्येत आता खालवत चालली होती. १९९२ मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाची धुरा सुद्धा अजय यांना सांभाळावी लागली.
दिवसभर अजय बिजली हे अमृतसर ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करायचे आणि संध्याकाळी अजय आणि त्यांची पत्नी ‘प्रिया सिनेमा’ वर यायचे. त्या काळात या दोघांनी तिकिटं सुद्धा स्वतः विकली आणि नवीन सिनेमाचे पोस्टर्स सुद्धा स्वतः प्रिया सिनेमाच्या भिंतीवर चिकटवले होते.
इथपर्यंत सर्व सुरळीत होतं, पण अचानक एके दिवशी त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला आग लागली आणि पूर्ण ऑफिस जळून खाक झालं. पूर्ण बिजली परिवार या घटनेने आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या हताश झाला होता.
अजय यांच्याकडे दोन पर्याय होते. एक तर हा व्यवसाय पुन्हा नव्याने उभा करायचा किंवा जो व्यवसाय आकार घेत आहे त्याकडे लक्ष द्यायचं. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. अजय यांनी त्यासाठी आईकडून परवानगी घेतली.
‘मल्टिप्लेक्स’ ही संकल्पना अजय यांनी परदेशात बघितली होती. तीच त्यांना भारतात आणण्याची खूप इच्छा होती. त्याच वेळी प्रिया सिनेमाच्या आसपास मोठे रिटेल आऊटलेट्स येत होते, पण हा बदल घडवायचा कसा त्याबाबतीत त्यांना अंदाज येत नव्हता.
हॉलीवूडच्या एका डिस्ट्रिब्युटर सोबत बोलताना अजय यांना ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिलेज रोडशो’ यांची ही माहिती मिळाली. ते भारतात त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पार्टनर शोधत होते.
अजय हे ‘व्हिलेज रोडशो’ च्या डायरेक्टर जॉन क्रोफोर्डला भेटायला ऑस्ट्रेलियाला गेले. दोन्ही देशातील व्यवसाय संधींबद्दल चर्चा झाली आणि एका नॅपकिन सारख्या पेपर वर ही डिल ६०:४० च्या स्वरूपात फायनल झाली. ज्यामध्ये ६०% शेअर्स हे प्रिया सिनेमाकडे असतील आणि ४०% हे ‘व्हिलेज रोडशो’ कडे असतील. दोन कंपनी एकत्र आल्या आणि अद्याक्षरं एकत्र येऊन नाव तयार झालं PVR.
‘प्रिया सिनेमा’ला हात न लावता दुसरं मल्टिप्लेक्स सुरू करण्याचं अजय यांनी ठरवलं होतं. त्यांच्या शोधमोहीमे नंतर त्यांना हे कळलं की, ‘अनुपम’ हे साकेत या ठिकाणी असलेली टॉकीज हे त्यांच्या मालकांना लिझ वर द्यायचं होतं. श्री. अंसल आणि श्री. बिजली यांच्यात एक करार झाला आणि १९९७ मध्ये भारताला ४ स्क्रीन असलेलं भारतातील पहिलं ‘PVR अनुपम’ हे मल्टिप्लेक्स पहायला मिळालं.
मल्टिप्लेक्स सुरू करणं आणि ते फायद्यात चालवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेक्षकांना सतत ऑफर्स देऊन आपल्याकडे बांधून ठेवावं लागतं. “एकाच छताखाली ४ स्क्रीन, एका दिवशी २४ शोज” हे कॅम्पेन PVR ग्रुप ने राबवलं आणि हा सगळा खेळ कसा चालतो निदान हे बघायला तरी लोक एकदा तिकीट काढून PVR अनुपम ला भेट देऊ लागले.
१००० सीट्सच्या एका टॉकीजपेक्षा ३०० सीट्सचे चार स्क्रीन ही नवीन पद्धत लोक मान्य करू लागले होते. त्याच दरम्यान १९९८ मध्ये बॉलीवूडला उद्योगाचा दर्जा देण्यात आला होता.
जगभरातील सर्व मोठ्या बिजनेस हाऊसप्रमाणे ‘व्हिलेज रोडशो’ या ग्रुपने सुद्धा भारतातून काढता पाय घ्यायचं ठरवलं, पण त्यावेळ पर्यंत जवळपास १०० करोडचे करार हे PVR ग्रुप ने कित्येक मॉल्स सोबत केले होते, ज्यांचं बांधकाम सुरू होतं.
‘जॉईंट व्हेंचर मधून बाहेर पडणे म्हणजे ४०% शेअर्स विकत घेणे’ हे मोठे आव्हान अजय बिजली यांच्या समोर होतं. हे आव्हान पेलण्यासाठी ‘रेणुका रामनाथ’ या ICICI बँक च्या एका उपक्रमाने PVR ग्रुपला ४० करोडचं अर्थसहाय्य केलं आणि एकूण ८० करोड रुपये भरून PVR ही एक पूर्णपणे स्वायत्त भारतीय कंपनी झाली.
२००६ मध्ये PVR ने शेअर मार्केटमध्ये आपला पहिला IPO रिलीज केला ज्यातून त्यांनी ICICI चं कर्ज फेडलं आणि शिवाय २५० करोडची त्यांची कमाई सुद्धा झाली. या पैशातून PVR ग्रुपने पुढचा १२० स्क्रीन चा प्लॅन जाहीर केला आणि पूर्णत्वास नेला.
त्याच वेळी बिग सिनेमा आणि INOX हे ग्रुप PVR सोबत स्पर्धा करण्यासाठी स्वतःला तयार करत होते. स्पर्धेवर मात करण्यासाठी PVR ग्रुपने केवळ मल्टिप्लेक्स न राहता निर्माता व्हायचं ठरवलं. त्यांनी भागीदारीत निर्मिती केलेल्या तारे जमी पर, गजनी, गोलमाल रिटर्न्स, डॉन, ओंकाराला घवघवीत यश मिळालं.
२०१२ मध्ये ‘कनकिया’ या ग्रुपला त्या बिजनेस मधून बाहेर पडायचं होतं. त्यांच्याकडे सिनेमॅक्स हा ग्रुप सुद्धा होता.५४३ करोडच्या डील मध्ये PVR ने ‘कनकीया’ ग्रुप ला विकत घेतले आणि त्यानंतर PVR ग्रुप हा भारतातील एक नंबरचा सिनेमा बिजनेस चा ग्रुप झाला. हॉलीवूडच्या सिनेमाचे ते एकमेव डिस्ट्रिब्युटर्स आहेत. सध्या भारतात त्यांचे ५०० पेक्षा अधिक स्क्रीन आहेत.
PVR ग्रुपच्या प्रवासासाठी त्यांना सिने आशिया, युथ आयकॉन, रिटेलर ऑफ द इयर सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने वेळोवेळी सन्मानित करण्यात आलं आहे.
एका छोट्या टॉकीजपासून सुरू झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे. आज प्रिया सिनेमा सुद्धा ‘PVR प्रिया’ या नावाने वसंत विहार मध्ये दिमाखात सुरू आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.