Site icon InMarathi

कीर्तनातून घरोघरी पोहोचलं “कैलास जीवन”, मार्केटिंगची भारी आयडिया!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दूरदर्शनवर दाखवण्यात आलेल्या सर्व जाहिराती आपल्या लक्षात आहेतच. कमी खर्चात जास्त प्रतिसाद त्या काळात व्यवसायिकांना मिळायचा. एकदा केलेली आकर्षक जाहिरात ही प्रत्येक वस्तूला हमखास ग्राहक मिळवून द्यायची. ‘निरमा’ च्या उदाहरणात सुद्धा आपल्या हेच लक्षात येतं. स्थानिक व्यक्ती देशभर प्रसिद्ध होते ते सुद्धा एका जाहिरातीच्या ट्यून मधून आणि नंतर ती वस्तू एक ‘ब्रँड’ म्हणून नावारूपास येते.

‘कैलास जीवन’ या क्रीम चा जन्म याच काळात झाला आणि आजही त्याचं मार्केट मधील स्थान अढळ आहे. “काही खरचटलंय, पायाला भेगा ही पडल्या आहेत?… वापरा कैलास जीवन” ही जाहिरात सर्वांना आठवत असेलच.

आज दिसणाऱ्या यशामागे एका पिढीची मेहनत असते, एखादी युक्ती असते जी क्लिक होते आणि कठीण वाटणारा व्यवसायाचा मार्ग अचानक सुकर वाटायला लागतो.

पुण्याचे श्री. वासुदेव शिवराम कोल्हटकर हे ‘कैलास जीवन’ या विविध वेदनांना उपयुक्त क्रीमचे निर्माते आहेत. ‘मार्केटिंग’ च्या कोणत्याही पुस्तकात दिला नसेल असा फंडा वापरून त्यांनी या क्रीमला त्याकाळात घरोघरी पोहोचवलं असं म्हणायला हरकत नाही.

 

 

एक ‘किर्तनकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले कोल्हटकर सर हे त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून ‘कैलास जीवन’ लोकांपर्यंत पोहोचवायचे. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? संगीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन होतं हे आपण सगळेच जाणतो, पण एका क्रीमची माहिती देणं, लोकांना त्याची गरज पटवणे आणि त्यानंतर ती वस्तू त्यांना विकत घ्यायला लावणे हा आजच्या MBA चं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अभ्यास करण्याचा विषय ठरू शकतो.

आयुर्वेदिक पद्धतीने तयार होणाऱ्या या क्रीमचा स्थानिक ठिकाणी खप वाढवण्याची धुरा वासुदेव शिवराम कोल्हटकर यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पुण्याच्या सदाशिव पेठ येथील प्रसिद्ध केसकर विठोबा मंदिर, कोल्हटकर यांच्या घरातील वामन मंदिर, कॅम्प मधील मारुती मंदिर, शिवाजी नगर मधील रोकडोबा मंदिर ही सगळी ठिकाणं एकेकाळी श्री. वासुदेव कोल्हटकर यांच्या किर्तनाने दुमदुमून जायची.

तारुण्यपिटिका, त्वचेच्या तक्रारी, भाजणे, मूळव्याध अश्या विविध गोष्टींना उपयुक्त पडणारं ‘कैलास जीवन’ हे एक उपयुक्त मलम म्हणून फार कमी वेळात नावारूपास आलं.

 

 

पुण्याव्यतिरिक्त इंदोर, बेळगाव, बडोदा, कोलकत्ता, गोवा, हुबळी, धारवाड, अजमेर, दिल्ली सारख्या ठिकाणी वितरक नेमले होते. या सर्व ठिकाणी असलेल्या मराठी लोकांनी ‘कैलास जीवन’ला पसंती दिली आणि त्यामुळे विक्री कित्येक पटीने वाढली.

त्वचा रोगांवर उपयुक्त असलेल्या कोणत्याही क्रिमने साईड इफेक्ट होऊ नये ही अपेक्षा असते. आयुर्वेदिक पद्धतीने तयार होणारे हे क्रिम या कसोटीवर खरे उतरले होते. शरीरातील जळजळ, भेगा, पित्त, दातांचं दुखणं, अंगाला खाज सुटणे, एखादी जखम होणे अशा अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारच्या आजारांना उपयुक्त हे एकमेव मलम होतं.

सुरवातीला या मलमाचं नाव ‘कैलास लोणी’ असं ठेवण्यात आलं होतं. इतक्या गोष्टींना उपयुक्त असलेलं हे क्रीम त्या काळात ६० ग्रॅमच्या छोट्या बाटलीत मिळायचं आणि किंमत होती फक्त १ रुपये.

आयुर्वेदातील ‘शतधौतघृत’ या औषधापासून ‘कैलास जीवन’ च्या निर्मिती ची प्रेरणा श्री. वासुदेव कोल्हटकर यांना मिळाली होती. त्यांच्या एका मुलाने आणि एका मुलीने वैद्यकीय शिक्षण घेतले होते आणि एका मुलाने औषधनिर्माण शास्त्राचा अभ्यास केल्याने पूर्ण कुटुंब हे कोल्हटकर सरांच्या या प्रवासात त्यांनी साथ देत होतं.

 

 

‘आयुर्वेद संशोधनालय पुणे प्रा.लि.’ या कंपनीच्या पुण्यातील धायरी येथील प्लॅन्ट मध्ये ‘कैलास जीवन’ चं उत्पादन व्हायचं. जाड काचेच्या बाटलीत हे भरून त्यातून पाणी वेगळे होऊ नये यासाठी जाड पत्र्याचे झाकण वापरलं जायचं. पॅकिंगवर केलेल्या सततच्या सुधारणांमुळे ‘कैलास जीवन’ हे फार कमी काळात परदेशात सुद्धा पोहोचू लागलं आणि लोकांच्या जखमांना लवकर भरण्यास मदत करू लागलं.

‘कैलास जीवन’ च्या प्रवासात श्री. वासुदेव कोल्हटकर यांना साथ मिळाली ती त्यांच्या किर्तनातील सहकारी दादा बर्वे आणि त्यांचे मेहुणे जनुभाऊ जोशी यांची आणि त्यांची मुलं बाळकृष्ण, वामन आणि वैद्य माधव कोल्हटकर यांची. घरातील ही सर्व मंडळी एकत्र येऊन त्याकाळी एक मार्केटिंग टीम तयार झाली होती आणि ‘नात्यात व्यव्हार आणू नये’ ही म्हण कोल्हटकर परिवाराने साफ चुकीची आहे हे सिद्ध करून दाखवलं होतं.

१९६० ते १९६५ हा काळ ‘कैलास जीवन’ साठी सुवर्ण काळ म्हणता येईल. सौ. राधाबाई वासुदेव कोल्हटकर या स्वतः कंपनी चं प्रॉडक्शन डिपार्टमेंट लीड करायच्या. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मुलाने विश्वनाथ यांनी ही धुरा सांभाळायला सुरुवात केली आणि दुसरा मुलगा शिवराम यांनी जाहिरात आणि मार्केटिंगची जवाबदारी स्वतःवर घेतली.

घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या या व्यवसायाने आता एक मूर्त स्वरूप घेतलं होतं. स्टोव्ह, गॅसला आता मोठ्या बॉयलर ने बदललं होतं. लेबलिंग मशीन, प्रिंटिंग मशीन हे सगळं ऑटोमॅटिक झाल्याने उत्पादन क्षमता कित्येक पटीने वाढली होती.

 

 

नवीन येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला वेळेत माल पोहोचवणं यावर आता कंपनीने लक्ष केंद्रित केलं होतं. गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा प्रत्येक राज्यात वितरक नेमण्यात आले. जाहिरातीचं प्रमाण वाढवण्यात आलं.

दूरदर्शनवरील जाहिरातींच्या जोडीला स्थानिक वृत्तपत्रांत सुद्धा जाहिराती येऊ लागल्या आणि १९८१ च्या दशकात केलेल्या या मेहनतीमुळे आज ही ‘कैलास जीवन’ हे लोकांच्या मनात आणि घरात आपली जागा टिकवून आहे.

कोणत्याही मराठी माणसाच्या व्यवसायिक योगदानाबद्दल लिहितांना आणि वाचतांना एक वेगळाच आनंद होत असतो. आपल्या सारख्याच वातावरणात राहून या लोकांनी केलेली ही प्रगती आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version