Site icon InMarathi

आयफोन कवडीमोलाच्या किंमतीला विकणाऱ्या टेलिग्रामच्या या रॅकेट पासून सावध रहा!

telegaram scam featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आयफोन – प्रत्येकाच्या आवडीचा मोबाईल हँडसेट. काहींना त्याचा कलर आवडतो, तर काहींना त्याचं आकर्षक डिझाईन. आपला डेटा सुरक्षित रहावा यासाठी काळजी घेणारा कोणता हँडसेट असेल तर आयफोन म्हणता येईल.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत असं व्हायचं की, आयफोन लाँच होण्याच्या दिवशी लोक आयफोन स्टोअरच्या बाहेर रांग लावायचे. “पहिला हँडसेट मी घेतला” हे सांगण्यासाठी लोक आतुर असायचे.

आजही सोशल मीडिया वर आयफोन च्या पॅकिंगचं कौतुक करण्यासाठी सुद्धा लोक फोटो टाकत असतात. प्रत्येक गोष्टीवर इतक्या बारकाईने काम करणाऱ्या Apple कंपनीला हे यश मिळणं सहाजिकच होतं.

 

 

आता मार्केट मध्ये खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत, पण आयफोन ची क्रेझ ही काही वेगळीच आहे. इतर फोन म्हणजे इकॉनॉमी क्लास आणि आयफोन म्हणजे ‘बिजनेस क्लास’ हे नेहमीच बोललं जातं.

या ‘बिजनेस क्लास’ च्या फोन ला जर का कोणी तुम्हाला १२,००० रुपयात आणून देत असेल आणि आधी त्यासाठी तुम्हाला ६००० रुपये ऍडव्हान्स द्यायला सांगत असेल तर तुम्हाला काय वाटेल?

काही पर्याय विचारात येऊ शकतात :

१. विक्रेत्याकडे हा चोरीचा माल आहे.

२. हे लोक ६००० घेऊन टाकतील आणि तिकडेच जातील. “तेलही गेलं, तुपही गेलं…” सारखी गत होणार.

३. मस्त डील आहे, पैसे कुठे ट्रान्सफर करू?

४. थोडं अजून डिस्काउंट नाहीये का ?

प्रत्येकाकडे विचार करण्याची पद्धत आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. पण, जर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या पर्यायाचा विचार करणार असाल तर सावध व्हा. तुम्हाला काही लोक सहज फसवू शकतात.

जर का तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या पर्यायाचा विचार करत असाल तर योग्य ट्रॅक वर आहात. हा पूर्ण खेळ कसा चालवला जातो याबद्दल शेवटपर्यंत नक्की वाचा आणि इतरांना याबद्दल सतर्क करा.

कारण, ही स्कीम आज आयफोन १२ साठी आली आहे. उद्या कदाचित मॅकबुक किंवा प्लेस्टेशन साठी सुद्धा येऊ शकते.

टेलिग्राम – हे एक नवीन ऍप सध्या खूप लोकप्रिय होत आहे. सगळं फुकट, सिनेमा फुकट, वेबसिरीज फुकट. स्वतःचं चॅनल तयार करा, लोकांना ते जॉईन करायला लावा, वस्तूंची थोडक्यात माहिती द्या, बँक डिटेल्स द्या.

 

 

पैसे घेऊन टाका आणि त्या व्यक्तीला नंतर ब्लॉक करून टाका. अश्या कित्येक घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत.

राज्य निहाय तर आकडा नसेल, पण कित्येक लोक या बनावट रॅकेट मध्ये अडकली आहेत आणि नंतर सायबर क्राईम ऑफिस च्या चकरा मारत आहेत.

टेलिग्राम च्या काही चॅनल वर लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू या काही हजारात उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

अमेझॉनवर लिस्टिंग असलेल्या प्रॉडक्ट्स ची लिंक वापरायची, तीच वस्तू अर्ध्या किमतीत देण्याची ग्वाही द्यायची, ऍडव्हान्स पैसे घ्यायचे आणि मग गायब व्हायचं असा हा खेळ आहे.

“कोणतीही वस्तू १० ते १५ हजारात…” असा त्यांचा हरमालची खेळणी विकली जायची तसा व्यवसाय आहे. त्यात तरी प्रत्यक्ष खेळणी आपल्याला गाड्यावर दिसायची. इथे तर सगळंच त्या स्क्रीनच्या पलीकडे असतं.

यासाठी कोणत्या एका चॅनलचं नाव सांगून फायदा नाही, असे कैक चॅनल्स टेलिग्राम वर सध्या सक्रिय झाले आहेत.

काही वस्तूंसाठी हे लोक तुमच्याकडून ६००० रुपये मागतात, तर काही वस्तूंसाठी २००० रुपये घेतात. मग हेच लोक, तुमच्या साठी अमेझॉन वर ऑर्डर प्लेस करतात, स्क्रीनशॉट पाठवतात आणि बाकीचे पैसे मागतात.

तुम्ही जर का तेव्हा ‘त्यांनी सांगितलेली’ उरलेली रक्कम नाही ट्रान्सफर केली तर अडवांस पैसे पण गेले आणि वस्तू तर विसराच.

 

 

आपण किती खात्रीलायक आहोत हे दाखवण्यासाठी यातील काही चॅनलने एक शक्कल लढवली आहे. त्यांनी पाठवलेल्या “वस्तू मिळाल्या” या आशयाचे ते मेसेजेस आणि फोटो त्यांच्या चॅनलवर सतत अपलोड करत असतात.

त्यांची एक टॅगलाईन पण आहे की, “मी म्हणत नाही, माझ्यावर भरोसा ठेवा. माझं कामच ते सांगेल तुम्हाला…” असे वाक्य कोणती कंपनी कधी लिहिते का?

काही सायबर क्राईमच्या तज्ज्ञांच्या पाहणीत हे आलं आहे की, हे जवळपास ३००० लोकांचं रॅकेट आहे जे की “ऑर्डर केलेल्या वस्तू मिळाल्या” असे मेसेजेस तयार करतात आणि चॅनल वर अपलोड करत राहतात.

नवीन माणूस हे फोटो बघतो आणि एखाद्या गर्दी असलेल्या हॉटेल मध्ये शिरतो तसा तो या लोकांच्या तावडीत सापडतो.

स्वस्त डील कसं काय दिली जातात?

टेलिग्राम वर चॅनल उघडलेल्या या ग्रुप ने कॅनडा चे काही क्रेडिट कार्ड्स हॅक केले आहेत. डॉलर्स मध्ये क्रेडिट लिमिट उपलब्ध असलेल्या या क्रेडिट कार्ड्स वरून ही जनता काही हजार रुपयांची खरेदी करते.

कॅनडा मधील इंपेरियल बँक चे हाय बॅलन्स कार्ड यासाठी वापरले जातात जे की त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट इन्श्युरन्स सुद्धा उपलब्ध करून देतात.

कॅनडा मधील क्रेडिट कार्ड धारक जेव्हा हे सिद्ध करतो की ही खरेदी मी केलीच नाहीये, तेव्हा इन्श्युरन्स कंपनी त्याला पैसे परत देते. या सर्व प्रकाराला ‘कार्डिंग’ हे नाव देण्यात आलं आहे.

कार्डिंग चा वापर करून कित्येक चॅनल सध्या हा काळा बाजार चालवत आहेत.

‘डार्क वेब.कॉम’ या वेबसाईट वर जे क्रेडिट कार्ड हॅक होऊ शकतात अश्या कार्ड चे नंबर CVV सकट दिले जातात. हॅकर लोक ही माहिती काही रक्कम देऊन विकत घेत असतात.

‘डार्क वेब’ हे नावाप्रमाणेच एक गूढ आहे जिथे की गुगल, बिंग सारखे कोणतेही सर्च इंजिन कधीच पोहोचू शकत नाही. ‘डीप वेब’ सुद्धा असाच एक प्रकार आहे.

 

 

थोडक्यात, वस्तू तुमच्यासाठी खरेदी करायची आणि त्याचं बिल दुसऱ्याच्या नावावर येणार असं हे चक्र आहे. ‘नैतिकता’ सारख्या शब्दांना इथे अजिबात थारा नाहीये.

आपल्या व्यवसाया बद्दल पुरावे सादर करणारे हे लोक आणि फसवणारे लोक हे एकच आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे.

ज्या लोकांनी त्यांचा अनुभव इंटरनेटवर लिहिला आहे त्यांनी सुद्धा हेच लिहिलं आहे की, –

“आम्ही ऑर्डर केलेली वस्तू आमच्यापर्यंत कमी किमतीत पोहोचली खरी. पण, त्यासाठी आम्हाला एकाने दुसऱ्याचा नंबर दिला, दुसऱ्याने तिसऱ्याचा आणि असं करून कित्येक दिवसांनी आम्हाला ८००० ची वस्तू २००० रुपयात मिळाली.

आमचा धोका कमी रकमेचा होता. पण, इतरांनी अशा नादी लागू नये. तुम्हाला जर का समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केलं तर तुम्ही काय करू शकता?”

‘कार्डिंग’ या पद्धतीचा योग्य वापरच करायचा असेल तर हे लोक स्वतः अमेझॉन वरून आयफोन सारख्या वस्तू विकत घेऊन त्यांना स्वस्तात OLX सारख्या वेबसाईटवर विकू शकतात.

पण, ते असं करत नाहीत. का? ज्यांना प्रश्न पडतात, ते वाचतात. ज्यांना काही प्रश्नच पडत नाहीत, ते फसवले जातात.

इन्स्टाग्राम वर सुद्धा असे कित्येक उद्योग सुरू झाले आहेत. हे अकाउंट ‘वस्तूंचे फोटो, माहिती आणि लोकांना त्या मिळाल्याची खात्री’ हे पोस्ट करतात.

 

 

लोक खरेदी करण्यासाठी पैसे ट्रान्सफर करतात आणि मग “कोण तुम्ही?” असा प्रश्न ब्लॉकच्या स्वरूपात तुमच्या समोर येऊ शकतो.

या टोळीतील काही लोक हे “पेटीएम वॉलेट चे पैसे डबल करून देऊ” किंवा “फुकट सिमकार्ड मिळेल” सारख्या ऑफर्स सुद्धा वारंवार पोस्ट करत असतात.

टेलिग्राम वरच्या एका ग्रुपबद्दल ची माहिती काही दिवसांपूर्वीच टेक्निसॅन या सायबर एजन्सी ने केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली आहे. टेलिग्राम वरील Techserve सारख्या चॅनल पासून चार हात लांब रहायचं आवाहन या एजन्सीने लोकांना केलं आहे.

तात्पर्य काय आहे?

आयफोन १२ ची विक्री १२००० रुपयात करण्याची ग्वाही देणाऱ्या या टोळीने आपले पैसे खाण्यासाठी हा खेळ मांडला असावा.

ही पण शक्यता आहे की, पूर्ण पैसे दिल्यानंतर तुम्हाला ती वस्तू त्या कमी किमतीत मिळेल सुद्धा. पण, तुमच्याही नकळत तुम्ही एका गुन्हेगाराला मदत केली असेल.

गुन्हेगार का? कारण कार्डिंग चे पैसे हे शेवटी इन्श्युरन्स कंपनी देत असते आणि त्या कंपनीत कोणाचे पैसे असतात? आपलेच.

 

 

स्वस्तात गोष्टी मिळवण्याच्या या स्पर्धेत विक्रेता ओळखीचा किंवा रिचेबल असलेला असावा हे शिकणं अत्यंत आवश्यक आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ‘नावाला जपणाऱ्या’ वेबसाईट वरून ऑर्डर करणं कधीही चांगलं.

आज हे टेलिग्राम वर सुरू आहे, उद्या व्हॉटट्सअप पर्यंत येईल. धोका झाल्यावर कोणीही हेच म्हणेल, “आम्ही तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं…”

कोचीन मधल्या टेक्निसॅन या सायबर एजन्सीचे ही सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आपण आभार मानले पाहीजेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version