आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : प्रा. डॉ. गौरव गोविंदराव जेवळीकर
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,उदगीर.
===
कोणी शिक्षणाच्या निमित्ताने तर कोणी कामाच्या निमित्ताने आपलं मूळ गाव सोडून, आई-वडील, आप्तेष्ट, मित्रमंडळींपासून लांब मोठ्या शहरात वास्तव्याला येतात. या मोठ्या शहरात असलेली नवीन आव्हानं पेलताना अनेक पातळ्यांवर जुळवून घ्यावं लागतं.
जवळच्या मित्रांना, घरच्यांना न सांगता अनेक गोष्टी मनातच ठेवल्या जातात. या गोष्टी सांगाव्यात की नको या संभ्रमात आपण असतो आणि या सगळ्यामधूनच ‘गर्दीतला एकाकीपणा’ वाढायला सुरुवात होते.
आता या मोठ्या शहरात अनेक नवीन लोकांच्या ओळखी झालेल्या असतात. अनेक नवीन मित्रमैत्रिणी शिकत असतांना किंवा मग नोकरी – व्यवसायाच्या ठिकाणी जोडले जातात, पण यामधल्या कोणत्या व्यक्तीसमोर आपलं मन हलकं करावं, कोणाला आपल्या अडचणी सांगाव्यात अशाप्रकारचा गोंधळ मनात सुरू होतो.
जवळच्या वाटणाऱ्या विश्वासार्ह मित्र-मैत्रिणाला आपले सगळे प्रॉब्लेम्स भडाभडा सांगितले तर ते आपल्याबद्दल काय विचार करतील ? हा विचार करण्यामुळे अनेक माणसं अव्यक्तच राहतात.
जे संवेदनशील मनाचे असतात त्यांची खरी अडचण होते. माझे प्रश्न, माझे प्रॉब्लेम्स समोरच्या व्यक्तीसमोर मांडले तर ती समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? त्याचं माझ्याबाबतचं मत अगदीच बदलून जाईल का? अशा विचाराने ते आतल्या आत कूढत बसतात. आई-बाबा, भाऊ-बहीण, पत्नी-मुले यांना काही सांगावं तर त्यांना उगीच टेन्शन येईल, असा विचार असतो.
अशा परिस्थितीतून जात असताना शहराच्या गजबजलेल्या गर्दीतही आपल्याला एकटं वाटायला लागतं. सगळे ओळखीचे चेहरे आजूबाजूला असतांना आपण एकटेच आहोत असं ती व्यक्ती समजायला लागते.
कवी नागेश सोंडकर लिहितात,
“तो रोजच रडत असतो
एका अंधारलेल्या कोपऱ्यात
माणसांची गर्दी असते बाजूला
पण गर्दीतही एकटा असतो मनात
भीती वाटत असते त्याला
गर्दीत तो हरवला नाही ना जाणार
असा ही हरवला आहेच मनातून
पण गर्दीतून हरवला तर कोण शोधणार
वाढलेल्या माणसांच्या गर्दीत
तो स्वतः मात्र एकटाच आहे
माणसे वाढलीत फक्त आजूबाजूला
असं ही त्यात कोण दर्दी आहे!
खरंच आजूबाजूला फक्त माणसांची गर्दी वाढते आहे. त्या गर्दीमध्ये माणूस मात्र एकटाच आहे आणि हाच गर्दीतला एकाकीपणा अधिक भयावह व जीवघेणा असतो. त्यामुळे या गर्दीत देखील आपल्या हक्काची, जिवाभावाची, प्रत्येक गोष्ट आपण ज्याला मोकळेपणाने सांगू शकू अशी चार – दोन माणसं असलीच पाहिजेत अन्यथा ओळखी खूप आहेत पण जवळच मन मोकळं करण्यासाठी असं हक्काचं ठिकाण नसल्यामुळे अनेकांवर जीवन यात्रा संपविण्याची वेळ येते.
त्यातून निर्माण होतात अनेक प्रश्न, उत्तरांच्या प्रतीक्षेत… गर्दीत राहणारा, अनेकांना हवाहवासा वाटणारा चेहरा जेव्हा न सांगता काळाच्या पडद्याआड निघून जातो तेव्हा त्या व्यक्तीचं, त्याच्या कुटुंबाचं तर नुकसान होतंच पण त्याहीपेक्षा ज्या गर्दीत तो अनेकांना हात देत असतो, आधार देत असतो त्यांचदेखील अपरिमित नुकसान एकाकीपणातून निर्माण झालेल्या नकारात्मक विचारांमुळे होत असतं.
दुसऱ्यांच्या बाबतीत जेव्हा ही वेळ येते तेव्हा त्यांनी खूप मोठी चूक केली, कोणापाशी तरी आपलं मन मोकळं करायला हवं होतं, आपली जीवनयात्रा अशा रीतीने संपवायला नको होती, असे आपण बोलत असतो पण आपणही अशाच चुका तर करत नाही ना? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. व्यक्त होता आलं पाहिजे मनातल्या मनात नाही तर हक्काच्या माणसापाशी!
‘अनेकवेळा चेहरा हा मनाचा आरसा असतो’ हे उदगार देखील खोटे वाटावेत असे अनेक मुखवटे आपल्या अवतीभवती वावरत असतात. चेहऱ्यावरचे भाव व त्यांच्या अंतर्मनातील दुःख यांचा ठावठिकाणा अशी माणसं कोणालाही लागू देत नाहीत.
पृथ्वी हा एक रंगमंच आहे. या रंगमंचावर तुम्ही-आम्ही सर्वचजण अभिनय करत असतो, परंतु काही माणसं इतका सराईतपणे अभिनय करतात, की त्यांच्या मनात काय चाललंय आहे, हे कोणालाही शेवटपर्यंत कळत नाही.
हे सर्व घडतं त्यांच्या मनातल्या एकाकीपणामुळे. त्यामुळे कधी ना कधी या जगाचा निरोप घ्यायचाच आहे म्हणून जीवनयात्रा स्वतःहून संपवून घेणे, हे कोणालाही न पटणारे आहे. आपल्या जाण्यामुळे कदाचित आपली सुटका होते असाही अनेकांचा समज असतो, पण मागे राहणाऱ्यांची मात्र आपण फार मोठी अडचण करत आहोत, हे कदाचित टोकाचा निर्णय घेताना लक्षातही येत नाही.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतच असतात. मुळातच जीवन म्हणजे ऊन – सावल्यांचा खेळ आहे. परिस्थिती कधीही सारखी राहत नसते. उगवणारा सूर्य ज्याप्रमाणे अस्ताला जातो त्याप्रमाणे दुसऱ्यादिवशी पुन्हा तो उगवतही असतो. म्हणून प्रतिकूलतेला कधीही शेवट समजू नये उलट आपल्या सामर्थ्याची ती एक प्रकारे परीक्षाच असते.
गर्दीत राहणारी अनेक माणसे वरवर आनंदी दाखवत असली, तरी आतून अनेक वेळेला दुःखाची किनार घेऊन जगत असतात. फक्त त्या दुःखाला योग्य वाट मिळाली की अनेक अनर्थ टळतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला गर्दीतल्या एकाकीपणाचा अनुभव घेणारी काही माणसं असतील तर त्यांना आधार द्या. त्यांच्या व समाजाच्या निरोगी भविष्यासाठी!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.