' केकची चव जितकी भारी, तितकीच त्याच्या उगमाची “स्टोरी”….एकदा बघा – InMarathi

केकची चव जितकी भारी, तितकीच त्याच्या उगमाची “स्टोरी”….एकदा बघा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

केक आवडत नाही असे खूप कमी लोक असतील जगात. कोरोनाच्या काळात तर किती हौशी स्त्रीयांनी घरी केक बनवून कुटुंबाला मनसोक्त केक खायला घातले. नवशिक्या मुली, स्रीयांनी हौसेने आॅनलाईन क्लास करुन केक करायची हौस भागवून घेतली.

स्पाँजी, लुसलुशीत केक वर आईसिंगचं डिझाईन, जेम्स किंवा इतर चाॅकलेट्सची सजावट पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. बाहुलीचं डिझाईन असलेला गुलाबी केक मोहात पाडतोच पाडतो. पाईनॅपल, स्ट्राॅबेरी, चाॅकलेट, व्हॅनिला, अंड्यांचा, बिनअंड्याचा, पेस्ट्रीज, कप केक, कोल्ड केक, रसमलाई केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, साधा केक, तऱ्हेतऱ्हेचे फ्लेवर्स, एक म्हणता हजार केकची नावं, तऱ्हेतऱ्हेचे रंग बघून पण जीभ लपलप करेल!

जगात खवैय्यांची कमी नाही आणि खाद्यपदार्थांची पण…प्रत्येक प्रदेशातील आपली आपली खासियत असते. तिथे केले जाणारे पदार्थ, त्यात वापरले जाणारे घटक बदलत्या काळानुसार त्यात केल्या जाणाऱ्या सुधारणा, यामुळे वाढलेली पदार्थांची लज्जत हे सारं खाऊगल्लीच्या गर्दीत भरच घालत राहतं.

 

wheat cake inmarathi

 

पूर्वी केक फक्त वाढदिवसाच्या दिवशीच खायला मिळत. तीही ठराविक लोकांची मिरासदारी होती. बाकी लोकांना कप केक, स्लाईस केकवर समाधान मानावं लागायचं. दोन दोन‌ लेअर्स असलेले केक तर फक्त सिनेमातच पहायला मिळत. चार सहा थरांचे केक तर किती कौतुकास्पद गोष्ट होती. पेपरला येणाऱ्या फोटोतच ते दिसत.

केक तयार करायची पद्धत सुरुवातीला खूपच साधी आणि आताच्या तुलनेत फारच किरकोळ वाटावी अशी होती. केकचा साधारण ते रंगीबेरंगी होण्यापर्यंतचा प्रवास हा फार मजेदार होता.

सुरुवातीला जो केक बनवला जाई तो प्राथमिक दर्जाचा, आताच्या ब्रेडसारखा होता. त्यात मध, शेंगदाणे आणि सुका मेवा वापरला जात असे. केक बेक करण्याची ती अतिशय साधी पद्धत होती. बेकर्स तेव्हा फ्रूटकेक आणि जिंजरब्रेड बनवत.

 

 

खाद्य संस्कृतीच्या अभ्यासकांच्या मते, केकची सुरुवात १३ व्या शतकात सुरु झाली होती, पण १७ व्या शतकात गोल आकारात, आयसिंग असलेला केक बनवायला सुरुवात केली होती. कारण त्यावेळी साखर, ओव्हन्स, अशी केकसाठी आवश्यक असलेली मशीन्स, त्यात आवश्यक असणारे घटक उपलब्ध होऊ लागले होते.

केकसाठी लागणारे साचे त्यावेळी धातूचे, लाकडी आणि कागदी असायचे. त्यातील काही लवचिकपणे वापरण्यायोग्य होते. सपाट बेकिंग ट्रे पण सर्रास वापरले जात.

आयसिंग करण्यासाठी तेव्हा साखर आणि अंड्यातील पांढरा बलक यांचं मिश्रण तयार केलं जाई. हे मिश्रण केकवर ओतून क्षणभर केक ओव्हनमध्ये ठेवून दिला जात असे. जेव्हा हे मिश्रण ओव्हनमध्ये ठेवत त्यापूर्वी त्यात सुका मेवा, मनुके, संत्र्याच्या फोडी, लिंबाचा रस वगैरे घालत. त्यामुळे केकची चव अजून जराशी चांगली होई.

 

cake baking inmarathi

 

१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत आपण आज जो केक खातो तो बनायला सुरू झाला. ज्यात मैदा आणि यीस्टच्या ऐवजी बेकिंग पावडर वापरली जाऊ लागली.

न्यू युनिव्हर्सल कुकरी बुक या पुस्तकात असा उल्लेख आहे, की केकवरच्या आयसिंगची पारंपरिक पद्धत बदलताना त्यात मैदा, बटर, क्रीम आणि आयसिंग शुगर वापरायला सुरुवात केली. फ्रान्समधील अँटाॅनिन कॅरेना हा पेस्ट्रीज बनवणारा इतिहासातील पहिला बेकर मानला जातो.

रोमन लोक जो केक बनवत तो आणि ब्रेड यात अगदी किंचित फरक होता. तो बनवताना रोमन लोक त्यात अंडी आणि लोणी वापरायचे. तसंच गोडवा हवा म्हणून साखर आणि नैसर्गिक प्रकार मध आवर्जून वापरत, पण तो केक स्पाँजी, मऊ लुसलुशीत न‌ होता दोन्ही बाजूंनी कडक व्हायचा.

मग कोणताही पदार्थ चांगला व्हावा यासाठी माणूस नित्य नवे प्रयोग करतो. तसेच केकवरही प्रयोग केले गेले. डोनट, पुडिंग्ज यांचाही शोध लागला. त्यावर फेटलेलं क्रीम, फळं, चाॅकलेट्स, सुका मेवा यांनी तो अजूनच चविष्ट बनला.

 

cake 4 inmarathi

 

थोडक्यात सांगायचं तर, केकच्या नानाविध प्रकारांनी एक नवं खाऊचं दालनच खवैय्यांना उपलब्ध झालं.

आता साधारण गोल केकच सर्रास असतात, पण पूर्वी हार्टशेप, किंवा इतर प्राण्यांच्या आकाराचे अॅल्युमिनीअमचे साचेच असायचे. त्यातून विविध प्रकारचे केक तयार होत. याचं मुख्य कारण म्हणजे अॅल्युमिनीअमची भांडी गंजत नाहीत. स्वच्छ करायला सोपी असतात.

केक हा पाश्चिमात्य पदार्थ. आपल्याकडे जशी सणावाराला पुरणाची पोळी हमखास असते, तसं पाश्चिमात्य देशात धार्मिक कार्यात केक हेच मुख्य पक्वान्न म्हणून केलं जाई. आजही केलं जातंच. त्याचा आकार गोल असण्याचं कारण म्हणजे, आयुष्य असंच गोल चाकोरीबद्ध आहे याची ती खूण आहे.

 

cake 3 inmarathi

 

सूर्य, चंद्र हे जसे गोल असतात तसंच आपलं आयुष्य! आनंदाच्या क्षणी केक खाऊ घालणं हा मानच असतो तिथे. आता आपण नाही का? कोणी पाहुणा आला तर गोडधोड काहीतरी करतोच.. तसंच हे पण! म्हणजेच देश बदलला, तरी आगत्य करायचा रिवाज कधीच बदलत नाही.

एखादा पदार्थ छान होतो, उत्तम होतो, पण तो पदार्थ शोधून काढणारी खरी सुगरण. बाकी नंतर त्यात सुधारणा करत तो पदार्थ उत्तमातला उत्तम बनवणारी मंडळी त्या पायवाटेवरचे प्रवासी! केक बनवला आणि तो इथंवर वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादांनी सजवत आणला, पण केकचा इतिहास किती रंजक आहे बघा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?