…म्हणून ‘मोहम्मद कुली खान’ याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मात घेतलं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव ज्या-ज्या वेळी आपण वाचतो, तेव्हा एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो. कोणत्याही परिस्थितीत प्रजेच्या पाठीशी ठाम उभं रहायचं हे आपल्याला या ‘जाणता राजा’ ने शिकवलं आहे.
आपल्यात आणि प्रजेत कधीही अंतर मानू नये हे आपल्या राजाने त्याच्या वागण्यातून नेहमीच दाखवून दिलं. लहानपणी मावळयांसोबत युद्ध कलेसाठी स्वतःला तयार करत असताना स्वतःतील ‘राजकुमार’ त्यांनी कधीच सोबत ठेवला नव्हता.
जितके आक्रमक, तितकेच नम्र आणि जितके संयमी तितकेच गरज पडल्यावर कठोर असं ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं’ अद्वितीय व्यक्तिमत्व आपल्या भुमीवर होऊन गेलं आहे.
तत्कालीन समाजात सुद्धा असणारे धर्म भेद, जाती भेद त्यांनी कधीच मानले नाहीत. त्यांच्यासाठी ‘स्वराज्याचा समर्थक’ किंवा ‘विरोधक’ या दोन प्रकारचेच लोक फक्त अस्तित्वात होते.
विरोधकांना त्यांनी कसा धडा शिकवला हे आपण इतिहासात बघितलंच आहे. एका समर्थकाला त्यांनी समाजाचा विरोध पत्करून कशी साथ दिली त्याबद्दल या लेखात जाणून घेऊया.
नेताजी पालकर – हिंदवी स्वराज्यातील सरसेनापती. त्यांचे वडील हे शहाजी राजांकडे जहागीरदार म्हणून काम बघत. १६४५ ते १६६५ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण काळात नेताजी पालकर यांनी कित्येक मोहिमांमध्ये सेनेचं नेतृत्व केलं.
त्यांच्या मोहिमांपैकी सर्वात जास्त महत्वाची मानली जाते ती विजापूरच्या आदिलशाह विरुद्ध त्यांनी नेतृत्व केलेली मोहीम. या मोहिमेनंतर अफझल खान मारला गेला होता.
मनकोजी दहातोंडे यांच्या निधनानंतर नेताजी पालकर यांना १६५७ मध्ये सरनौबत हे पद देण्यात आलं होतं. नेताजी पालकर यांची शरीरयष्टी आणि देहबोली इतकी करारी होती की त्यांना ‘प्रति शिवाजी’ या नावाने सुद्धा ओळखले जात असे.
मुघल साम्राज्यातील कित्येक भाग हे नेताजी पालकरांनी एकहाती हस्तगत केले होते किंवा तिथे प्रशासन करण्यास मुघलांना हैराण करून सोडले होते.
१६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहामुळे २३ किल्ले मुघल साम्राज्याला द्यावे लागले होते. विजापूरच्या आदिलशाह विरुद्ध औरंगझेबच्या बाजूने लढायचं असा तो तह होता.
औरंगझेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथे झालेल्या भेटीनंतर नेताजी पालकर हे जय सिंग राजाच्या सैन्यात सामील झाले होते. शिवाजी महाराजांची आग्रहून झालेली सुटका ही नेताजी पालकर यांच्या मदतीने झाली होती, या संशयाने औरंगझेबने राजा जयसिंगला नेताजी पालकर यांना अटक करण्यास सांगितले.
क्रूर औरंगझेबाने आपल्या बळाचा गैरवापर करून नेताजी पालकर यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. नेताजी पालकर यांना ते मान्य करावं लागलं आणि त्यानंतर ते ‘मोहम्मद कुली खान’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली तयार झालेल्या नेताजी पालकरने ही गोष्ट मान्यच कशी केली असा प्रश्न पडू शकतो. पण, ही जिवंत राहण्यासाठी केलेली एक तडजोड होती.
औरंगझेबाने त्यानंतर ‘मोहम्मद कुली खान’ म्हणजेच नेताजी पालकर यांना अफगाणिस्तानच्या कंदहार किल्ल्याच्या किल्लेदार म्हणून नेमलं.
नेताजी पालकर यांनी तिथून सुटका करून घेण्याचे खूप प्रयत्न केले. एका प्रयत्नात ते लाहोर येथे पकडले गेले. त्यानंतर नेताजी यांनी, सतत औरंगझेबाला विरोध करण्यापेक्षा त्याचा विश्वास जिंकण्याचे ठरवले. काबुल आणि कंदहार इथे पठाणांच्या विरुद्ध झालेल्या लढाईत नेताजी यांनी मुघल साम्राज्याला जिंकण्यास मदत केली.
नेताजी पालकरच्या युद्ध कौशल्यावर औरंगझेब खुश झाला होता. त्याने नेताजी यांना छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी पाठवण्याची एक योजना आखली. नेताजी पालकर यांच्या सोबत दिलेर खानला सुद्धा पाठवण्यात आले.
महाराष्ट्राच्या भूमीवर परतण्याची एक सुवर्णसंधी नेताजी पालकर यांना चालून आली होती. त्यांना आपल्या शिवाजी राजावर पूर्ण विश्वास होता. त्यांना जर आपण आपल्या सोबत घडलेला घटनाक्रम सांगितला, तर ते नक्की आपल्याला माफ करतील हे त्यांना माहीत होतं. याच विश्वासाने नेताजी हे थेट रायगडावर गेले.
दहा वर्षांनी परतलेल्या नेताजी पालकरांना मुहम्मद कुली खानच्या रुपात बघताना पूर्ण दरबार आश्चर्यचकित झाला होता. नेताजी पालकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली की,
“मला पुन्हा आपल्या सैन्यात सामील करून घ्या आणि मला पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याची परवानगी द्या.”
पहिल्या मागणीबद्दल दरबारातील कोणाचाही आक्षेप नव्हता. पण, दुसऱ्या मागणीला त्याकाळी समाजातून विरोध झाला होता. पण, शिवाजी महाराजांनी या दोन्ही विनंत्या मान्य केल्या आणि मुहम्मद कुली खान म्हणून परतलेल्या नेताजी पालकरांना धर्म परिवर्तन करण्यास परवानगी दिली.
राजदरबारी असलेल्या धर्मगुरूंकडून हे कार्य करवून घेतलं. दहा वर्षांनी जनतेला परत आपल्या ‘प्रति शिवाजी’ बघायला मिळाला होता.
इतर कोणत्याही राजाने मान्य केलं नसतं ते मान्य करणं, हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनाचा मोठेपणा होता. ते त्यावेळी कोणताही निर्णय घेऊ शकले असते, पण ते एका स्वराज्य समर्थक सैनिकाच्या बाजूने उभे राहिले आणि त्याला परत एक नवीन आयुष्य त्यांनी मिळवून दिलं.
नेताजी पालकर यांनी सैन्यात परत सामील झाल्यानंतर खटाव, फलटण आणि मंगळवेढा या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली होती. पन्हाळा गड राखण्यात आलेल्या अपयशानंतर प्रतापराव गुजर हे दुसरे सरनौबत म्हणून नियुक्त झाले होते.
आपला राजा म्हणजे आपला पालक असतो. राजवाडा म्हणजे आपलं माहेरघर असतं. तिथे आपल्या चुका पदरात घेतल्या जातात.
म्हणून, कोणत्याही परिस्थितीत आपल्या राजाशी एकनिष्ठ असावं असा विश्वास प्रजेमध्ये निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.