५० चेंडू, ७ धावा, ३ बळी… कांगारूंविरुद्ध ‘हरून सुद्धा’ त्याने जिंकली सगळ्यांची मनं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – ईशान घमंडे
===
२००३ चा क्रिकेट विश्वचषक, हे दादाच्या अर्थात गांगुलीच्या भारतीय संघासाठी एक दिवास्वप्नच ठरलं.
या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाने केलेली कामगिरी आणि एकूणच परिस्थिती पाहता ‘फार निभाव लागणं अशक्य’ असंच बरीचशी मंडळी म्हणत होती. मात्र भारतीय संघाने अफलातून कामगिरीचा नमुना पेश केला.
थोडंथोडकं नाही, तर भलंमोठं यश भारतीयांच्या पदरात पडलं. दादाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला.
सचिन तेंडुलकरने गोलंदाजांची पिसं काढली. युवराज आणि कैफसारखे दमदार क्षेत्ररक्षक अधिक परिपूर्ण झाले. एकंदरीतच भारतीय संघाचा प्रवास उत्तम ठरला. अंतिम सामन्यात गांगुलीचा निर्णय चुकला, आधी गोलंदाजी करायला नको होती वगैरे त्यानंतर घडलेल्या गोष्टी… पण, भारतीय संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती.
अनेकांसाठी ती अविश्वसनीय होती. अविश्वसनीय असण्यावर कदाचित दुमत होऊ शकेल, पण भारताचं हे यश अविस्मरणीय होतं हे मात्र नक्की!
१५ भारतीय खेळाडू आणि त्यांच्यासोबत असणारी संघव्यवस्थापन टीम, यांच्याशिवाय आणखी एका भारतीयाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं नाव मोठं केलं. या भारतीयाचं नाव होतं संदीप पाटील. कसोटी क्रिकेट खेळण्याची मान्यता नसणाऱ्या केनियाच्या संघाने उपांत्य फेरीत मजल मारली. भारताचे माजी खेळाडू संदीप पाटील हे या संघाचे प्रशिक्षक होते.
न्यूझीलंडच्या संघाने केनियात खेळण्यास नकार दिला, म्हणून ४ आयते गुण त्यांच्या पदरात पडले. पण, केनियाच्या संघाने उपांत्य फेरी गाठली त्यात फक्त नियतीचा वाटा नव्हता. त्यांनी केलेली चांगली कामगिरी सुद्धा महत्त्वाची होती.
याचा प्रत्यय येतो, तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्यांच्या सामन्यातून… या सामन्यात आसिफ करीमने ऑस्ट्रलियाच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. आसिफ करीम हा केनियाचा एक महत्त्वाचा गोलंदाज आणि अनुभवी खेळाडू होता.
त्याने १९९६ साली पदार्पण केलं होतं. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत अवघ्या ४.१३ च्या इकॉनॉमीने त्याने गोलंदाजी केली. ८ गडी सुद्धा बाद केले. पण, त्याने मुख्य काम पार पाडलं, ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणणं.
जे त्याने उत्तमरीत्या पूर्ण केलं हे त्याच्या इकॉनॉमीच्या आकड्यांवरून लक्षात येतं. हल्लीच्या काळातील क्रिकेट म्हणजे गोलंदाजांसाठी वाईट काळ झाला आहे. त्याकाळात मात्र परिस्थिती तशी नव्हती. तरीही १७५ धावांचं आव्हान पुरं करताना दमछाक व्हावी अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती नव्हती
ऑस्ट्रेलिया त्याकाळातील दादा संघ होता. त्यांचं अवघ्या क्रिकेट विश्वावर राज्य होतं. या राज्यकर्त्याला शह देण्याचं, त्याच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम आसिफ करीमने करून दाखवलं.
फलंदाजांनी धावांची भिंत थोडी मोठी उभारली असती, तर काय होऊ शकलं असतं हे त्यावेळी सगळ्यांनाच जाणवलं. ८.२-६-७-३ ही अशी होती करीमच्या गोलंदाजीची आकडेवारी!
गिली, हेडन, पॉन्टिंग, लेहमन, सायमंड्स, मार्टिन, हॉग, बिकेल अशी फलंदाजांची फळी असणाऱ्या संघाविरुद्ध त्याने ६ निर्धाव षटकं टाकली.
५० चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त ७ धावा दिल्या. त्याची इकॉनॉमी होती ०.८६! प्रतिषटक एकहून कमी धावा देणं म्हणजे काही सोपं काम नव्हे. बरं त्याने जे ३ गडी बाद केले त्यात एक होता कप्तान पॉन्टिंग आणि एक होता लेहमन… ब्रॅड हॉग ही त्याची तिसरी विकेट सुद्धा महत्त्वाचीच होती. हॉगला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करणं सुद्धा सोपं नव्हतंच.
बिनबाद ९५ वरून ५ बाद ११७ अशी ऑस्ट्रलियाची अवस्था करणाऱ्या या फिरकीची जादू काय असेल, त्याचा फक्त विचार करा.
या स्पेलमध्ये करीमने काय काय कमावलं असं विचाराल, तर सांगतो. You lost the match but won our hearts हे हल्ली अगदी सर्रास वापरलं जाणारं वाक्य, या प्रसंगासाठी अगदी चपखल बसतं. केनियाने सामना जिंकला नाही. पण, करीमने मनं नक्कीच जिंकली.
त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. गोलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार मिळणं, हीच मुळात काहीशी आश्चर्याची बाब; त्यातच हा गोलंदाज ‘हरलेल्या संघाचा सदस्य’ होता, हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे. हे असं सहसा घडलेलं पाहायला मिळत नाही.
अनेकदा रडीचा डाव खेळणाऱ्या ऑस्ट्रलिया संघाचा कर्णधार पॉन्टिंग याने सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली.
पण, एकतर्फी होऊ घातलेला सामना रंजक करणाऱ्या या वीराला सामनावीर पुरस्कार मिळणं, हा खरंतर क्रिकेटचा विजय होता.
हे असे दिवस नेहमी येत नाहीत. हा दिवस जसा आसिफ करीमच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला असेल, तसाच तो क्रिकेटच्या इतिहासात सुद्धा अजरामर ठरेल…!!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.