' असावा सुंदर “प्लॅस्टिकचा” बंगला – ही नक्की काय भानगड आहे?, वाचाच – InMarathi

असावा सुंदर “प्लॅस्टिकचा” बंगला – ही नक्की काय भानगड आहे?, वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महत्त्वाच्या शोधांची यादी केली, तर त्यात प्लॅस्टिकचा क्रमांक खूप वरचा लागेल. एक किरकोळ पेनाच्या टोपणापासून ते मोठमोठ्या उपकरणांपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये प्लॅस्टिकचा अंतर्भाव झालेला दिसून येतो. आज आपल्या रोजच्या वापरातील ९९% वस्तूंमध्ये प्लॅस्टिक कोणत्या ना कोणत्या रुपात वापरलेले असतेच.

सन १८६९ मध्ये जगात सर्वप्रथम सिंथेटिक पॉलिमरची निर्मिती झालेली असली, तरी आपण आज वापरतो त्याच्या जवळपास येणाऱ्या प्लॅस्टिकची निर्मिती सन १९०७ मध्ये लिओ बँकेलँड याने केली. यानंतर नायलॉनसारख्या गोष्टींचाही शोध लागला. 

दुसऱ्या महायुद्धापासून प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. उष्णतारोधक, वीजरोधक, जलरोधक आणि सहजपणे कोणताही आकार देता येऊ शकणारा हा पदार्थ त्याच्या उपयुक्ततेमुळे लोकप्रिय होऊ लागला. एकट्या अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्लॅस्टिकचे उत्पादन तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले! पण कालांतराने प्लॅस्टिकचे दुष्परिणामही दिसायला लागले.

उपयोगितेच्या दृष्टीने प्लॅस्टिक फायद्याचे असले, तरी त्याचा महत्त्वाचा दोष म्हणजे त्याचे न होणारे विघटन. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये हा प्रश्न ऐरणीवर येण्यास सुरुवात झाली आणि आजच्या घडीला प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन ही जागतिक पातळीवर जवळपास सर्वच देशांना भेडसावणारी समस्या बनली आहे.

 

Plastic-Pollution 5 InMarathi

 

या समस्येवर निरुपयोगी प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणे हा एक चांगला उपाय समजला जातो. सगळ्याच प्रकारच्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणे शक्य नसले, तरी Low Density Polyethylene (LDPE), High Density Polyethylene (HDPE), Polypropylene (PP), Polyvinyl Chloride (PVC) इत्यादी प्रकारच्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर होऊ शकतो.

सध्या जगभर प्लॅस्टिक पुनर्वापराबद्दल संशोधन सुरू आहे. प्लॅस्टिक वितळवून त्याचा नवीन प्रकारे वापर करणे ही आजकाल सामान्य बाब झाली आहे.

प्लॅस्टिक त्याच्यामध्ये आढळणाऱ्या संयुगांमुळे आज डांबरी रस्त्यांच्या कामात डांबर आणि खडीच्या मिश्रणातील एक सहाय्यक घटक म्हणूनही वापरले जाते. याशिवाय आपल्या दररोजच्या वापरातील अनेक गोष्टी या खराब प्लॅस्टिकचे पुनर्निर्माण करून बनवलेल्या आढळून येतात, पण संपूर्ण घरच टाकाऊ प्लॅस्टिकमधून तयार झाल्याचे आपण कधी ऐकले आहे का?

होय, ही गोष्ट घडून आलेली आहे. केवळ साडेचार लाख रुपये खर्चात टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करून बांधलेले पक्के घर खऱ्या अर्थाने “Green Building”च आहे!

 

plastic house inmarathi

 

‘प्लॅस्टिक फॉर चेंज’ ही संस्था प्लॅस्टिक पुनर्वापराच्या क्षेत्रात काम करते. ही संस्था सर्वसामान्य कचरावेचक लोकांकडून चांगल्या प्रकारे पुनर्वापर करता येऊ शकणारे प्लॅस्टिक घेऊन ते मोठ्या उद्योगांना उपलब्ध करून देते.

कचरावेचक वर्गातील लोकांच्या उन्नतीसाठी ही संस्था कार्यरत आहे. कचरावेचक कर्मचारी म्हणजे घनकचरा व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु त्यांचे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होणे गरजेचे आहे.

अलीकडेच ‘प्लॅस्टिक फॉर चेंज इंडिया’ फाउंडेशनने कर्नाटकातील मंगलोर जवळील पाचनदी या गावात संपूर्णपणे टाकाऊ प्लॅस्टिकपासून एक घर उभारून एका कचरावेचक भगिनींना हक्काचे छप्पर मिळवून दिले.

ही संस्था सद्यस्थितीत कर्नाटकातील बंगलोर, मंगलोर, उडुपी, कारवार, धारवाड, हुबळी या भागातील कचरावेचक लोकांच्या कल्याणसाठी अनेक योजना राबवत आहे आणि यातून सुमारे १०,००० कचरावेचकांना याचा लाभ झालेला आहे.

कमला या मंगलोरजवळील पाचनदी या गावातील रहिवासी आहेत. त्या जवळपास २० वर्ष कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. ६ महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या कामातून निवृत्ती घेतली. त्या ज्या लहानशा घरात राहत होत्या ते घर या वर्षी पावसाळ्यात जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत कमला यांच्या पायालाही दुखापत झाली.

कमला यांच्याप्रमाणेच इतरही अनेक कचरा वेचक कामगार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. अशा लोकांच्या डोक्यावर छत उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने ‘प्लॅस्टिक फॉर चेंज इंडिया’ फाउंडेशनने टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करून पक्की घरे बांधण्याची संकल्पना मांडली. १० नोव्हेंबर रोजी टाकाऊ प्लॅस्टिकपासून बांधलेले पहिले घर कमला यांना फाउंडेशनने सुपूर्त केले.

कमला यांचे हे घर जवळपास ३५० स्क्वेअरफूट क्षेत्रफळाचे असून टाकाऊ प्लॅस्टिकपासून बनविलेल्या पॅनल्सचा वापर करून याची बांधणी केली गेली आहे. एक स्वयंपाकघर, माजघर, एक खोली आणि शौचालय अशी रचना असलेल्या या घराचे बांधकाम हैद्राबाद मधील ‘बांबू प्रोजेक्ट्स’ या विकासकाने केलेले आहे.

 

plastic house inmarathi1

 

यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च आला असून १५ दिवसांत या घराचे बांधकाम पूर्ण झाले. बांधकामात कोणत्याही प्रकारे सिमेंट, वाळू, खडी, विटा किंवा इतर पारंपरिक बांधकाम साहित्याचा वावर झालेला नसल्याने ते पर्यावरण पूरक बनले आहे. यासाठी सुमारे १५०० किलो टाकाऊ प्लॅस्टिक वापरले गेले.

या बांधकामात वापरल्या गेलेली प्लॅस्टिक पॅनल्स Low Density Polyethylene (LDPE) आणि Multi Layered Plastic (MLP) या प्रकारच्या टाकाऊ प्लॅस्टिकसह टेट्रा पॅक, गुटख्याची पाकिटे यांचाही वापर करून बनविण्यात आली आहेत. एका घरासाठी अशा सुमारे ६० पॅनल्सचा वापर करण्यात आला.

जर एकाच वेळी अशा अनेक घरांची उभारणी केली, तर याची किंमत प्रत्येकी साडेतीन लाख रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. आगामी वर्षांत अशा प्रकारची २० घरे बांधण्याचे उद्दिष्ट ‘प्लॅस्टिक फॉर चेंज’ने ठेवले आहे. यातून सुमारे २० टनापेक्षा जास्त टाकाऊ प्लॅस्टिक पुन्हा उपयोगात येऊ शकते.

सध्या पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर वाढलेला असताना टाकाऊ प्लॅस्टिकपासून बांधलेल्या घराची संकल्पना फारच नाविन्यपूर्ण आहे. या संकल्पनेचा वापर करून शासनाच्या सहकार्याने कमी खर्चातील घरे बांधण्याचा ‘प्लॅस्टिक फॉर चेंज’ फाउंडेशनचा मानस आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी यासारख्या गोष्टींचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?