एकाच कुंडीत ५ वेगवेगळ्या भाज्या पिकवून पाण्याची बचत करण्याचा प्रयोग झाला यशस्वी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“आपलं शिक्षण, नोकरी हे फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी असतं. आपला कल हा आपल्या आवडीच्या गोष्टीकडेच असतो.” हे मागच्या काही वर्षांत खूपदा अधोरेखित होत आहे. कित्येक लोकांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायची संधी मिळते आणि त्याचं ते सोनं करतात.
पण, कोणत्या न कोणत्या कारणामुळे ज्या लोकांची ही संधी हुकते ते काही वर्षांनी त्यांच्यातील संकोच बाजूला करून आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी ते करतात.
याचं उदाहरण सांगायचं तर कित्येक लोक वयाच्या चाळीशीत पोहोचल्यावर गाणं गायला सुरुवात करतात, काही लोक गार्डनिंग मध्ये मन रमवतात.
ही सुरुवात होण्याचं एक कारण असावं की, त्या वयात जाईपर्यंत लोकांना आनंद आणि सुख यातील फरक कळलेला असतो. कामातील यश हे त्यांना सुख मिळवून देत असतं आणि छंद जोपासण्यातून त्यांना एक आनंद मिळत असतो.
आपल्या छंदातून जर का आर्थिक कमाई होत असेल किंवा एखादा खर्च वाचत असेल तर त्या कामाला पूर्ण कुटुंबाचा पाठींबा मिळतो.
डॉक्टर चंद्रशेखर बिरादार हे एक असंच व्यक्तिमत्व आहे जे की प्रोफेशनने तर एक स्पेस रिसर्च सायंटिस्ट आहेत. पण, त्यांना सर्वात आनंद देणारी गोष्ट ही त्यांचं ‘रुफटॉप गार्डन’ म्हणजेच ‘गच्चीवरची बाग’ हीच आहे.
ती बाग पण इतकी छान आहे की, त्यांना कोणतीच भाजी बाहेरून विकत आणावी लागत नाही. आहे की नाही मस्त कल्पना… सारखं बाजारात जाणं नको, कोथिंबीर विसरली म्हणून पुन्हा जाणं नको.
सगळ्या भाज्या हे कुटुंब त्यांच्या गच्चीवरच पिकवतात. वेळेची आणि पैशांची सुद्धा बचत.
कर्नाटक मध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉ. बिरादार ह्यांनी स्पेस सायन्स अँड अप्लिकेशन या विषयातून PhD चं शिक्षण पूर्ण केलं आहे. ते सध्या कैरो (इजिप्त) इथे स्थायिक आहेत.
कामानिमित्त आजपर्यंत त्यांचं ३३ देशात भ्रमण झालं आहे. डॉ. बिरादार ह्यांना नेहमीच केमिकल न वापरता उत्पादन केलेल्या फळभाज्याचं आकर्षण होतं.
सुरुवात कशी झाली?
डॉ. बिरादार हे वर्ष २००० मध्ये नोकरीसाठी अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी बघितलं की हिरव्या पालेभाज्या या खूप चढ्या किमतीने विकल्या जायच्या. त्यातही फार कमी पर्याय उपलब्ध असायचे.
त्यांच्याकडे दोन पर्याय होते. एक तर महाग भाज्या घेणे किंवा किंवा स्वतः त्या भाज्यांचं उत्पादन करणे. त्यांनी दुसरा पर्याय निवडला.
गरजेसाठी सुरू केलेली गच्चीवरची बाग त्यांना त्यांच्या आवडीच्या शेतीच्या जवळ नेणारी होती. दहा वर्ष रुफटॉप गार्डनिंग करताना ऑरगॅनिक फार्मिंग केल्यानंतर बिरादार कुटुंबियांना त्यातील आर्थिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त फायदा सुद्धा दिसायला लागला.
गच्चीवरची बाग करण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती फक्त ५० स्क्वेअर फुट जागेची.
इतक्या जागेत आपण ५० प्रकारच्या भाज्या पिकवू शकतो. यासोबतच आवश्यकता आहे ती कुटुंबातील सर्वांच्या इच्छेची की आपण इथून पुढे फक्त केमिकल विरहित भाज्याच खाणार.
डॉ. बिरादार हे कैरो मध्ये त्यांची पत्नी आणि ३ मुलांसोबत राहतात. बिल्डिंगच्या टॉप वर असणाऱ्या त्यांच्या फ्लॅट मधील किचनला लागूनच एक मोठी टेरेस आहे.
इथे लावलेल्या झाडांमध्ये टोमॅटो, वांगी, मटार, केळी, बिन्स, मिरच्या, बटाटे, कोबी, ब्रोकोली, दोडके, पालक, काकडी, मेथी, सफरचंद, कांदे, भोपळा यांसारख्या भाज्या आणि कित्येक प्रकारची फुलझाडे त्यांनी लावली आहेत.
घरातील ५ व्यक्तींना पुरेल इतकी तर ही भाजी असतेच, पण वर्षातील काही दिवस हे उत्पादन इतकं वाढतं की, डॉ. बिरादार हे अतिरिक्त भाजी त्यांच्या मित्रांना आणि शेजारच्या लोकांना देत असतात.
हे कसं साध्य केलं?
डॉ. बिरादार यांनी पहिल्या पासूनच ‘मल्टी लेअर मेथड’ म्हणजेच पाच थरांमध्ये शेती करण्याच्या पद्धतीचा अवलंब केला. त्यांच्या बागेत असलेल्या प्रत्येक कुंडीची उंची ही दीड फूट इतकी आहे. या कुंडीमध्ये ते पाच प्रकारचे झाड पिकवतात.
थर १ – म्हणजे मातीच्या खाली त्यांनी गाजर, बिट रूट, कांदा, बटाटे, अद्रक अश्या झाडांची त्यांनी लागवड केली आहे.
थर २ – मध्ये त्यांनी कोथिंबीर, मेथी, पालक अश्या सर्व हिरव्या पालेभाज्यांची लागवड केली आहे.
थर ३ – मध्ये वांगी, मिरची, बिन्स, भेंडी, टोमॅटो, ब्रोकोली यासारख्या भाज्या त्यांनी लावल्या आहेत.
थर ४ – हे सर्व प्रकारचे दोडके, काकडी या भाज्यांसाठी उपयुक्त आहे.
थर ५ – या सर्वात वर च्या थरात शेवग्याच्या शेंगा, कडीपत्ता, फळं यांना वाढवलं जातं.
फळभाज्यांची लागवड अश्या विविध थरात केल्याने प्रत्येक प्रकारच्या झाडांना स्वतःला वाढवण्यासाठी एक विशिष्ट जागा मिळते त्यामुळे त्यांची चव सुद्धा खूप छान होते.
मल्टी लेअर मेथड मुळे झाडांना पाणी सुद्धा कमी लागतं. सगळे झाड एकमेकांच्या आजूबाजूला असल्याने त्यांच्यातून एक वेगळाच फ्लेवर सुद्धा मिळतो. जसं की, कोबी ही तुळशी च्या बाजूला वाढत असल्याने दोन्ही सुगंधित होतात.
आपण कशी सुरुवात करू शकतो?
नवीन लोकांसाठी डॉ. बिरादार अश्या टिप्स देतात की :
१. सुरुवात ही छोट्या कुंडीने करा. त्यामध्ये शेतातील माती, खत योग्य प्रमाणात घेतल्या नंतर सुरुवात ही टोमॅटो, पालक, मेथ्या, वांगे, मिरची यासारख्या झाडाने करावी.
२. काही दिवस झाडं ही तुमच्या वातावरणाला कसा प्रतिसाद देतात याचा अभ्यास करा. खूप झाडं एकदम लावण्याची घाई करू नका.
३. खूप जास्त पाणी सुद्धा देऊ नका. कधी कधी आपण हे करत असतो. फळभाज्यांना आपण ३ दिवसातून एकदा जरी पाणी दिलं तरीही ते व्यवस्थित वाढतात असा डॉ. बिरादार यांचा अनुभव आहे.
४. तुम्ही लावलेल्या मातीचा सुद्धा प्रकार समजून घ्या. थोड्या प्रमाणात खतांचा वापर करून नंतर गरजेप्रमाणे तो वापर वाढवा.
५. गार्डनिंगकडे एक काम म्हणून बघू नका. त्याकडे एक आनंद देणारा खेळ म्हणून बघा.
एकदा तुम्हाला झाडांची पूर्ण माहिती झाली की, झाडांचं प्रमाण आपण वाढवू शकतो. जागेची कमतरता असलेल्या ठिकाणी सुद्धा अश्या प्रकारची मल्टी लेअर गार्डनिंग ही खूप उपयुक्त ठरते.
डॉ. बिरादार यांनी त्यांच्या गच्ची च्या भिंतींवर रोजमेरी, तुळस, अद्रक यांची झाडं लावली आहेत. ज्या झाडांना फार उन्हाची गरज त्यांचं संरक्षण करण्यासाठी डॉ. बिरादार यांनी स्नेक प्लँट आणि क्रिपर्स सारखे झाड लावून आवश्यक ती सावली त्यांनी छोट्या झाडांना दिली.
एकाच कुंडीत ५ आडवे भाग करण्याचा सुद्धा एक अनोखा प्रयोग डॉ. बिरादार यांनी केला आणि तो यशस्वी झाला. विविध प्रकारच्या झाडांमध्ये सुद्धा एक नातं असतं असं डॉ. बिरादार यांचं मत आहे.
त्यांनी टोमॅटो आणि तुळस एकत्र लावली ज्यामुळे दोन्ही झाडांचं किड्यांपासून संरक्षण झालं. त्याच बरोबर शेंग जी की नायट्रोजन तयार करतो आणि पालक ज्याला की नायट्रोजन ची गरज असते अश्या झाडांची जोडी करून त्यांना एकत्र लावलं.
यामुळे मातीचा दर्जा सुद्धा सुधारला. या सर्व टिप्स मागे डॉ. बिरादार यांची कित्येक महिन्याचे अथक परिश्रम आणि प्रयोग आहेत.
पाणी कसं वाचतं?
शंभर कुंडया असलेली या बागेला खूप पाणी लागतं असं कोणालाही वाटू शकतं. डॉ. बिरादार यांनी पाणी कमी लागावं यासाठी त्यांनी मातीमध्ये एक कुंडी पुरली आहे आणि त्यामध्ये पाणी साठवून ठेवलं आहे.
मातीखाली असलेली ही कुंडी ही ज्याप्रकारे झाडं पाणी शोषून घेतात त्या प्रमाणे रिकामी होत जाते. या कुंडी मध्ये दर आठवड्यात फक्त १ लिटर पाणी भरवून ठेवावं लागतं जे की नेहमीच्या झाडांना पाणी देण्याच्या पद्धतीपेक्षा ९०% कमी आहे.
खत सुद्धा घरीच तयार करायचं :
डॉ. बिरादार यांनी “पाईप कम्पोजिंग” ही एक पद्धत शोधून काढली आहेत ज्यामध्ये स्वयपाक घरातील अन्नपदार्थांचे साल टाकली जातात ज्यांचं रूपांतर खतामध्ये होत असतं.
यासाठी त्यांनी कुंडीच्या मातीत एक ६ x ३ फुट आकाराचा एक PVC पाईप लावला आहे ज्यामध्ये अन्नकण टाकल्याने जमिनीला उपयुक्त खत तयार होतं.
आपल्या टेरेस गार्डन बद्दल आणि पूर्ण कुटुंबाचा त्या पुढाकाराला मिळणारा प्रतिसाद बघून डॉ. बिरादार यांना खूप आनंद होतो. त्यांच्या तिन्ही मुलांची सकाळ ही या बागेत होते हे बघून त्यांना खूप समाधान वाटतं.
लॉकडाऊन मध्ये घरातील सर्वांनी एकत्र येऊन बागेची काळजी घेतली आणि तिथे पक्ष्यांसाठी घरटे सुद्धा तयार करून दिली.
डॉ. बिरादार हे त्यांच्या भारतीय मित्रांना सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या गार्डनिंग बद्दल माहिती आणि टिप्स देत असतात आणि त्यामुळे कित्येक लोकांना टेरेस गार्डन साठी प्रेरणा मिळत आहे.
प्रत्येक परिवाराने जर एक किलो भाजीचं उत्पादन घेतलं तर जगातील ट्रान्सपोर्ट कंपनी वर येणारा किती तरी भार कमी होऊ शकतो आणि पर्यायाने तितकं प्रदूषण सुद्धा कमी होईल.
निसर्ग संवर्धनासाठी केलेलं कोणतंही काम हे आपल्याला नेहमीच आनंद देत असतं.
आपल्या गच्चीवर लावलेल्या बागेतील झाडांची रोज थोडी होणारी वाढ बघून खूप समाधान वाटतं आणि ऑर्गनिक भाज्या खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तर आपणही जागा, वेळ आणि आवड असल्यास हा प्रयत्न करूच शकतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.