Site icon InMarathi

सोशल मिडीयामुळे दिग्गज पत्रकारांना आपण मुकतोय का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

महाराष्ट्र टाईम्स या अग्रगण्य दैनिकाचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचे निधन झाले. पत्रकारांची एक पिढी घडवणाऱ्या संपादकांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारे अनेक लेख विविध वृत्तपत्रांत आणि सोशल मिडियावर प्रसिद्ध झाले. त्यातून तळवलकर, द्वा. भ. कर्णिक, कुमार केतकर, अरूण टिकेकर यांसारखे संपादक आजच्या पिढीला माहिती नसल्याची ओरडवजा खंत व्यक्त करण्यात आली. या परिस्थितीची कारणीमीमांसा करणारा हा लेख.

पेपर वाचणे हा मुळातच वडील लोकांचा प्रांत समजला जातो.

वडील फक्त पेपर वाचतात अशी अनेकदा संभावना केली जाते. आजच्या पिढीला पेपर वाचणे अतिशय बोअरिंग काम वाटते. अनेकांच्या घरी पेपर येतो पण ते वाचत नाही. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे माहिती मिळतच असते असे त्यांना वाटते जे फार चुकीचे नसले तरी फारसे बरोबर देखील नाही. वृत्तपत्र म्हणजे ज्ञानाचे भंडार असते, आजुबाजुची परिस्थिती, त्यावरचे भाष्य यातून माणूस म्हणून घडत असतो.

पण हल्ली मत व्यक्त करण्याची जागा फेसबुक ट्विटर ने घेतल्याने पेपर हा फक्त चिवडा खाण्यापुरता उरला आहे. आता पेपरच वाचत नाही म्हटल्यावर त्यात काय असते? हे जाणून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे आजची पिढी अनेक लेखकांच्या, विद्वानांच्या ज्ञानकणांना मुकते आहे.

 

printweek.in

शहरी भागात तरी लोकांना म.टा, सकाळ, टाईम्स, इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांची नावे ऐकून माहिती आहेत. पण ग्रामीण भागात तर ती सुद्धा सोय नाही.

तिथे एक तर पेपर उशिरा पोचतात आणि तिथले स्थानिक वृत्तपत्र कसदार साहित्य पुरवण्यात काही प्रमाणात अपयशी ठरतात. त्यामुळे पेपर वाचण्याची गोडी लागत नाही. हीच मुले शिक्षणाच्या निमित्ताने जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांना या क्षेत्राची जाणीव होते आणि मग थोडेफार वाचले की लगेच विद्वान झाल्याची भावना निर्माण होते. अर्धवट मत तयार होतात आणि ते व्यक्त करायला फेसबुकसारख्या माध्यमांचा आधार घेतला जातो. पण त्यातून ज्ञान किती मिळते हा एक प्रश्नच आहे.

याच परिस्थितीची दुसरी बाजू अशी आहे की जे थोडेफार पत्रकार, संपादक ऐकून माहिती आहे त्यांची लायकी काढण्याचे, टिंगल उडवण्याचे प्रकार वाढत चालले आहे. मुळातच फेसबूक, ट्विटर ने अनेकांना स्वयंघोषित पत्रकार बनविले आहे. ज्यांना शाळेत असतांना इतिहास, भुगोल, राजकारण यांचा तिटकारा होता असे अनेक लोक आता राजकारणावर चर्चा करतात.

मोदी, राहूल गांधी, केजरीवाल यांची खिल्ली उडवली म्हणजे आपल्याला फार राजकारण कळले अशी यांची धारणा असते. त्यांच्यावर मोठ्या मोठ्या पोस्टी पाडल्या की आपण आता मोठे समाजसुधारक झालो असा गैरसमज होतो आणि चुकीचे संदेश समाजात पसरविले जातात.

आजची पत्रकारिता ही झोलाछाप नाहीये, मान्य आहे. पण मुळातच पत्रकारिता करायला भरपूर ज्ञान हवं हे नाकारून चालणार नाही. Electronic Media मध्ये दिसणाऱ्या उथळपणामुळे पत्रकारितेबद्दल लोकांचे फार वाईट मत झाले आहे. प्रेस्टिट्यूट वगैरे शब्दांनी या क्षेत्राचे वलय पार लयाला गेले आहे. त्यात पगार इतर क्षेत्रापेक्षा कमी असल्याने पत्रकारिता म्हणजे भिकेचे डोहाळे हा समज अजुनही आहे. यामुळे पत्रकार आणि पत्रकारिता हा टिंगलटवाळीचा विषय झाला आहे.

पण ही नकारात्मक मतं हिरीरीने मांडणारे किती लोक रोज पेपर वाचतात का हा? एक मोठा प्रश्न आहे.

लोकसत्ता, म.टा, हिंदू या वृत्तपत्रांमध्ये विद्वानांची मांदियाळी असते. रोजचे संपादकीय पान वाचणारे किती लोक आहेत? रविवारच्या पुरवण्या किती लोक वाचतात? नुसतं फेसबूक वर कोणाचे तरी उसने विचार वाचून आपली मतं बनविणं सोपं असतं पण एखादा विषय अभ्यासून त्यावर मत मांंडणं कठीण असतं जे कोणाला करायचं नाहीये. कारण त्यापेक्षा टिंगल करणे जास्त सोपे आहे.

 

इथे अनेक लोक कुमार केतकरांना सुमार केतकर म्हणून कायम हिणवत असतात. पण कुमार केतकरांसारखा विद्वान माणुस शोधून सापडणार नाही.

त्यांची काॅंग्रेसनिष्ठा, संघद्वेष सगळ्यांना माहिती आहे. पण त्यापलीकडले केतकर किती जणांना माहिती आहे? त्यांचे ‘बदलते विश्व’, ‘त्रिकालवेध’ ही पुस्तकं किती जणांनी वाचली आहेत? पण ते सगळं न बघता हल्ली विशीतील मुले सुद्धा कुमार केतकरांवर टीका करतात, जे अतिशय दुर्देवी आहे.

तीच गत गिरीश कुबेरांबद्दल.

आमच्या पिढीला ते फक्त अग्रलेख मागे घेणारे संपादक इतकेच माहिती आहेत. पण बाकी विद्वतेचं काय? त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, अर्थशास्त्राचा अभ्यास, त्यांचा व्यासंग आजच्या पिढीला तोंडात बोटं घालायला लावणारा आहे.

संघाचे प्रवक्ते मा.गो. वैद्य हे त्याचे आणखी एक उदाहरण.

आघाडीचे राज्यशास्त्रज्ञ असलेल्या मा.गों.चं त्यांचं रविवार तरूण भारत मध्ये येणारे ‘भाष्य’ हे सदर म्हणजे ज्ञानाचा खजिना असायचा. पण संघ म्हटलं की अर्ध्या लोकांच्या अंगावर पाल पडते त्यामुळे बाकी बघायचंच नसते.

हिंदू, इंडियन एक्सप्रेस मध्ये सुद्धा पत्रकारच नव्हे तर निवृत्त आयएएस, आयपीएस आॅफिसर, थिंक टॅंक मधील तज्ञ लोक ज्या पद्धतीने लिहितात ती पद्धत आत्मसात करण्याचे कष्ट घेतले तर बराच फरक पडू शकतो. पण आपला समाज आणि बऱ्याचदा शिक्षकसुद्धा पत्रकारितेची एकांगी बाजू विद्यार्थांना दाखवत असतात. त्यामुळे तळवलकर माहीत असो किंवा नसो, त्याने काहीही फरक पडत नाही.

सुब्रमण्यम स्वामींची मुलगी असलेली आणि आता हिंदूच्या ज्येष्ठ पत्रकार सुहासिनी हैदर सांगतात की,

उत्तम पत्रकार होण्यासाठी रोज पाच वर्तमानपत्रे, १० वेबसाईट आणि आठवड्याला एक पुस्तक वाचायला हवं.

अशा टिप्स देणारे किती लोक आसपास आहेत? किंवा त्यांना शोधून त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न किती मुलं करतात? नोकरी करतांना आपल्या ज्येष्ठांना एखाद्या शब्दाचा अर्थ विचारणे, त्याचा उहापोह करणे, नवीन माहिती मिळवणे, चांगली पुस्तके घेऊन वाचणे म्हणजे अतिशहाणपणा समजला जातो. त्यामुळे पत्रकारांविषयी असलेली टिंगलटवाळीची भावना पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांचे खच्चीकरण करते, त्यामुळे फक्त नोकरी करणे हाच एक उद्देश राहतो. त्यातला समृद्ध वर्तमानकाळ आणि सुवर्ण भुतकाळ जाणून घेण्यात कोणालाच रस नसतो.

ही परिस्थिती नक्कीच बदलता येऊ शकते. आपल्याला पत्रकारितेत जायचे असेल तर वाचन चौफेर हवेच पण देशाचा जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा आजुबाजुला काय सुरू आहे याची जाणीव असायला हवी.

आपल्या पाल्यांना रोज एक मराठी आणि इंग्रजी पेपर वाचण्याची सवय लावा. जे मुलं शिकतात त्यांनीसुद्धा हे करायला हरकत नाही. वर्तमानपत्राचे अॅप्स जरी असल्या तरी त्यात फक्त लोकप्रिय बातम्या नोटिफिकेशन मधून आदळत असतात. त्यापलीकडे जाऊन संपादकीय पान रोज वाचावे. जर शब्द समजत नसतील तर शब्दकोशाचा आधार घ्यावा.

पुढे काही दिग्गज लेखकांची नावे देत आहे, त्यांचा स्तंभ आणि त्यांची पुर्वप्रकाशित नक्की वाचावीत आणि कोणत्याही लेखकावर किंवा पत्रकारांवर आणि संपादकांवर टीका करतांना आपला पाय किती खोलात आहे हे स्वत: ला विचारून बघा. समाज नाही बदलला तर तुम्ही नक्कीच बदलाल.

 

http://www.simplydecoded.com

काही दिग्गज स्तंभलेखकांची आणि त्यांचे लिखाण ज्या वर्तमानपत्रात छापून येते त्यांची नावे: 

प्रताप भानू मेहता, प्रवीण स्वामी, सीमा चिस्ती, इला पटनायक- इंडियन एक्सप्रेस

पी.साईनाथ, एन राम, एम. के.नारायणन, डी.शिवानंदन, आर. के राघवन- द हिंदू

कुमार केतकर, गिरीश कुबेर, संतोष कुलकर्णी,(दोघेही लोकसत्ता) प्रशांत दिक्षीत,(दिव्य मराठी) श्रीराम पवार,(सकाळ) श्रीकांत बोजेवार, अशोक पानवलकर (म.टा)

लेखक मुक्त पत्रकार आहेत

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version