आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
भारतासाठी १९७२ हे वर्षं भीषण दुष्काळाचं वर्षं म्हणून (कु)प्रसिद्ध ठरलं. त्याच वर्षी एक स्पॅनिश तरुण महात्मा गांधींच्या विचार नि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता. दिल्लीत गेला. बऱ्याच लोकांना भेटल्यावर त्याच्या लक्षात आलं की गांधींजींविषयी इथल्या लोकांना नुसती तोंडदेखली आस्था आहे. बाकी काही विशेष नाही. त्याचा भ्रमनिरासंच झाला कारण अर्थात फार मोठ्या अपेक्षेने तो भारतात आला होता. पण निराश न होता त्याने अनेक ग्रंथालंयं धुंडाळली, गांधींजींविषयी मिळेल तेव्हढं वाचलं, त्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ वाचलं, स्वतःला गांधीवादी समजणाऱ्या काही लोकांनाही भेटला; बोलला, पण त्याचं पुरेसं समाधान झालं नाही. त्याच्या मनातल्या गांधींजींच्या नुसत्या प्रतिमेजवळ तरी जाऊ शकेल अशा एकही गांधीवाद्याचा शोध काही लागला नाही.
‘गांधीजींचा वैचारिक ‘वारसदार’ कोण’? या प्रश्नाच्या शोधात असताना त्याला माहिती कळली कि, तिकडे दूर महाराष्ट्रात वर्ध्याला एक व्यक्ती आहे, तिला लोक गांधीजींचा खरा शिष्य वगैरे म्हणतात, त्यांच्याविषयी आणखी जाणून घेतल्यावर पाहुण्याला फारच आश्चर्य वाटलं. त्याला असंही कळलं की ही वयोवृद्ध व्यक्ती म्हणे एव्हढ्या प्रचंड देशात सर्वत्र पायी चालत हिंडलीये.
त्यानेही मग दिल्लीहून चालत वर्ध्याला जायचं ठरवलं आणि तसा कित्त्येक दिवसांचा, हजार – दिड हजार किमीचा प्रवास चालत करून तो वर्ध्याजवळच्या ‘पवनार’ला पोचला. त्याने आश्रमातल्या साधकांजवळ विनोबांना भेटण्याची इच्छा व्यक्तवली. आपण इथे कशासाठी, कुठून नि कसे आलोय हेही थोडक्यात सांगितलं. साधकांनी हि माहिती ‘बाबा’ अर्थात विनोबांना सांगितली. विनोबांनी थोड्या वेळाने त्याला भेटायला बोलावलं. पाहुणा विनोबांच्या छोट्याशा कुटीत शिरला. एकूण आश्रम परिसर, तिथलं वातावरण आणि कुटीत खादीच्या अगदी आवश्यक इतक्याच वस्त्रांत असलेले ‘गांधीजींचे शिष्योत्तम’ पाहून त्याला भयंकर आश्चर्यच वाटलं, त्याने कल्पना केली होती त्याच्या हे सर्व अगदी विपरीत होतं.
एखाद्या समृद्ध परिसरात वसलेल्या आश्रमात, प्रचंड आसनावर आरूढ झालेला भारदस्त पुरुष आपल्याला दर्शन देईल अशी काहीशी त्याची कल्पना होती. पण इथे तर दुष्काळात आणखीच शुष्क झालेल्या, रखरखीत प्रदेशात आटोपशीर जागेतल्या आश्रमातल्या अगदी लहानशा झोपडीत एक दाढी वाढलेला, डोक्यावरच्या केसांचा बहुधा कधीच भांग न पाडलेला, अत्यंत कृश नि चष्मेवाला वृद्ध, सूत कातत बसला होता. पटकन पाहुण्याला चुकल्या सारखंच वाटलं. त्याने हेच ते विनोबा आहेत ना, याची खात्री करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. विनोबा मात्र खंड न पडू देता सूत कताई करतंच होते. पाहुणा काहीसा चक्रावलाच. त्याने साध्या, किंचित तोडक्याच इंग्लिश मध्ये स्वतःचा अल्पसा परिचय समोर बसलेल्या वृद्ध पण तेजस्वी व्यक्तीला करून दिला. आपल्या प्रवासाचा उद्देश सांगितला आणि “मी स्पेन हून आलोय” हेही सांगितलं.
विनोबा त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता त्यांच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं काम करत होते. काही क्षणानी विनोबानी पाहुण्याला अचानक ‘स्पॅनिश’ भाषेत – पाहुण्याच्या मातृभाषेतंच – एक प्रश्न विचारला. आता मात्र पाहुणा चांगलाच चकित झाला होता. पुढचा काही वेळ विनोबांशी स्पॅनिश भाषेत बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं की विनोबांना स्पॅनिश, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि १४ मुख्य भारतीय भाषांसकट एकंदर २० – २२ भाषा चांगल्या बोलता येतात, त्यांचं व्याकरणही समजतं. शिवाय या भाषांचे इतिहास, त्यातले धातू, शब्दांच्या व्युत्पत्ती, त्या भाषांमधलं साम्य आणि भेद याविषयीही खूपंच ज्ञान आहे. एकीकडे विनोबांचं सूत कताईचं महत्त्वाचं काम तसंच चालू होतं, तर स्पॅनिश तरुणाची मती, ‘एखादा चमत्कारी, अवतारी साधूबाबाच आपल्या समोर बसलाय आणि यापुढे तो काहीही घडवून आणू शकेल कि काय या कल्पनेने कुंठित वगैरे झाली होती. “आप ‘यहां’ क्या कर रहे हो बाबाजी” अशा विस्मयचकित भावनेने त्याने विनोबांना नमस्कार केला आणि जीवनात मार्गदर्शनपर असा काही ‘संदेश’ देण्याची विनंती केली.
विनोबांनी जीवनाचा संदेश वगैरे सांगण्यास नकार दिला पण त्याच्याकडच्या ‘गांधीजींच्या आत्मकथे’वर ऋग्वेदातल्या एका सुप्रसिद्ध ऋचेचा केवळ एक चरण लिहून दिला.
आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वतः।
पुढेच स्पॅनिश मध्ये ऋचेचा अनुवादही लिहिला.
विश्वातील सर्व भद्र विचार – संकल्प विश्वभरातून आमच्याकडे येवोत.
एरव्ही अगदी माफक, अत्यावश्यक तेव्हढंच बोलणाऱ्या विनोबांसाठी इतका संवाद म्हणजे खूपंच जास्तं होता. विनोबांनी त्याला येण्याची सूचना केली. स्पॅनिश पाहुणाही खूपंच कृतकृत्य वगैरे झाला होता. न भूतो न भविष्यती असा मनुष्य त्याने ‘गांधीजींचा शिष्य’ या रुपात पाहिला होता. त्या ऋचेचा अनुवाद मनात घोळवत पाहुणाही निघाला. विनोबांचं काम तसंच पुढेही चालू राहिलं.
आपल्याकडे, विनोबा भावे म्हणताच सामान्यपणे, एक खादी वापरणारा गांधीवादी आणि फारतर ज्याला संत / आचार्य वगैरे म्हंटलं जातं असा मनुष्य अनेकांच्या डोळ्यासमोर येतो. बहुतेकांना विनोबा म्हणजे ‘गीताई’ चे निर्माते आणि गीतेचे प्रवचनकार इतपत माहिती आहेत.
कित्त्येकांना फक्त त्यांचे “अनुशासन पर्व” हे ‘(लिखित)उद्गार’ आठवतात आणि त्या एका अर्धवट माहितीवर आधारित असलेल्या गोष्टीवरून विनोबांवर टिका करायची परंपरा गेली चाळीस वर्षं टिकून आहे. मुळात आता विनोबांचं स्मरण करण्याचीच फारशी कुणाची इच्छा उरली नसल्याने टिकेची वारंवारिता तेव्हढी कमी झालीये इतकंच.
एका स्वतःला शहाण्या समजणाऱ्या, “सुशिक्षित” समूहाला तर विनोबांपेक्षा गोडसेच अधिक जवळचा नि प्रिय वाटतो – आठवावासा वाटतो. त्यामुळे विनोबां मधला एक प्रकाण्ड पंडित, बहुभाषाप्रभू प्रचंड ज्ञानी नि तत्त्वज्ञ कुणाला आठवावासा वाटत नाही यात काही विशेष आश्चर्य नाही.
(प्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर १९७२ चा दुष्काळ एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी ‘कव्हर’ करायला विदर्भात गेले असता ‘पवनार’लाही गेले होते. तेंव्हा त्यांना विनोबांचं जसं समक्ष दर्शन झालं त्यावर त्यांनी ‘क्रांतदर्शी ऋषि’ शीर्षक असलेला लेख लिहिलाय, ‘एडिटर्स चॉईस’ या पुस्तकात तो संग्रहित करण्यात आलाय.)
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.