वाल्मिकींपेक्षाही सुरस रामायण हनुमंताने लिहिलं होतं; पण ते नष्ट झालं, कारण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“योग्य गोष्टीचं श्रेय योग्य व्यक्तीलाच मिळावं” हे वाक्य अगदी बरोबर आहे. कलाक्षेत्रात तर हे आपण बऱ्याच वेळेस बघतो, की एखादी कलाकृती ही एका कलाकाराने तयार केलेली असते आणि नंतर त्याचीच कॉपी काही लोक करत असतात आणि त्या व्यक्तीला श्रेय न देता स्वतःच्या नावावर ती वस्तू किंवा कलाकृती खपवत असतात.
राजकारणात सुद्धा आपण हे काहीवेळेस बघतो, की एखादी योजना राबवल्यानंतर दोन नेत्यांमध्ये किंवा पक्षांमध्ये एक श्रेय वाद सुरू असतो.
आपला देश, आपली संस्कृती ही नैतिकतेला धरून असणारी संस्कृती म्हणून जगात लोकप्रिय आहे, पण ही सगळी उदाहरणं एकच गोष्ट सांगतात, की काही लोक ‘फक्त माझं नाव व्हावं’ या अति महत्वाकांक्षेमुळे आपण इतरांपेक्षा कसे सरस आहोत हे दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात.
अशीच पौराणिक काळात घडलेली एक घटना सांगत आहोत, जिथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची कलाकृती जगासमोर यावी म्हणून खूप मोठा त्याग केला होता. कथा होती ‘रामायण’ आणि हा त्याग केला होता पवनसुत हनुमान यांनी.
वीर हनुमान म्हणजे बजरंग बली हे प्रभू श्रीरामाचे सर्वोच्च भक्त आहेत हे आपण सगळेच जाणतो. त्याशिवाय हनुमान हे एक शक्तिशाली, प्रसंगावधान बाळगणारं दैवत आहे.
आपल्यापैकी काही लोकांना हे माहीत असेल, की रामायणात रामाची सावली म्हणून वावरलेल्या या भक्ताने स्वतः सुद्धा रामाची यशोगाथा आणि शौर्यगाथा सांगणारे ‘रामायण’ लिहिले होते.
हनुमंताने लिहिलेल्या रामायणाला ‘हनुमद रामायण’ हे नाव देण्यात आले होते. हनुमानाने हे रामायण त्यांच्या नखाने हिमालयातील दगडांवर लिहिलं होतं अशी एक आख्यायिका आहे. रावण वध केल्यावर जेव्हा हनुमानजी हिमालयात निघून गेले होते, तेव्हा त्यांनी हे लिखाण केलं होतं असा काही ठिकाणी उल्लेख आहे.
शिवपुराणांमध्ये असलेल्या उल्लेखांनुसार शिव अवतार असलेले हनुमान हे रोज हिमालयातील दगडांवर प्रभू श्रीराम यांच्यासोबत जगलेल्या प्रत्येक दिवसाचा अनुभव लिहून ठेवत असत.
प्रभू श्रीराम यांच्याबद्दल असलेली त्यांची निस्सीम भक्तीला ते शब्दात मांडायचा प्रयत्न करायचे. हे रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या ‘रामायण’ च्या कित्येक वर्षांआधीच लिहिलं गेलं होतं.
एक अशी नोंद आहे, की वाल्मिकी ऋषी यांनी जेव्हा रामायणाचं लिखाण पूर्ण केलं, तेव्हा त्यांनी हनुमान यांना रामायणाची प्रत दाखवली. त्याच वेळी वीर हनुमान यांनी सुद्धा त्यांनी लिहिलेली रामाची शौर्यगाथा महर्षी वाल्मिकी यांना दाखवली.
‘हनुमद रामायण’ वाचतांना महर्षी वाल्मिकी खूप भारावून गेले. कोणत्या शब्दात हनुमान यांना या लिखाणाचा अभिप्राय द्यावा हे त्यांना कळत नव्हतं. ‘हनुमद रामायणा’समोर आपण लिहून आणलेलं रामायण हे तितकं चांगलं नाहीये असं वाल्मिकी ऋषींना वाटलं.
थोड्याच वेळात वाल्मिकी ऋषींच्या चेहऱ्यावर एक उदासीनता पसरली. आपल्या रामायणापेक्षा पवनपुत्र हनुमान यांनी लिहिलेलं रामायणच जगासमोर यायला पाहिजे असं त्यांना वाटलं. ‘हनुमद रामायणा’समोर आपण लिहिलेलं रामायण हे नेहमीच दुर्लक्षित राहील असं त्यांना वाटलं.
त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी हनुमानाने लगेच हेरली. त्यांच्या तोंडून नाराजीचं कारण ऐकण्यासाठी हनुमानाने वाल्मिकी ऋषींना बोलतं केलं.
तेव्हा ते म्हणाले, “मी खूप कठोर परिश्रमानंतर रामायणला मूर्त स्वरूप देऊ शकलो. तरीही तुमच्या रामायण समोर हे रामायण काहीच नाहीये.”
वाल्मिकी ऋषींचं हे वाक्य संपताच हनुमानाने प्रसंगावधान, सामंजस्य दाखवलं आणि स्वतः लिहिलेलं रामायण समुद्रात टाकून दिलं. ‘हनुमद रामायण’ त्यानंतर कोणालाही कधीच वाचायला मिळालं नाही.
धन्य ते प्रभू श्रीराम आणि धन्य तो बजरंग बली. स्वतःचं नाव व्हावं, श्रेय मिळावं याचा लवलेशही हनुमानाकडे नव्हता. कदाचित म्हणूनच युगा युगानंतर आज हनुमानाची पूजा केली जाते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.