आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
फॅशन ट्रेन्ड कडे नीट लक्ष दिलं, तर जुन्याच फॅशनचेच नूतनीकरण होऊन तेच ट्रेंड पुन्हा येत असतात.
८० च्या दशकातील केसांचा पफ, ते पूर्वीच्या स्त्रिया जशा कोपरापर्यंत लांब ब्लाऊज घालायच्या ती पद्धत आता पुन्हा फार चलनात येणे, जुन्या नट्यांनी आय लायनर किंवा काजळाने डोळ्यांवर काढलेली चंद्रकोर आपणही काढणे.
जुन्या डिजाईनचे दागिने, आयुर्वेदाकडे वळून जुन्या पद्धतीचा आहार, काढे, आयुर्वेदिक फेस मास्क सगळं सगळं पुन्हा पुन्हा फॅशन मध्ये येतंय. पण एक दागिना असाय ज्याचे काही ठिकाणी काळानुसार बदललेलं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं, कधी अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेलं पारंपरिक स्वरूप बघायला मिळतं.
आधी आई आजी सांगायच्या म्हणून तो दागिना घातला जायचा पण आजकाल कोणत्या रॉकस्टार ने त्याचे “मॉडर्न व्हर्जन” घातले म्हणून आपणही ते तसंच घालायचं या हट्टाने तो दागिना घालतो.
प्रत्येक वेशभूषेवर अगदी त्याच वेशभूषे प्रमाणे स्वतःला ढाळणारा दागिना म्हणजे “नथ”.
होय, आपली पारंपरिक नथ. पूर्वीच्या काळी मानाचे आणि सौभाग्याचे लक्षण समजले जाणे ते मॉडर्न फॅशन नुसार “नथीचा नखरा” म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या ह्या नथीच्या वापरण्यामागे काय कारणे आहेत ते जरा जाणून घेऊया.
असं म्हणतात नथ ही मूळची भारतीय नाही. कारण आपली वैज्ञानिक पुस्तकं, पुराणं, इत्यादी नथीबद्दल काहीच सांगत नाहीत, ती नथेविषयी मौन आहेत. त्यामुळे नथ ही नक्की अपल्याकडची आहे का हे ठोस पणे सांगणे जरा कठीणच.
याच उलट, मुघल इतिहासात नथीची नोंद मात्र मिळते. काही इतिहासकारांचं असं मत आहे की नथ हि मध्य पूर्वेतून जेव्हा मुघल भारतात आले, त्यांच्याबरोबर भारतात आली आणि भारतीय अलंकारांपैकी एक बनली.
मुघल स्त्रियांचा शृंगार हा नथीशिवाय अपूर्ण समजला जाई. नथीचा उगम हा मुघलांपासूनच झाला हे म्हणण्यास हरकत नाही.
भारतीय स्त्रियांना हा अलंकार आवडला व तिथून तो संपूर्ण भारतात प्रचलित झाला असे आपण समजुया.
आज महाराष्ट्रात चंद्रकोरे प्रमाणे दिसणारी मोत्यांची नथ नाकाच्या डाव्या नासिकेत घालतात, तर उत्तर भारतात एक खडा किंवा छोटा खऱ्या हिऱ्याने जडलेली एक चमकी घातली जाते.
दक्षिणेत मात्र नथ क्वचितच ठिकाणी वापरली जाते. दोन्ही नासिकांच्या मध्ये असलेल्या जागेवर कानात बाळी घालतो त्याप्रमाणे छोटी बाळी घातली जाते, तिला “मुक्कुट्टी” म्हणतात.
ईशान्य भारतात सुद्धा याच पद्धतीने दोन्ही नासिकांच्या मध्यभागी नथ घातली जाते. गुजरात एकमेव असं राज्य आहे जिथे नवरी नाकाच्या उजव्या बाजूस नाक टोचवून नथ घालते.
सोळा शृंगारांपैकी असलेली नथ घालण्यामागची काही कारणं –
१) आयुर्वेदातील उल्लेख –
आयुर्वेदात नथीचा असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. पण स्त्रियांच्या डाव्या नासिकेतून जाणाऱ्या काही रक्तवाहिन्या गर्भाशयाशी सुद्धा जोडलेल्या असतात.
त्यामुळे ह्या बिंदूवर टोचवून घेतल्याने स्त्रियांना प्रसुतीपीडा कमी होते व बाळंतपणात फार त्रास सहन करावा लागत नाही व प्रजननाशी संबंधित सगळे अवयव सुदृढ राहतात असे म्हटले आहे.
२) सुश्रुत संहिता –
सुश्रुत संहितेचा “अध्याय १९ चिकित्सा स्थान ” यात नाक टोचवून घेण्याचे महत्व सांगितलेले आहे.
बाळंतपण सोपे होण्याव्यतिरिक्त स्त्रियांचे व ऋतुप्राप्ती झालेल्या मुलींचे नाक टोचल्याने त्यांना मासिक पाळीच्या वेळी अतिरिक्त रक्तस्राव होणे, पोट दुखणे, कंबर दुखणे, ऍनिमिया होणे हे त्रास कमी होतात.
या शिवाय नथीचा इतर कोणत्याही पोथी पुराणात किंवा कोणत्याही आरोग्यासंबंधी ग्रंथात उल्लेख मिळत नाही.
३) वात कमी होणे –
डॉक्टरांचे म्हणजेच मॉडर्न विज्ञानाचे असेही म्हणणे आहे की आपल्या शरीरातील नाकाचे आणि कानाचे बिंदू टोचून घेऊन धातू वापरल्याने अंगातील वात ताब्यात राहतो.
त्यामुळे नाक टोचवल्याने ऍक्युप्रेशर होऊन हात पाय अकडणे, फीट येणे, अंगात कळा येणे, चमक निघणे, हाता पायांत गोळे येणे, हात पाय वाकडे होणे हे सगळे वाताचे प्रकार आपल्याला टाळता येतात.
४) उष्णता कमी होणे –
नाक किंवा कान टोचवून घेऊन त्यात सोन्याची कुंडलं किंवा सोन्याची नथ घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषली जाते.
त्यामुळे उष्णतेमुळे होणारे आजार जसे पित्त खवळणे, अंगावर फोड पुटकुळ्या होणे, हातापायांची सालं निघणे, भेगा पडणे, नाक फुटून रक्तस्राव होणे हे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात.
५) मानसिक आरोग्यावर उपयुक्त –
असे म्हणतात स्त्रियांचे नाक टोचून त्यात सोन्याची किंवा चांदीची नथ घातल्याने त्यांच्यात झटपट होणारे मूड स्विंगज् कमी होऊ शकतात. नकारात्मक विचार येणे थांबते, मन विचलित होणे थांबते आणि कॉन्सन्ट्रेशन वाढते.
ज्या स्त्रीचे नाक टोचलेले असेल ती स्वभावाने चंचल नसून तीचे विचार एकदम स्पष्ट असतात व ती स्त्री मजबूत मनाची आणि खंबीर असते असेही म्हटले जाते.
मॉडर्न वैज्ञानिक संशोधना नुसार रक्तदाब नियंत्रणात राहणे, श्वासनाच्या अजरांपासून बचाव होणे, कानाचे विकार न होणे नथ घालण्याचे हेही काही महत्वपूर्ण आरोग्यवर्धक फायदे आहेत.
नथ वापरण्यामागील काही लोकमान्यता –
१) पार्वतीचा आशीर्वाद –
पार्वती म्हणजेच सौभाग्याची देवता, तिच्या आशीर्वादाने मनासारखा वर प्राप्त होतो, सौभाग्य अखंडित राहते अशी भारतीय पुराणांत मान्यता दिलेली आहे.
त्यामुळे राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, म्हणजे उत्तर भारतातील काही मान्यतांप्रमाणे नाकातील नथ हि सौभायाचे प्रतिक असते असे समजले जाते.
तिथल्या मुलींना लग्ना आधी नाक टोचून घ्यावेच लागते. आपल्याकडे मंगळसूत्राला जितके महत्व आहे तितकेच महत्व उत्तर भारतात नथीला आहे.
२) लक्ष्मी देवीचा आशिर्वाद –
भारतात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे काही भागात नाक टोचून त्यात सोन्याची छोटीशी चमकी घालण्याला देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मानले जाते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.